एक प्रवास - वैचारीक प्रदुषणाचा

Submitted by बेफ़िकीर on 16 September, 2014 - 06:36

'आम्हीच का असे' हा प्रश्न सगळ्यांना पडू शकत असेल आणि जवळपास सगळ्यांची उत्तरेही सारखी असतील. अशक्यप्राय स्वप्ने पाहून त्या ध्येयाकडे चिवटपणे व मेहनतीने वाटचाल करणारे जपानी नागरीक एकीकडे तर स्वप्नांच्याच दुनियेत रममाण होऊन आभासी सुखदु:खे किंवा प्रयत्न न करता नशीबी आलेली सुखदु:खे ह्यांची टिमकी वाजवणारे किंवा रडगाणे गाणारे आपण एकीकडे!

हिंदी चित्रपट, क्रिकेट व राजकारण हे ह्या देशाच्या मनावर व्यापलेले तीन विषय आहेत किंवा होते. कदाचित अलीकडे त्यांचा प्रभाव किंचित कमी होत चालला असेलही. त्यातल्यात्यात हिंदी चित्रपटांनी सुमारे तीन पिढ्या घडवल्या, बिघडवल्या, जगवल्या आणि मारल्या. हिंदी चित्रपटांनी केलेले वैचारीक प्रदुषण ह्या विषयाची व्याप्ती निश्चित ठरवणे एकट्याला अवघड आहे. पण घेतलेल्या थोड्याफार अनुभवांच्या आठवणी असे सुचवतात की वेगवेगळ्या वेळी मनाला असे प्रश्न पडतच असत. ते एकत्रितपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

हिंदी चित्रपटातील मारामारी:

