घरच्या मिरचीची गोष्ट

Submitted by मंदार शिंदे on 7 October, 2014 - 16:41

मिरजेजवळच्या भोसे गावात शेतक-यांच्या ग्रुपला भेटायला गेलो होतो. चर्चा शेतकरी-अडते-ग्राहक यावर आली तेव्हा एका शेतक-यानं सांगितलेला अनुभव -

"वडलांनी शेतात मिरची लावली होती. मिरची काढून मिरज मार्केटला पोचवायची होती. दीडशे रुपये देऊन तीन बायका लावल्या होत्या मिरची काढायला. मी तेव्हा मिरजेला नोकरी करायचो. जाता-जाता मार्केटला मिरचीचं पोतं पोच करायला वडलांनी सांगितलं. मोटरसायकलवर पोतं टाकून निघालो. गाडी सुरु करताना वडलांनी घरातून एक रिकामी पिशवी आणून दिली आणि सांगितलं, घरची मिर्ची हाय, जाता-जाता मिरजेच्या काकाकडं थोडी दिऊन जा. तिथून निघालो ते थेट मिरज मार्केटला. मोटरसायकलवर पोतं बघून तिथला एकजण पुढं आला. 'काय घिऊन आलाय?' मी सांगितलं - मिरची. म्हणाला, 'कशाला आणलाय? कोण इचारतंय इथं मिर्चीला?' मी निम्मा गार झालो. म्हटलं, घिऊन तर आलोय. किती मिळत्याल बोला. जरा अंदाज घेत बोलला - एका पोत्याचं पन्नास! मी म्हटलं, दीडशे रुप्ये निस्ती मजुरी झाल्या मिर्ची काढायची. मोटरसायकलवर घिऊन आलोय त्ये येगळंच. मिर्ची लावल्यापास्नं किती खरीचल्यात त्ये तर सांगतच न्हाई... मग होय-न्हाय करत शेवटी शंभरला तयार झाला. मला पण कामावर जायला उशिर होत होता. शंभर रुपये घेऊन पोतं टाकलं आणि कामावर गेलो. दुपारी जेवणाच्या सुट्टीत वडलांनी दिलेली रिकामी पिशवी बघितली आणि काकांसाठी मिरच्या काढायच्या राह्यल्या ते आठवलं. घरची मिरची, एवढं सांगून काकांकडं पोचवली नाही तर घरी गेल्यावर शिव्याच पडतील. तसाच पुन्हा निघालो, मार्केटला आलो. तो सकाळचा माणूस कुठं दिसेना, पण त्याच्याकडनं मिरच्या घेऊन विकायला बसलेल्या बायका सापडल्या. त्यांच्याकडं गेलो नि सांगितलं, जरा ह्या पिशवीत मिरच्या भरुन द्या. त्यांनी विचारलं, किती दिऊ? मी म्हटलं, द्या चार-पाच किलो, घरच्याच हैत! असं म्हटल्यावर बाई तागडी ठिऊन माझ्याकडं बघाय लागली. म्हणाली, कुठनं आलायसा? चार रुप्ये पाव हाय मिर्ची. किती भरु सांगा. मी म्हटलं, अवो सकाळी मीच टाकून गेलोय की पोतं तुमच्यासमोर. तवा काडून घ्याची राह्यली म्हून परत आलो. बाई काय ऐकंना. काकांकडं तर मिरची द्यायचीच होती. शेवटी झक मारत साठ रुपये देऊन चार किलो मिरची विकत घेतली आणि काकांकडं पोच केली!"

उत्पादक ग्राहक झाला की काय होतं याचं उत्तम उदाहरण. म्हणून तर मी नेहमी म्हणतो, प्रोड्युस करु शकणा-यांनी कन्झ्युमर होणं ही डेव्हलपमेंट नाहीये भौ! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे खरच समजलं नाही. घेउअन जाणार्‍या व्यक्तीला बाजारभावाच इतका पण अंदाज नव्हता म्हणायचां का?

