संगीत-आस्वादः लेख-१- तानपुरा

Submitted by चैतन्य दीक्षित on 23 September, 2014 - 01:14

भारतीय शास्त्रीय संगीतात गायक-वादकांचा आदिपूज्य म्हणता येईल असा तानपुरा! तानपुर्‍याबद्दल मला माहिती असलेल्या काही गोष्टी लिहायचा हा प्रयत्न आहे. काही चुकत असेल तर ते आवर्जून दुरुस्त करा आणि अजून काही माहिती असेल तर ती अवश्य द्या. ती माहिती लेखात समाविष्ट करेन.

तानपुरा ह्या नावावरून अर्थ लावला तर 'ताने'साठी म्हणजे गायनासाठी (रूढार्थानं जिला तान म्हणतात ती तान नव्हे.) पूरक, तो तानपुरा. यूट्यूबवर असलेल्या शास्त्रीय संगीताच्या व्हिडिओवरील कमेंट्समध्ये अनेकदा 'what is that drone like sound? ' असे प्रश्न विचारलेले आढळतात. तो तानपुर्‍याचा आवाज ही भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख आहे. तानपुर्‍याची ढोबळ ओळख खालीलप्रमाणे.

विशिष्ट जातीच्या भोपळा कोरून त्याला वरून लाकडी पोकळ दांडी लावली जाते. जेणेकरून पोकळी तयार होईल आणि आवाज मोठा येण्यास मदत होईल. हे भोपळे विषारी असल्याने त्यांना सहसा कीड लागत नाही (असे ऐकले आहे). वरून केले जाणारे पॉलिशिंगही टिकाऊपणा वाढवते. भोपळ्याच्या बुडाशी तारा घट्ट बांधता येतील अशी लहानशी खुंटी/ धातूची पट्टी लावली जाते. तानपुर्‍याच्या तारा त्या खुंटी भोवती गुंडाळल्या जातात आणि वर लाकडी दांड्याकडे खेचून बांधल्या जातात. लाकडी दांड्यालाही विशिष्ट ठिकाणी छिद्र पाडून तार पिळता येईल अशी खुंटी त्या छिद्रात बसवतात. ह्या वरच्या खुंट्या घट्ट किंवा सैल करून तारेवरचा ताण जास्त/ कमी केला जातो.

तारा: तानपुर्‍यात किमान चार तारा असतात. पाच किंवा प्रसंगी ७ तारांचे तानपुरे वापरल्याचीही उदाहरणे आहेत.
(पं. पन्नालाल घोष यांनी असा सात तारांचा तानपुरा वापरल्याचे ऐकले आहे).
तारेचा धातू, त्याची घनता आणि त्यावर असलेला ताण यांवर तार छेडली असता येणारा आवाज अवलंबून असतो. तार खूप सैल किंवा खूप घट्ट असेल तर त्यातून योग्य तो आवाज येत नाही.
सर्वसामान्यपणे तानपुर्‍याच्या ४ तारा खालीलप्रमाणे लावल्या जातात.
१-तानपुर्‍याची पहिली तार ही रागानुरूप वेगवेगळ्या स्वरांत लावली जाते. सर्वसामान्यपणे 'पंचम' स्वरात लावली जाते. पण पंचम वर्ज्य असलेल्या रागात मध्यम किंवा निषाद यापैकी जो त्या रागात मुख्य स्वर असेल त्या स्वरात लावली जाते. उदा- राग रागेश्री- यात पंचम वर्ज्य असल्याने आणि निषाद/ मध्यमापैकी मध्यम हा मुख्य स्वर असल्याने मध्यमात लावली जाते.
२, ३ -त्यानंतरच्या दोन तारांना जोडतारा किंवा जोडी म्हणतात. त्या मध्यसप्तकातल्या षड्जावर लावल्या जातात. तार षड्जात लावताना आधी ती शुद्ध निषादावर लावून मग तिचा पीळ वाढवून षड्जापर्यंत नेणे सोयीचे ठरते आणि तारही व्यवस्थित सुरात लागते असे गुरुजींनी सांगितले.
४- शेवटची तार खर्जात लावली जाते.
ही तार इतर तारांच्या मानाने जाड असल्याने येणारा आवाज धीर-गंभीर असतो.
तारा एकामागून एक छेडल्या जात असल्याने, स्वरलहरींची वर्तुळे एकमेकांत मिसळून संपूर्ण वातावरण भरून राहील असा एकसंध नाद निर्माण होतो. त्यातही दोन तारा मध्यसप्तकाच्या षड्जात आणि एक खर्जात लावल्याने गायक/वादकाला इतर स्वरांचा आधारभूत असा षड्ज सहज सापडतो आणि गायन/वादन सुरात आहे की नाही हे जोखता येते.