दिलीपकुमार, प्राण असे दिग्गज अभिनेते ज्या काळात ऐन भरात होते त्या काळी मारामारी हा चित्रपटांचा आत्मा तर नसेच पण खलनायकाला प्रत्यक्ष शारीरिक इजा पोहोचवून अद्दल घडवण्याची नितांत गरज कथानकाने निर्माण केल्याशिवाय मारामारी होतही नसे. ती मारामारी झाली तरीही त्यात चाबकाने किंवा एखाद्या लाकडी काठीने फटके मारणे अश्या मर्यादेपर्यंत होत असे. जणू तेव्हाचे खलनायकही बिचारे मुळचे सज्जन पण परिस्थितीमुळे दुर्जन झालेले असत. हिंदी चित्रपटात मारामारी असावी ह्याची त्यामुळे प्रेक्षकांनाही फारशी निकड नव्हती. एखाद्या राजेश खन्नाचा रोग बरा झाला, एखाद्या शम्मी कपूरबाबतचा नायिकेचा गैरसमज नष्ट झाला, एखाद्या राज कपूरवर सगळी दुर्दैवे कोसळल्यानंतर त्याच भाग्योदय झाला किंवा एखाद्या देव आनंदने एखादे रहस्य प्रकाशात आणले की प्रेक्षक खुषीत परत यायचा. मारामारीला अढळपद देण्याचे कर्तृत्व अमिताभ बच्चनसाहेबांनी गाजवले. जणू तोवर हिंदी चित्रपटांनी सामान्य प्रेक्षकाच्या सामान्य मनातील सामान्य सूडभावनेला, चिडीला, संतापाला अस्पृश्यच मानलेले होते. अमिताभच्या चित्रपटांमधीक कथानके नेमकी ह्याच सूडाग्नींना भडकवू लागली. कधी आईवडिलांना मारणारा कोणीतरी सापडला तर कधी बायको किंवा वहिनीला छळणारा! अमिताभ बच्चनने केलेल्या मारामार्‍यांपैकी जवळपास सर्वच मारामार्‍यांची कारणमीमांसा ही कुठेतरी 'आजसे पच्चीस साल पहले'वाल्या काळातील त्याच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाशी निगडीत असायची. त्या 'पच्चीस साल किंवा काही साल पहले'चा अमिताभ हा भारतीयांना मनोमन मान्य असलेल्या संस्कृतीतील आदर्शांच पुतळा असायचा. संस्कार स्मरणारा असायचा. नंतर झालेल्या अन्यायात तो अनेक वर्षे होरपळून एकदम मोठा, सव्वा सहा फुटी होऊन दे दणादण मारामार्‍या करू लागायचा. जंजीर, दिवर त्रिशूलपासून हम, आखरी रास्ता, अग्निपथपर्यंत ही केंद्रीय संकल्पना ठळकपणे अस्तित्वात असलेली दिसते. अमिताभचा भला मोठा देह मारामारीला पुरेसा वाटत असे, असे मुळीच नव्हते. अमिताभच्या मारामारीतही सशक्त अभिनय असे. डोळ्यात सूड पेटलेला असे. मार खाताना चेहर्‍यावरील वेदना खर्‍या वाटत. दहाजणांना मारल्यावर रुग्णालयात पाठवावे लागेल म्हणून अ‍ॅम्ब्यूलन्स सोबत घेऊन जाणारा अमिताभ व त्याचा आत्मविश्वास हे आवडायचे कारण स्क्रीनवरील प्रत्येक दृष्यात तो अभिनयाने जान ओतायचा. शोलेमध्ये दोन दोन दिग्गज हिरोंसमोर गब्बरसिंगशी पंगा घेणारा एक तुलनेने नवा हिरो म्हणून स्पर्धेत उतरतानाही त्यानेच भाव खाल्लेला होता. लाथेचा वापर, विविध वस्तूंचा वापर, स्वतः भरपूर मार खाणे, चिवटपणाचा अभिनय ह्या सगळ्या गोष्टींमुळे अमिताभची मारामारी खोटी आहे हे सतत जाणवत असले तरी त्यामागची त्याच्या अभिनयातून प्रदर्शीत झालेली भावना प्रेक्षकाला पेटवून उठवू शकत असे. पण ह्या मारामारीला पुढे फार वाईट दिवस आले. एक तर मारामारी हा प्रमुख विषय बनू लागला. खास त्या विषयाला डोळ्यासमोर ठेवून कथानके लिहिली जायला लागली. (कातिलोंके कातिल वगैरे). मारामारी करण्यामागचा मोटिव्हच हारवला. म्हणजे 'आजसे बीस साल पहले' वगैरे प्रकारही जरा कमी होऊ लागले आणि जेथे ते प्रकार होते ते अमिताभ नसल्याने तुलनेने कमी दर्जाचा अभिनय ते खुलवू शकला नाही. निव्वळ खलनायकी प्रवृत्ती नष्ट करणे ह्या उद्देशाने सहा खलनायक आणि तीन हिरो वगैरे असे चित्रपट काढले जाऊ लागले. हळूहळू ही मारामारी प्रेक्षकाला भावेनाशी झाली कारण सबळ कारणमीमांसा असल्याशिवाय उगाच विध्वंस पाहणे ह्याचा नंतर कंटाळा येणारच. त्यातच ह्या मारामारीचे स्वरूप अतिशय उग्र होत गेले. प्रथम त्यात घातक शस्त्रे आली. त्यानंतर तीन तासांपैकी पावणे तीन तास खलनायकाने नायकाला भयानक पीडा देणे आणि शेवटच्या पंधरा मिनिटांत नायकाने एकदमच सगळा सूड उगवताना विनाशकारी विध्वंस करून दाखवणे हा एक प्रकार आला. ह्या अश्या प्रकारामुळे पोलिस ह्या संस्थेचे महत्व, जे आधीही फारसे नव्हतेच, ते नामशेषच झाले. त्यानंतर शस्त्रात्रांनी अधिक उग्र रूप धारण केले व पडद्यावर अमाप बाँब फुटू लागले. पूल कोसळू लागले. वाहनांचा चक्काचूर होऊ लागला. हेलिकॉप्टरमधून अत्याधुनिक गन्सनी खालील माणसे मारली जाऊ लागली. प्रेक्षकाला मारामारी का आवडते हे विस्मृतीत गेले आणि आवडते इतकेच आठवणीत राहिले जणू! त्यानंतरच्य काळात अतर्क्य आणि विनोदी ह्याच्या सीमारेषेवर मारामारी येऊन पोचली. रजनीकांतसारख्यांनी ती सीमारेषा घाईघाईने ओलांडली पण तरीही टाळ्या, शिट्ट्या मिळवल्याच! हिंदीत सनी देवलपर्यंत जरा तरी बरे दिवस होते. पुढे देवगण, सलमान, अक्षय कुमार वगैरेंच्या पूर्ण स्थिरावण्यानंतर वाट्टेल ती दृष्ये दाखवली जाऊ लागली. खलनायकाला एक गिरकी दिली की तो पंधरावेळा गोलगोल फिरत जाऊन भिंतीवर आदळतो. कोणीही कुठूनही कोणावरही कसाही नेम धरू शकतो. हिरोला गोळ्याबिळ्या लागण्याची शक्यताच असू शकत नाही. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सहज मारहाण करून परत येऊन मिरवता येते असे प्रकार सुरू झाले.

