निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||

Submitted by निमिष_सोनार on 12 October, 2014 - 01:28

निंदकाचे घर असावे शेजारी असे जरी पूर्वजांनी सांगून ठेवले आहे तरी हे निंदक कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला मारक ठरतात. त्यातल्या त्यात जर हे निंदक घराशेजारी नसून जर आपल्या घरातच असतील तर मग पाहायलाच नको.

निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण":
नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात.

मुळात कुणाची निंदाच करणे चूक आहे. कारण निंदा करणारा हा स्वत: कोणत्या ना कोणत्या बाबतीत कमजोर असेलच की ज्यामुळे इतर लोकांच्या तो निंदेला पात्र असेल. मग निंदा करून मिळते काय? निंदा ही एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीला त्याचा बुद्धीनुसार झालेले आकलन असते. त्यामुळे निंदा व्यक्तिसापेक्ष असते जसे की सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते आणि सत्याला अनेक बाजू असतात. किंबहुना सत्य हेच स्वत: एखाद्या माणसाकडून थोड्या असत्याचा अंश घेऊन जन्मलेले असते. तसेच निंदेचे असते.

काही निंदक लोक दोन्ही बाजूंनी बोलतात.
समाजात अशा दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध असले पाहिजे. एकवेळ एका विशिष्ट विचारसरणीला धरून चालणारा शत्रू आणि निंदक परवडला पण सतत रंग बदलणारे सतत स्वत:च्या फायद्यासाठी आपले विचार बदलणारे व ते विचार त्यांच्या सोयीनुसार दुसऱ्यांवर लादणारे मित्र आणि नातेवाईक यापासून मात्र सावध असले पाहिजे.

उदाहरणार्थ, कुणी मुद्दाम आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण शांत असलो तर "बर्फासारखा थंड" आणि संतापलो तर "भडकू डोक्याचा" असा शिक्का आपल्या कपाळावर मारतात. पण आपण लोकांच्या प्रत्येक म्हणण्यानुसार सतत स्वत:ला बदलत गेलो तर आपल्याला जगणे मुश्कील होईल आणि आपले स्वत्व उरणार नाही, म्हणून शांत राहणे व बोलणे हेच फायदेशीर असते कारण हे दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक स्वत: सुद्धा आदर्श नसतात आणि संताप हा केव्हाही चांगला नसतोच. तसेच "थंड आणि संताप" यातील सुवर्णमध्य कधीच अस्तित्वात नसतो. मुळात सुवर्ण मध्य ही संकल्पनाच व्यक्तिसापेक्ष आणि प्रसंग सापेक्ष आहे. म्हणून शांत राहणे योग्य!

शिक्केवाले निंदक प्रत्येकाला "हा असा आहे आणि तो तसा आहे" असे शिक्के मारत फिरतात. स्वत:च्या कपाळावर कोणता शिक्का आहे याचा त्यांना मात्र सोयीस्करपणे विसर पडतो.

त्याचप्रमाणे काही निंदक हे सतत एखाद्या व्यक्तीतला दोष काढण्यात गुंतलेले असतात. त्यांना फक्त ठराविक व्यक्तीतले गुण तर ठराविक व्यक्तीतले दोषच दिसतात. हे तर फारच विषारी निंदक. अशा निंदकांच्या सहवासात राहिल्यावर आत्मविश्वासाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आणि हे निंदक आपल्या घरातलेच असतील तर मग काही पाहायलाच नको.

काही निंदक सतत तुलना करतात. इतरांच्या मुलावरून स्वत:च्या मुलांना बोलणे, तो बघ कसा आहे आणि तू? यात "तू" हा "तो" चा आदर्श घेणे तर दूरच राहाते पण "तो" आणि "तू" मध्ये तुलनेमुळे द्वेष मात्र वाढीस लागतो. हे तुलनाबाज कहर करतात. हे सतत आपल्या दोन मुलांमध्ये तुलना करतात, त्या दोन मुलांच्या मुलांमध्ये सुद्धा तुलना करतात.

आता तुम्ही म्हणाल निंदकांकडे लक्ष न देता आपले मार्गक्रमण करत राहावे. पण प्रत्येकाला प्रत्येक वेळेस हे शक्य होत नाही. प्रत्येक जण स्वचालक (internally driven) नसतो, काही जण लोकप्रमाणचालक (externally driven) असतात आणि ते या निंदकांना बळी पडतात.
या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुरू केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते.

निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||
सव्वाशेर दणका द्या जरा | निंदकांची निंदा करा ||
म्हणा त्याला परनिंदा सोडा | थोडी स्वनिंदा करा ||
तेव्हा निंदक होई बरा | अन समाज सुदृढ होईल खरा ||
आपल्याला काय वाटते? सांगता का जरा ....!!
निंदाबुद्धी विनश्यते । ओम शांती शांती शांती ॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख १०० टक्के पटला. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिकत असताना इयत्ता आठवी ते दहावी अशी तीन वर्षे तीन सॅडिस्ट शिक्षिकांचा (सौ. सुहासिनी पानसे, सौ. अलका अविनाश शाळू आणि कुमारी अलका नलावडे) असाच अनुभव आला. मला ईयत्ता सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत १४ वा क्रमांक व सोबत शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर ह्या केवळ ह्या तिघी जणींनी मी कसा अवगुणी आहे हे पदोपदी मला ठासून सांगत इतरांसमोर हिणविण्याची एकही संधी सोडली नाही. ह्या तिघी सोडल्या तर इतर सर्व शिक्षक शिक्षिकांनी पाठिंबा दिला, कौतुक केले, पण ह्या तिघींनी जो प्रचंड मनस्ताप दिला त्यामुळे व्हायचे ते नुकसान होऊनच गेले. सातवीपर्यंत पहिल्या तीनात असणारा मी दहावीला वर्गातून चक्क तेहतिसावा आलो. ९०+ टक्के गुण मिळणे अपेक्षित असताना केवळ ७९.४२% च मिळाले आणि त्यामुळे अभियांत्रिकी पदविके करिता प्रवेश घेताना महत्त्वाची शाखा मिळू शकली नाही आणि संबंध उर्वरित आयुष्याकरिता कायमची हानी झाली.

असे कोणासोबतही घडू नये, ही ईच्छा.

चेतन जी आपल्यासोबत घडले ते वाचून वाईट वाटले. अशांना ठिकाणावर आणण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ (हेडमास्तर) कडे तक्रार करून त्या तिघींची निंदा / टीका इतर शिक्षकांसमोर करवून घ्यायला हवी होती. अर्थात तुम्ही तेव्हा लहान होतात.
एनीवे, घडले ते घडले.
आता फक्त आपण यापुढे आपली मुले वगैरे यांचे सोबत जर असा प्रकार झाला तर त्यांना त्यांचे चांगले गुण दाखवून आत्मविश्वास वाढीस लावला पाहिजे आणि स्वत: आपण सुद्धा कुणाची अशी सतत निंदा टाळली पाहिजे.......

त्याचप्रमाणे काही निंदक हे सतत एखाद्या व्यक्तीतला दोष काढण्यात गुंतलेले असतात. त्यांना फक्त ठराविक व्यक्तीतले गुण तर ठराविक व्यक्तीतले दोषच दिसतात. हे तर फारच विषारी निंदक. >> अनुमोदन. त्यांच्या
जीवनातले काही फ्र्स्ट्रेशन असेल तर आपल्या वर काढतात. कायम धारेवर धरल्यासारखे करतात. आ पल्या परिस्थितीचा काहीही अनुभव नस्ताना जज करतात. अश्या लोकांना तुम्ही किती ही समजावून सांगितले तरी ही समजत नाही. कारण त्यांना कायम उखडूनच राहायचेअसते. आज तुम्ही उद्या दुसरे कोणी तरी. ह्यांच्यापासोन दूर राहावे.

विलास मनोहर यांचे अमावस्येचा चंद्र हे पुस्तक जरूर वाचावे. एका वयस्कर माणसाला ग्रंथालयात काम करणारी एक काळी सावळी पण आकर्षक दिसणारी तरूणी फारच आवडत असते. अर्थात वयातील फरकामुळे ती तरूणी आपल्याला प्रतिसाद देणार नाही हे देखील ह्या वयस्कर माणसाला ठाऊक असते. हा माणूस मग तिची प्रशंसा करून तिचे मन जिंकण्याऐवजी (कारण त्याचा उपयोग होणार नाही हे जाणून) तिच्या सावळेपणावरून तिची सतत निंदा करू लागतो. योगायोगाने त्याचा मुलगा प्रेमविवाह करून याच तरूणीला घरी घेऊन येतो. आता ही त्याची सून झाल्यावर हा खलनायक तिचा अनन्वित छळ करू लागतो. त्याकरिता तो तिची सतत जातीवरून, दिसण्यावरून आणि इतरही वेगवेगळ्या कारणाने निंदा करू लागतो.

बहूतेक निंदक हे असेच असतात. ते तुमच्या गुणांवर जळतात. त्यांना तुमचे आकर्षण वाटत असते, पण तुमच्याकडून प्रतिसादाची शून्य अपेक्षा असल्यानेच नैराश्येपोटी तुमच्यावर अतिरेकी टीका करीत राहतात. मला त्रास देणार्‍या तीन शिक्षिकांपैकी एक कुमारी होती, ती याच कॅटेगरीतली. अर्थात हे मला फार उशिराने समजले. म्हणजे मी शालेय आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण संपवून नोकरीला लागलो. बुलेट वरून फिरत असायचो, तेव्हा या बाई रस्त्यात कुठेही भेट झाली की मला आवर्जून हात करून थांबवायच्या. तोंड भरून हसत विचारपूस करायच्या. शाळेत असताना इतक्या तुसडेपणाने वागणार्‍या या बाईंच्या स्वभावात इतका बदल कसा? हे मला कळेचना. योगायोगाने त्याच दरम्यान वाचनालयातून हे अमावस्ये चंद्र पुस्तक माझा वाचनात आले आणि सार्‍या प्रकाराचा व्यवस्थित उलगडा झाला.

