कैलास मानससरोवर यात्रा: भाग २ - दिल्ली ते सिरखा

Submitted by Adm on 16 September, 2014 - 23:48

भाग पहिला : http://www.maayboli.com/node/50335

-------------------------------------------------------------


वरील नकाशात यात्रेचा मार्ग दाखवलेला आहे. दिल्ली ते धारचुला बस प्रवास होता. हा प्रवास उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमधून होणार होता. उत्तराखंडामधलं काठगोदाम हे सपाटीवरचं शेवटचं शहर. तिथून पुढे हिमालयाच्या रांगा आणि त्यामुळे घाट सुरु होतो. काठगोदामपर्यंत व्हॉल्वो बस जाते आणि मग पुढे धारचुलापर्यंत लहान बसने प्रवास होता. धारचुला ते नारायण आश्रम जीपने आणि मग तिथून चीनच्या सीमेपर्यंत चालत. ह्यात अल्मोडा आणि धारचुला हे बसमार्गावरचे मुक्कामी थांबे तर सिरखा, गाला, बुधी, गुंजी आणि नाभीढांग असे भारताच्या बाजूचे कॅम्प होते.

दिवस १ : दिल्ली ते अल्मोडा : ३४० किमी. मुक्कामी उंची : ५२५० फूट / १०० मिटर :
आमच्या बसमध्ये सगळे यात्री न मावल्याने उरलेले आठ-दहा जण एका टेम्पो ट्रॅव्हलरमधून निघाले. आदल्या रात्री फारच कमी झोप आणि बर्‍यापैकी दमणूक झालेली असल्याने बस सुटल्या सुटल्या सगळे पेंगायला लागले. इतक्या सकाळी ट्रॅफिक कमी असल्याने पाऊण-एक तासात दिल्ली ओलांडून उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादला पोचलो. गाझियाबादला एका समितीतर्फे नाश्ता होता. रिवाजाप्रमाणे हार, टिळे, भेटवस्तू वगैरे प्रकार झाले. मग त्या समितीवाल्यांची ओळख करून देण्याचा कार्यक्रम बराच वेळ चालला. मी तेव्हाही पेंगत होतो. नंतर त्यांनी उत्तर प्रदेशातल्या यात्रींचा सत्कार केला. श्याम गाझियाबादचाच असल्याने ते सारखं त्याला 'आदरणीय श्याम गर्गजी' असं म्हणत होते. अठ्ठाविस वर्षीय पोरगेल्श्या श्यामला एव्हडं भरभक्कम नाव दिल्याने सगळे हसत होते. त्यात तो टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये होता आणि पोचायला उशीर झाला. त्यांनी बर्‍याचदा त्याच्या नावाचा पुकारा केला. पुढे यात्राभर सगळेजण श्यामला 'आदरणीय' म्हणत होते! ह्या नाश्त्यामध्ये आम्हांला छोल्यांचा पहिला 'डोस' दिला गेला. पुढे छोले आणि चणे इतके खाल्ले की आम्ही वर्षभर तरी ते खाणार नाही असं ठरवून टाकलं. त्यांनी दिलेल्या छोट्या जिलब्या मात्र मस्त होत्या. एकदम गरमा गरम आणि कुरकुरीत.

खाणं पोटात गेल्यावर लोकांना जरा तरतरी आली आणि बसमध्ये गप्पांचा फड रंगला. आदरणीय श्यामजींना निवडणूकीत 'लाँच' करण्यासाठी फ्लेक्सवर काय घोषणा लिहाव्या ह्यावर जोरदार चर्चा आणि हसाहशी झाली. केदार 'फ्लेक्सतज्ज्ञ' असल्याने त्याचा एकदम सक्रिय सहभाग होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूका हा नेहमीचा यशस्वी विषय होताच. शिवाय विविध राज्यांमधली मंडळी असल्याने आपापली राज्यसरकारे, स्थानिक राजकारण ह्याविषयी माहितीची देवाणघेवाण झाली. दिल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने बसच्या खिडक्यांना पडदे लावायला तसेच खिडकीच्या काचा काळ्या करायला बंदी आहे. त्यामुळे खिडक्यांची फक्त वरची अर्धी काच काळी होती जेणेकरून ऊन लागणार नाही. पण ह्या अश्या काचेमुळे बाहेरचं फार काही स्पष्ट दिसत नव्हतं. बुरखा घातल्यावर कसं वाटत असेल ह्याची थोडीफार कल्पना ह्या खिडक्यांनी यावी! मधे एकेठिकाणी बस थांबली तेव्हा बघितलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं, त्यात काम करणारे बायका/पुरूष, मधून वाहणार पाटाचं पाणी, कुठेतरी दुरवर चाललेला सायकलस्वार, एका बाजूला टोळकं करून गप्पा छाटत बसलेली लोकं असं अगदी टिपीकल दृष्य दिसलं.
उत्तर प्रदेश ओलांडून उत्तराखंडात प्रवेश करता करता एक गाव लागलं. तिथे रामसेवकजींच्या ओळखीतल्या एकांच्या आग्रहावरून चहासाठी बस थांबवली. खरतर जेवायची वेळ झाली होती आणि अर्ध्यातासात काठगोदाम येणारच होतं पण त्यांचा आग्रह मोडवेना. त्यांनी निघताना जवळच्या शेतातल्या लिचींनी भरलेली मोठी पिशवी आम्हा यात्रींसाठी दिली. त्याभागात लिचींच उत्पादन खूप होतं. रामसेवकजींच्या सांगण्यानुसार मोरादाबादची लिची ही भारतातली सगळ्यात उत्कृष्ठ समजली जाते पण तिथलं बहुतांश उत्पादन निर्यात होतं. मला बसमध्ये एका जागी बसून कंटाळा आला होता. मग मी लिची वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. काही दक्षिण भारतीय लोकं म्हणे आम्ही कधी लिची खाल्लेली नाहीये त्यामुळे ही सोलायची आणि खायची कशी ते पण दाखव. म्हटलं आता फ्लाईट अटेंडंट सारखं आईलमध्ये उभं राहून प्रात्यक्षिक करून दाखवतो!