ह्या सगळ्यात एक गोष्ट झाली. सूड घ्यावासा वाटत आहे आणि सूड घेण्यासाठी चिवटपणे मेहनत करून, अपमान सोसून यशस्वी व्हायचे असते व नंतर शत्रूचा नायनाट करायचा असतो हा संदेश गायबच झाला. जो उरला तो संदेश असा, की आपले प्रश्न रस्त्यावर सोडवायला पाहिजेत. तिथल्यातिथे दे दणादण पद्धतीने वागून सोडवायला पाहिजेत. येथील सुजाण वाचक एका अश्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात जो वर्ग सहसा अश्या परिस्थितीत सापडतच नाही आणि सापडला तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करतो. पण एक खूप मोठा, प्रचंड मोठा वर्ग 'दे दणादण' संस्कृतीला आपले मानतो. ह्या वर्गाला हिंदी चित्रपटाने चित्रपट 'दि एन्ड' होताना कधी चुकूनही दाखवले नाही की आत्तापर्यंत दिग्विजयी ठरलेल्या नायकाला शेवटी पोलिसांनी पकडले आणि बेड्या ठोकल्या. (जेव्हा दखवले तेव्हा तेही नायकाला पोलिसांचे कर्तव्य करायला लागल्यासारखे दाखवून, त्याला मोठा ठरवून मग पुन्हा त्यानेच स्वतःचे हात बेड्यांसाठी पुढे केल्याचे दाखवले.) असे दाखवले तर पोट कसे भरणार निर्मात्याचे?

ज्या प्रदेशात असे भीषण मारामार्‍या, विध्वंस असलेले चित्रपट नसतात तेथील माणसे मोठी शांतताप्रिय असतील असे नाही, पण ह्या प्रदेशात मुळातच अहिंसा, शांती ह्या तत्त्वांचा इतका अमाप प्रसार झालेला आहे की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतरांपेक्षा तुलनेने शांतताप्रिय बनलेल्या समाजाला हिंसक बनवण्याचे विधायक कार्य हिंदी चित्रपटांनी केलेले आहे. हे एक वैचारीक प्रदुषण आहे असे वाटते. हिंसक बनण्यास फक्त हे चित्रपट जबाबदार आहेत असे म्हणायचे नाही, पण चित्रपटांनी मोठा वाटा उचललेला आहे. त्यांनी मारामारी दाखवण्याची सशक्त कारणमीमांसा दाखवणे जणू निशिद्ध ठरवलेले असून अतीभव्य विध्वंस दाखवणे हे ध्येय मानल्यासारखे केलेले आहे.

तुम्ही जे प्रत्यक्ष आयुष्यात करूच शकत नाही ते आम्ही दाखवत आहोत हे सांगण्याचा आटापिटा करताना नकळतपणे ह्या चित्रपटांनी 'प्रश्न असेही सोडवता येतात किंवा प्रश्न असेच सोडवावे लागतात' हाही संदेश पोचवलेला आहे.

हिंदी चित्रपटातील गीते:

मारामारी एक वेळ विनोदी ठरेल, अशक्य आहे असे म्हणून प्रेक्षक पुढच्या दृष्याची वाट पाहात राहील. पण हिंदी चित्रपटातील गीते हा वादाचा विषय वाटतो. एक तर प्रत्यक्ष आयुष्यात कोणीही माणूस एखाद्या परिस्थितीत अचानक उत्स्फुर्तपणे गाऊ लागत नाही. तो गाऊ लागला तर शब्द कुठून आणणार सेकंदा सेकंदाला? तेही तात्कालीन परिस्थितीवर अगदी तंतोतंत व काव्यमय भाष्य करणारे, गेय, गायनानुकुल आणि एकाच भाषेतले शब्द इतक्या प्रवाहीपणे कसे ओवणार तो? त्यात पुन्हा तो गात असताना कोरस कोण गाणार? संगीत कोण वाजवणार? त्याचे गायन, वाद्ये व कोरसशिवाय इतर कोणताही आवाज ऐकू न येणे हे शक्य कसे होणार? गाणे किती वेळ गाणार? पुढची सिच्युएशन निर्माण होईपर्यंत? गाणे गायल्यामुळे इतरांचे मन कसे पालटणार? प्रत्येक पात्राचा गाताना आवाज उत्तम कसा असणार? सूर अचूक कसे लागणार? चाल कशी ठरणार? मधला म्युझिकचा पीस किती वेळ असायला पाहिजे हे कसे ठरणार?

