आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १५ (अंतिम)

Submitted by स्पार्टाकस on 8 October, 2014 - 19:34

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट ही लेखमालिका आज संपली. ही मालिका प्रकाशित करु दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. ही मालिका आपल्याला कशी वाटली ते जरुर कळवा.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सॅन फ्रॅन्सिस्को १९०६ च्या एप्रिलमध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून अद्यापही सावरत होतं. जवळपास ८०% शहर भूकंपात उध्वस्तं झालेलं होतं. नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार करुन आलेल्या अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांच्या यशाने सॅन फ्रॅन्सिस्कोवासियांना या धक्क्यातून सावरण्याची उमेद मिळाली असावी. अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांवर सॅन फ्रॅन्सिस्कोत अभिनंदनाचा आणि कौतुकाचा पाऊस पडला!

सॅन फ्रॅन्सिस्को इथे काही दिवस मुक्काम केल्यावर अ‍ॅमंडसेन आणि इतरांनी परतीचा मार्ग धरला. नॉर्वेला परतण्यासाठी केप हॉर्नला वळसा घालून परतणं हाच एक मार्ग होता. पुन्हा नॉर्थवेस्ट पॅसेजमधून प्रवास करण्याची कोणाची तयारी नव्हती!

सॅन फ्रॅन्सिस्को इथल्या नॉर्वेजियन लोकांनी अ‍ॅमंडसेनकडून ग्जो विकत घेतलं. केप हॉर्नला वळसा घालून परत ते नॉर्वेला नेण्यापेक्षा सॅन फ्रॅन्सिस्को इथे त्याचं म्युझियम उभारण्याची त्यांची योजना होती. यथावकाश १९७२ मध्ये एका मोठ्या जहाजावरुन ग्जो नॉर्वेला नेण्यात आलं. आजही ते नॉर्वेजियन मेरीटाईम म्युझियम मध्ये दिमाखात उभं आहे!

चुंबकीय उत्तर धृवाचं नेमकं स्थान बदललेलं असावं हा अ‍ॅमंडसेनचा कयास अचूक असल्याचंही निदर्शनास आलं. जेम्स क्लार्क रॉसला चुंबकीय उत्तर धृवाचं जे स्थान आढळलं होतं त्यापेक्षा उत्तर-पूर्व दिशेला सुमारे साठ मैलांवर अ‍ॅमंडसेनला ते आढळलं होतं!

नॉर्थवेस्ट पॅसेज

अ‍ॅमंडसेनचा नॉर्थवेस्ट पॅसेजचा मार्ग

नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार करणार्‍या अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असला तरी ब्रिटीश नौदलाने आणि ब्रिटनमधील उच्चभ्रू वर्गाने मात्रं त्याची फारशी दखल घेतली नाही. जगभर आपलं साम्राज्य उभारणार्‍या ब्रिटीशांना आपल्या नौदलाचा फार अभिमान होता. ब्रिटीश नौदलाला न जमलेली नॉर्थवेस्ट पॅसेज पार करण्याची कामगिरी नॉर्वेजियन अ‍ॅमंडसेनने पार पाडली हे रुढी आणि परंपरावादी ब्रिटीशांच्या कसं पचनी पडावं? ब्रिटीशांच्या विशेषतः नौदल अधिकार्‍यांच्या मनात अ‍ॅमंडसेनबद्दल अढी निर्माण होण्यास इथूनच सुरवात झाली.

नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवरुन आल्यावर अ‍ॅमंडसेन १९१० मध्ये दक्षिण धृवाच्या मोहीमेवर गेला होता. नॉर्वेचा किनारा सोडेपर्यंत आपण पूर्वनियोजित योजनेप्रमाणे उत्तर धृवावरच जात आहोत अशीच त्याने सर्वांची समजूत करुन दिली होती. हेल्मर हॅन्सन आणि लिंडस्ट्रॉम दक्षिण धृवाच्या मोहीमेवरही अ‍ॅमंडसेनबरोबर गेले होते. अ‍ॅमंडसेनने कॅप्टन रॉबर्ट फॅल्कन स्कॉटच्या आधी दक्षिण धृव पादाक्रांत केल्यावर ब्रिटीशांनी अ‍ॅमंडसेनवर टीकेची झोड उठवली. एर्नेस्ट शॅकल्टनचा अपवाद वगळता ब्रिटीश संशोधक आणि नौदल अधिकारी आणि वृत्तपत्रांनीही अ‍ॅमंडसेनने स्कॉटची फसवणूक केली असाच सूर लावला होता!

