रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १

Submitted by आनन्दा on 12 September, 2014 - 09:17

सामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली.

प्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू -
आपल्या शरीरात अनेक विजातीय घटत कायम येत असतात. अनेक अनावश्यक गोष्टी चयापचय क्रियांमधून साठत असतात, या विजातीय गोष्टी अनेक प्रकारच्या असू शकतात.. बक्टेरिया, किंवा इतर एकपेशीय जीव, विषद्रव्ये जसे की शिसे वगैरे. अगदी शरीरात विनाकारण साठणारी चरबी देखील याच विजातीय द्रव्यांमध्ये येते. शरीरामध्ये नेहमी ही विजातीय द्रव्ये शोधून बाहेर टाकण्याचे काम चालू असते.
मोडर्न मेडिसिनच्या दृष्टीने रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे रोगजंतूंसोबत लढण्यची शरीराची शक्ती. एक प्रकारे ते बरोबरच आहे. कारण ते देखील एक विजातीय द्रव्यच आहे, आणि शरीर देखील त्याच्याबरोबर लढाच करत असते. आणि त्यामध्ये शरीरातील अनेक यंत्रणा कार्यरत असतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की रोग होतो एव्हढेच मोडर्न मेडिसीन म्हणते.

आरोग्याच्या समांतर शाखांचा दृष्टीकोन मात्र थोडा वेगळा आहे. होमिओपॅथी मध्ये रोगग्रहणक्षमता (susceptibility - संवेदनशीलता) अशी एक संज्ञा आहे. माझ्यादृष्टीने त्याची व्याख्या म्हणजे रोग वेळेवर ओळखण्यची क्षमता. आपण लहानपणी शिकलो त्याप्रमाणे आजारांचे २ प्रकार असतात. (मॉडर्न मेडिसीनप्रमाणे)
१. रोग - जो रोगजंतूंमुळे होतो - उदा. न्युमोनिया, टायफॉईड, इ.
२. विकार - जे शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे होतात.

समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. त्यामुळे उपाय पण त्यावरच केला जातो.

कमिंग बॅक टू रोगग्रहणशक्ती - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे शरीराची विजातीय द्रव्ये योग्यवेळी शोधून बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते, याचाच परिणाम शरीरात रोग निर्माण होण्यात होतो.
आयुर्वेद म्हणतो अयोग्य आहार-विहारांमुळे शरीरात दोष वाढीस लागतात. हे वाढलेले दोष बाहेर टाकण्यासाऱही स्थिती जर शरीराकडे नसेल - म्हणजे
१. अशक्तपणा - पोटात अपचन झालेले अन्न आहे, पण जुलाब करून ते बाहेर टाकण्याची शक्ती शरीराकडे नाही.
२. आत्यंतिक प्रमाणात बिघडलेले राहणीमान - यांमध्ये पहिले दोष बाहेर काढण्यापूर्वीच नवीन पुन्हा शरीरात तयार होतात - जसे की रोज जागरण करणे - जागरणामुळे शरीरात पित्त निर्माण होते. म्हणजेच विजातीय द्रव्ये. ही द्रव्ये शरीरातून बाहेर टाकण्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा जागरण झाले तर मग शरीरात पुन्हा पित्त निर्माण होईल. मग हे पित्त त्याच जुन्या साठ्यात साठवले जाईल.
किंवा ईतरही काही कारणे असतील.

आता गम्मत अशी आहे की केव्हा ना केव्हा तरी शरीराची म्हणजे त्या दोषाच्या शरीरगत स्थानाची(जसे की पित्ताशय) साठवणक्षमता संपणारच. मग अश्यावेळेस शरीरासमोर २ पर्याय शिल्लक राहतात -
१- तीव्र शाररीक क्रिया - जसे की उलटी द्वारे हे पित्त बाहेर फेकून देणे
२. - जर पर्याय १ काही कारणाने शक्य नसेल, काही कारणाने उदा. एखादा माणूस माझ्यासारखा उलटी होऊच देत नाही, तेव्हा मग ते शरीरातच कुठेतरी स्थानबद्ध करणे. (पुन्हा एकदा सांगतो - मी आयुर्वेदाच्या दॄष्टीकोनातून पित्त म्हणतोय. त्यामागे कोणती केमिकल असतात ते मला माहीत नाहीत, पण कोणतीतरी असतात हे नक्की)