ह्यातील प्रत्येक प्रश्न प्रत्येकाला पडत असूनही प्रत्येकजण त्याकडे डोळेझाक करतो. कारण दशकानुदशके ह्या गीतांनी लोकांना आनंद दिलेला आहे.

अजीब दास्ताँ है ये, कहां शुरू कहां खतम!

हे एक गीत अतिशय उत्तम उदाहरण आहे. अचूक वृत्तातील हे गीत अत्युत्कृष्ट शब्दरचनेने नटलेले असून राजकुमार आणि मीनाकुमारी ह्यांच्या नात्यात पडत असलेल्या दरीमुळे मीनाकुमारीच्या मनात उठलेल्या आंदोलनांना समर्पकपणे, तरलपणे, श्रोत्यांना खिन्न बनवत बनवत सुंदर पार्श्वभूमीवर उद्धृत करते. जसजसे गीत पुढे सरकते तसतसा राजकुमारचा चेहरा अंशाअंशाने गंभीर होत जातो आणि पाहणार्‍याच्या मनात कळ उठते. हे गीत तो परिणाम फक्त राजकुमारवर करते का? नाही. प्रेक्षक त्यात समाविष्ट होतो. भग्नहृदयी प्रेमवीरांसाठी ह्यापेक्षा अधिक अचूकपणे विषाद कथन करणारे दुसरे गीत नसेल. तो चित्रपट मी आजतागायत पाहिलेला नाही, पण जितक्यावेळा ते गीत पाहिलेले / ऐकलेले आहे तितक्यावेळा काय झाले असेल हे सहज समजते आणि भिडते.

हिंदी चित्रपटातील गीतांनी नेमकी हृदये ग्रासली ती अशीच! ग्रासलीच म्हणावे लागेल. मानवी मनोव्यापारातील अगणित गुंतागुंतीच्या टप्प्यांना अगणित गीतांनी शब्दबद्ध करून जणू प्रत्येक प्रेक्षकाला, श्रोत्याला एक आवाज मिळवून दिला. आपण पटकन् आपल्या एखाद्या प्रॉब्लेमबाबत दुसर्‍याला उद्देशून म्हणतो, ;जाऊदे च्यायला, हर फिक्रको धुवे मे उडाता चला गया! काव्य, सूर, चाल, संगीत, अभिनय, पार्श्वभूमी आणि कथानकाशी असलेली सांगड ह्या प्रत्येक निकषांवर उत्तम ठरलेल्या, थोडक्यात सर्व भट्टी जमून आलेल्या गीतांचा जमाना कित्येक वर्षे चालला आणि हळूवार रसिकमनांना तोषवत राहिला.

मात्र जेव्हा गीतनिर्मीतीत अनुक्रमे ह्या पुढच्या पातळ्या येऊ लागल्या, तेव्हा प्रदुषण सुरू झाले. ह्या पातळ्याही अश्याच क्रमाने आलेल्या दिसतील. कथानकाच्या आवश्यकतेपेक्षा 'आत्ता गाणे असायला हवे' ही गरज भासणे, काव्याची कसर संगीताने भरून काढणे, अभिनयाची कसर चित्रणाने भरून काढणे, चालीची कसर नृत्याने, अंगप्रदर्शनाने भरून काढणे आणि सुरांची कसर र्‍हिदमने भरून काढणे! येथपर्यंतचे अधःपतनही एक व्यावसायिक अगतिकता म्हणून दुर्लक्षित करता येत होते, पण जेव्हा आयटेम साँग्ज ही निव्वळ 'पब्लिकला नाचायला आपण एक गाणे द्यायलाच पाहिजे' ह्या भूमिकेतून येऊ लागली तेव्हा हिंदी चित्रपट गीतांचे अवमूल्यन हे नीचांकी पातळीच्या खाली घसरले आणि समाजातील चांगली अभिरुची असणारा गट संख्येने घटला किंवा मूक झाला. सगळेच सापेक्ष असल्याने आयटेम साँगवाल्यांना त्यांची अभिरुची उत्तम वाटणेही शक्य आहेच! पूर्वीही आयटेम साँग्ज असत, पण ती अनेकदा खलनायकाचे रंगढंग दर्शवण्यासाठी असत व तकलादूपणे का होईना पण कथेशी निगडीत असत. चित्रपट हे दृक्श्राव्य माध्यम असल्यामुळे त्यातील गीते ही ऐकण्याबरोबरच पाहण्याचीही बाब असे. आता ती न ऐकण्यासोबत न पाहण्याचीही बाब झाली आहे. हीच गीते लहान मुलांना नृत्यासाठी पालक देत असून रिअ‍ॅलिटी शोमध्ये मुलांना नाचवत आहेत अशी खंत मध्यंतरी एका अभिनेत्रीने बोलून दाखवली.