तानपुरा छेडताना मध्यमेने पहिली तार आणि तर्जनीने इतर तारा छेडल्या जातात. बोटे तारांना शक्य तितकी समांतर ठेवून तार छेडली जाते. बोटे तारेला काटकोनात ठेवून तार छेडल्यानेही आवाज येऊ शकत असला तरी तारा खूप लवकर उतरतात (सैल पडतात).

गायन/वादनासाठीच्या तानपुर्‍यांचा फरक-
गायनासाठी मोठे आणि वादनासाठी तुलनेने छोटे तानपुरे वापरले जातात (आजकाल).
वादनामध्ये मुख्य वाद्याचा आवाज तानपुर्‍याच्या आवाजापुढे लहान ठरू नये म्हणून लहान आणि पर्यायाने आवाज कमी असलेले तानपुरे वापरले जातात.
गायनासाठी मोठे, भरीव आवाजाचे तानपुरे वापरले जातात. काही गायक दोनापेक्षा जास्त तानपुरे वापरून मैफिलीत गायन सादर करतात.
गायक व गायिकांसाठीचे तानपुरेही क्वचित वेगळे असलेले पाहण्यात आले आहे. तरीही सर्वसामान्यपणे गायनासाठीचे तानपुरे हे मोठ्या भोपळ्याचे (परिणामी भरीव आणि धीरगंभीर आवाजाचे) असतात.

इलेक्ट्रॉनिक तानपुरे- सध्या इलेक्ट्रॉनिक तानपुरे वापरण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. किंबहुना, खरे तानपुरे वापरले तरीही ते लावताना इलेक्ट्रॉनिक तानपुर्‍यातील स्वर प्रमाण मानून लावण्याचेही प्रमाण वाढले आहे.
तानपुरा हा खरे तर गायकाच्या गातानाच्या आवाजाला अनुसरून त्याच्या स्वरात लावण्यासाठी असतो. कोणत्या स्वरात गायन केले जाते? हे ढोबळमानाने सांगताना सोपे जावे म्हणून पेटीच्या पांढर्‍या व काळ्या पट्टीच्या भाषेत स्वर सांगितला जातो. उदा. काळी१, पांढरी २ इ. परंतु, माझा काळी १ हा स्वर आणि अन्य कुणा गायकाचा काळी१ हा स्वर सारखाच असला पाहिजे असे बंधन नाही. हे भारतीय संगीताचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यामुळे तानपुराही गायकाच्या गळ्यानुसार त्या त्या स्वराच्या अचूक स्वरलहरीपेक्षा कमी-अधिक पट्टीत लावून गायन केले जायचे. अर्थात, इलेक्ट्रॉनिक तानपुर्‍यातही अशी पट्टी किंचित कमी-अधिक करण्याची मुभा आहेच, पण तरीही प्रत्यक्ष तारा छेडल्याने येणारी अनुभूती देण्यात इलेक्ट्रॉनिक तानपुरे कमीच ठरतात यात शंका नाही.