पुढे काठगोदाम आलं. व्हॉल्वोच्या पोटातल्या बॅगा मिनीबसच्या पोटात टाकल्या, आत जाऊन जागांवर रुमाल टाकले आणि मग जेवायला गेलो. ह्याबसमध्ये जागेची फारच टंचाई होती. पाय नक्की ठेवावे कुठे हा प्रश्न होता! त्यात माझी सिट मोडकी निघाली त्यामुळे ती 'ऑटो रिक्लाईन' होत होती! मला काहीच त्रास नव्हता पण मागे बसलेल्या हायमाच्या पायांची वाट लागत होती. मग तिने तिचा ट्रेकिंग पोल त्या सिटमध्ये अडकवून ते 'ऑटो रिक्लाईन' थांबवलं. काठगोदामच्या पुढे घाट सुरू झाला आणि हिमालयात आल्याची जाणिव झाली.

जरावेळ झोप झाल्यावर भिमतालच्या जवळ डॉ.यशोधर मठपाल ह्यांच्या लोकसंस्कृती संग्रहालयात पोचलो. सत्तरीच्या आसपासच्या यशोधरजींनी पुणे विद्यापिठातून Archeology मध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे तसच ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे. त्याच्या संग्रहालयात उत्खननात मिळालेल्या जुन्या वस्तू, दगड, हस्तलिखिते वगैरे आहेत तसेच त्यांनी स्वतः काढलेली कमाऊं तसेच गढवाल प्रांतांमधली संस्कृती दाखवणारी चित्रे, मॉडेल वगैरे ठेवली आहेत. यशोधरजींनी त्याबद्दल बरीच माहिती सांगितली. तिथे फोटो काढायला परवानगी नव्हती. यशोधरजींचा मुलगा Environmental science मध्ये डॉक्टरेट आहे. आता संग्रहालयाचं काम वडिलांना वयानुसार झेपत नाही त्यामुळे तो ही तिकडे कायमच्या वास्तव्यासाठी येणार आहे. तिथे कैलास तसेच ॐ पर्वताची सुंदर चित्रं प्रदर्शनात तसेच विकायला ठेवली होती. परतल्यावर कोणाकोणाला भेट म्हणून देण्यासाठी ती छान होती. आम्ही त्यांची ऑर्डर नोंदवून ठेवली आणि ती आम्हांला परतीच्या प्रवासात काठगोदामला मिळाली. एकदा चोख व्यवस्था! यशोधरजी संग्रहालयासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश फी घेत नाहीत तसेच देणगीही स्विकारत नाही. त्यामुळे चित्रे घेतल्याने त्यातल्या त्यात तरी मदत केल्यासारखं वाटलं.

बरेच डोंगर ओलांडून गेल्यावर पुढे एका वैष्णोदेवी मंदिरात थांबलो. देऊळ छान होतं. नुकतच रंगवल्यासारखं चमकत होतं. सुर्यास्ताच्या थोडं आधी पोचलो त्यामुळे छान संधीप्रकाश पडला होता.

मंदिराच्या आसपास बाजार होता. तिथे बरीच फळं स्थानिक फळं होती. मी केदारला म्हटलं की कॉमन फंडमधून फळं घेऊया सगळ्यांसाठी. त्याने फुड कमिटीला विचारलं तर ते नको म्हणाले! कारण तेच जाणे! खरतर पैशांची कमतरता अजिबात नव्हती. मग आम्ही स्वतःच फळं घ्यायला निघालो तर एलओ चला चला करायला लागले. त्यामुळे ती फळ चाखायची राहूनच गेली.