अ‍ॅमंडसेन आणि हेल्मर हॅन्सन पुढे नॉर्थईस्ट पॅसेज आणि विमानातून उत्तर धृव ओलांडण्याच्या मोहीमेवरही एकत्र होते! १९२८ मध्ये आर्चरो नोबाईलच्या इटालिया विमानाचा शोध घेताना अ‍ॅमंडसेन आणि इतर पाचजण आर्क्टीक समुद्रात कायमचे अदृष्यं झाले! बेरेंट्स समुद्रात त्यांचं विमान कोसळलं असा अंदाज बांधला जातो!

नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेदरम्यान ग्जो हेवन आणि किंग पॉईंट इथल्या आपल्या वास्तव्यात अ‍ॅमंडसेनने एस्कीमोंकडून आर्क्टीकमध्ये सफाईदारपणे वावरण्याच्या दृष्टीने अनेक कला आत्मसात केल्या होत्या. आपल्या पुढील सर्व मोहिमांमध्ये त्याने याचा पुरेपूर वापर करुन घेतला!

नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडताना अ‍ॅमंडसेनने ज्या मार्गाने प्रवास केला होता, त्या मार्गात अनेक ठिकाणी त्याला अतिशय उथळ पाण्यातून प्रवास करावा लागला होता. काही ठिकाणी तर जेमतेम अडीच-तीन फॅदम (८ ते १० फूट) खोलीच्या पाण्यातून ग्जो ने मार्ग काढला होता. ग्जो सारख्या लहान जहाजाला हे शक्यं झालं असलं, तरी मोठ्या व्यापारी जहाजांना या मार्गाने प्रवास करणं अशक्यं होतं.

नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्यामागचा मुख्य उद्देश केप हॉर्नला वळसा घालून अमेरीकेचा पश्चिम किनारा गाठण्यापेक्षा आर्क्टीकमधून वेळ आणि इंधन वाचवणार्‍या जवळच्या मार्गाचा शोध घेणं हा होता! त्या दृष्टीने अ‍ॅमंडसेनचा मार्ग हा निरुपयोगीच होता.

१९२१ मध्ये पाचव्या थूल मोहीमेअंतर्गत ग्रीनलंडचा रहिवासी असलेला नड रॅस्मसेन याने ग्रीनलंडच्या दोन एस्कीमोंसह कुत्र्यांच्या स्लेजच्या सहाय्याने अटलांटीकच्या किनार्‍यावरुन नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मार्गाने (कॅनडाच्या किनार्‍याने) पॅसिफीक महासागर गाठला. जमिनीवरुन उत्तर अमेरीकेच्या पूर्व किनार्‍यावरुन पश्चिम किनारा गाठणारी ही पहिलीच मोहीम होती!

अ‍ॅमंडसेनच्या मोहीमेनंतर तब्बल ३८ वर्षे कोणीही नॉर्थवेस्ट पॅसेजच्या वाटेला गेलं नाही!

रॉयल कॅनेडीयन माऊंटेड पोलीस अधिकारी हेनरी लार्सन याने १९४० च्या जूनमध्ये व्हँकुअर मधून नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर प्रस्थान केलं. त्यावेळी दुसर्‍या महायुद्धाचा भडका उडाला होता. जर्मनीने ग्रीनलंडवर हल्ला करुन त्याचा ताबा घेतल्यास पाणबुड्यांचा तळ म्हणून जर्मनी ग्रीनलंडचा वापर करेल अशी कॅनेडीयन नौदलाला भिती वाटत होती. त्या दृष्टीने ग्रीनलंडवर आक्रमण करुन ताबा मिळवण्याचा नौदलाचा प्रयत्न होता! लार्सनची नॉर्थवेस्ट पॅसेजची मोहीम हा त्या प्रयत्नाचाच एक भाग होता. कॅनेडीयन नौदलाच्या या योजनेला अमेरीकेने खो घातला असला तरी लार्सनची नॉर्थवेस्ट पॅसेजची मोहीम मात्रं कोणत्याही अडथळ्याविना सुरु राहीली!

सेंट रोज या आपल्या जहाजातून व्हँकुअर सोडल्यावर लार्सनने बेरींगच्या सामुद्रधुनीमार्गे पॉईंट बॅरो गाठलं. पॉईंट बॅरोच्या पूर्वेला बर्फातून मार्ग काढणं खूप जिकीरीचं जात असूनही व्हिक्टोरीया बेटाच्या पश्चिम किनार्‍यावरील प्रिन्स ऑफ वेल्स सामुद्रधुनीचं प्रवेशद्वार असलेल्या वॉकरच्या उपसागरात त्याने हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला.