पु.ल. देशपांडेंच्या एका पुस्तकात (बहुतेक पूर्वरंग) त्यांनी जे लिहिलंय ते अक्षरश: खरं आहे.
'मोक्ष मिळवण्यासाठी वनावनातून भटकण्यापेक्षा दोन तानपुर्‍यांच्या मध्ये जाऊन बसला असता तर त्याला (बुद्धाला) लगेच मोक्ष म्हणजे काय ते कळले असते' (शब्द पुस्तकातले जसेच्या तसे नाहीत).

- चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती Happy

माझा काळी १ हा स्वर आणि अन्य कुणा गायकाचा काळी१ हा स्वर सारखाच असला पाहिजे असे बंधन नाही. >>> याचा अर्थ समजणं माझ्या बुद्धीच्या पलिकडलं आहे.

छान सुरवात.
हे भोपळे कडू असतात. खाण्यासाठी वापरले जात नाहीत. छोटा गंधर्वांसारखा एखादा गायक तर स्वतः भोपळ्याची निवड करत असे. दोन भोपळे एका वेलीवरचे असावेत असा त्यांचा कटाक्ष असे.

नाटकात, नाट्यगीत गाताना क्वचितच तानपुरे वापरले जातात. पण ज्या नाटकात प्रत्यक्ष संगीत मेहफीलच असेल त्या नाटकात तानपुरे वापरले जात. स्वरसम्राज्ञी नाटकात, लता शिलेदार ( दीप्ती भोगले ) आणि किर्ती शिलेदार एकमेकींना साथ करत असत.
संशय कल्लोळ नाटकात जलश्याचा प्रवेश आहे. त्यात प्रभाकर कारेकर, शोभा गुर्टू असे कलाकार हजेरी लावत. त्यावेळीही तानपुरे असत. कट्यार काळजात घुसली मधे भार्गवराम आचरेकर ( दिन गेले भजनावीण सारे ) आणि
जय जय गौरीशंकर नाटकातही तानपुरे असत.

लताची शास्त्रीय गायनाची एक जूनी क्लीप यू ट्यूबवर आहे, त्यात तिने स्वतः तानपुरा घेतलेला आहे.

माझा काळी १ हा स्वर आणि अन्य कुणा गायकाचा काळी१ हा स्वर सारखाच असला पाहिजे असे बंधन नाही>>>>> @ चैतन्य. मला वाटते हे विधान तपासुन घेणे गरजेचे आहे.
प्रथमत: काळी १, पांढरी २ ह्या स्वर पट्ट्या हार्मोनियम आला तेंव्हाच अस्तीत्वात आल्या. जर एकच हार्मोनियम दोन गायकांनी वापरला तर दोघांची काळी १ ( स्वर ) सारखाच असला पाहीजे.

सर्व प्रतिसाददात्यांचे मनापासून आभार.

>>जर एकच हार्मोनियम दोन गायकांनी वापरला तर दोघांची काळी १ ( स्वर ) सारखाच असला पाहीजे.
@टोचा
बरोबर आहे. जर एकच हार्मोनियम असेल तर दोघांचाही काळी १ हा स्वर सारखाच असला पाहिजे.
माझं विधान अधिक स्पष्ट करतो.
माझा काळी १ हा स्वर आणि अन्य कुणा गायकाचा काळी१ हा स्वर सारखाच असला पाहिजे असे बंधन नाही>>

माझ्या या विधानापूर्वी हा भाग आहे.
<कोणत्या स्वरात गायन केले जाते? हे ढोबळमानाने सांगताना सोपे जावे म्हणून पेटीच्या पांढर्‍या व काळ्या पट्टीच्या भाषेत स्वर सांगितला जातो.>

त्यामुळे माझा जो नैसर्गिक आवाज आहे तो पेटीच्या पट्टीच्या भाषेत सांगायचं तर समजा 'काळी१' च्या जवळ (काळी१ पेक्षा कमी/जास्त) असला तरीही सांगताना काळी१ असाच सांगितला जातो.
तसाच दुसर्‍या कुणा गायकाचा आवाजही काळी १ असा सांगितला जात असला तरी नैसर्गिक आवाज पेटीच्या काळी १ पेक्षा कमी किंवा जास्त (किंवा अगदी तंतोतंत काळी१) असणार. म्हणून माझा काळी१ आणि अन्य गायकाचा काळी १ एकच फ्रीक्वेन्सी असेल असे नाही.