मुक्कामाच्या ठिकाणापर्यंतचा म्हणजे अल्मोड्यापर्यंतचा पुढचा प्रवास मात्र खूपच कंटाळवाणा झाला. कुठून ह्या फंदात पडलो असंही वाटून गेलं. शेवटी केदारने गाड्या वगैरेंचे विषय काढून लोकांना बोलतं केलं. शिवाय त्याला लेह-लडाख ट्रीपची पण फारच आठवण येत होती.आठ-साडेआठला एकदाचं अल्मोडा आलं. गेस्ट हाऊस छान होतं. तीन जणांना मिळून एक खोली मिळणार होती. लगेज कमिटीच्या फनीकुमारांकडे खोलीवाटपाचं काम होतं. त्याचा अगदी हुकूमशाही खाक्या. मी सांगेन तश्याच खोल्या मिळतील वगैरे. तिथे लोकांची भांडणं झाली, कारण सहाजिकच प्रत्येकाला आपापल्या ओळखीच्यांबरोबर रहायचं होतं! मी, केदार आणि रघू अश्या तिघांना मिळून खोली मिळाली. जरा आवरून गरम गरम सुप प्यायल्यावर बरं वाटलं. रात्री जेवायच्या वेळी एलओंनी सांगितलं की उद्या पहाटे चार वाजता निघायचं आहे कारण उद्याचा प्रवास बराच मोठा म्हणजे सुमारे ११ तासांचा आहे आणि पुढच्या रस्त्यात पावसाची आणि दरडी कोसळायची शक्यता आहे! इतक्या पहाटे उठायचं असल्याने जेऊन सगळे गुडूप झोपून गेले.

दिवस २ : अल्मोडा ते धारचुला. २२० किमी. मुक्कामी उंची : २९८५ फूट / ९१० मिटर
पहाटे सगळे अगदी वेळेवर तयार होऊन बसमध्ये पोचले. सकाळचा नाश्ता रस्त्यातल्या एका ठिकाणी मिळणार होता. सुर्योदयाच्या आसपास गोलू महाराज मंदिर आलं.

स्थानिक लोकांसाठी हे महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे ड्रायव्हर, क्लिनर आत पुजा करायला गेले. ह्या मंदिरात लोक नवस बोलतात आणि इच्छा पूर्ण झाली की तिथे येऊन घंटा बांधतात. त्यामुळे मंदिरात हजारो घंटा आहेत. असा समज आहे की ही न्यायाची देवता आहे, इथे मागणी केली की न्याय मिळतोच. लोक त्यांच्या कोर्टातल्या केसेचे कागदही इथे येऊन बांधतात आणि मग आपल्या बाजूने निकाल लागल्यावर घंटा बांधतात.

इथे काही स्थानिक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी यात्रींचे 'बाईट' घेतले.
साधारण साडेआठच्या सुमारास नाश्यासाठी थांबलो. छोटसं पण छान रेस्टॉरंट होतं. मागे गॅलरी होती. सहज म्हणून मागे डोकावलो तर हे दृष्य दिसलं.

संपूर्ण प्रवासात साधारण अशीच व्यवस्था असायची. सगळ्यांना सकाळी उठवताना बेड टी, प्रवासाला निघता निघता गरम बोर्नविटा, मग थोडासा प्रवास झाला की नाश्ता, मग मार्गावर कुठेतरी जेवण, मुक्कामी पोचल्यावर वेगवेगळ्या चवीचं सरबत आणि पाणी आणि वेळेनुसार संध्याकाळचा चहा, खाणं आणि मग रात्रीचं जेवण. भारताच्या हद्दीत खायचे प्यायचे अजिबात हाल होत नाहीत. ते देतात ते अगदी पुरेसं असतं.

छान गरम पुरी भाजीचा नाश्ता आणि चहा घेऊन पुढे निघालो.डोंगर आणि झाडांच्या अधूनमधून नुकत्याच अजून फार वर न आलेल्या सुर्याचं दर्शन होत होतं. चालत्या बस मधून फोटो काढायचा प्रयत्न केला पण ते नीट येत होत नव्हते. मग नाद सोडून दिला आणि गाणी ऐकत बाहेर बघत बसलो. अधेमधे झोप काढणं, गप्पा मारणं सुरू होतं.
दिदिहाट नावाच्या गावात जेवणाची व्यवस्था होती. बसमध्ये बसून सगळेच कंटाळले होते. त्यामुळे जेवणावर लगेच ताव मारला. हे गाव डोंगर दर्‍यांमध्येच असल्याने तिथेही समोर छान दृष्य होतं. फोटो काढावे म्हणून मी कॅमेरा बाहेर काढला आणि बघतो तर काय कॅमेर्‍याच्या लेन्सच्या काचेला मोठमोठे तडे गेलेले! माझं अक्षरशः धाबं दणाणलं. कॅमेरा पडला तर नव्हता हातातून, मग मघाशी चालत्या बसमध्ये फोटो काढायच्या नादात कुठे धडकला की काय काहीच आठवेना आणि सुचेना. हा असा फुटका कॅमेरा घेऊन पुढे जाण्यापेक्षा परतच जाऊया असाही विचार त्या क्षणभरात डोक्यात आला. मग जाऊन केदारला गाठलं. कॅमेरा दाखवला. तो म्हणाला फोटो काढून बघ येत आहेत का ते. हे खरतर माझ्या लक्षातच नाही आलं. फोटो काढले तर ते नीट येत होते. अगदी फोकसिंग वगैरेही व्यवस्थित होत होतं. तो म्हणाला राहू देत मग तसाच घेऊन जाऊ. कोण्या कॅनन वाल्याकडे जास्तीची लेन्स असेल तर घे लागेल तेव्हा.