शरीर हा दोष स्थानबद्ध करायला निघाले आहे, याचाच अर्थ माझी या दोषाबद्दलची संवेदशीलता आता कमी होत चालली आहे. आता हे साठवायचे कुठे असा प्रश्न आहे - त्याचे उत्तर शरीराच्या बाबतीत सोपे आहे. असा दोष साठवण्याचे २ निकष आहेत
१. शरीराच्या त्या भागाची तो दोष साठवण्याची क्षमता असली पाहिजे.
२. शरीराच्या त्या अवयवाकडे त्या दोषाबद्दल कमी संवेदनशीलता असली पाहिजे - म्हणजे शरीराने पुन्हा सांगेपर्यंत त्या अवयवाने तो दोष बाहेर टाकण्याचा प्रयत्न करता नये.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोटावर साठवली जाणारी चरबी.

परंतु इथेच तर सारी मेख आहे - कारण शरीराच्या कोणत्याही अवयवाची असा दोष साठवण्याची क्षमता अमर्यादित नसते, केव्हातरी त्या स्थानावरचा घडा भरतोच, आणि मग शरीराचा तो अवयव असहकार पुकारतो. उदा. डोकेदुखी - डोके किंवा त्याचे नियंत्रण करणारे स्थान, जिथे हे पित्त साठलेले आहे, ते शरीराला सांगते की माझी क्षमता संपली. एकतर हे पित्त बाहेर टाका, किंवा दुसरीकडे हलवा. शरीर त्याप्रमाणे काहीतरी कृती करते आणि मग डोकेदुखी थांबते.
म्हणूनच आयुर्वेदाकडे २ प्रकारच्या चिकित्सा आहेत.
१ शमन - यामध्ये हा तात्कालिक प्रकारचा दोष शांत केला जातो. काही प्रकारची औषधे घेऊन, जसे की पित्ताची मात्रा, हा दोष तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करून शांत केला जातो.
२. उत्सर्जनः- यामध्ये असा दोष शरीरातून त्याच्या मूळ स्थानी आणून मग उस्तर्जन केला जातो. उदा - पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.
मूलतः या उत्सर्जन चिकित्सेमध्ये औषधोपचारांनी विजातीय द्रव्ये बाहेर टाकली जातात. सामान्यपणे अशी अपेक्षा असते की अश्या प्रकारे शरीरेशुद्धी झाल्यावर शरीराची संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होईल आणि त्यामुळे शरीराचे काम सुरळीत चालू लागेल. तसे झाले नाही तर बहुधा पुन्हा पंचकर्म चिकित्सा करतात.

या सर्व विवेचनामध्ये एक गोष्ट अजून आलेली नाही, ती म्हणजे रोगग्रहणशक्ती - रोगग्रहणशक्तीची माझ्यापुरती व्यख्या अशी, की विजातीय द्रव्य तत्काळ बाहेर टाकण्याच्या शरीरात असलेल्या यंत्रणेत झालेला बिघाड.
आता आपण रोगजंतुजन्य रोगांकडे येउ -
प्रत्येक रोगजंतुचे आपले असे स्थान असते, तो रोगजंतु फक्त त्याच अवयवाला संसर्ग करू शकतो. मग होते असे, की जर एखादा दोष जर त्या स्थानात अगोदरच ठाण मांडून बसला असेल, तर त्या रोगजंतुला आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते. जसे की घश्याला होणारा संसर्ग - वातपित्तकर खाण्यामुळे जर घसा दूषित झाला असेल, तर त्याला व्हायरल इन्फेक्शनसाठी आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते.