१९४१ च्या जुलैमध्ये बर्फातून सेंट रोचची मुक्तता झाली. ऑगस्टच्या अखेरीला लार्सन ग्जो हेवन इथे पोहोचला. किंग विल्यम बेटाच्या उत्तरेला बर्फामुळे त्याचा मार्ग खुंटला होता. सप्टेंबरमध्ये त्याने बुथिया आखाताच्या पश्चिमेच्या परिसरात जेम्स क्लार्क रॉसने जिथे चुंबकीय धृवाचं स्थान निश्चित केलं होतं, त्याच्या जवळच असलेल्या पेस्ली उपसागरात त्याने हिवाळ्यासाठी आश्रय घेतला.

१९४२ च्या ऑगस्टमध्ये त्याने उत्तरेचा मार्ग धरला. प्रचंड अडचणींचा सामना करत आणि प्रतिकूल हवामानाशी मुकाबला करत त्याने बेलॉटची सामुद्रधुनी ओलांडली! या सामुद्रधुनीच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या फोर्ट रॉस इथून त्याने प्रिन्स रिजंट खाडी आणि लॅंकेस्टर खाडीच्या मार्गाने डेव्हीसची सामुद्रधुनी गाठली!

११ ऑक्टोबर १९४२ ला सेंट रोच हॅलीफॅक्स बंदरात पोहोचलं!
नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार करणारं सेंट रोच हे दुसरं जहाज होतं!

पॅसिफीक महासागरातून नॉर्थवेस्ट पॅसेजमार्गे अटलांटीक मध्ये प्रवेश करणारं ते पहिलं जहाज ठरलं होतं!

हेनरी लार्सन

२५ जुलै १९४४ ला सेंट रोचने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली! जहाजात जास्तं ताकदीचं इंजिन बसवण्यात आलेलं होतं. यावेळी नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळी वाट पकडण्याचा लार्सनचा बेत होता!

हॅलीफॅक्स सोडल्यावर सेंट रोचने २० ऑगस्टला बीची बेट गाठलं. तिथून पश्चिमेचा मार्ग धरुन लार्सन मेल्व्हील बेटावर पोहोचला. मॅक्क्युलर सामुद्रधुनीत बर्फाने मार्ग अडवल्यावर त्याने दक्षिण-पश्चिमेला वळून प्रिन्स ऑफ वेल्स सामुद्र्धुनीचा मार्ग धरला. ही सामुद्रधुनी ओलांडण्यात आतापर्यंत एकही जहाज यशस्वी झालेलं नव्हतं! बर्फ फोडण्याच्या तंत्राचा अवलंब करत सेंट रोचने ही सामुद्रधुनी ओलांडली आणि वॉकरचा उपसागर गाठला! ४ सप्टेंबरला लार्सनने हडसन बे कंपनीचं होलमन बेट ओलांडलं. पश्चिमेचा मार्ग धरुन शक्यं तितक्या घाईने प्रवास करत सेंट रोचने पॉईंट बॅरो ओलांडून बेरींगच्या सामुद्रधुनीतून व्हँकुअर गाठलं!

१६ ऑक्टोबर १९४४!

हॅलीफॅक्स हून निघाल्यावर अवघ्या ८५ दिवसात सेंट रोच व्हँकुअरला पोहोचलं होतं!

हिवाळ्यात मुक्काम न करता एका मोसमात नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडणारं सेंट रोच हे पहिलंच जहाज होतं!

सेंट रोच

१९५७ मध्ये अमेरीका - कॅनडा यांच्या संशोधन मोहीमेने नॉर्थवेस्ट पॅसेज मधून प्रवास करत ग्रीनलंड गाठलं. या मोहीमेदरम्यान हायड्रोग्राफीच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली.

१९६९ मधे एस्. एस्. मॅनहटन या जहाजाने बर्फ फोडणार्‍या जॉन मॅक्डोनाल्ड आणि लुईस एस. सेंट लॉरेंट या जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार केला. अमेरीकन कोस्टगार्डच्या नॉर्थविंड आणि स्टॅटन आयलंड या बर्फ फोडणार्‍या जहाजांचाही या मोहीमेत समावेश होता.