किंबहुना, पेटीवर मानवी गळ्याशी जुळेल अशाप्रकारे सूर बदलता येत नसल्याने, सुरुवातीला हार्मोनियम वापरण्याला अनेक गायकांचा विरोधच होता. त्याऐवजी सारंगी वापरली जायची, जेणेकरून गायकाच्या गळ्याशी तंतोतंत जुळेल असा स्वर त्यातून निघू शकेल.

छान लेख चैतन्य. आवडला.
पण तरीही प्रत्यक्ष तारा छेडल्याने येणारी अनुभूती देण्यात इलेक्ट्रॉनिक तानपुरे कमीच ठरतात यात शंका नाही. >> हे का कमी ठरत असावेत? प्रत्यक्ष तार छेडल्यावर ऐकू येणारे हार्मोनिक्स इलेक्ट्रोनिक तानपुऱ्यात ठेवत नाहीत का? ते ठेवणे फारसे कठीण नसावे. का पोकळीत निर्माण होणारी कंपने आणि प्रतीकंपने सिम्युलेट नाही झाल्येत?

त्यामुळे माझा जो नैसर्गिक आवाज आहे तो पेटीच्या पट्टीच्या भाषेत सांगायचं तर समजा 'काळी१' च्या जवळ (काळी१ पेक्षा कमी/जास्त) असला तरीही सांगताना काळी१ असाच सांगितला जातो.
तसाच दुसर्‍या कुणा गायकाचा आवाजही काळी १ असा सांगितला जात असला तरी नैसर्गिक आवाज पेटीच्या काळी १ पेक्षा कमी किंवा जास्त (किंवा अगदी तंतोतंत काळी१) असणार. म्हणून माझा काळी१ आणि अन्य गायकाचा काळी १ एकच फ्रीक्वेन्सी असेल असे नाही.->

हे मान्य आहे.. पण काळी १ असे संबोधल्यावर स्टंडर्ड पेटीवर जो काळी १ वाजतो त्याच्याशी जुळणाराच सूर अपेक्षित असतो. तो कमी जास्त होत असेल तर सुरेल न होता कणसूर वगैरे प्रकार होतात.
हार्मोनियम टेम्पर्ड स्केल मध्ये असल्यामुळे प्रत्येक सूर हा ठराविक अंतरानेच येतो.. पण आपल्याकडची स्वर पद्धती टेम्पर्ड मध्ये बसत नाही.. त्यामुळे पेटी सुद्धा वेगवेगळी ट्यून केली जाते.. काळी १ चा सा धरून लावलेली पेटी काळी २ च्या सप्तकात सूरात असेलच ह्याची खात्री नाही.. त्यामुळे काळी २ चा सा धरून लावलेली वेगळी पेटी पण वापरली जाते..

बर्‍याचदा पुरुष आणि महिला गायक असतील तर दोन वेगळ्या पेट्या वापरल्या जातात..

अजूनही दक्षिण हिंदुस्थानी मध्ये पेटी प्रवेश करू शकलेली नाही कारण त्यांच्या कडची स्वर पद्धती.. त्यांच्याकडे वापरले जाणारे सगळे सूर पेटीत येतच नाहीत.. त्यामुळे व्हायोलिन हेच साथीला वापरले जाते. आणि बरोबर स्वर भरणा करण्यासाठी तानपुरा.. चूभुदेघे..

