शोषित योद्ध्या - भाग २
शोषित योद्ध्या - भाग ३
=============================
आवं दाऽऽजीबा ...... गावात्तं व्होईल श्वोभा ...... ह्यं वागनं बरं न्हवं
तमाशा!
एक असा विषय जो दशकानुदशके मराठी चित्रपटाला कथानके पुरवत राहू शकला. एक असा विषय जो काही शतके ह्या भूमीतील आंबटशौकीनांचे चोचले पुरवत राहिला. एक असा विषय ज्याला शासनाने लोककलेचा दर्जा दिला. एक असा विषय जो आजच्या टेकसेव्ही पिढीलाही पावले उचलायला लावू शकतो. एक असा विषय जो अस्सल ग्रामीण बाजाचा राहिल्यामुळे आज तळागाळात सेल फोन्स आणि नेट पोहोचलेले असूनही आपल्यालाच आपल्याच संस्कृतीचे भान देत राहतो. एक असा विषय, जो चारचौघात चघळणे तर सभ्य मानले जात नाही, पण 'सभ्यतेला काय चाटायचंय?' असा विचार मात्र मनात आणू शकतो. एक असा विषय, जो धड देहविक्रीचा नाही, धड नृत्याविष्काराचा नाही आणि धड अत्यावश्यकही नाही. एक असा विषय......
...... जो त्या क्षेत्रात काम करणार्याला जग किती निष्ठूर, रुक्ष, हपापलेले, संवेदनाहीन आणि अन्यायी आहे ह्याचा प्रत्यक्ष अनुभव देतो.
माझे हे खालचे शेरः
उदासीची मुळे जोपास आनंदात जगताना
जशी ठेक्यात पान्हवते कलावंतीण एखादी
पोलक्याची पाठ खेचे सभ्यतेला खालती
चेहर्याचा राग बोले बघ मवाल्याची हवस
पायामध्ये चाळ बांधुनी बैठकीस आल्यावर
मूल रडत नाही ना बघणे फार विसंगत आहे
हे शेर मला तमाशाचे जग पाहिल्यानंतर सुचले होते.
जेजुरी येथे एक कलाकेंद्र आहे. शासनमान्य व शासन पुरस्कृत! तमाशा ही एक लोककला असल्यामुळे तिला शासनाकडून आधार मिळतो. हा आधार एक बांधकाम, राहण्याची, नाचण्यासाठीची व्यवस्था व कायद्याचे पाठबळ इतपतच मर्यादीत असतो. असेच एक कलाकेंद्र वाघोलीलाही आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी तमाशा केंद्रे असतील.
ह्या केंद्रांमध्ये काय चालते?
बारामतीकर, सोलापूरकर, औरंगाबादकर, सातारकर अशी खोटी आडनांवे लावलेल्या पाट्या काही खोल्यांवर असतात. पण त्या आडनावांच्या आधी नाजूक नांवेही असतात. कोमल सातारकर, योगिनी नांदेडकर, पल्लवी सोलापूरकर वगैरे! ह्या खोल्यांंमध्ये काय असते? तर जिचे नांव दारावर असते ती राणी नर्तिका आणि तिच्या टीममधील तीन ते चार नर्तिका त्यांच्या मुलाबाळांसकट राहात असतात. खोलीचा साईझ दहा बाय पंधरापेक्षा अधिक नसतो. त्यातच देव्हारा, सजावट, वाळत टाकलेले कपडे, एक कपाट, कायिक सुशोभीकरणाची सर्व साधने आणि एक कीव येण्याजोगा टी.व्ही.!
ह्या कोमल, योगिनी, पल्लवी वगैरे कोण असतात?
आई तमाशात नाचायची म्हणून नर्तिकाच बनू शकलेल्या मुली, किंवा मुलगी म्हणून घरच्यांनी वार्यावर सोडलेल्या मुली किंवा उदरनिर्वाहाचे इतर कोणतेही साधन समोर नसल्याने असलेल्या तारुण्याचा जगावर मोहिनी घालण्यासाठी अधिकाधिक विनियोग करण्याची एकमेव संधी असलेल्या मुली!