मॅनहॅटन जहाज हा मोठा तेलाचा टँकर होता. ही मोहीम ही तेलवाहतुकीची चाचणी करण्याच्या दृष्टीने आ़खण्यात आलेली होती. मात्रं हा मार्ग आर्थिकदृष्ट्या फायद्याचा नसल्याने टँकरमधून तेलाची वाहतूक करण्याऐवजी अलास्का पाईपलाईन बांधण्यात आली!

१९७७ मध्ये विली डी रुस याने विलीवॉ या १३ मीटर स्टीलच्या बोटीतून बेल्जीयमहून आर्क्टीकचा मार्ग धरला! नॉर्थवेस्ट पॅसेजमधून प्रवास करत सप्टेंबरमध्ये त्याने बेरींगची सामुद्रधुनी गाठली! बेरींगच्या सामुद्रधुनीतून दक्षिण अमेरीकेच्या टोकाला असलेल्या केप हॉर्नला वळसा घालून रुस बेल्जीयमला परतला!

संपूर्ण अमेरीका खंडाची प्रदक्षिणा करणारं विलीवॉ हे पहिलं जहाज होतं!

१९८४ मध्ये एक्सप्लोरर या बोटीने नॉर्थवेस्ट पॅसेजमार्गे प्रवासी वाहतुकीला सुरवात केली! (२००७ मध्ये एक्सप्लोरर अंटार्क्टीकामध्ये हिमनगाला धडकून बुडालं).

१९८६ मध्ये डेव्हीड स्कॉट कॉपर याने १२ मीटर लांबीच्या लाईफबोटीतून इंग्लडमधून नॉर्थवेस्ट पॅसेजची वाट धरली! बेरींगच्या सामुद्रधुनीत पोहोचल्यावर पॅसिफीक महासागर आणि हिंदी महासागरातून केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो इंग्लंडला परतला! नॉर्थवेस्ट पॅसेजमधून जगप्रदक्षिणा करणारा कॉपर हा पहिलाच दर्यावर्दी!

२००६ मध्ये बर्मन या क्रूझ बोटीने नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे ओलांडला!

२००७ मध्ये फ्रेंच दर्यावर्दी सॅबस्टीयन रॉबीनेट याने आपल्या एका सहकार्‍यासह साडेसात मीटर (२५ फूट) लांबीच्या बोटीतून अलास्कातील अँकरेज इथून नॉर्थवेस्ट पॅसेजमार्गे ग्रीनलंड गाठलं. ४ महिन्यांच्या या प्रवासात त्याने एकूण ४४७५ मैलांचं अंतर काटलं होतं. विशेष म्हणजे रॉबीनेटच्या बोटीला इंजिन नव्हतं! ही संपूर्ण मोहीम केवळ शिडांच्या सहाय्याने पार पाडण्यात आली!

२०१२ मध्ये द वर्ल्ड हे नॉर्थवेस्ट पॅसेजमधून प्रवास करणारं सर्वात मोठं प्रवासी जहाज ठरलं! या जहाजावर एकूण ४८१ प्रवासी होते! अलास्कातील नोम पासून ग्रीनलंडमधील नूक बंदरापर्यंत ५५०० मैलांचा प्रवास करण्यास या जहाजाला अवघे २६ दिवस लागले होते. या जहाजाने बहुतांश प्रवास अ‍ॅमंडसेनच्या मार्गाने केला होता!

२०१३ मध्ये नॉर्डीक ओरीयन हे मालवाहतूक करणारं सर्वात मोठं जहाज नॉर्थवेस्ट पॅसेजमार्गे व्हँकुअर इथून फिनलंडला पोहोचलं. या जहाजावर १५००० टन कोळसा होता!

जगभराला भेडसावणार्‍या ग्लोबल वॉर्मिंगचा फटका नॉर्थवेस्ट्च्या परिसरातील आर्क्टीकलाही बसतो आहे असं शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे. २००० पासून नॉर्थवेस्ट पॅसेजमधील बर्फ गोठण्याचं प्रमाण दरवर्षी कमी होत असल्याचं दिसून येत आहे. २००६ मध्ये बर्मन या क्रूझने नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे ओलांडल्यावर तर हा प्रश्न प्रकर्षाने पुढे आला आहे.