म्हणजे असे बघा, पोटात बाहेरून खाण्यापोटातकोणता तरी जीवाणू आला, जर शरीराची संवेदनशीलता चांगली असेल, तर शरीराला जो जीवाणू लगेच कळेल, आणि तत्काळ शरीर कृती करून तो जीवाणू बाहेर फेकेल. पण तसे जर झाले नाही, शरीराची तेव्हाची संवेदनशीलता जर कमी असेल, तर मग तो जीवाणू शरीरात कुठेतरी स्थानबद्ध केला जाईल. स्थानबद्ध केलेला जीवाणू कालांतराने आपली संख्या वाढवून पुन्हा शरीराला अपायकारक होतोच, आणि त्यावेळी तो जास्त संख्येने असल्यामुळे त्याचा प्रतिकार करणे देखील कठीण जाते. आणि मग अश्या वेळेस शमन चिकित्सा करून तो बरा करावा लागतो.
जसे की - उदाहरण आपण टायफोईड चे घेउ - टायफोईड हा आतड्यांमध्ये वाढणारा जीवाणू आहे. त्याला वाढीसाठी जडान्न, किंवा पोटात दीर्घकाळ साठून राहिलेले अन्न उपयोगी पडते. जेव्हा टायफोईड्चा जंतू शरीरात प्रवेश करतो तेव्हा हर आपण आपण मिताहारी, आणि हलका, सुपाच्य आहार घेत असू, आणि आपली संवेदनशीलता जागृत असेल, तर त्यावर वेळीच उपाय होईल, आणि त्या जंतूंना वाढीस संधी मिळणार नाही.
परंतु तसे जर झाले नाही तर,
जर त्या जंतूंना बाहेर टाकले गेले नाही, तर मग ते त्यांच्या स्थानात, म्हणजे आतड्यात स्थानबद्ध होतात. पोटात त्या जंतूंना वाढीस अनुकूल स्थिती मिळाली, तर मात्र ते जोमाने वाढीस लागतात. अश्या वेळेस शरीरची स्थिती देखील त्या जंतूंना बाहेर टाकण्याला अनुकूल नसते, त्यामुळे शमन चिकित्सा करावी लागते. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे टायफॉईड चा उलटणारा ताप. ताप बरा होता होता जर काही कुपथ्य झाले, तर मग टायफॉईड चा दुप्पट जोमाने उलटतो, आणि मग त्याला आवर घालणे कठीण होते. )
आता आयुर्वेदानुसार याची चिकित्सा कशी होते ते पाहू, शरीरातून रोग बाहेर टाकणे शक्य नाही, म्हणजे मग तो शरीरातच संपवला पाहिजे. तो कसा संपवणार? आयुर्वेद म्हणतो, की रोग संपवायचा असेल, तर त्याचे शरीरातील स्थान नष्ट करा, म्हणजे आतडी काढून टाकायची की काय? Smile तर तसे नव्हे. शरीरात जे त्रिदोषांच्या असमानतेमुळे रोगाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे ते पुन्हा समस्थितीत आणून त्या रोगाचे स्थान उद्वस्त करणे. उदा. टायफॉईडच बघू, त्याचे स्थान आहे आतड्यातले न पचलेले अन्न - या परिस्थितीत खालील उपाय संभवतात -
१. लंघन - शरीराला कमीत कमी - अगदी गरजेपुरतेच अन्न द्यायचे, ते देखील अतिशय हलके, सुपाच्य. त्यालाच पथ्य म्हणतात. प्रत्येक आजाराप्रमाणे त्याचे पथ्य बदलू शकते.
२. पाचन - शरीरातील न पचलेले अन्न पचन करून ते बाहेर टाकणे,आणि रोगात निर्माण विजातीय द्रव्यांचे शमन करणे यासाठी वेगवेगळी औषधे, काढे वगैरे दिले जातात.
या दोन उपायांनी शरीरातील रोगाचे स्थानच उध्वस्त झाल्यावर रोग तिथे फार काळ राहू शकत नाही.

आयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे -
ज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं |
ज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं |
बहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे.