खरं आहे! काय बोलणार. एकदा लाल भोपळा पंच्याहत्तर पैसे भावानं मुंबईला विकला होता त्याची आठवण आली. अडत वगैरे काढून मुंबईला माल पोचवायचा खर्च व भोपळा साठवायचा खर्च निघाला होता जेमतेम.

शहरी मध्यमवर्गीय प्रश्न आहे, वेडगळपणाचा(च) असेल, कारण हे प्रत्येकाला सुचून तोही आतबट्ट्याचा व्यवहार ठरत असेल, पण विचारल्याशिवाय राहवत नाहीये.
मग शेतकरी किरकोळ विक्री का नाही करत? वेळ/ श्रम/ सेटअप/ मनुष्यबळ/ दादागिरी/ अडत्यांना फेवरेबल नियम का अजून काही?

मग शेतकरी किरकोळ विक्री का नाही करत? >>>

माझ्या वाचनावर आधारीत ज्ञानानुसार एपीएमसी कायद्यानुसार शेतकर्‍याला आपला माल कृषी उत्पन्न समितिमध्येच विकावा लागतो. त्या कायद्यानुसार समिती जो भाव ठरवेल तोच शेतकर्‍याला मिळतो.

आणि हल्ली मोदी सरकार आल्यावर तो कायदा रद्द करण्याबद्दल विचार चालू झाला तेंव्हा ह्या अडत्यांनी 'मुंबई / ठाण्याच्या बाजारात माल कसा पोहचतो ते बघतोच आम्ही' अशी उघड उघड धमकी दिली होती. पुढे तो कायदा रद्द होण्याचे बारगळलेच बहुतेक.

शुम्पी, शेतकरी बल्कमध्ये पैदास करतो. उदा. समज आमच्याकडे १०० पोती सोयाबीन निघालं. आता हे सोयाबीन मी बाजारात तागडी घेऊन विकू शकत नाही. ते मळणी झाल्यावर काही दिवसात गोडाउन मध्ये जाऊन पडलं पाहिजे कारणः
१. शेतावर सुरक्षित (उंदीर, घुशी, आर्द्रता, चोरीमारी) साठवणीची सोय नसते
२. कॅश फ्लो: चार महिन्यापुर्वी बियाणं विकत घेतल्यापासून, पाणीपट्टी, वीज बिल, मजुरी असा सर्व खर्च झालेला असतो. त्यामुळे पैश्याची आवक होणे गरजेचे असते.

हा माल कोण विकत घेणार? तर व्यापारी किंवा प्रोसेसिंग युनिट्स. सोयाबीन तेल एन्ड कस्टमरने वापरलं तरी तो/ती सोयाबीन विकत नाही घेणार.

भारतातली सप्लाय चेन थ्रु व्यापारीच जाते.

बाजारपेठेत - लिलावात गेलं की समज २० व्यापारी आहेत एकूण. फेअर मार्केट डिलींगमध्ये प्रोसेसिंग कंपन्यांची मागणी व पुरवठा यांच्या रस्सीखेचीने भाव ठरला पाहिजे. पण २० व्यापार्‍यांनी ठरवलं की प्रोसेसिंग कंपनीला ५० रुपये किलोने माल पुरवायचा पण लिलावात ५ रुपये किलोच्या वर कुणी जायचेच नाही. शेतकरी ट्रॅक्टरमध्ये माल घालून बाजारात आलेला असतो. लोडिंग-अनलोडींग-वाहनखर्च तगडा झालेला असतो. माल आणला नाही तर लिलावात घेत नाहीत. आता एव्हडा खर्च करून आल्यावर ५ रुपयाने विकण्यावाचून पर्याय नसतो.

दोन वर्षामागे सांगलीत द्राक्षाच्या लिलावात भाव २५ पैसे किलोने सुरू होवून १ रुपायापर्यंत गेला. त्याच्यावर कुठलाच व्यापारी भाव वाढवेना. द्राक्ष काय स्टोअर करून ठेवता येत नाही शेतकर्‍याला, पैश्याची पण गरज असते. मग कधी पडेल त्या भावाने विकतात किंवा राग अनावर झाला की दंगा करतात, माल रस्त्यावर ओततात आणि भकास नजरेने घरी जातात.