तंबोर्‍याचा भोपळा विषारी वा कडू असतो ते माहिती नाही. पण तो खायला वापरत नाहीत हे नक्की. मिरजेतल्या सतारमेकरांकडे हे भोपळे बहुतकरून पंढरपूरहून येतात.

हिम्सकूल,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

>पण काळी १ असे संबोधल्यावर स्टंडर्ड पेटीवर जो काळी १ वाजतो त्याच्याशी जुळणाराच सूर अपेक्षित असतो. तो >कमी जास्त होत असेल तर सुरेल न होता कणसूर वगैरे प्रकार होतात.

हो, बरोबर. अर्थात, पेटी वापरली जात असताना हा मुद्दा योग्य ठरेल.
मला भारतीय संगीतपद्धती 'टेम्पर्ड' स्केलमध्ये नाही हा मुद्दा अधोरेखित करायचा होता, पण कदाचित जास्तच क्लिष्टता आली असावी लिखाणामुळे.

>त्यामुळे पेटी सुद्धा वेगवेगळी ट्यून केली जाते.. काळी १ चा सा धरून लावलेली पेटी काळी २ च्या सप्तकात सूरात >असेलच ह्याची खात्री नाही.. त्यामुळे काळी २ चा सा धरून लावलेली वेगळी पेटी पण वापरली जाते..

>बर्‍याचदा पुरुष आणि महिला गायक असतील तर दोन वेगळ्या पेट्या वापरल्या जातात..

हो हे ऐकलं आहे मीही.

सुमेधाव्ही, टण्या - धन्यवाद.

मस्त माहिती. !
एक अगदी बेसिकमध्ये राडा असलेला प्रश्न विचारू का? Sad
तानपुरा म्हणजेच सतार का? (मला वाटायचं सतारीला जरा भारी क्लासी बिसी भाषेत तानपुरा म्हणतात!)
की ही दोन वाद्य एका प्रकारची पण वेगवेगळी ?

मस्तं लेख.. Happy

इलेक्ट्रॉनिक तानपुरे >>> याला काही पर्यायच राहिला नाहीये हल्ली... प्रत्यक्ष तानपुरा नसताना हेच जी काही साथ करतात ती गोड मानून घ्यावी लागते....

तानपुरा म्हणजे सतार नाही.

तानपुरा हे गायन किंवा वादनाला accompaniment म्हणून वापरतात. तानपुर्‍यावर रागविस्तार करता येत नाही. षड्ज मिळण्यासाठी याचा उपयोग होतो. तानपुरा लावणे हे कौशल्याचे काम आहे.

सतार हेही तंतुवाद्य (string instrument) आहे हेच काय ते साम्य असेल तानपुरा आणि सतारीत. सतारीवर रागविस्तार करता येतो.

पराग, तानपुरा म्हणजे तंबोरा. हा एका हाताने वाजवतात. वाजवणारा आपल्या खांद्याशी तानपुरा उभा धरतो किंवा समोर आडवा जमिनीला समांतर ठेवतो. (चुभूद्याघ्या)

सतार कायम तिरकी धरूनच आणि दोन्ही हातांनी वाजवली जाते. त्यातला खालचा हात तारा व्हायब्रेट करण्यासाठी आणि वरचा हात त्या तारांवर कमी-अधिक दाब देण्यासाठी वापरला जातो. खालच्या हाताच्या तर्जनीत नखी अडकवली जाते.
तानपुरा छेडताना अशी नखी वगैरे घालत नाहीत.

तानपुरा छेडणारं बोट तारेला समांतर असतं. सतारीत पर्पेन्डीक्युलर असतं.

चुभूद्याघ्या
चुभूद्याघ्या
चुभूद्याघ्या Proud

तानपुरा म्हणजेच सतार का? (मला वाटायचं सतारीला जरा भारी क्लासी बिसी भाषेत तानपुरा म्हणतात!)
की ही दोन वाद्य एका प्रकारची पण वेगवेगळी ?>>>>>

@पराग - हा प्रश्न तुम्हाला खरच पडला असेल तर तुम्ही ह्या धाग्यावर आलात च का असा प्रश्न मला पडलाय.