तर ही झाली संवेदनशीलता, रोगग्रहणशक्ती, आणि,आयुर्वेदाची पद्धती/ तत्वज्ञान..
पुढील भागात होमिऑपॅथी, आणि योगोपचारांकडे आणि इतर बाजूंकडे एक नजर टाकू.
===============================================================================
डिस्क्लेमर - मी काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही, पण घरात तसे वातावरण असल्यामुळे थोडाफार अभ्यास आहे, त्यामुळे यात त्रुटी नक्कीच राहू शकतात. जाणकारांनी त्या दूर कराव्यात, अशी त्यांना विनंती.
===============================================================================
मी मॉडर्न सायन्सेसचा प्रतिवाद करण्याऐवजी समांतर चिकित्सापद्धती मांडण्याचा मार्ग स्वीकारला आहे, या चिकित्सापद्धतींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, पण या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत आहे.
चु. भु. दे. घे.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॉडर्न शास्रातही ससेप्टिबिलिटी ही संकल्पना आहे.

त्या दोषाच्या शरीरगत स्थानाची(जसे की पित्ताशय) साठवणक्षमता
<<
पित्ताशयात(गॉल ब्लॅडरमध्ये) जमा होणारे "पित्त" हा आपल्या शरीरातला 'दोष' आहे, असे आपले म्हणणे आहे काय?

- डॉ. इब्लिस.

रच्याकने: माझ्याही दुकानाबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. वरील प्रतिसाद फक्त शंकानिरसनासाठी लिहिलेला आहे. Wink
माझ्या मंदबुद्धीला पडतील तशा एकेक शंका हळू हळू विचारीन. जमल्यास निरसन करावे ही नम्र विनंती.

डाक्टर डाक्टर हा खेळ लहान मुलांना फार आवडतो.

टॉप मार्क्स मिळवून दहा वर्षे घासून जे ज्ञान मिळते, त्यानंतर पेशंटला प्रॉब्लेम आला, तर ज्या डॉक्टरची गच्ची धरायची सिस्टीम आपल्या भारतात आहे, त्याच आपल्या देशात, तुमच्यासारख्या "थोडाफार अभ्यास"वाल्यांना कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट लावण्याआधी, वैदूप्रतिबंधक कायद्याखाली तात्काळ गजाआड करायला हवे, असे माझे स्पष्ट मत आहे.

लेख पटला. पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य पिलाजी लोखंडे हेच म्हणतात, त्यांच्या लेखाची पुरवणी सुकाळ साप्ताहिकात येते ,मी ती वाचतो, आयुर्वेदात हास्योपचाराचे महत्वही वीदीत केले आहे तर!

"थोडाफार अभ्यास" वाले तात्काळ गजाआड झाले की जनतेच्या सगळ्या नाड्या टॉप मार्क्स मिळवून दहा वर्षे घासून ज्ञान मिळवून हातोहात फसवणा-यांच्या हातात!!

सगळे तसे नसतात हे मान्य पण आजची परिस्थिती पाहता हे दहा वर्षे घासणारे एकत्र जमून हॉस्पिटले काढतात नि जमून जमून लूटतात)

शेवटी इज समांतर चिकित्सापद्धती थ्रेट टू अॅलोपथी?

