मन - एक मित्र

Submitted by शमा१ on 25 September, 2014 - 14:10

नेहमीचीच सकाळ. शांतपणे खिड्कीत उभी राहून मी सकाळची कोवळी शांतता हळू हळू पिऊन घेतेय.
मधूनच एखाद्या पक्षाचा आवाज येतो.
ही वेळ अगदी खास वाटते मला. स्वतःच स्वतःशी बोलायची वेळ.
स्वतःच्या मनाला आंजारायची गोंजारायची वेळ.
नाहीतर एरवी वेळ कुठे असतो मनाचं काही ऐकायला ?
शरीरात कुठेही न दिसणारा हा अवयव अवघं आयुष्य व्यापून राह्तो.
आणि किती गृहीत धरतो मनाला आपण ?
--
मन ही एखाद्या समंजस मित्रासारखं वागतं. कित्येकदा मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत , तरी तक्रार नाही.
कित्येकदा मनाप्रमाणे गोष्टी घडूनही मला मनाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.
कित्येकदा मनाच्या इच्छेला मी ओठावरही येऊ दिलेलं नसतं.
कित्येकवेळेला तर तुकारामांनी लिहिल्यासारखं 'आपुलाची वाद आपणासी ' असं ही झालेलं.
कित्येकवेळेला तर जे नेमकं हवं होतं ते हेच आहे काय असा अविश्वास ही मनावर दाखवलेला .
कित्येकदा बुद्धीने मनाला फसवून जे हवं आहे ते हेच आहे असा आभास ही निर्माण केलेला.
तर कधी आपल्या मनात नेमकं काय चाललंय हे कळायला ही वेळ लागलेला.
मन मात्र एखाद्या समंजस् ,सुजाण मित्रासारखं समजून उमजून आपल्याला सांभाळून घेत असतं.
--
हळू हळू सकाळ होतेय. अगदी पृथ्वीचा 'warm up' चालल्यासारखं वाटतं.
मी स्वतःला दिवसभरातल्या घडामोडींसाठी सज्ज करतेय.
आणि कुणालाही न दिसणारा माझा हा समंजस मित्र मला दिवसाच्या स्वाधीन करून अलगद बाजूला होतो.

- माधवी शहाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..