हा प्रश्न तुम्हाला खरच पडला असेल तर तुम्ही ह्या धाग्यावर आलात च का असा प्रश्न मला पडलाय. >>>

का बरं?? असे काही गैरसमज असलेच तर ते दूर होतील ना या धाग्यावर येऊन...??? Uhoh

सर्व्वान्च्या हार्मोनियम चा "काळी एक" हा एकच असावा यासाठी "प्रमाण" कंपनसान्क्येच्या स्वराची व्यवस्था अस्तित्वात आली. यानुसार "सी" या स्वराला२७० कंपनसंख्या ठरली . हा म्हणजे हार्मोनियम चा "पांढरी एक". "प्रमाणित" "सी" स्वर बाजारात उपलब्ध असतो. प्रत्येकाने हा आपल्याजवळ बाळगावा आणी हार्मोनियम या स्वराशी तपासून घ्यावी.
विकि मधे ही सन्ख्या २६१ दिलि आहे.(http://en.wikipedia.org/wiki/C_%28musical_note%29). भारतात २७० ही कपनसन्ख्या प्रचलित आहे.
२७० हा षड्ज असेल तर ५४० हा तार षड्ज होतो . पुरूष गायक जी हार्मोनियम साथीला वापरतात (नर स्वरांची) त्यात "मधले" पांढरी एक चे सप्तक या कमपनासंख्येच्या स्वरांचे असते. गाइका जी हार्मोनियम साथीला वापरतात (मादी स्वरांची) त्यात "मधले" पांढरी एक चे सप्तक ५४० ते १०८० कमपनासंख्येच्या स्वरांचे असते.

हा प्रश्न तुम्हाला खरच पडला असेल तर तुम्ही ह्या धाग्यावर आलात च का असा प्रश्न मला पडलाय. >>>

का बरं?? असे काही गैरसमज असलेच तर ते दूर होतील ना या धाग्यावर येऊन...???
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मला असे म्हणायचे होते. -- नॉर्मली ज्या भारतीय शिकलेल्या ( संगीताची अजिबात आवड नसली तरी ) माणसाने सतार आणि तंबोरा कधीतरी, कुठेतरी ओझरता तरी बघितला असतो. कोणाच्या तरी तोंडुन त्याचा उल्लेख ऐकलेला असतो. कधीतरी चित्र बघितली असतात. तुम्ही तुमच्या आजुबाजुला विचारुन बघा १००० मधल्या १ माणसाला तरी हा प्रश्न पडेल का ते.

हा प्रश्न पडला म्हणजेच "पराग" ला संगीतामधे काडीचा म्हणजे काडीचा इंटरेस्ट नाही. मग ह्या धाग्यावर येण्याचे प्रयोजन कळले नाही. कदाचित चेष्टेचा मुड असावा असे वाटले.

अहो जर मराठी ५ वी चा तास चालू असेल तर त्यात येउन कोणी "अ" आणि "ब" मधे काय फरक असतो असे विचारले तर चालेल का?

माझे गुरुजी पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी तानपुरा कसा जुळवतात ते दाखवले. तानपुरा जुळवताना जवारी काढणे हा एक महत्वाचा भाग. तो या व्हीडिओत पाहायला मिळेल.

जुळलेला तानपुरा कसा वाजतो व कसा वाजवला जातो ते इथे पाहा.
दुसरा व्हीडिओ सुरुवातीला काही सेकंद उलटा दिसतोय, त्याला नाइलाज आहे. मोबाईलवर घेतलेला असल्याने लक्षात आले नाही. Happy

व्हीडिओ इथेच एम्बेड करता येतो का? कसा करायचा तो?
कुणाला माहिती असेल तर सांगता का?