(susceptibility - संवेदनशीलता) हे एक आधुनिक शास्त्रात मान्यता पावलेले तत्व आहे. उदा. दमट खोलीत गेल्यावर ज्या माणसाला दमा आहे त्याला लगेच धाप लागते आणि आपल्या सारक्या माणसाला काही त्रास होत नाही. किंवा आपण पाणी पुरी/ झणझणीत मिसळ खाल्ली तर काही होत नाही पण (अति) संवेदनशील माणसाना ताबडतोब लोटा परेड करावी लागते.( काही उष्ण प्रकृती माणसाना नुसत्या विचारानेच बहिर्दिशेची भावना होते.
"समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. "
नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो? आईच्या शरीराचे असंतुलन हा एक साधारण घेतलेला बचाव आहे पण आईला क्षयरोग/ कर्करोग असताना हि मुल उत्तम प्रकृतीचे असते हे कसे?
वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब.
आपले शरीर संपूर्णपणे संतुलित असेल तर आपल्याला रोग होणारच नाही असे छातीठोकपणे सांगता येईल काय?
अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच.
अगदी निरोगी माणूस असेल तरीही जर मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाल्यास त्या माणसाला विषमज्वर(टाय फोईड) होणारच.
तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.( अजीर्णामुळे ताप आला असेल तर गोष्ट वेगळी) उलट तापामुळे आपल्या शरीरात चयापचय रासायनिक क्रिया वाढल्याने( तापमान वाढले कि रासायनिक क्रिया वेगाने होतात हे अगदी बाळबोध रसायन शास्त्रातील तत्व आहे) आणि आपले शरीर गरम ठेवण्यास लागणारी उर्जा शरीरातून गेल्याने उलट अशक्तपणा येतो आणि अशात लंघन केल्यास अशक्तपणा भरून येण्यास जास्तच वेळ लागतो. माझ्या सारख्या बारीक प्रकृतीच्या माणसाना विचारून पहा लहानपणी तापामुळे अशक्तपणा आणि चक्कर कशी येत असे ते. बरेच लोक आपल्याला हा अनुभव सांगतील.
पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.
पित्ताशय कोणताही तेलकट पदार्थ खाल्ला कि रिकामे होते. मी सोनोग्राफी मध्ये पित्ताशय काम करते कि नाही हे पाहण्यासाठी रुग्णाला दोन सामोसे किंवा बटाटे वाडे खाऊन येण्यास सांगतो आणि एक तासाने परत सोनोग्राफी केल्यावर पित्ताशय( काम करीत असेल तर)रिकामे झालेले दिसते.
आपले विवेचन हे फारच जनरलायझेशन आहे.
वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. मी गेली ३१ वर्षे शिकतो आहे अजून पलीकडचा काठहि नजरेस आलेला नाही. तेथवर पोहोचणे याच नव्हे तर पुढच्या सात आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही.

डिविनिता उर्फ .. Wink
तुमच्या लेव्हलच्या इंटेलिजान्ससाठी असले वैदूच हवेत खरं तर. स्वतःच्या जिवाचीही कदर नसेल, तर ऐश करा इतकेच सांगू शकतो. कीव येते खरच! तुमच्यासारख्या अती हुश्शार लोकांच्या 'श्रद्धां'पायी किती लोकांची श्राद्धं घालायची वेळ येते, हे तुम्हाला समजत नाही, यातच सगळे आले.
अन हो, नेक्स्ट टाईम घरात कुणाला कुठलाही आजार झाला, तर अ‍ॅलोपथी औषध घेताना हा प्रतिसाद आठवा, अन श्रद्धेने 'आल्टरनेटिव्ह' मेडिसिन घ्या.

वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. मी गेली ३१ वर्षे शिकतो आहे अजून पलीकडचा काठहि नजरेस आलेला नाही. तेथवर पोहोचणे याच नव्हे तर पुढच्या सात आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही.

-- क्या बात है!

आधुनिक वैद्यक शास्त्राचा आजिबात उल्लेख न करता आयुर्वेदावर लिहीलेला लेख वाचायला आवडेल.असा लेख लिहीता येईल याविषयी मला शंका वाटत नाही कारण आयुर्वेद आधीपासून अस्तित्वात आहे. त्यातील संज्ञा, संकल्पना without any reference to modern medicine कोणी तज्ज्ञ लिहू शकेल का?
बाकी डॉक्टर खरे यांच्याशी सहमत! Immunology इतका गहन विषय आहे.अजूनही आपल्याला आपली immune system कशी काम करते ते पूर्णपणे उलगडलेले नाही.