२००७ च्या डिसेंबरमध्ये नासाच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनामधून एक विशेष गोष्ट समोर आली ती म्हणजे आर्क्टीकच्या परिसरातील नेहमी गर्दी करुन असणारे ढग हे त्या वर्षी सुमारे १६% कमी आढळले होते! ढगांचं प्रमाण कमी झाल्याने सूर्यकिरण नेहमीपेक्षा जास्तं प्रमाणात पृत्थ्वीपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे आर्क्टीकमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं! या कारणामुळे २००७ मध्ये नॉर्थवेस्ट पॅसेज नेहमीपेक्षा लवकर खुला झाला होता आणि बर्‍याच कालावधीसाठी जहाजांच्या वाहतुकीसाठी उपलब्धं होता. वर्षानुवर्षे बर्फ गोठून बंद असलेल्या अनेक खाड्या आणि सामुद्रधुन्यांमधून प्रवास करणं या वर्षी साध्यं झालं होतं!

२०१२ मध्ये द वर्ल्ड या जहाजाने अ‍ॅमंडसेनच्या मार्गाने नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडला. अ‍ॅमंडसेनला आपल्या नॉर्थवेस्टच्या मोहीमेदरम्यान जेमतेम तीन फॅदम खोल पाण्यातून प्रवास करावा लागला होता. परंतु २०१२ मध्ये द वर्ल्ड सारखं मोठं जहाज सहजपणे जाऊ शकेल इतकं खोल पाणी बहुतेक सर्व मार्गावर आढळून आलं होतं. हा अर्थातच ग्लोबल वॉर्मिंगचाच परिणाम होता.

अर्थात ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसल्यावरही बाराही महिने नियमीतपणे उपलब्धं असलेला नॉर्थवेस्ट पॅसेजचा मार्ग अद्यापही आढळलेला नाही.

नॉर्थवेस्ट पॅसेजमधून नियमीतपणे जलवाहतूक सुरु होण्यास किमान वीस ते पंचवीस वर्षे तरी लागतील असं कॅनेडीयन सरकारच्या अधिकार्‍यांचं मत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा कितीही फटका बसला तरी अनेकदा वाटेत उभ्या ठाकणार्‍या हिमनगांशी मुकाबला करण्यासाठी बर्फ फोडणारी जहाजं अत्यावश्यक आहेत. प्रत्येक व्यापारी अथवा प्रवासी जहाजाच्या जोडीला किमान एक बर्फ फोडणारं जहाज असणं आवश्यक असल्याने नॉर्थवेस्ट पॅसेजमधून नियमीत प्रवास करणं हे आर्थिक दृष्ट्या अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे पनामा कालव्यातून जाऊ न शकणार्‍या प्रचंड मोठ्या आकाराच्या जहाजांची केप हॉर्नला वळसा न घालता नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मार्गाने नियमीतपणे वाहतूक सुरु होण्यास अजून बराच काळ जावा लागेल!

नॉर्थवेस्ट पॅसेजमधील बर्फाचं प्रमाण कमी झाल्याने पॅसिफीक आणि अटलांटीक महासागरातील अनेक प्रकारचे मासे आणि इतर प्राण्यांनी आर्क्टीकमध्ये स्थलांतर केल्याचं आढळून आलं आहे!

अटलांटीक महासागरातील ग्रे व्हेल्सचा १८ व्या शतकातील अनिर्बंध शिकारीमुळे संपूर्ण विनाश झाला होता. हे मासे उत्तर पॅसिफीक महासागरात आणि कॅनडा - अमेरीकेच्या पश्चिमेला विपुल प्रमाणात आढळत असले तरी सुमारे दोनशे वर्षे एकही ग्रे व्हेल अटलांटीकमध्ये सापडला नव्हता. परंतु २०१० मध्ये थेट भूमध्य समुद्रात एक ग्रे व्हेल आढळल्याने शास्त्रज्ञ चकीत झाले! अनेक शास्त्रज्ञांच्या मते शिकारीच्या शोधात हा व्हेल आर्क्टीकमध्ये शिरला असावा आणि नॉर्थवेस्ट पॅसेजमधून प्रवास करुन अटलांटीक मार्गे तो भूमध्य समुद्रात पोहोचला असावा!

पॅसिफीक आणि हिंदी महासागरात आढळणारे अनेक लहानसे सागरी जीव गेल्या आठ लाख वर्षांत अटलांटीकमध्ये आढळलेले नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात या जीवांचं अस्तित्वं उत्तर अटलांटीकच्या प्रदेशात आढळून आलं आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यास असमर्थ असलेले हे सजीव नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मार्गानेच तिथे पोहोचले असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

२०१० मध्ये नॉर्थवेस्ट पॅसेजच्या परिसरात चक्कं व्हेल्सची एक प्रेमकहाणी उदयाला आली!