बस अर्ध्यातासात मेरथीला पोचली. मेरथीला आयटीबीपीच्या सातव्या तुकडीचा कॅम्प आहे.

तिथे ब्रिफींग होतं. आमची बस थांबल्यावर बँडच्या पथकाने आमचं स्वागत केलं. त्या तुकडीतल्या जवानांनी आम्हांला मानवंदना दिली आणि तुकडीच्या प्रमुखाने एलओ, तसेच बॅचमधल्या सगळ्यांत मोठ्या आणि छोट्या यात्रीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मग पुढे आमचा ग्रुप फोटो काढला. परताना तो फोटो आम्हांला प्रत्येकाला फ्रेम करून भेट म्हणून दिला. नंतर त्यांनी यात्रे संदर्भात अतिशय महत्त्वाच्या सुचना दिल्या. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या ब्रिफींगमधलं हे सगळ्यांत उपयोगी ब्रिफींग होतं. बाकी समितीवाल्यांचं वगैरे एकवेळ ठिक आहे पण आयटीबीपी जवानांनी आम्हांला इतका मानसन्मान देण्याइतकं खरच काही फार मोठं आम्ही करत होतो का हा मला प्रश्न पडत होता आणि अवघडून जायला होत होतं. हा सगळा कार्यक्रम फार व्यवस्थित आखलेला होता आणि उत्साहाने आणि शिस्तबद्ध रितीने पार पडत होता पण त्या कॅमेर्‍याच्या झोलाने माझं कशातच अजिबात लक्ष नव्हतं!

मेरथीच्या पुढे घाट अजून अवघड होत गेला. दरम्यान श्याम आणि रानड्यांनी आमचं सामान वाहून नेणार्‍या ट्र्क वाल्याशी संधान बांधलं आणि ते बस सोडून ट्र्कमध्ये बसायला गेले. थोड्या काळाने खाली खोल दरीत कालीगंगा दिसायला लागली. उंच पहाड, खोलवर दर्‍या आणि अचानक आलेला दमदार पाऊस! आम्ही हिमालयाच्या कुशीत येऊन पोचलो होतो. रस्त्यात लहान लहान गाव लागत होती. घरं अगदी मोजकी पण त्यातलं एखादं भाजपाचं कार्यालय! निवडणूकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने देश ढवळून काढला म्हणतात त्याचा पुरावाच म्हणायचा हा. बाहेर बघतानाच एकिकडे वर्ल्डकप फुटबॉल, विंबल्डन वगैरे त्या काळात चालू असलेल्या क्रिडास्पर्धांचे विषय चालू होते. त्या चर्चेत मी फार संयम ठेऊन अगदी गुडीगुडी मतं मांडली! एकंदरीत यात्रेच्या वातावरणाचा प्रभाव पडत होता तर! साडेचार-पाचच्या सुमारास धारचुला आलं. तुळशीबागेतली शोभेलं अश्या एका गल्लीत बस शिरली आणि तिथेच थोड्याश्या जागेत ती उभी राहिली. कुमाऊं मंडलचं गेस्ट हाऊस समोरच होतं. इथेही खोली वाटवापरून घोळ झाला. आतातर एलओ पण त्यात उतरले आणि म्हणे लिस्टमधल्या सिरीयल नंबरप्रमाणेच खोल्या मिळणार! कोणीही आपला कंपू करायचा नाही. इथे चार जणांना मिळून एक खोली होती. माझ्या खोलीत विनोद सुभाष काका, देबाशिष डे आणि खुद्द फनी कुमार असे तिघे आले. मीआणि केदारने आमच्या खोलीतल्यांना हलवून एकत्र यायचा प्रयत्न केला पण कोणीच ऐकायला तयार नाही. शेवटी म्हटलं जाऊ दे आज करू अ‍ॅडजेस्ट उद्या सिरखाला बघू. विनोद सुभाष काका आम्हांला चिडवत होते, म्हणे तुम्हा दोघांना कोणीतरी वेगळं करू शकलं अखेर!

फुटका कॅमेरा परत बाहेर काढला. जरा शांतपणे बघितल्यावर लक्षात आलं की लेन्सवर लावलेल्या फिल्टरला तडे गेलेले आहेत. त्या खालच्या लेन्सच्या काचेला काही झालेलं नाहीये. पण तो फिल्टर फिरवून निघेना. मग हळूहळू करत, आतल्या लेन्सला धक्का न लागू देता ती फिल्टरची काच तोडून काढली. सगळं स्वच्छ पुसून काढलं आणि फोटो काढून बघितले. अगदी नीट फोटो आल्यावर माझा जीव भांड्यात पडला.. इतका जोरात की अगदी आवाज आला असेल! अशी अपोआप आपल्या नकळत काच फुटली तर आमची आज्जी म्हणायची की आपल्यावर येणारं संकट त्या काचेवर निभावलं. त्याचीच आठवण झाली आणि समाधान मानून घेतलं.