आधुनिक वैद्यक शास्त्राचा आजिबात उल्लेख न करता आयुर्वेदावर लिहीलेला लेख वाचायला आवडेल.।>> जुन्या मायबोलीवर की नवीन (??) तोषवीनं असे लेख लिहिलेले आहेत... मुळात तिचा आयुर्वेदावर अब्भ्यास आहे. घरामधेय पसरलेले ज्ञानकिरण शोषून घेऊन लिहिलेले लेख नव्हेत.

सुबोधसर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आपण एक एक गोष्टींचा विचार करू

नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो?

माझ्यामते आयुर्वेदामध्ये गर्भाधान + गर्भसंस्कार हा एक संपूर्ण वेगळा विभाग आहे, त्यामध्ये बहुधा यातल्या बर्‍याच गोष्टी असाव्यात. (म्हणजे बाळाला कर्करोग कश्यामुळे होतो असे नव्हे, पण ढोबळमानाने आईच्या आहारविहाराचा बाळावर काय परिणाम होतो वगैरे. )
बाकी - माणूस जन्माला येताना संतुलित प्रकृती घेऊन येतो असे आयुर्वेद कधीच म्हणत नाही. तसा आपला समज असल्यास कृपया दूर करावा. किंबहुना आयुर्वेदानुसार गर्भधारणेपूर्वीपासून पती पत्नींनी पाळायचे नियम आहेत, म्हणजेच केवळ स्त्रीच नव्हे, तर उत्तम संतती निर्माण होण्यात पुरूषबीजाचा देखील तेव्हढाच वाटा आहे हे आयुर्वेद मान्य करतो.

अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच.

या गोष्टीबद्दल मी आता भष्य करू इच्छित नाही, कारण त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या एव्हढेच म्हणतो ज्या वानरांपासून एडस संक्रमित झाला आहे त्यांच्यामध्ये या रोगासाठी प्रतिकारशक्ती आहे. (मी माकड आणि माणसांना एका पातळीवर आणत नाहिये, पण प्राणिजगतामध्ये एड्स हा अजेय आहे असे नाही. याविषयी सविस्तर मी शिवांबुबद्दल लिहिताना बोलेन.

तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.

यामागची भूमिका कळली नाही - लंघन म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे? लंघनामध्ये कडकडीत उपास करावा असे मला तरी कुठे ऐकलेले आठवत नाही. आम्हाला लण्घन म्हणजे कण्हेरी/ भाताची पेज देत असत. त्यामागची भूमिका स्पष्ट आहे - तापामुळे इतर सार्‍या शरीरयंत्रणांबरोबर अग्नी पण मंद झालेला असतो. अश्या वेळी जडान्न घेऊन उगीचच त्यवर्‍ आणखी भार टाकणे म्हणजे इतर आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्याऐवजी हलका/ सुपाच्य पण पुरेश्या क्यालरीझ देणारा आहार असावा अशी आयुर्वेदाची भूमिका आहे. अर्थात विषमज्वरासारख्या काही आजारांमध्ये मात्र रुग्णाला केवळ पेय पदार्थांवरच ठेवले जाते बहुधा. पण ते मला नक्की माहीत नाही, त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन टाळतो.

आणि महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही प्रतिजैविके घेत असाल, तर तुम्ही लंघन करणे मुळीच अपेक्षित नाही, कारण (१)जड आहारामुळे जे जीवाणुजन्य रोग होऊ शकतात, ते प्रतिजैविके चालू असताना होउ शकत नाहीत. (२)प्रतिजैविकांमुळे जंतूंबरोबर शरीरातील इतर पेशी देखील मरत असतात. त्यामुळे जर तुम्ही काहीच खाल्ले नाही, तर शरीरावर कल्पनातीत लोड येउ शकतो, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे काही औषधे अशी देखील आहेत की जी केवळ खाल्यावरच घ्यायची असतात.

पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.

याबाबतीत मला पुरेसे ज्ञान नाही, मिपावरील जाणकारांच्या प्रतीक्षेत. कदाचित शारीरशास्त्रातील पित्तशय आणि आयुर्वेदानुसार पित्ताशय या दोन वेगळ्या एंटिटी असतील.