त्या कश्या दिसतात? राणी नर्तिका दिसायला खरंच गोड असते. बाकीच्या जर नटल्याशिवाय बघितल्या तर कोणी दुसर्यांदा पाहणारही नाही अश्या!
मग त्यांच्यात तिथे येण्याची पात्रता कशी निर्माण होते? तर किरकोळ नृत्याच्या स्टेप्स कोणीही पटकन् शिकून शकते ह्या जोरावर त्या तिथे येतात. पण अंगभर कपडे घालून कोणी मुलगी नाचू लागली तर पैसे देऊन तो नाच कोणी बघेल का? तर नाही. त्यामुळे त्यांचे कपडे उत्तान असतात. 'पोलक्याची पाठ खेचे सभ्यतेला खालती स्वरुपाचे असतात. बहुतांशी सभ्य नागरीक मदिरेनंतर मदिराक्षी हवीच ह्या उद्देशाने येत असल्यामुळे फिगरला तितकेसे महत्व उरलेले नसते. ह्या मुलींचा वयोगट? अठरा ते अठ्ठावीस, साधारणपणे! माझ्या मुली शोभतील अश्या मुलींना दोन दोन मुले आहेत.
बारामतीकर आणि औरंगाबादकर एकमेकांशी, तसेच सर्वच 'कर' दुसर्या 'करां'शी अंतर ठेवून असतात. फटकून नसतात, फक्त अंतर ठेवून असतात. फटकून का नसतात तर प्रत्येकीला दुसरीच्या दु:खाची पूर्ण जाणीव असते. प्रत्येक 'करां'कडे एक वादक व गायक असा संच असतो. मी जेथे गेलो होतो तेथे वादक आणि एक गायिका असा एकच संच सर्व 'करां'कडून वापरला जातो.
ह्या मुलींना झालेली मुले कोणापासून झाली हा विषय बोलायचा विषय नसतो. पण 'बाप' म्हणून एक पुरुष मात्र नांदत असतो तिथे! तो सून सासरी वागते तसा वागत असतो. तमाशाच्या क्षेत्रात कलावंतीणीचा नवरा हा कलावंतीणीकडे येणार्या दिलदार रसिकांचा सेवक असतो. त्याला 'से' नसतो. तो मुले सांभाळतो, दारूची क्वॉर्टर घेऊन येतो, ग्लास आणून देतो, सिगारेट आणून देतो, तान्ह्या बाळांना लुगड्याच्या झोक्यात ठेवून झोके देतो. एका नगण्य नवर्याची बायको खास आपल्यासाठी आपल्यासमोर नाचते हा पुरुषार्थ गाजवण्यातही और मजा घेणारे रसिक तेथे असतात.
बाहेरून आलेल्या रसिकाला खणखणीत उर्मी यावी ह्यासाठी प्रयत्न केले जातात. सर्व सुंदर्या आवारातच एकमेकींचे केस विंचरत असतात. त्यांचे पदर 'चुकून' सरकलेले असतात. दोरीवर आतले आणि बाहेरचे सगळे कपडे वाळत टाकलेले असतात. एकमेकींमध्ये स्पर्धा आहे हे अजिबात दाखवले जात नाही. आलेल्या माणसाला ताबडतोब खुर्ची द्यायचा आदेश कलावंतीण आपल्या तथाकथित नवर्याला सोडते. त्या माणसाला चहापाणी विचारले जाते. कोणी रसिक उंबर्यात आला म्हणजे जणू सुदैवच! बॉर्डरवर लढून आणि विजयी होऊन अनेक दिवसांनी आलेल्या आपल्या नवर्याचे स्वागत बायको जसे करेल तसे भाव त्या मुलींच्या चेहर्यावर असतात.