काव्यमय पद्धतीने कथानक फुलवणे ते पावले उडू लागतील असे शब्द आणि ठेके रचणे हा हिंदी चित्रपट गीतांचा दुर्दैवी प्रवास आणखी एक वैचारीक प्रदुषण करतो असे वाटते.

हिंदी चित्रपटातील प्रेम

प्यासे है होठोंसे कहना कितना है आसान 'जफर'
मुश्कील उस दम आती है जब आँखोंसे समझाना हो!

हिंदी चित्रपटांपैकी मला आजवर सर्वाधिक आवडलेली प्रेमकहाणी म्हणजे शोलेमधील अमिताभ बच्चन आणि जया भादुरीची प्रेम कहाणी! निळसर निळसर संधीप्रकाश, लांबवर दिसणारे निळेकाळे डोंगर, सर्वत्र एक उदास शांतता, वरच्या मजल्यावरील व्हरांड्यामध्ये एक एक दिवा प्रज्वलीत करणारी विधवा जया भादुरी, तिच्या चेहर्‍यावरची आर्तता नजरेमार्फत हृदयातून आरपार जाणारी, बाजा वाजवणारा गंभीर अमिताभ, बाजावरचे सूरही अतिशय खिन्न, शोले चित्रपटाच्या कथानकाची विदीर्ण करणारी पार्श्वभूमी, एक शब्दही एकमेकांशी मनासारखा बोलता न येणे, सगळे संवाद डोळ्यांमधून, शेवटच्या हिंसाचारात अमिताभचा बळी गेल्यानंतर अश्रू लपवणे अशक्य झाल्याने जया भादुरीने संजीव कुमार सासरा आहे हे विसरून लहान मुलीसारखे त्याला बिलगून रडणे!

सगळा 'शोले' एकीकडे आणि ही प्रेमकहाणी एकीकडे! कालवाकालव होते मनात अक्षरशः!

पूर्वीच्या शेकडो चित्रपटांमध्ये नायिका अगदी चुलबुली असली किंवा नायक अगदी सज्जनपासून ते मोठा रोमिओछाप असला तरीही त्यांचे प्रेम जमण्याची प्रक्रिया आपल्याही मनातील काही अस्पर्श कोपरे हुळहुळे करायची. नकळत डोळे पडद्यावर रोखले जायचे आणि चेहर्‍यावर हलकेसे स्मितहास्य यायचे. एज नो बार, सेक्स नो बार!

काँबिनेशन काहीही असो! गरीब, सज्जन व अनाडी राज कपूर असो नाहीतर धसमुसळा ऋषी कपूर असो! किलर राजेश खन्ना असो नाहीतर सुपर किलर देव आनंद! ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार असो नाही ज्युबिली कुमार राजेंद्रकुमार! नर्गीस, नूतन, मीनाकुमारी, वैजयंतीमाला येथपासून ते अगदी डिंपल, रेखापर्यंत हिंदी चित्रपटांमधील प्रेम हा विषय निरागस बालकासारखा फुलत राहिला.

नंतर मात्र अतिशय वाईट परिस्थिती येऊ लागली. प्रेमं झटक्यात जमू लागली. कॉलेजच्या दिवसांत माकडउड्या मारल्या की पोरी पटायला लागल्या. नुसती स्टाईल, पहिली नजरमे प्यार वगैरे बाबी आम होऊ लागल्या. डीडीएलजे किंवा क्यूएसक्यूटी सारखे काही अपवाद निराळे! प्रेम हे जमणारच, त्यात कोण वेळ घालवत बसणार असा काहीसा खाक्या झाल्यासारखे वाटू लागले.