एकदा हे कॅमेर्‍याचं निस्तरल्यावर आजूबाजूला पाहिलं. धारचुला गाव कालीगंगेच्या काठी आहे. त्यात आमचं गेस्ट हाऊस अगदी नदीकाठी होतं. खोलीमधूनही नदी दिसत होती. ती ओलांडली की पलिकडे नेपाळ. मधे एक पूल आहे. त्या पुलावरून कधीही पलिकडे जाता येतं. नेपाळला जाण्यासाठी विसाची गरज नसल्याने तपासणी वगैरे काही नसते. फक्त हा पुल संध्याकाळी सहाला बंद होतो.

तेव्हड्यात सुट्टे पैसे हवे असतील तर चला म्हणून रानडे बोलवायला आले. आमच्या बॅचबरोबर चौबळ साहेब येणार म्हटल्यावर आम्ही बँकेत जायच्या ऐवजी बँकच आमच्याकडे आली होती. बँकेतले कर्मचारी सुट्ट्या पैशांची सोय करण्यासाठी गेस्टहाऊसवर आले होते. चौबळ साहेबांच्या स्वागताला आणि भेटीला आलेला जथ्था हे दृष्य नंतर प्रत्येक मोठ्या ठिकाणी दिसलं.

धारचुला पासून माझ्या मोबाईलची रेंज गेली. केदारच्या फोनलाही रेंज मधेमधेच येत होती. त्यामुळे रात्री फोन बुथ शोधून आलो पण आम्ही जाईपर्यंत सगळी बंद झाली होती. घरी बोलण झालच नाही. रात्री जेवणाच्या वेळी एलओंनी जरा ओरडा-आरडा केला. म्हणे माझी नसलेली कामं पण मला करावी लागतात जसं की सगळे वेळेवर निघत आहेत की नाही बघणं वगैरे. आम्ही म्हटलं तुमच्या नसलेल्या कामांमध्ये तुम्ही कशाला लक्ष घालता मग उदा. खोलीवाटप! मग शेवटी त्यांनी दिल्लीमध्ये बनवलेली डिसिप्लीन कमिटी पुन्हा नव्याने बनवली आणि त्यांना ही हल्या-हल्या छाप कामं दिली. मी हळूच त्यातून माझी सुटका करून घेतली. पार्वते अधिकृतपणे त्या कमिटीचा अध्यक्ष झाला आणि लोकांवर दादागिरी करायचा त्याला परवाना मिळाला. नदीकाठच्या गच्चीवर बसून मस्त जेवण झालं. जेवणादरम्यान कुमाऊं मंडलच्या अधिकार्‍याने आसपासच्या परिसराची बरिच माहिती सांगितली.
जर आपल्याल हवा असेल तर पोर्टर आणि घोडा नारायण आश्रमहून पुढे मिळू शकतो. ह्यांचे पैसे आपल्याला अर्थातच वेगळे भरावे लागतात आणि नोंद धारचुलातच करावी लागले. पोर्टर आणि घोडा/घोडेवाला आपल्याबरोबर लिपुलेखपर्यंत येतात आणि मग परतीच्या वेळी पुन्हा न्यायला येतात. मी घोडा आणि पोर्टर दोन्ही करणार होतो. मला घोड्यावर बसायचं नव्हतं पण प्रवासा दरम्यान गरज पडली तर नंतर घोडा मिळत नाही. समजा पायच मुरगळला तर तेव्हा कुठे शोधत बसा असा विचार करून हे आधीच ठरलेलं होतं. आता इतके पैसे खर्च करणारच आहे तर घोडा आणि पोर्टरच्या बाबतीत काटकसर नको अशी घरून सक्त ताकिद मिळाली होती. केदारचं नक्की ठरत नव्हतं आणि त्यात बर्‍याच लोकांनी बरेच सल्ले देऊन त्याचा गोंधळ वाढवला. त्यानेही शेवटी दोन्हीचे पैसे भरून टाकले.

उद्यापासून वजन काटेकोरपणे तपासलं जाणार होतं. लगेज काँट्रॅक्टर येऊन त्याने प्रत्येकाला फक्त २०(च) किलो सामान घेऊन बाकीचं इथेच ठेऊन द्यायला सांगितलं. बरोबर लहान सॅक ठेवणं चालणार होतच. मग पुन्हा सगळ्यांची सामानाशी झटापट सुरू झाली. दिल्ली सरकारने दिलेली सॅक मला बरोबर ठेवायची नव्हती कारण सगळ्यांच्या सॅक सारख्या होत्या. मग मी बर्‍याच प्रयत्नांनी त्यात सगळं सामान भरून ती ताडपत्रीच्या बॅगेत कोंबली आणि काळी बॅग वर घेतली. विनोद सुभाष काकांना सामानाचं जरा टेन्शन आलं होतं कारण कुठे उचलायची गरज पडली असती तर ते त्यांना झेपलं नसतं. त्यात फनी फंडे मारत होता. मग त्यांना सामान भरायला थोडी मदत केली आणि तुम्हांला काही लागलं तर आम्ही देऊ पण जड सामान घेऊ नका असं पटवलं. फनीचे फंडे सुरुच होते. आपल्या आठ दिवस मुक्कामाच्या जोरावर अटलांटातली थंडी ह्या विषयावर फंडे झाडायला सुरूवात केल्यावर मात्र मी त्याला गप्प केलं!
रात्री सगळी सामसून झाल्यावर नदीचा लयबद्ध ध्रोंकार ऐकू येत होता. त्या नादात झोप कधी लागली कळलच नाही!