एक व्यासपीठ असते. ते कधीही उपयोगी पडत नाही. कारण साठ सत्तरजण कधी येणार तमाशा बघायला? येणार ते लहानश्या टोळक्यानेच येणार चार सहाजणांच्या! त्यामुळे शासनाने देऊ केलेले व्यासपीठ हा मोठाच विनोद असतो. खासगी बैठकीच्या रूम्स मात्र दोन दोन तास रिकाम्या होत नाहीत. उघड आहे, त्या रूम्समध्ये दोन चार फुटांवर लवलवते तारुण्य सळसळते. कोण लांब बसून व्यासपीठावर नाचणारीसाठी पैसे मोजणार?
लोक दारू पिऊनच येतात, बैठकीतही दारू पितात आणि जातानाही! दारूच्या अंमलामुळे त्या नर्तकीच्या मागे गायक व वादकांचा संच आहे ह्याचे भानच राहात नाही. सगळे जग माझ्यासाठी निर्माण झालेले आहे अश्या भावनेतून तमाशा पाहिला जातो. जो एरवी चार घासही कमवू शकत नसेल तो खुरटलेला, किळसवाणा मनुष्यही येथे येऊन 'चला आता उमराव जान होऊन जाऊंदेत' किंवा 'मेरे फोटोको सीनेसे यार' कधी घेणार असे बोलतो.
पाऊण पाऊण किलोंच्या घुंगरांचे वजन जाणवू नये म्हणून बहुधा कपड्यांचे वजन किंचित अॅडजस्ट केले जाते. पण नर्तकीला हात लावणे, जवळ बोलावणे असले काहीही प्रकार होऊ दिले जात नाहीत. खरे तर नर्तकी ह्या लोकांकडे बघतही नाहीत. अचानक एखादीचे मूल रडत असल्याची वर्दी तिचा 'तथाकथित' नवरा किंवा कोणीतरी घेऊन येतो आणि ती मुलाला पाजायला धावते. 'जशी ठेक्यात पान्हवते कलावंतीण एखादी'!
ह्या मुलींचे शोषण होते का?
होय!
त्यांना शिकायचे असते. 'प्रॉपर' लग्न करायचे असते. संसार थाटायचा असतो. इतर कित्येक गरीब मुली तमाशा हे क्षेत्र का निवडत नसतील हाही प्रश्न मी विचारला. उत्तर होते, त्यांना जे निवडावे लागते त्यापेक्षा ही शासनमान्य लोककला बरी, येथे निदान कायद्याने तरी पोलिसांचे संरक्षण घेण्यास आम्ही पात्र आहोत.
अडीच हजार एका खासगी बैठकीचे घेतले जातात. त्याशिवाय दोनशे रुपये टीप! मी अश्या दोन बैठकी केल्या. एकट्यानेच! मला गायला आवडते. दोन कव्वाल्या मीच गायल्या. हा अनुभव घेणे हे माझे काम होते. नंदाताई सातारकरांची मुलाखत, जी मी घेतली, ती आमच्या उपक्रमातील एक खळबळजनक मुलाखत असणार आहे. ही मुलाखत द्यायला त्यांनी तयार व्हावे म्हणून बैठक घेणे आवश्यक होते.
ह्या मुली शरीरविक्रय करत नाहीत. पण समाज त्यांनी शरीरविक्रयच करावा म्हणून आसूसलेला असतो. ह्या मुली अजिबात चांगले नाचू शकत नाहीत. पण समाजाला त्यांचा नाच बघायचाच नसतो.
कोण कोणाची कोणती गरज केव्हा आणि कशी पुरवत आहे हे न समजणे हा ह्या विश्वातील एक दुर्दैवी प्रकार आहे.
तान्ह्या, काही महिन्यांच्या एका बाळाला घेऊन एक लहान मुलगी एका रिक्षेत बसून रिक्षेवाल्याबरोबर निघून गेली. मी तिच्या 'तथाकथित' नवर्याला खोदून खोदून विचारले की ती कोणाबरोबर कुठे गेली! शेवटी तो म्हणाला की ती मुलगी तिला त्याच्याचपासून झालेली आहे आणि तो तिला अधूनमधून नुसते रिक्षेतून फिरवून आणतो व थोडे पैसेही देतो.