मुळात प्रेम बसण्यासाठीचे पडद्यावर दाखवले जाणारे निकषच बदलले. 'डायल्यूट' झाले. नुसते व्यक्तिमत्व, नुसते मारामारीचे तंत्र, गुंडांपासून बचाव करण्याची क्षमता, निर्भीडपणे प्रपोज करणे वगैरे काय वाट्टेल ते निकष पुरेसे ठरू लागले. हेसुद्धा प्रत्यक्ष आयुष्यात होणे जवळपास अशक्य आहे. पण ते जवळपास अशक्य आहे असे दाखवायचे धाडस किती चित्रपटांनी केले? शैक्षणिक संस्था ही पोरी पटवण्यासाठी शासनाने निर्माण केलेली अधिकृत वास्तू असल्याच्या थाटात प्रेमं जमू लागली. आजकालच्या चित्रपटांमध्ये तर नायक व नायिका म्हणून घेतलेले अभिनेते हे चित्रपटाच्या कोणत्यातरी वळणावर 'आपले जमणे मस्टच आहे' अश्या आविर्भावात डायरेक्ट शारीरिक जवळीकीवरच येऊन ठेपतात.

आवडत्या मुलीला किंवा मुलाला 'तू माझ्याशी मैत्री करशील का' असे विचारण्याचे धाडस करण्यात किती प्रचंड व मधूर हुरहूर असते ह्याची एक टक्काही जाणीव नसलेली आजची मुले सोसायट्यांच्य अंधार्‍या भागात एका बाकावर एकमेकांवर चुंबनांची बरसात करतात. त्यावर हरकत घेतली तर त्यांचे पालक म्हणतात की हाय सोसायटीत हे चालतेच. आणि ती एकमेकांची चुंबने घेणारी बालके यथावकाश एकमेकांना विसरूनही जातात.

हिंदी चित्रपटांइतके ह्या गोष्टीवर प्रभाव टाकणारे अधिक महत्वाचे दुसरे घटक नसतील. असलेच तर माध्यमे, पॉर्न साईट्स वगैरे! पण सर्वाधिक वाटा चित्रपटांचाच!

हिंदी चित्रपटांमधील नृत्ये:

खरे तर 'गीते' ह्यात नृत्ये आलीच आहेत, तरी खासकरून लिहावेसे वाटले की नृत्यातील कलात्मकता ते बीभत्सता हा प्रवास वैचारीक प्रदुषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.

हिंदी चित्रपटामधील विनोदः

सुदैवाने ह्या निकषावर तपासले तर ग्राफ थोडासा वेगला भासावा. शेवट निराशाजनक असला तरी ग्राफ वेगळा मात्र आहे. जुने ते नेहमीच सोने असते असे नसावे. मेहमूद, केश्तो, असरानी, राजेंद्रनाथ आणि जॉनी वॉकर हे महान होते. पण व्यक्तिशः मला त्यांच्यापेक्षा राजपाल यादव, जॉनी लिव्हर, परेश रावल, अर्शद वार्सी, विजयराज, मनोज जोशी हे अधिक आवडतात. पण हा आवडीनिवडीचा भाग झाला. मात्र तटस्थपणे पहिले तर पूर्वीचा विनोद बराच बालिश होता. टुणटुण जाड असणे आणि तिच्यावर दारूड्या केश्तोचे प्रेम असणे हे पाहून लोक हसणारच असे काहीतरी गृहीत धरले जात असावे. त्यामानाने अमिताभचा विनोदी अभिनयही लाजवाब असे. पण प्रत्येक मुद्यात अमिताभ बच्चनला घुसडणेही योग्य नाही.

तुलनेने चमत्कृती, भाषाशैली, परिस्थितीजन्य विनोद, कोट्या, अभिनय, कल्पकता ह्या बाबींमध्ये दुसर्‍या पिढीतील विनोदवीरांनी काळ गाजवला असे म्हणावे लागेल. ह्यातच अक्षय कुमारचेही नांव घ्यावे लागेल. विनोद हे चित्रपट चालण्यास पुरेसे ठरू शकणारे एक कारण आहे हा साक्षात्कार निर्मात्यांना व्हावा इतपत पातळी ह्या सर्व कलाकारांनी नक्कीच आणली. (त्याचवेळी आपल्याकडे एक अशोक सराफ हे दिग्गज अभिनेते सोडले तर सचिन, लक्ष्मीकांत वगैरे लोकं अक्षरशं पीडत असत. पण तरीही त्यांनी विनोदांवर दहा वर्षे तरी मराठी चित्रपट चालवून दाखवला असे म्हणावे लागेल).