दिवस ३ : धारचुला ते सिरखा. अंतर: ५४ किमी बसने, ७ किमी ट्रेक, मुक्कामी उंची: ८४०० फूट / २५६० मिटर
सकाळी आमचं आवरून नाश्ता होईपर्यंत सामानाचा ट्रक तसेच जीप तयारच होत्या. एका जीपमध्ये साधारण आठ जणं सोडत होते. दरम्यान थोडा वेळ असताना आम्ही पुल ओलांडून नेपाळला जाऊन आलो. पलिकडे बाजार आहे. तिथल्या बसस्टँडवरून काठमांडूला बस जाते. पण आम्हांला फक्त तो पुल ओलांडायचच काय ते आकर्षण होतं.

चौबळ साहेबांनी आमच्या कंपूकरता एक जीप पकडली. धारचुला गावातून बाहेर पडल्यावर आम्ही कालीगंगा सोडून आत वळलो आणि मग धौलीगंगा लागली. आमचा प्रवास धौलीगंगेच्या काठाने सुरू झाला. ड्रायव्हरकडून समजलं की गेल्यावर्षीच्या ढगफुटीच्या काळात ह्या परिसराचही खूप नुकसान झालं होतं, फक्त बातम्यांमध्ये जास्त प्रसिद्धी गढवाल भागाला मिळाली. इथलीही लहान गावं पूर्ण वाहून गेली, पुल कोसळले, एक पुल तर सैन्याने अक्षरशः दोन दिवसांत उभारला कारण त्या पुलाशिवाय पलिकडे मदत पोचवणं शक्यच नव्हतं. नदीच्या पात्रात दरडींबरोबर कोसळलेल्या अनेक मोठ-मोठ्या शिळा दिसत होत्या. आता धौलीगंगेवर जलविद्युतप्रकल्प उभारला आहे. रस्त्यात एक ट्रक बंद पडल्याने सुमारे तासभर खोळंबा झाला. आणखी थोडं वर गेल्यावर तवाघाट नावाचं गाव लागलं. तवाघाटला कालीगंगा आणि धौलीगंगेचा संगम आहे. पूर्वी इथे रस्ते नव्हते, त्यामुळे यात्रेदरम्यान चढाई इथूनच सुरू व्हायची. ह्या पहिल्या चढाईला 'थानेदार की चढाई' म्हणायचे. आम्ही जसजसे वर जात होतो तसतश्या दर्‍या अधिकाधिक खोल होत होत्या आणि खाली वाकून बघायला जरा भितीच वाटत होती.

सुमारे सव्वा-दिडतासाच्या प्रवासानंतर नारायण आश्रम आला. १९३६ साली नारायण स्वामींनी इथल्या दुर्गम भागातल्या लोकांना मदत करायच्या हेतून नारायण आश्रम बांधला. त्या काळात धारचुलापर्यंततरी गाडी येत असेल की नाही कोणास ठाऊक! आता ह्या आश्रमातर्फे शाळा, दवाखाने, ग्रंथालये वगैरे सुविधा आसपासच्या गावकर्‍यांना पुरवल्या जातात. आश्रमाचा परिसर अतिशय रम्य आणि मोठा आहे. देवीचं देऊळही प्रसन्न आहे.

इथे यात्रींच्या आणि त्यांच्या पोर्टरच्या भेटीचा रोमहर्षक कार्यक्रम पार पडला. घोडा सिरखा नंतर मिळेल म्हणाले कारण आधीच्या बॅचबरोबर वर गेलेले घोडे अजून परतच आले नाहीयेत. तसाही घोडा आज लगेच लागणार नव्हताच. छोट्या चणीचा कमानसिंग माझा पोर्टर होता. मितभाषी पण कामाला तत्पर कमानसिंग लगेच सामान उचलून घेऊन पण गेला.

नारायण आश्रमच्या समोरून चालायची वाट सुरू झाली. महादेवाचा जोरदार जयघोष करून सगळे सिरखाकडे मार्गस्थ झाले.