पॅसिफीक महासागरातून आलेला एक बोहेड व्हेल आणि अटलांटीक महासागरातून आलेला दुसरा बोहेड व्हेल यांची नॉर्थवेस्ट पॅसेजमध्ये व्हिक्टोरीया बेटाच्या उत्तरेला गाठ पडली! सुमारे पंधरा दिवस एकमेकाच्या सान्निध्यात घालवल्यावर त्यांनी आपला पुढचा मार्ग सुधरला! सॅटेलाईटच्या माध्यमातून व्हेल्सच्या हालचालीवर नजर ठेवून असणारे शास्त्रज्ञ या घटनेने अचंबित झाले!

अलास्काच्या पूर्वेला असलेला नॉर्थवेस्ट पॅसेजचा बहुतांश मार्ग हा कॅनडाच्या उत्तर किनार्‍याजवळून जातो. या भागातील अनेक बेटं कॅनडाच्या अधिपत्याखाली आहेत. याच आधाराने नॉर्थवेस्ट पॅसेजचा हा भाग विशेषतः पूर्वेच्या एल्समेयर आणि बॅफीन बेटापासून ते पश्चिमेला बँक्स बेटापर्यंतचा आर्क्टीक समुद्राचा भाग हा कॅनडाच्या सागरी हद्दीत आहे आणि या प्रदेशातून कोणालाही प्रवास करण्यास मनाई करण्याचा कॅनडाला हक्क आहे असा कॅनेडीयन सरकारचा दावा आहे! कॅनडाचा हा दावा खरा मानला तर नॉर्थवेस्ट पॅसेजच्या या भागात मासेमारी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आणि स्मगलिंगला आळा घालण्याच्या दृष्टीने कायदे राबवण्याचा पूर्ण अधिकार कॅनेडीयन सरकारला मिळतो! त्याच्या जोडीला नॉर्थवेस्ट पॅसेजमधून जाणार्‍या कोणत्याही जहाजाकडून जकातवसूलीचा आणि जहाजाची तपासणी करण्याचा हक्कही कॅनडाला आपसूकच मिळेल!

युरोपियन युनियनचे सभासद देश आणि अमेरीका यांचा अर्थातच कॅनडाच्या या दाव्याला विरोध आहे. या सर्व देशांच्या मताप्रमाणे इतर सर्व महासागरांप्रमाणेच नॉर्थवेस्ट पॅसेज हा नियंत्रणमुक्तं जलमार्ग आहे आणि कोणत्याही जहाजाला तो वापरण्याचा हक्क आहे!

१९८५ मध्ये अमेरीकन सरकारचं पोलर सी हे बर्फ फोडणारं जहाज ग्रीनलंडमधून नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मार्गे अलास्काला गेलं होतं. कॅनेडीयन कोस्ट गार्डने या जहाजाची तपासणी केली खरी परंतु या जहाजाने आपली पूर्व परवानगी न घेतल्याबद्दल कोस्ट गार्डने आक्षेप घेतला! अमेरीकन सरकारने अर्थात नॉर्थवेस्ट पॅसेज हा नियंत्रणमुक्तं जलमार्ग असल्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. १९८६ मध्ये नॉर्थवेस्ट पॅसेजमधील हा भाग हा कॅनडाच्या सागरी हद्दीतील भाग आहे असं कॅनडाने जाहीर केलं, परंतु अमेरीकेने कॅनडाचा हा दावा मान्यं करण्यास साफ नकार दिला! अखेर १९८८ मध्ये झालेल्या करारानुसार नॉर्थवेस्ट पॅसेजमध्ये संशोधन करणार्‍या जहाजांपुरती कॅनडाची परवानगी घेण्यास अमेरीकेने मान्यता दिली! मात्रं इतर सर्व जहाजांना कोणत्याही परवानगीची गरज नाही या आपल्या दाव्यावर अमेरीका आणि इतर सर्व देश आजही ठाम आहेत!