पूर्वी प्रेयसीच बाप आला की प्रियकर लपणे, कोणीतरी जाड असणे, कोणीतरी बालिशपणे बोलणारे असणे, कोणीतरी स्त्रीवेषात वावरण्यास मजबूर होणे वगैरे प्रकार दाखवले की विनोदाचे अंग संपले असे मानत असावेत. मधला काळ मस्त गेला. पण आता पुन्हा असा काळ आला आहे की शाब्दिक विनोद, द्वयर्थी विनोद, पांचटपणा, बीभत्सपणा, नुसतीच विनोदी स्टाईल उचललेली असणे असे प्रकार घातकरीत्या वाढलेले आहेत. जुन्या काळी उत्पल दत्त, संजीव कुमार ह्या लोकांनी सुंदर विनोद दिलेला होता. नंतर अमिताभ आणि वर नमूद केलेली सर्व नांवे आली. पण आता नांव घेण्यासारखे कोणी वाटतच नाही.

आपण जर थोडेसे डोळसपणे पाहिले तर असे लक्षात येईल की आजची पिढीसुद्धा सुमार विनोदांवर हासत आहे. त्यांना 'घाईघाईत विनोद झाला आणि हसून घेतले की पुरे' असे वाटत आहे. विनोद वाचल्यावर प्रतिसाद म्हणून खूप प्रचंड हासण्याचे स्मायली देणे हेच कर्तव्य वाटत आहे. त्यांना जे मिळत आहे ते ते उपभोगत आहेत असे म्हणता येईलच, पण त्यांना जे मिळत आहे ते देणार्‍यांमध्ये चित्रपट हे पुन्हा एक प्रभावी माध्यम आहे हे दुर्लक्षिता येणार नाही. वर्तमानपत्रातील सुमार विनोद, वनलायनर्स ह्यांच्याइतकेच विनोदाच्याही बाबतीत चित्रपट प्रभावी ठरतात हे मान्य व्हावे.

भारतीयांसाठी जवळपास सात दशके मनोरंजनाचे अतिशय प्रभावी माध्यम ठरलेल्या चित्रपटांमधील ह्या प्रमुख बाबींमध्ये झालेली गुणवत्तेची घसरण आजच्या समाजातील वैचारीक प्रदुषणामागचे एक ठळक कारण आहे असे मला वाटते. ह्याशिवाय आजच्या चित्रपटांचा तुफान वेग, नव्या तंत्रांमुळे त्यांना मिळत असलेली मर्यादीत व्यावसायिक आयुर्मर्यादा, त्यांचे विषय हेही असे घटक आहेत जे दूरगामी परिणाम करतच राहतील असे वाटते.

धन्यवाद!

=================

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमात देवानंद दारू प्यायचा ती उंची आणि अगदी बाटली वरचे लेबल बघुन मगच, अभिताभ च्या काळात हीरो देशी आणि हातभट्टीची प्यायला लागले.

छान आढावा, छान लेख.

अमिताभबाबत प्लस वन वन वन Happy
हिंदी सिनेमातील सारी अ‍ॅक्शन एकतरफ आणि अमिताभचा त्रिशूल+दिवार एकतरफ!

पण प्रेम या विभागाअंतर्गत शाहरुखचा अनुल्लेख खटकला Sad

खुप छान...खरच हे विचार प्रत्येकाला पडतातच कधी ना कधी खरच...काही सिनेमे असे असतात्..
मला एक जुने गाने सलमा आगा यांचे खुप आवडते 'दिल के अरमा आसुओ मे बह गये' मला वाट्ल नायिकेला नायक सोडुन गेला वैगेरे असेल ह्या उत्सुकतेने मी तो सिनेमा पाहीला अर्धाच गाण्यापर्यंत पण विशेष काही नाही झालेले नायक ऑफीसच्या कामासानिमित्त बाहेर जात असतो म्हणुन नायिका रडत असते...बाकी गाणे १ च नंबर...
असे खुप सिनेमे असतात ...