बाकी -

वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब.

याच्यामागचा हेतू समजू शकलो नाही. तसा सूर माझ्या लेखातून ध्वनित होत असल्यास क्षमस्व. एका लेखात डोक्टर होता येईल एव्हढे वैद्यकशास्त्र नक्कीच सोपे नाही, नाहीतर मी नोकरी सोडून मेडिकल प्रॅक्टिसच नसती का सुरू केली?
या लेखामागचा माझा हेतू मॉडर्न मेडिसीन वगळता इतर समांतर चिकित्सापद्धतींची थोडक्यात तोंडओळख करून देणे, त्यांचे पायाभूत तत्वज्ञान (जसे आणि जेव्हढे मला समजले आहे तसे आणि तेव्हढे) लोकांपर्यंत पोचवणे, आणि या सर्व चिकित्सप्रणालींच्या अभ्यास/ संशोधनासाठी शक्य झाल्यास थोडी उत्सुकता निर्माण करणे इतकाच आहे. कोणाला आयुर्वेद शिकवणे, किंवा माझी जाहिरात करणे हा नाही. (कारण मुळात मी डॉक्टरच नाही, आणि ते मी वर स्पष्ट लिहिले आहे.) त्यामुळे तुमची पर्सनल वाक्ये मला लागू होत नाहीत असे समजतो.
या चिकित्साप्रणालींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत. बाकी या क्षेत्रात असणर्‍या समस्यांविषयी पुढे सविस्तर लिहेनच, त्यामुळे आता इथेच थांबतो.

@राज साहेब
साहेब माझा स्वतःच्या शास्त्राचा अभ्यासच इतका तोकडा आहे कि मी दुसर्या शास्त्रावर काय मत प्रदर्शन करणार. हे म्हणजे चार ग्रंथ वाचलेला भिक्षुक वेदांतावर प्रवचन करण्यासारखे आहे.
राहिली गोष्ट इतर शास्त्रांची त्यांनी आपली धुणी धुवावीत. (दुसर्या शास्त्रांवर -आधुनिक वैद्यकावर- टीका करण्यापेक्षा). काही वर्षांपूर्वी होमियोपथिचा अभ्यासक्रम पाहिला त्यात एका विषयात १९ गुण शंभर पैकी आधूनिक वैद्यकशास्त्राच्या दुष्परिणामा (साईड इफेक्ट्स) साठी होते. आता आपण आपल्या औषधाच्या परीणामा बद्दल बोलावे कि दुसर्याची धुणी धुवावीत?
उत्साहाच्या भरात आमच्या प्रणालीने कर्करोग एड्स सुद्धा बरे होतात म्हणून दावे करणारे लोकच त्या शास्त्राचे जास्त नुकसान करतात असे माझे स्पष्ट मत आहे.

सुबोधसरांशी संपूर्ण सहमत. म्हणूनच मी माझ्या लेखात आधुनिक वैद्यक्शास्त्राबद्दल टीका टाळली आहे. परंतु त्याच वेळेस एखादे शास्त्र एखादे तत्वज्ञान घेऊन येते, आणि त्या शास्त्राला जर परिणाम दिसत असतील, तेव्हा त्या शास्त्राला सरळ नाव ठेवण्याऐवजी त्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. समजा अभ्यास करायचा नसेल तर किमान अज्ञेयवाद घ्यावा एव्हढेच माझे म्हणणे आहे.

बाकी @इब्लिस - मी मला झालेला मलेरिया केवळ होमिओपॅथिक औषधांच्या सहाय्याने बरा केलेला आहे. आणि गेली १० वर्षे मी क्रोसिन/ तत्सम गोळी वगळता कोणतीही अ‍ॅलोपॅथिक गोळी घेतलेली नाही. अपवाद एका तापाचा जेव्हा मला घरातील डॉक्टरपर्यंत पोचणे शक्य नव्हते. कावीळीचा सुरतच्या हॉस्पिटलने मरण्यासाठी घरी पाठवलेला रुग्ण होमिओपथीने बरा झालेला मी पाहिलेला आहे. तस्मात तुम्ही दिलेले आव्हान मी बहुधा पाळू शकेन असे वाटते.

