मन से रावण जो निकालू राम मेरे मन में है

Submitted by सुमुक्ता on 6 October, 2014 - 09:45

अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि पापावर पुण्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे दसरा. ह्याच दिवशी रामाने रावणाचा वध केला, ह्याच दिवशी दुर्गामातेने महिषासुराचा वध केला, ह्याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या वृक्षावरून आपली शस्त्रास्त्रे पुन्हा हस्तगत केली. दसऱ्याच्या दिवसाचे महत्व सांगणाऱ्या ह्या आणि अशा अनेक कथा आपल्या पुराणांमध्ये आहेत. पांडवांनी अज्ञातवास संपवून युद्धाची तयारी सुरु केली म्हणूनच असेल कदाचित, पूर्वीच्या काळी युद्धाच्या मोहिमा दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरु केल्या जात होत्या. दसऱ्याच्या दिवशी आपल्या राज्याच्या सीमा विस्तारित करण्यासाठी सीमोल्लंघन होत होते. आजही भारतामध्ये जवळजवळ सर्व प्रांतांमध्ये अतिशय उत्साहाने हा सण साजरा होतो. वेगवेगळ्या परंपराचे पालन होते. ह्या दिवसाला भारतभर अनन्यसाधारण महत्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मनाला जातो. कोणतेही कार्य सुरु करण्यासाठी अथवा शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे असे मानले जाते.

मी सुद्धा दसऱ्याच्या दिवशी परंपरेप्रमाणे सरस्वती पूजन केले. घरातील पुस्तकांची आणि यांत्रिक उपकरणांची पूजा केली. त्यानंतर दोन तीन दिवस मी विचार करत होते की नुसते सरस्वती पूजन करून अथवा सीमोल्लंघन करून काय साध्य होणार? अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि पापावर पुण्याचा विजय साजरा करायचा म्हणजे नक्की काय काय करायला हवे? सीमोल्लंघन नक्की कसे करायचे? खूप विचार केला तेव्हा "सीमोल्लंघना"चा खरा अर्थ मला थोडाथोडा कळायला लागला आहे. माझ्या मनाच्या सीमा विस्तारण्याचे सीमोल्लंघन करणे फार फार आवश्यक आहे असे मला जाणवले. माझ्या लक्षात आले की आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य केल्यानंतर येणारा अहंकार माझ्या मनाला सीमाबद्ध करत आहे. स्वतःबद्दल मी बाळगलेल्या वल्गना माझ्या प्रगतीच्या आड येत आहेत. सर्वप्रथम हा अहंकार दूर व्हायला हवा. तेव्हाच कळेल की साध्य करण्यासारख्या कितीतरी गोष्टी अजून बाकी आहेत. अहंकाराच्या सीमा झुगारून दिल्या तरच प्रगती शक्य आहे. हाच अहंकार माझ्या मनाला कमकुवत बनवीत आहे. अपयश पचविण्यासाठी लागणारी शक्ती अहंकारी मनात कधीच नसते. त्यामुळे अगदी किंचितसे अपयश देखील मला भयभीत करत आहे. आणि त्यातूनच नकारात्मक विचार वाढीस लागत आहेत

ह्याच अहंकारापोटी इतर लोकांनी मला महत्व द्यावे हा अट्टाहास जन्म घेत आहे . जगाचा केंद्रबिंदू मीच आहे. माझ्या प्राथमिकता महत्वाच्या आहेत. इतर लोकांची प्राथमिकता सुद्धा मीच असायला पाहिजे असे आत्मकेंद्रित विचार हाच अहंकार जन्माला घालतो आहे. आणि मग अतिशय शुल्लक कारणांसाठी अपमान, राग, दुःख, निराशा ह्या भावना वाढीस लागत आहेत. ह्याच अहंकारामुळे "मी इतरांसाठी एवढे करते" ही भावना माझ्या मनात रुजत आहे. त्यामुळे माझे मन इतर लोकांकडून अनेक अपेक्षा ठेवते आहे. इतरांसाठी कदाचित ह्या अपेक्षा अवास्तव असतील हे मानायला मन तयार होत नाही, ते ह्याच अहंकारामुळे. आणि मग अपेक्षा पूर्ण न झाल्याचा राग मनामध्ये मूळ धरत आहे. अपेक्षाभंगाचे दुःख मला व्याकूळ करते आहे. स्वत:ला अतिशय जास्त महत्व दिल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अपमान मानण्यात मला धन्यता वाटायला लागली आहे. ह्या अहंकारामुळे "माझाच त्रास मोठा आणि माझेच दुःख मोठे" असा विचार करण्याची सवय मला लागली आहे. त्यामुळे जगातील अनन्वित अत्याचार, दारिद्र्य आणि कल्पनेपलीकडचे दुःख ह्याकडे मी आपोआपच डोळेझाक करत आहे. असे दुःख सहन करणाऱ्या जगातील इतर लोकांपेक्षा मी कितीतरी सुखात आहे ही जाणीव नष्ट होऊ पाहतेय. आणि इतके सुंदर आयुष्य मिळूनही मी कृतघ्न आहे.

अहंकार आणि आत्मविश्वास ह्यामध्ये असणारी रेषा मला स्पष्ट दिसायला हवी. कोणतीही गोष्ट असाध्य अथवा अवघड असणे हे कमीपणाचे लक्षण नाही. मी काय साध्य करू शकते आणि कोणती गोष्ट माझ्यासाठी असाध्य अथवा अवघड आहे ही जाणीव झाली की आपोआपच आत्मविश्वास वाढेल. एखादी गोष्ट साध्य केल्यानंतर त्याचा गर्व करण्यापेक्षा अजून कितीतरी पल्ला पुढे गाठायचा आहे ही भावना मनाला उत्साह देईल. पुढे कसे होणार ही विवंचना करण्यापेक्षा पुढे अजून काय करता येईल असा विचार केल्याने मनाला हुरूप येईल. त्याचबरोबर माझ्या कर्तुत्वामध्ये अनेक लोकांचा हातभार आहे ही जाणीव ठेवली तर त्या कर्तुत्वाचा अहंकार मला होणार नाही. दुसऱ्यांनी मला केलेल्या मदतीची मी जाणीव ठेवली तर माझ्यामध्ये विनम्रता येईल. ही विनम्रताच मला अहंकारापासून दूर ठेवेल.

आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदांना मी ह्या अहंकारामुळे मुकते आहे. दुसऱ्याला मदत केल्यानंतर मिळणारे समाधान खरच खूप मोठे आहे. पण ती मदत मी दुसऱ्यावर नव्हे तर स्वतःवर उपकार म्हणून करायला हवी. मला समाधान मिळते म्हणून मी मदत करते, दुसऱ्या माणसापेक्षा त्याला मदत करण्याची गरज मला आहे असा विचार केला तरच मला निखळ समाधान मिळेल आणि त्या मदतीची परतफेड व्हावी अशी अपेक्षाच राहणार नाही. आपसूकच अवास्तव अपेक्षांपासून माझे मन मुक्त होईल. अपेक्षाभंगाचे दुःख माझी पाठ सोडेल. अहंकारी मनच मला जवळच्या लोकांवर शुल्लक कारणासाठी रागवायला आणि छोट्या छोट्या कारणांसाठी अपमान मानून कुढत बसायला भाग पाडते. त्यापेक्षा माझ्या मनाला आत्मपरीक्षणाची सवय हवी. झालेल्या चुकांबद्दल स्वतःला दोषी ठरविण्यापेक्षा त्या चुका सुधारण्याकडे माझा कल हवा. आत्मपरीक्षणामधून बोध घेउन स्वतःमध्ये बदल घडविण्याची माझी तयारी हवी.

विचार फार छान वाटला किंवा लिहिताना फार सोपे वाटले तरी असे वागणे फार कठीण आहे ह्याची कल्पना मला आहे. कळते पण वळत नाही अशातला भाग आहे. पण दसऱ्याचा मुहूर्त साधून प्रयत्न करण्यास काय हरकत आहे? आजपर्यंत दसऱ्याच्या नुसत्या कथाच ऐकत आले. आज त्या कथांमधून बोध घ्यायची वेळ आली आहे. अहंकाराचा त्याग करता आला तर मला मिळालेल्या आयुष्याबद्दल मला कृतज्ञता वाटेल. राग, द्वेष, दुःख, मत्सर ह्या भावना आपोआपच गळून पडतील. अहंकार हा सर्व नकारात्मकतेचा जन्मदाता आहे. माझ्या मनात असलेली अपार उर्जा ह्या अहंकारामुळे सीमाबद्ध होत आहे. ह्या अहंकाराच्या रावणाचे दहन करणे जमले तर राम माझ्या मनातच आहे. आणि मग माझ्या मनाच्या शक्तीला कोणती मर्यादा? मनाच्या उर्जेला मुक्त करणे हेच माझे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन असेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>दुसऱ्या माणसापेक्षा त्याला मदत करण्याची गरज मला आहे असा विचार केला तरच मला निखळ समाधान मिळेल<<< व्वा

मस्त लेख!

छान

सुंदर आणि तितकाच अगदी मनापासून लिहिलेला हा लेख आहे. "अहंकार" अंगी येणे वा बाळगणे म्हणजे एका अर्थी एका अवगुणाला जपणे. याचा संसर्ग इतरांना सीमेबाहेर जाऊन लागणे सुरू झाले म्हणजे त्याचे दुष्परिणाम ठळकपणे दिसायला सुरूवात होते. त्यातून मनी निर्माण होते ती असह्य अशी एक भीती, जिच्यामुळे जाणवायला सुरू होते ती एक चिंता "मी जे काल वागले ते होते का बरोबर ?" किंबहुना ही पायरी म्हणजे चांगलेपणाच्या मार्गावर टाकलेले एक पाऊल होय. इथे आत्मविश्वास हवा सोबतीला, जो व्यक्तीला समजावून सांगू शकतो की अंगी मुरत असलेल्या अहंकारावर मात कशी करावी.....ती करता येते परत चांगल्या आणि मनमिळाऊ वर्तनातूनच....ते तर आपल्याच हाती असते. तुमच्या एखाद्या मैत्रिणीला फ़ोनवर नुसते बोलून बघा, "अगं, परवा त्या कार्यक्रमात मी जे बोलले तुला....नकळत....त्याचे मला फ़ार वाईट वाटत आहे गं....तू विसरून जाशील का तो प्रसंग ?" बस्स. इतकी सौम्यतादेखील दोन मने जुळायला मदत करते...अहंकार जळूनच जातो.

हे सारे तुमच्या मनी जर दस-याच्या निमित्ताने आले असेल तर त्याच्यासारखा अन्य आनंद नाही....अहंकाराचा रावण आपणच जर जन्माला घातला असेल, तर त्याला गाडून टाकण्यासाठी रामाने कशाला यायले हवे...? ते तर तुम्हीच करू शकाल. शुभेच्छा.

सुंदर आणि प्रामाणिक लिखाण !

अहंकारावर पुर्ण विजय मिळवणे जवळ जवळ अशक्यच, हे मी आयुष्याच्या एका टप्प्यावर समजून चुकलो. तेव्हापासून त्याची टिंगल उडवत जगतोय. ते सोपे पडते.

सुमुक्ता

खुपच ह्र्द्य आत्मचिंतन आहे. एक अतिशय महत्वाचे reminder दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.

प्रिया