२००५ मध्ये अमेरीकेच्या अणुशक्तीवर चालणार्‍या यूएसएस शार्लोट या पाणबुडीने कोणालाही सुगावा लागू न देता पर्ल हार्बरहून नॉर्थवेस्ट पॅसेजमार्गे व्हर्जिनीयातील नॉर्फोक गाठलं. साठ फूट जाडीचं बर्फाचं आवरण भेदत ही पाणबुडी उत्तर धृवावर सागरपृष्ठावर प्रगटली! या पाणबुडीचे उत्तर धृवावरील फोटो प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली! अमेरीका आणि कॅनडा यांच्या दरम्यान असलेल्या नॉर्थवेस्ट पॅसेजच्या वादाला नव्याने तोंड फुटलं! २००६ मध्ये कॅनेडीयन नौदलाने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या परिसराचा उल्लेख यापुढे कॅनडाच्या सागरी सीमेतील प्रदेश असा करण्यात येईल याचा पुनरुच्चार केला.

आजही नॉर्थवेस्ट पॅसेजवर कॅनडाच्या सरकारचा दावा आहे! अमेरीका आणि इतर युरोपियन देशांची मात्रं नॉर्थवेस्ट पॅसेज मुक्तं जलमार्ग असल्याची भूमिका आजही कायम आहे!

नॉर्थवेस्ट पॅसेजचा कॅनडाच्या नियंत्रणातील बेटांचा भाग

शास्त्रीय संशोधनानंतर बर्फ फोडणारी विविध उपकरणं उपलब्धं असताना आणि दळणवळणाची अत्याधुनिक साधनं हाताशी असणार्‍या आजच्या काळातही नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडणं हे एक आव्हान आहे. अशा परिस्थितीत ८ व्या शतकातील एल्स्मेअर बेटांवर पोहोचलेले व्हायकींग्ज किंवा १४९७ मधील जॉन कॅबोट पासून नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे ओलांडणार्‍या अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांपर्यंतचे दर्यावर्दी आणि जॉन रे सारखे जमिनीवरुन प्रवास करणारे संशोधक किती असामान्य धाडसी होते याची कल्पना येते. कोणत्याही क्षणी झडप घालणार्‍या हिमनगांपासून ते स्कर्व्हीसारख्या दुर्धर रोगापर्यंत अनंत जीवघेण्या अडचणींचा सामना करत त्यांनी केलेलं संशोधन आणि नविन प्रदेशाचा घेतलेला शोध याचं मूल्यमापन करणं हे निव्वळ अशक्यं आहे!

आर्क्टीकच्या परिसरातील प्रदेशांचा शोध घेण्यार्‍या आणि त्या प्रयत्नात प्राण वेचणार्‍या असंख्य ज्ञात-अज्ञात संशोधकांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना विनम्र अभिवादन!

समाप्त

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भः-

Arctic Land Expedition to the Mouth of the Great Fish River, and along the Shores of the Arctic Ocean, in the Years 1833, 1834 and 1835 - जॉर्ज बेक
Expedition in HMS Terror, Undertaken with a View to Geographical Discovery on the Arctic Shores, in the Years 1836-37 - जॉर्ज बेक
From Barrow to Boothia: The Arctic Journal of Chief Factor Peter Warren Dease, 1836–1839 - पीटर वॉरेन डीस आणि विल्यम बार
A voyage of discovery, made under the orders of the Admiralty, in His Majesty's ships Isabella and Alexander, for the purpose of exploring Baffin's Bay, and inquiring into the probability of a north-west passage - जॉन रॉस
A voyage to the Pacific and Beering's Strait: to co-operate with the Polar expeditions : performed in His Majesty's Ship Blossom, under the command of Captain F.W. Beechey, R.N. ... in the years 1825,26,27,28 - विल्यम बीची
Second voyage in search of a north-west passage, and of a residence in the Arctic regions during the years 1829, 1830, 1831, 1832, 1833 - जॉन रॉस आणि जेम्स क्लार्क रॉस
The Discovery of the North-West Passage - रॉबर्ट मॅक्लुअर आणि शेरार्ड ऑस्बॉर्न
The Last of the Arctic Voyages - एडवर्ड बेल्चर
In the Arctic Seas A Narrative of the Discovery of the Fate of Sir John Franklin and his Companions - फ्रान्सिस मॅक्लींटॉक
Arctic Researches, And Life Among The Esquimaux: Being A Narrative Of An Expedition In Search Of Sir John Franklin In The Years 1860, 1861 and 1862 - चार्ल्स फ्रान्सिस हॉल
The Long Arctic Search - फ्रेडरीक श्वाटका
The North-West Passage: Being the Record of a Voyage of Exploration of the Ship "Gjoa", 1903-1907 - रोआल्ड अ‍ॅमंडसेन
The North-West Passage - हेनरी लार्सन
The lands of silence: a history of Arctic and Antarctic exploration - क्लेमंट्स मार्कहॅम
The Royal Navy in Polar Exploration From Frobisher to Ross - ई. सी. कोलमन
The Royal Navy in Polar Exploration From Franklin to Scott - ई. सी. कोलमन
Fatal Passage : The Story of John Rae – the Arctic hero time forgot - केन मॅक्कगूगन
The Arctic Grail: The Quest for the North West Passage and the North Pole, 1818–1909 - पिअर बर्टन
Historical Dictionary of the Discovery and Exploration of the Northwest Passage - एडविन अ‍ॅलन डे
Voyages of Delusion The Quest for the Northwest Passage - ग्लिन्डर विल्यम्स
Fury Beach: The Four-Year Odyssey of Captain John Ross and the Victory - रे एडींगर
In Quest of the Northwest Passage - लेस्ली नीट्बाय
Narratives of Voyages Towards the North-West: In Search of a Passage to Cathay and India, 1496–1631 - हेकल्ट सोसायटी
Bering: The Russian Discovery of America - ऑर्कट विल्यम फ्रॉस्ट
A summer search for Sir John Franklin; with a peep into the polar basin - थॉमस हॅरीसन
Arctic Crossing A Journey Through the Northwest Passage and Inuit Culture - जोनाथन वॉटरमन
Two Planks and a Passion: The Dramatic History of Skiing - रोलांड हर्टफोर्ड

