आजोबांचे मरण..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 September, 2014 - 13:02

त्या एका वर्षी खूप पाऊस पडला
दुष्काळ संपला अन माझा आजोबा
आषाढातील एका ओल्या संध्याकाळी
अवसेच्या आधी जग सोडून गेला
चार वर्ष पावसाविना सरली होती
केलेली सारी मेहनत वाया गेली होती
तरीही मनावर दगड ठेवत अन
हातावर आपल पोट सांभाळत
त्यांनी जगून काढली होती.
खूपच काटक म्हातारा
पंच्याहत्तरी पार केलेला
उन्हात रापलेला शेतात खपलेला
काहीसा खंगलेला काहीसा वाकलेला
तरीही जिवट आणि चिवट
बाभळीसारखा टिकून राहिलेला .
मरायच्या आधी त्याला पहायची होती
हिरवीगार शेती भरलेली नदी
शेताच्या बाजूचा उधानला ओढा .
त्या वर्षी खूप पाऊस पडला
अन तो आजारी पडला
झरणाऱ्या प्रत्येक नक्षत्रा बरोबर
त्याचा जीव उतावीळ होत होता
शेतात जायला शेत पाहायला
पण म्हातारी आजी त्याला
जबरदस्तीने अडवून ठेवत होती
ताकद येऊ द्या,बरे वाटू द्या,
मग जा ..असे म्हणत होती
आता तो मनानेच
पिकाची उंची मोजत होता
विहारीचे पाणी जोखत होता
आजी कडून पुन:पुन्हा
खात्री करून घेत होता
त्याच्या डोळ्यात ख़ुशी होती
चेहऱ्यावर तृप्ती होती
दरवर्षी पोळ्या आधी उत्साहाने
भरलेला हौशी आजोबा
त्या आदल्या दिवशी
अंथरुणावरून हलूही शकत नव्हता
त्या संध्याकाळी बाबांच्या हातून
त्याचा आवडता चहा तो प्यायला
अन बाबा शेताच्या वाटेला लागे पर्यंत
देह सोडून शेतावर पोहचला देखील
दुष्काळानंतर बहरलेले शेत बघायला ..

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्चर्य वाटले प्रतिक्रिया वाचून !!!!!!!>>>>>>>>>>.. मला ही....
चांगली कविता....आपल्याला जवळचं माणुस दुरावणे ही गोष्ट वाईट...पण त्यातल्या त्यात समाधान इतकेच की त्यांचा शेवट व्यवस्थित झाला ( व्यवस्थीत म्हणजे काही त्रास न होता...माझं बोलणं चुकीच्या अर्थाने घेउ नये. मला कदाचीत शब्दात मांडायला जमत नाहेये).
.माझे आजोबा ७४ व्या वर्षी बाईक अ‍ॅक्सिडंट मधे गेले..त्यांचा चेहरा ही बघायला मिळाला नाही इतकी वाईट अवस्था होती...असो..हे अवांतर झालं....पण आजोबांच्या दुखातुन बाहेर यायला देव तुमची मदत करो...

तुमच्या आजोबांच्या निधनावर हि कविता आहे हे मला माहित नवतं. मी फक्त त्याकडे १ कविता एवढ्याच नजरेतून पाहिलं त्यामुळे ती मनाला भिडली नाही .
आजोबांच्या दुखातुन बाहेर यायला देव तुमची मदत करो. पण मग वरची प्रतिक्रिया आश्चर्य कारक आहे मग काय प्रतिक्रिया expected होती . अरॆ रे .फारच मनाला लावून घ्या. त्यातून बाहेर पडू नका . ७५ वर्षे म्हणजे काहीच नाही . अजून खूप आयुष्य असायला पाहिजे होतं. अशी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती कि काय ???

मोहिनी, मला वाटते कविता आवडली नाही तर कुणी प्रतिक्रिया देत नाही ..अगदीच आवडली नाही किंवा वाचून सटकली तर सडकून लिहिणारे आहेत इथे ..तुमच्या प्रतिक्रियेत कविते बद्दल काहीच नव्हते मेलेल्या म्हाताऱ्या माणसाबद्दल होते ,म्हणून आश्चर्य वाटले ..असो ..प्रतिक्रिया देण्याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे . प्रतिक्रिया देणे यातून होणारी वैचारिक देवाण घेवाण सुंदरच असते .लोभ असावा .

मला वाटते कविता आवडली नाही तर कुणी प्रतिक्रिया देत नाही >>>
Uhoh
असं होय . मला हा नियम माहिती नवता . किवा मग निगेटिव प्रतिक्रिया स्वीकारण्याची तुमची तयारी नाही .
तुमच्या प्रतिक्रियेत कविते बद्दल काहीच नव्हते मेलेल्या म्हाताऱ्या माणसाबद्दल होते >>>
कवितेतच मेलेला म्हातारा माणूस आहे ना . असं काय करताय . जावूदे. पुन्हा कविता नाही आवडली तर नाही देणार प्रतिसाद . (फक्त तुच्या कवितेला हा :P)