खाली काही फोटो दिलेले आहेत. नर्तिकांचे फोटो मुद्दाम दिलेले नाहीत.
शिक्षणाचा अभाव, पर्याय नसल्यामुळे ह्या क्षेत्रात फेकले जाणे, ह्या क्षेत्रातील 'करिअर' (?)साठी असलेला अत्यल्प कालावधी आणि त्यातच सर्व प्रकारच्या पुरुषांना फक्त आपणच आवडू ह्याची दक्षता, स्पर्धात्मकता अजिबात येऊ न देता घेणे!
लहान मुले? ती बिचारी असतात. कुठेही रांगणार्या मुलाने रडू नये म्हणून त्याच्यासमोर जमीनीवर एक लालभडक टोमॅटो टाकला जातो. त्याला त्या टोमॅटोच्या रंगाचे आकर्षणही वाटावे आणि त्याने तो तोंडात घातला तरी काहीही बिघडू नये म्हणून! तो टोमॅटो त्याच्यासमोर टाकून घुंगरू बांधून बैठकीच्या खोलीकडे धावावे लागते. ह्या मुलांचे शिक्षण आपल्यापेक्षा अधिक होते. जीवनाचे वास्तव त्यांना फार लहानपणी कळते. फक्त विद्यापीठाची पदवी आपल्याकडे असते म्हणून आपण मिरवू शकतो इतकेच!
माझी आई जर तमाशा कलावंतीण असती तर?
हा विचार आपण करूही शकत नाही.
माझी आई जर तमाशा कलावंतीण नसती तर?
हा विचार ती मुले पुढे करू शकतात.
-'बेफिकीर'!
बाळकडू
कलावंतिणींच्या खोल्या
मुख्य व्यासपीठ - जे कधीच वापरात येत नाही कारण 'खासगी बैठकीची गंमत' (?) त्यात नाही
कलाकेंद्राची इमारत
खासगी बैठकीच्या खोल्यांपैकी एक
त्या खोलीतील आसनव्यवस्था
मृदुंग वादक, पेटीवादक व पूर्वाश्रमीच्या नर्तिका व आताच्या गायिका (रौशनबाई सातारकरांची कन्या) नंदाताई सातारकर
खासगी बैठकीच्या खोलीतील नियमांची पाटी
आणि त्या पाटीवर एका आश्रयदात्या रसिकाने विचारलेला प्रश्न
एकमेकांना सांभाळणारे पोक्त बाल्य
वादक पुरुषांसाठी असलेली कॉमन रूम
विदारक !
विदारक !
तुम्ही फक्त कलाकेंद्रातील
तुम्ही फक्त कलाकेंद्रातील तमाशाबद्दल लिहीले आहे.
तमाशाचे फड जे गावागावातील यात्रेत येतात त्यात सुद्धा याच कलाकार असतात का ?
एक असा विषय जो अस्सल ग्रामीण बाजाचा राहिल्यामुळे >>>> सहमत नाही. मागणी तसा पुरवठा असल्यामुळे या कलेने आपला ग्रामीण बाज कधीच सोडला आहे.
'चला आता उमराव जान होऊन जाऊंदेत' किंवा 'मेरे फोटोको सीनेसे यार' कधी घेणार असे बोलतो.
>>>> हे याचेच द्योतक आहे.
पण तुम्ही जे म्हणताय चार घासही कमवु न शकणारा इथे येतो, तो अडीच हजार कसे देऊ शकेल.
माझ्या माहीतीप्रमाणे खाजगी बैठक करायची असेल तर यापेक्षा फार जास्त रक्कम मोजावी लागते.
अशा लोकांचे दु:ख पाहिले की
अशा लोकांचे दु:ख पाहिले की आपले दु:ख नक्की दु:ख आहे की नाहि हे तपासुन पहावे वाटते...