शिवार (मदिरा वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 29 September, 2014 - 00:32

(मदिरा वृत्त = गालल गालल गाललगा , ललगा ललगा ललगा ललगा )

आठवतो मज काळ जुना , अन आठवतो मज गाव पुन्हा,
ओबडधोबड वाट जरी ,मज बोलवतो गतकाळ पुन्हा....
पेटवल्यावर चूल घरी ,खरपूस सुवासिकता फुलते,
माय कुठे घर आवरते ,पण कंकण मंजुळ वाजवते.....

पाणवठ्यावर कैक स्त्रिया, कमरेवर घागर,वावरती
गोंधळ घालत कायमचा, लटकेच पुन्हा रुसती हसती....
आदळते नववार कुठे ,दगडावर वाळण अंथरले,
कोण भिजे कुणि वाट बघे, उघडीच तिथे बसतात मुले...

अंगण सारवते गृहिणी, तुळशीपुढती पणती जळते,
घेत कडेवर बाळ तिचे, स्वयपाक धुणी सगळे करते....
नांगर घेत गळ्यात उभा, धडधाकट मालक रोज दिसे,
तो निघतोय मळ्यात जरी, गृहिणी मुरकून मनात हसे....

शेत खळ्यात मका मळता, कणसे फुटल्यावर का उडती,
साठवल्या पिशव्यांवरती ,हलकी उबदार उन्हे पडती...
धुंद हवेत पिके हलता, चिमण्या तर गोंधळतात उगा,
हात हवेत सफेद झगा, दिसतो टकल्या खुणवीत उभा...

सांज जरा कलताच, उडे पदधूळ, गुरे फिरतात घरी,
हंबरती इवले बछडे ,क्षिरधार मुखी मिळणार तरी...
लाल प्रभाकर मावळता, पडवीतच माळकरी जमती,
कष्टकरी भजनात भले ,थकवा विसरून हरी भजती...

गाव शिवार मनी ठसतो, हिरवी कुरणे मन पांघरते,
आठवते जगणे सगळे ,शहरात जरी सुख आढळते...
आठवतो मज पार जुना, अन उंबर आठवतोय जुना,
स्वप्न खरे ठरणार कधी, मज जन्म मिळो खडकात पुन्हा ...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चित्रदर्शी रचना!

ही रचना वाचून माझ्या दोन जुन्या रचना आठवल्या. त्या देण्याचा मोह झाला म्हणून लिंक देत आहे, कृ गै न. Happy

उसळून असा लाव्हा उडतो

एक झोपडी

मस्त चित्रदर्शी रचना! >>> बेफींशी सहमत.
आणि लय देखील मस्त सांभाळलेय कवितेत ..... छानच.

"सांज जरा कलताच, उडे...." हे कडवे सर्वात विशेष वाटले.

धन्यवाद उल्हास सर...
बेफिकिरजी कृ.गै.न. ची आवश्यकता नाहीच इथे....तुमच्या अतिशय सुंदर रचना यानिमित्ताने मला आज वाचायला मिळाल्या यातच मी भाग्य समजतो....कामाच्या व्यापात कधी लक्ष गेले नसते तर एका सुखद अनुभवाला मुकलो असतो मी......खरोखर अत्यंत आनंद होत आहे तुमच्या रचना वाचून....