शाकशुका - इस्राएली तोंपासु

Submitted by भानुप्रिया on 25 September, 2014 - 01:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम किंवा १ मोठ्ठा आणि एक जरा छोटा - कांदा
१ रेड बेल पेपर
४ मध्यम टमाटे, नीट पिकलेले
१ पिटुकली ढोबळी मिर्ची
१०० ग्राम पनीर, कुस्करून
कमी तिखट असलेली सुंदरशी एक हिरवी मिर्ची
लसणाच्या ५-६ पाकळ्या
अर्धा चमचा जिरेपुड
अगदीच चिमुटभर धनेपुड
पाऊण चमचा लाल तिखट
थोडीशी मिरपूड
नमक स्वादानुसार!
ऑलिव्ह ऑईल २-४ चमचे
चीझ, मनात येईल तेव्हढं Proud
कोथिंबीर, बारीक चिरलेली
आणि ६ अंडी

क्रमवार पाककृती: 

कांदा, बेल पेपर आणि कॅप्सिकम छान बारीक चिरून घ्या.
(फार कौशल्य नाही दाखवलं तरी चालेल कारण नंतर सगळं शिजवायचंच आहे!)
एका जाड बुडाच्या कढईमधे ऑऑ तापवून घ्या. तेल मस्तपैकी तापलं की त्यात कांदा, बेल पेप आणि कॅप्सिकम ओता.
आता आपल्याला कंटाळा येईपर्यंत हे मंद आचेवर परतायचंय. (साधारण वीस मिनीटं)
साधारण कांदा (जळू न देता) गोल्डन ब्राऊन झालाय असं वाटायला लागलं आणि इतरही सगळं शिजल्यासारखं दिसायला लागलं की त्यात बरीक चिरलेला लसूण आणि उभी चिरलेली मिर्ची घालून सधारण ३ मिनिटं परतायचंय.
हवं तर थोडंस्सं मीठ आत्ताच घालून घ्या.
आता बारीक चिरलेला टमाटा कढईत ढकला.
परत एकदा कंटाळा येईपर्यंत परता.

लवकर उरकण्याच्या नादात आच वाढवू नका, आणि वाढवलीच, तर सासुशी गप्पा तर अज्जीबात मारत बसू नका. कढई वगैरे बदलावी लागते. (हो हो, स्वानुभव आहे!)

तर, हा मधला वेळ सत्कारणी लावायला म्हणून ओव्हन १८० डिग्री ला प्रीहिटींगला लावा.
मग ज्या मोल्ड मध्ये आपण हे सगळं सेट करणार आहोत, तो हाताशी काढून ठेवा.

एकदा पुन्हा छान परतून घ्या आणि आता त्यात पुरेसं मीठ, जिरेपुड, धनेपुड आणि लाल तिखट घाला. नीट मिक्स करा आणि कुस्करलेलं पनीर घालून, परतून एक २-५ मिनिटं शिजु द्या.

गॅस बंद करून कढईतलं हे सगळं मिक्स्चर ओव्हनच्या भांड्यात काढून घ्या.

त्यावर सगळी अंडी अलगद फोडून घाला.
हवी असल्यास थोडीशी मिरपूड घालून चीझचा एक मस्स्त लेयर द्या. (कॅलरीज ओव्हन मध्ये जळणार आहेत, त्याच्या विचार तुम्ही खरंच करू नका!)

आता साधारण १८० डिग्री वर २५ ते ३० मिनिटं ठेवा.

सर्व्ह करताना वरून कोथिंबीर पेरा आणि बागेत किंवा तत्सम कुठल्याही ब्रेड बरोबर ह्याचा आस्वाद घ्या.

आम्ही रेड वाईन घेतलेली, ह्याबरोबर. बियरही उत्तम लागेल असं मला वाटतंय. ट्राय करा आणि कळवा!

वाढणी/प्रमाण: 
२-४ जणांसाठी, खूपच आवडलं तर कमीही पडू शकतं!
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझं अतिकुशल टाळकं
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुजुता......भारी गं....फेबु वर पिक्स पाहीले मला वाटलं कुठे रेस्टॉरंट मधे काढलेत की काय....

भानुप्रिया... तोंडाला पाणी सुटलेलह्च आहे.
पण कृती लिहायची पद्धत आवडलीच. सुंदरशी मिर्चि, पिटुकली ढोबळी मिरची, सुंदरसं तापलेलं तेल.. सत्कारणी लावायचा वेळ... मस्तच.

अनिश्का, धन्यवाद!!!

दाद, पाकृ लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता, माझ्यामते जरा फेलच गेलाय, पण मोठ्ठं थँक्यु तुला! Happy

चिनुक्स, येण्याच्या तासभर आधी फोन करून कधीही ये! Proud

रुनी, थँक्यु! Happy