माझ्या मुलीला शाळेत असताना असाच एक धडा होता बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात. " लाल चिखल " नावाचा. लेखक नाही लक्षात आता. एक शेतकरी शेतात भरपूर कष्ट करुन, खतपाण्यावर , मशागतीवर खूप खर्च करुन टोमॅटोच पीक काढतो. पीक चांगल येतं. तो खुश असतो चार पैसे हातात खेळतील म्हणून पण कोणीही दलाल त्याला खर्चा एवढा भाव ही द्यायला तयार होत नाही. म्हणून निराशेने उद्वेगाने तो ते टोमॅटो पायतळी तुडवतो शेवटी. म्हणून 'लाल चिखल'.

टण्या
हे तर ऑलिगोपॉली व्यापार्‍यांचे कोल्युजन झाले, कायदे नाहीत का अश्या सेटिंग विरुद्ध?
सगळे शेतकरी एकत्र येऊन त्यांचा एक व्यापारी का नाही ऊभा करत?

शूम्पी
हे खरच समजलं नाही. घेउअन जाणार्‍या व्यक्तीला बाजारभावाच इतका पण अंदाज नव्हता म्हणायचां का? >>>
अमितव
मग शेतकरी किरकोळ विक्री का नाही करत? वेळ/ श्रम/ सेटअप/ मनुष्यबळ/ दादागिरी/ अडत्यांना फेवरेबल नियम का अजून काही? >>>
माधव
शेतकर्‍याला आपला माल कृषी उत्पन्न समितिमध्येच विकावा लागतो. त्या कायद्यानुसार समिती जो भाव ठरवेल तोच शेतकर्‍याला मिळतो. >>
टण्या
भारतातली सप्लाय चेन थ्रु व्यापारीच जाते. >>>
चमन
सगळे शेतकरी एकत्र येऊन त्यांचा एक व्यापारी का नाही ऊभा करत? >>>
---------------------

हे सगळे मुद्दे आणि प्रश्न बरोबर आहेत. त्या अनुषंगानं आमची पुढं झालेली चर्चा अशी -

आमचा मुद्दा - कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी व सोयीसाठी अस्तित्वात आलेली संस्था असताना शेतकरी तिचा लाभ का करुन घेऊ शकत नाहीत?
शेतकर्‍यांचं उत्तर - कारण तिथले संचालक आमच्या विरोधी पार्टीचे आहेत.

आमचा मुद्दा - गावातल्या प्रत्येक घरात एक-दोन तरी अशी माणसं असतातच जी प्रत्यक्ष शेतीत अथवा पूरक उद्योगात काहीही योगदान देत नाहीत. इंजिनियर, एमबीए झालेली मुलं 'योग्य' रोजगार न मिळाल्यानं बेरोजगार असतात. घरातली इतर माणसं जबाबदारी उचलत असल्यानं काही मुलं, पुतणे, भाऊ, गावगाड्याचं राजकारण करत फिरत असतात. अशा घरटी एक प्रमाणात वीस-पंचवीस शेतकर्‍यांमागं दहा-पंधरा तरी लोकांची टीम तयार होऊ शकेल. 'शिकलेल्या' मुलांना मार्केटिंग, फायनान्स, लॉजिस्टिक्स संबंधात 'योग्य' काम मिळू शकेल. घरचीच माणसं असल्यानं खर्च आटोक्यात राहतील आणि मिळालेल्या नफ्यातून एकत्र कामंही करता येतील. (सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यात नविन काहीच नाही. 'सहकारातून समृद्धीकडे' हे तर लहानपणापासून बघत आलोय...)
शेतकर्‍यांचं उत्तर - आजकालची मुलं असल्या कामाला तयार होत नाहीत. जास्त जमिनवाल्या शेतकर्‍याच्या घरातनं चार माणसं लावली पाह्यजेत. आम्ही कर्जं काढून पोरांना इंजनेर-मॅनेजर करतो त्ये शेती करायला का? आमच्या पोरांनी पुन्या-मुंबैला जाऊन लाखभर रुप्ये पगार कमवला तर तुमच्या पोटात का दुख्तंय? वगैरे वगैरे...