विकीपीडीया
इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांवरील महत्वपूर्ण माहिती.

सर्व फोटो इंटरनेटवरुन साभार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पार्टाकस, तुमच्या अनेक लेखमालिकेप्रमाणेच माहितीपुर्ण आणि अत्यंत उत्कंटतावर्धक अशी ही लेखमालिका आज पुर्ण झाली. लेखमालिका वाचताना अनेक गोष्टी नव्याने समजल्या आणि माणसाच्या नवीन प्रदेशाचा शोध घेणार्‍या दुर्दम इच्छाशक्तीचा सुध्दा प्रत्यय आला.

सुंदर अशी ही लेखमालिका मायबोलीकरांसाठी लिहिल्याबद्दल आपले खुप खुप आभार.

स्पार्टाकस,

या लेखमालिकेबद्दल अनेक धन्यवाद! खूपच अभ्यासपूर्ण आणि तटस्थपणे लिहीलेली असल्याने मालिका खूप आवडली.

मी स्वतः नॉर्थवेस्ट पॅसेजमधून संशोधनाच्या निमित्ताने प्रवास केलेला असल्याने तुमच्या लेखनाशी खूप सहज रिलेट करता आलं. लँकेस्टर साऊंड ते बेरींग स्ट्रेटपर्यंत कोणत्याही क्षणी हिमनग समोर दत्त म्हणून उभे राहतात. त्यातून मार्ग काढणं आजही जिकीरीचं असताना शंभर वर्षांपूर्वी अ‍ॅमंडसेन आणि इतरांनी कसा मार्ग काढला असेल या कल्पनेनेच धडकी भरते.

जॉन फ्रँकलीनच्या मोहीमेतील इरेबस हे जहाज नुकतंच कॅनडाच्या संशोधकांना सापडलं आहे. जॉन रे चा कॅनिबालीझम चा तर्क अचूक असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.

तुमच्याकडून अजून अशा मालिकांची प्रतिक्षा आहे.

- रत्ना

स्पार्टाकस, नेहमीप्रमाणेच नितांत सुंदर लेखमालिका. या विषयाचा आवाकाच इतका मोठा आहे की त्यावर लिहीणे म्हणजे अवघड शिवधनुष्य उचलण्याप्रमाणे आहे. तुमच्या प्रचंड व्यासंगाने, ते तुम्ही अर्थातच लिलया पेलले आहे. ४-५ भागा नंतर मात्र पुढचे भाग वाचताना माझ्यासारख्याची प्रचंड दमवणुक झाली.

स्पार्टाकस, तुमच्या ९० डिग्री साऊथ या अत्यंत उत्कंठावर्धक आणि अप्रतिम लेखमालिकेनंतर तुम्ही आर्क्टिकमोहिमेवर लेखमालिका लिहिणार का याबद्दल उत्सुकता होती.

मालिकालेखन सुरू झाल्यावर संपेपर्यंत वाट बघितली. त्यामुळे आता खंड न पडता एकापाठोपाठ एक भाग वाचता येतील. अख्खी मालिका वाचून प्रतिसाद देईनच.

सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेखमालिकांकरता धन्यवाद!