अर्थात "थप्पड से डर नही लगता, प्यारसे डर लगता है" अशी माझी अवस्था होऊन मी त्या बाईंना शिताफीने टाळू लागलो. पण एक मात्र झाले की आधी अशा निंदेमुळे माझा आत्मविश्वास डळमळीत व्हायचा तो प्रकार बंद होऊन उलट आता अशी कुणी 'निंदकीण" भेटली म्हणजे त्यामागील तिचा अंत:स्थ हेतू कळून स्वतःचा रास्त अभिमान वाटू लागतो.

या निदकावर एक सोपा उपाय आहे ............ मी आतापर्यत तो यशस्वीपणे वापरला आहे........
एखादा माणूस जर सतत या ना त्या कारणाने तुमची निन्दा करत असेल....उदाहरणार्थ तुझी भाजी कशी बेचव आहे तर आपणच जाहिर करायचे होना मला ना नीट येतच नाही स्वयम्पाक.... पुढ्च्या वेळापासून ही भाजी तुम्हीच करा......बास तिथेच तो विषय सम्पतो पुन्हा कोण तुमच्या भाजीला काही म्हणणार नाही....... अर्थात योग्य टिका कोणत्या आणि चुकिच्या कोणत्या यात आपण फरक करायला हवा.......

किवा कोणी तुमच्या कडून उगीच पार्टी उकळ्यासाठी तुम्ही किती कन्जूस आहात अस म्ह्णत असेल तर बिनधास्त बोलावे जगातल्या टॉप १० कन्जूस लोकान्च्या यादीत माझे नाव आहे...(हेच तुम्ही आळ्शी आहात, घरात पसारा करता, यावर उपयोगी पड्त.)... भले तुम्ही कितीही पैसाचा दानधर्म करत असाल मग.
तसच कोणी ऑफिस मधला सहकारी सतत तुम्ही कॉफी प्यायला गेलात की लगेच तुम्ही कसे टाईम पास करत आहात अस म्हणायच अरे तुझ्यासरखा कर्मचारी असताना मला कामाची काळजी करण्याचे काय कारण आहे ? वगैरे............ मुख्य म्ह्ण़़जे चुकिच्या टिकेमुळे आपण स्वतः काही वाटून घ्यायच नाही म्हणजे उपाय आपोआप सापड्तात Happy

निंदक फायदेशीर कसे असतात?
१. निंदकांमुळे यश आपल्या डोक्यात जात नाही.
२. निंदकांमुळे आपल्या वागण्यात काही चुक आहे हे आपल्याला कळते आणि ती दुरुस्त करता येते. (स्तुतीपाठक आपल्या चुका आपल्याला कधीच सांगु शकत नाहीत).
३. निंदेकरता मिंदा करणारे लोक आणि आपल्यात सुधारणा व्हावी म्हणुन आपल्या तोंडावर आपल्या चुका सांगणारे स्पष्टवक्ते लोक यांच्यातला फरक ओळखता आला पाहिजे.
४.लोक जेव्हा निंदा करायला लागतात तेव्हा आपण काही चांगले/उल्लेखनीय करतोय किंवा ते आपल्याकडे Threat म्हणुन पाहत आहेत हे ओळखावे.
५. साधारणतः दुसर्‍याची (अकारण) निंदा करणारे लोक हे न्युनगंड आणि भयगंडाने पिडीत असतात..आपल्या कर्तृत्वाने जेव्हा ते दुसर्‍या माणसापुढे जाउ शकत नाहीत तेव्हा त्या दुसर्‍याचा तेजोभंग करायचा हा मार्ग ते पत्करतात.
त्यामुळे अशा माणसांच्या बोलण्याला किती किंमत द्यायची हे आपण ठरवायचे.

गुरु चित्रपटामध्ये डायलॉग होता ना, लोग तुम्हारे बारे मे बाते करने लगे तो समझो तुम तरक्की कर रहे हो........
........पण खरे तर हे गुरु चित्रपट यायच्या आधीपासूनच मी समजलो होतो Happy

निंदकांचा नायनाट करायची माझी आपली एक आयडीया आहे आणि ती म्हणजे स्वस्तुती !
वापरून बघा, काम नाही झाले तर अ‍ॅडमिनना सांगून हि पोस्ट डिलीटायला लावतो Wink