आजच्या ट्रेक साधारण सात किलोमिटरचा आणि अगदी सोपा होता. लहान लहान चढ उतारांवरून जाणार मार्ग होता. आधी सगळे जण एकत्र होते, पण मग हळूहळू आपल्या वेगाप्रमाणे पांगले. आम्ही सगळ्यात पुढे होतो. फनी आणि मित्तलजी माझ्यापुढे होते. पण ते फोटो काढायला थांबले आणि कमान म्हणाला की आता आपल्या पुढे कोणीच नाहीये. म्हटलं ठिक आहे, तसही सगळ्यात पुढे असून नसून काही फरक पडणार नव्हता. पाऊण तासाने सिरखा कॅम्पचं पहिलं दर्शन झालं. दिसत समोर असला तरी फिरून जायचं होतं. ह्या कॅम्प्सवर यात्रींसाठी मोठ्या डॉर्म असतात आणि एलओंसाठी स्वतंत्र बंगला असतो. ह्या फोटोत हिरवं छप्पर असलेला बंगला आहे तर मागे निळे यात्रींचे डॉर्म आहेत.

साधारण तासभराच्या चालीनंतर सिरखा गाव आलं सुद्धा. आमचा कॅम्प गाव ओलांडून पलिकडे होता. सिरखा गावातल्या लाकडी घरांवर अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं होतं!

मी पुढे गेल्याने फनीला राग आला की काय कोण जाणे! तो अक्षरश: पळत आला मागून. कमान मला म्हणे 'साहब जाने दो उसे आगे, वो रनिंग रेस कर रहा है'. पाचेक मिनिटांत कॅम्पवर पोचलोच. कॅम्प अगदी दरीकाठी होता. पाणी सरबत घेऊन जरा बसलो तर केदारही आलाच. इथे सात सात जणांना मिळून एक डॉर्म मिळणार होती. सगळे यायच्या आधी आमच्या कंपू करता म्हणजे मी, केदार, बन्सलजी, सौम्या, श्याम, भीम आणि रानडे मिळून एक डॉर्म पकडली. पुढे सगळीकडे अशीच व्यवस्था राहिली. हळूहळू करत सगळे येऊन पोचले. खरतर आजचा ट्रेक अगदी छोटा होता. पण पहिलाच असल्याने सगळे एकमेकांशी उत्साहात ट्रेकबद्दल बोलत होते.
कालपासून घरी बोलणं झालेलं नसल्याने मी जेवण झाल्यावर लगेच सिरखा गावातल्या फोनबुथवर जायला निघालो. केदारही बरोबर आला. रस्त्यात अनिरुध्द आणि श्रुती भेटले. पहिल्याच दिवशी श्रुतीचा बूट फाटला! पण त्या इतक्या लहान गावातही तिला चांगल्या दर्जाचे बुट मिळाले. तिथे आम्ही मघाशी पाहिलेल्या त्या लाकडी घरांमध्ये सगळ्या वस्तू मिळणारी दुकाने होती. फक्त तिथे फार जास्त माश्या होत्या! फोन करून कॅम्पवर येऊन बघतो तर सगळे ढारढूर! मग जितके जण जागे होते ते गप्पा मारत बसलो. थोड्यावेळाने बाहेरून चहा आल्याची हाक आली. आणि बाहेर जाऊन बघतो तर समोरची सगळी शिखरं मावळतीच्या सुर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघाली होती! ती अन्नपूर्णा पर्वतरांग होती. अशी अचानक बर्फाच्छादित शिखर बघून फार मस्त वाटलं.

नंतर बराच वेळ आमचे एलओ त्यांचे रेल्वे मंत्रालयातले अनुभव सांगत बसले होते. एकंदरीत एलओंना दरबार भरवून गप्पा मारत बसायला फार आवडायचं.

ह्या कॅम्पपासून पुढे संध्याकाळचे फक्त दोन तास विज असते. कारण तिथे विज जोडणी नाहीये. जनरेटर चालवले जातात. त्यामुळे त्या दोन तासांमध्ये बॅटर्‍या चार्ज करायची धुम असायची. तसच तेव्हड्या वेळात रात्रीची जेवणं उरकायची असायची. आधी मोबाईलची रेंज गेली, मग गाडीरस्ता संपून पायवाट आली आणि आता दिवेही गेले. एकंदरीत शहरी वातावरणातून आम्ही हळूहळू निसर्गाच्या सानिध्यात जात होतो. जेवणं झाल्यावर एकदा दिवे बंद झाले की करण्यासारखं काहीच नसायचं आणि शिवाय दिवसभराच्या श्रमाने थकून सगळे झोपूनच जायचे.
सिरखा मुक्कामाच्या दिवशी बहुतेक अमावस्या होती. त्यामुळे बाहेर अगदी गडद काळोख होता. रात्री पाऊस सुरू झाला आणि पत्र्यावर आवाज यायला लागल्यावर मला जाग आली. इतका जास्त अंधार होता की मला माझे डोळे उघडे आहेत की बंद हेच समजेना! तसच चाचपडत मोबाईल शोधला. नंतर बराच वेळ झोप लागली नाही. त्या अंधाराने आणि पावसाच्या आवाजाने थोडी भितीही वाटत होती आणि रियाची खूप आठवण येत होती. मी बराच वेळ मोबाईलवर तिचे फोटो बघत राहिलो. कधीतरी उशीरा झोप लागली पण चारला उठायचं होतं त्यामुळे बेड टी आलाच. कमान आणि बाकीचे पोर्टर साडेचारच्या सुमारास हजर झाले. आवरून आणि बोर्नव्हिटा घेऊन चालायला लागलो. आज 'गाला'पर्यंत सुमारे सोळा किलोमिटरचा ट्रेक होता. पहिले दोन अडीच किलोमिटर उतरंड, मग ४ किलोमिटर रींगलिंग टॉपची खडी चढाई आणि मग चढ उताराचा रस्ता असा साधारण मार्ग होता.
कॅम्पमधून निघाल्या निघाल्याच हे दृष्य दिसलं आणि पुढे काय असणार आहे ह्याचा अंदाज आला!