अजून एका ज्येष्ठ शेतकर्‍यानं दिलेली माहिती अशी -
"गावातल्या चार-पाच शेतकर्‍यांनी मिर्ची लावली तर बाजारला एकजण टेम्पोत टाकून न्हिऊ शकतो. पन मग सगळ्यास्नी एकसारखा भाव मिळनार. ह्ये काय करत्यात, एकजन जातो पयले मोटरसायकलीवरुन पोतं घिऊन. व्यापार्‍याला म्हंतो - 'माज्या पोत्याचं दे शंभर-दीडशे, पन मागनं त्यो दुसरा येनारे दोन पोती घिऊन, त्येला लय गरज हाय पैशाची, दिडशेत दोन्ही पोती दिऊन जाईल...' ही असली गावातली भांडणं वेशीवर न्यायची असत्यात ह्यांना!"

आमच्याकडं यापुढं मुद्दाच नव्हता मांडायला...

लाजिरवाणे सत्य आहे हे. अडतेच सगळा फायदा खातात.

आपल्याकडे अजून शहरात शेतकरी बाजार का भरत नाही ? ( भरतो का ? ) असे बाजार मी अनेक देशात बघितले आहेत. शहरातला एक मुख्य भाग या बाजारासाठी राखलेला असतो. तिथे त्या दिवशी वाहनांना मज्जाव असतो.
शेतकरी आपला माल स्वतः तिथे घेऊन येतात व ग्राहक थेट खरेदी करतात. यासोबत इतरही उत्पादने असतात.

रस्त्यालगत जर शेत असेल तर रस्त्याच्या कडेलाच शेतकरी आपल्या शेतातला माल विकायला ठेवतात.

दिनेशदा शहरातील माहीत नाही पण गावात असा आठवडी बाजार भरतो... पण शहरातील भाज्यांचा दराप्रमाणेच गावच्या भाज्यांचा दर असतो. एक पैसाही कमी कि जास्त नाही Sad अगदी मुंबईच्या भाज्यांचा दर आणि गावाकडील भाज्यांचा दर सेम Sad असे का देवाला ठावूक Sad

एक कडवं सत्य आहे. जवळून पाहिलय अशी पोती फेकून देवून किंवा नगण्य किंमतीत विकून आलेली फळे, भाजी. खूप त्रास असतो ह्यात. नको तिथे भाउबंदकी, गावच्या पुढार्याच राज्कारण... वगैरे बरीच कारणं आहेत. दिसतं व वाटतं तितकं सोपं नाहीये.
आता ह्या वयात होत नाही म्हणून शेतजमीन विकून मामा बसलाय जी काही बचत आहे त्यावर. मुलं सगळी मुंबई ,पुण्याला.

स्नेहनिल, तो फायदा शेतकर्‍याचा. पण तरीही गावातल्या गावात विकताना जर अतिलोभाने चढा भाव लावला तर मालाला उठाव कसा मिळणार ?
न्यू झीलंडमधेपण काम करायला माणसे नसतात. त्यावेळी स्ट्रॉबेरी, टोमॅटो, लिंबू वगैरे उत्पादनासाठी ग्राहकानाच तोडणीसाठी थेट शेतात आमंत्रण देतात. बाहेर जाताना वजन करून, पैसे भरून माल घ्यायचा. अर्थात तिथले ग्राहकही जबाबदारीने तोडणी करतात. नासधूस करत नाहीत.

अरे वा दिनेशदा असेही असते का? तसे म्हण्टले तर आम्हीही जबाबदारीने शेतात तोडणी करतो. फक्त शेतमालकाला माहीत नसते Wink