त्यांना 'घाईघाईत विनोद झाला आणि हसून घेतले की पुरे' असे वाटत आहे. विनोद वाचल्यावर प्रतिसाद म्हणून खूप प्रचंड हासण्याचे स्मायली देणे हेच कर्तव्य वाटत आहे. >>>:हाहा:

छान आहे लेख. जरा लाम्बल्यासारखा वाटला, पण आवश्यक होता.

पण हिंदी चित्रपटातील गीते हा वादाचा विषय वाटतो. एक तर प्रत्यक्ष आयुष्यात कोणीही माणूस एखाद्या परिस्थितीत अचानक उत्स्फुर्तपणे गाऊ लागत नाही. तो गाऊ लागला तर शब्द कुठून आणणार सेकंदा सेकंदाला? तेही तात्कालीन परिस्थितीवर अगदी तंतोतंत व काव्यमय भाष्य करणारे, गेय, गायनानुकुल आणि एकाच भाषेतले शब्द इतक्या प्रवाहीपणे कसे ओवणार तो? त्यात पुन्हा तो गात असताना कोरस कोण गाणार? संगीत कोण वाजवणार? त्याचे गायन, वाद्ये व कोरसशिवाय इतर कोणताही आवाज ऐकू न येणे हे शक्य कसे होणार? गाणे किती वेळ गाणार? पुढची सिच्युएशन निर्माण होईपर्यंत? गाणे गायल्यामुळे इतरांचे मन कसे पालटणार? प्रत्येक पात्राचा गाताना आवाज उत्तम कसा असणार? सूर अचूक कसे लागणार? चाल कशी ठरणार? मधला म्युझिकचा पीस किती वेळ असायला पाहिजे हे कसे ठरणार?>>>>>>> >>>>>>

मला पण असेच वाटायचे. त्या नायिका एकतर तन्ग चूडीदार, डोक्यावर मोठ्ठाले चिमणीचे घरटे वा सुगरणीचा खोपा घालायच्या. बर हे नायक- नायिका कपडे पण बदलायचे त्यामुळे असे वाटायचे की आज अर्धे गाणे गायलेय आणी बाकी उद्या-परवा.

बाकी ह्या हिरो-हिरविणी मागे ते मोठ्ठाले तान्डे किन्वा झाडावर/ फान्द्यान्वर फळे लगडावी तश्या मुली लगडलेल्या ( हे वाक्य शिरीष कणेकर यान्चे जॉय मुखर्जी किन्वा तत्सम नायकान्च्या चित्रपटाबद्दल होते, ते इथे लिहीलेय) असायच्या.

बाकी मग बाकी लोक्स भर घालतीलच.

काल धमेंद्रचे एक गाणे अमूक अमूक चॅनेलवर लागले होते, त्यात तो चक्क मारामारी करत गाणे म्हणत होता , पडद्याआडून अमजत खान डोकावत होता.......... कुणाला गाणे आठवत असेल तर टाका. पण मारामारी आणि गाणे पाहताना हसावे कि रडावे तेच कळत नव्हते.

मूळ लेखातील वैचारीक प्रदूषण हे तितकेच जूनेही आहे हे लक्षात घ्यायला हवे. जून्या काळातील खूपशी गाणी अत्यंत सुरेख आणि अर्थपुर्ण आहेत म्हणून ती मनाला खेटून कानावर पडतात पण त्याच बरोबर तितक्याच संख्येची किंबहुना त्याहून अधिक गाणी टीपीकल रडक्या सुरातली ,रटाळ आणि चित्रपट बनवलाय तर गाणे हवेच म्हणून बळजबरीने कोंबलेली आहेत हेही तितकेच खरे आहे.
आजकाल बरेच चित्रपट डोके बाजूला ठेवून पहावे लागतात. ते तसेच पहावे कशाला नसत्या भानगडीत पडावे.
भारतीयांसाठी जवळपास सात दशके मनोरंजनाचे अतिशय प्रभावी माध्यम ठरलेल्या चित्रपटांमधील ह्या प्रमुख बाबींमध्ये झालेली गुणवत्तेची घसरण..............................
असहमत.............. अजूनही तेवढेच दर्जेदार चित्रपट निर्माण होतात.
चित्रपटाचा मूळ हेतू मनोरंजनाचा आहे, म्हणून त्यात आयटेम साँग किंवा अशक्य /अचाट मारामारी दाखविली तरी त्यात गैर काय.

एकंदरीत लेख आवडला थोडक्यात बरच काही सांगितलेय.

Befikir, society madhil balakanbabat sahamat. lekh nehmipramanech mast.