क्रमशः

भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/51024

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास! Happy

दोघं आपापलं व्हर्जन लिहिताय हे बेस्ट आहे.

पूल ओलांडून नेपाळला जाऊन येणं भारीच Lol

अंधाराने आणि पावसाच्या आवाजाने थोडी भितीही वाटत होती >>> हे एकदम अनपेक्षित...

एकदम मस्त!

वर्णन वाचुन तर आम्हीसुध्दा तुमच्या सोबत यात्रा करत आहोत असंच वाटलं. एकाच वेळी दोन मायबोलीकरांनी कैलास-मानसरोवर यात्रा पुर्ण केली आणि दोघांनी सुध्दा यात्रेचे वर्णन मायबोलीकरांसाठी लिहिण्याचे मनावर घेतल्यामुळे आम्हाला दुहेरी फायदा होतोय. केदार सुंदर प्रकाशचित्रांनी आम्हाला यात्रा घडवतोय आणि तुम्ही तुमच्या प्रभावी वर्णनशैलीने.

वा! मस्त लिहिलं आहेस. तुम्हा लोकांबरोबरच प्रवास करतेय असं वाटत होतं वाचताना Happy

आता मायबोलीवर कैलास-मानसरोवर यात्रेची ३ वर्णनं जमा होणार. प्रत्येकाच्या दृष्टीतून बघायला मजा येतेय.

शेवटचा फोटो... क्लासच

वर्णन अगदी डिटेलवार झालयं.. वाचायला मजा येतेय... अजिबात धाप लागत नाहियं.. Wink

मी अगदी एकटी शांतपणे बसून वाचतेय दोन्ही लिखाणं..फोटो बघताना मस्त वाटतेय. तिथील रहीवाश्यांचे काय जीवन आहे ना?
आपण कधी करु शकतो का हा विचार सुद्धा दोन तीन वेळा आला.

धन्यवाद सगळ्यांना.. Happy

हे एकदम अनपेक्षित... >>>> ललिता खरय.. Happy संपूर्ण यात्रेत शारिरीक क्षमतेबरोबर मानसिक क्षमतेचीही कसोटी लागते. आपल वागणं, भावना वगैरे स्वतःला चक्रावून टाकणार्‍या असतात.. Happy

तिथील रहीवाश्यांचे काय जीवन आहे ना? >>>> झंपी, आपण आपल्या परस्पेक्टीव्हने विचार करतो म्हणून तसं वाटतं. तिथल्या ज्या लोकांशी आम्ही बोलले त्यांनी पाहिलेलं सगळ्यात मोठं शहर अंबाला वगैरे असायचं. कुठली राज्याची राजधानी पण नाही. त्यांनी तशीच पहाडी आयुष्याची सवय असते. हां फक्त वैद्यकीय सुविधाचां वगैरे अभाव असतो. अर्थात आता त्याही बद्दल प्रयत्न सुरु आहेत. हेलिकॉप्टरने शहरात न्यायची सोय आहे.. पुढे लिहिनच ते.

आणि यात्रेचं म्हणाल तर नक्की करता येणं शक्य आहे. शारिरिक कष्ट आहेतच पण घोड्याची सोय आहेच लागेल तेव्हा. यात्रेच्या आधी नियमित व्यायाम केला की सहज शक्य आहे.

अफलातून लिहिलय पराग. माबोवर जरी ३-३ वर्णनं त्याच यात्रेची असली तरी तिन्ही वेगळी आणी अजिबात कंटाळवाणी नाहीत.
ही वर्णनं वाचून आपणही ही यात्रा करावी हे इच्छा मनात तयार झाली आहे.

मस्त वर्णन आणि फोटोज.
फिल्टर तडकण्याचं कारण काय शोधलं का ?
पहिला भाग कुठे आहे ? जमल्यास ह्याच भागात लिंक दे.

पराग, जबरदस्त लिहित आहेस आणि फोटो सुध्दा अमेझिंग!

असचं डिटेल मधे लिही, छान वाटतयं वाचायला Happy

पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. Happy

श्री, पहिल्या भागाची लिंक दिली आहे वर. काच तडकल्याचं कारण कळलं नाही काही. कुठे न कळत धक्का वगैरे लागला की काय माहित नाही.

Pages