बाकी तुमच्या आणि इतरांच्या व्यक्तीगत टीका मी दुर्लक्षित करतो.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

कांजी घेणे म्हणजे लंघन !

Proud

अ‍ॅलोपथीही अशा रुग्णाना सॉफ्ट डाएट देते. अ‍ॅडमिट झालेल्या रुग्णाला आमच्या हॉस्पिटलात आहार तज्ञ आहार ठरवतात. प्रत्येक रुग्णाच्या फाइलवर आहाराची नोंद असतेच.

@ इब्लिस - तुमच्याशी १०००% सहमत.

@ आनंदा - मॉडर्न मेडीसीन आहार विहाराचे पथ्य सांगत नाही असे तुम्हाला कोणी सांगीतले? प्रत्येक आजारात काय खावे, खावू नये, काय करावे किंवा करु नये हे सांगितले जाते.
मलेरिया बिना औषध बरा होत नाही असे कोणी सांगितले? तुमचा बरा झाला त्यात विषेश असे काही नाही. पण होमिओपाथीला मलेरिया का झाला हे सांगता येते का?

ही समांतर औषध पद्धती फक्त पोट साफ ठेवण्या पुरती उपयोगी आहे.

@टोचा
हो, तसे तर सारेच रोग औषधांशिवाय बरे होतात. फक्त तो होमिओपॅथीचे औषध घेतल्यावर २ तासातच कसा कायमचा गेला हे एक कोडेच आहे नाही का?
आणि काविळीवर आपण मत दिलेले नाही? तो देखील असाच आपोआप बरा होणारा आजार आहे का? ते देखील पेशंट होस्पिटलने नाकारल्यावर?

मॉडर्न मेडीसीन आहार विहाराचे पथ्य सांगत नाही असे तुम्हाला कोणी सांगीतले
असे मी कधी म्हटले? मी हा धागा मॉडर्न मेडिसिनवर टीका करण्यासाठी काढलेलाच नाही. पण उठ सूट कोणीही उठावे आणि समांतर चिकित्सापद्धतींना शिव्या घालाव्या हे मला मान्य नाही. त्यांना सुद्धा काहीतरी तत्वज्ञान आहे, आणि त्याला देखील गुण आहेत, त्याची ओळख (जशी मला आहे तशी) इतरांना करून देणे, आणि शक्य झाल्यास मोडर्न मेडिकल सायंन्सचा अ‍ॅप्रोच वापरून या समांतर पद्ध्द्तींमधून काही फलदायी बाहेर पडत आहे का हे पाहण्यासाठी लोकांना प्रव्रुत्त करणे. कारण माझा यातल्या कोणत्याच क्षेत्रात सखोल अभ्यास नाही, तेव्हा सर्व शाखांचा एकत्रित अभ्यास करणे हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञच करू शकतात.

झापडे काढून पहा, कळेल.

नेहमीची होणारी काविळी ही शरीर च बरे करते. शरीराला मदत करत रहाणे इतकेच करावे लागते. डॉक्टर लोक जास्त माहीती देवू शकतील.

तसे तर सारेच रोग औषधांशिवाय बरे होतात. >>>>>> हे चुक आहे. बरेसचे रोग शरीरच बरे करते. सर्व नाही.

तुम्हाला मलेरियाच झाला होता हे कोणी सांगितले?

झापडे काढून पहा, कळेल<<< आला आला, बीबी लाईनवर आला.

आपल्यालाच सर्व काही समजते इतरांनी झापडे लावलेली आहेत. सर्व ज्ञान आपल्याचकडे आहे या नोटवर बीबी आला की आपण अ‍ॅक्ट टूचे पुडे मायक्रोवेवमध्ये ठेवावेत.

होमिओपाथीला मलेरिया का झाला हे सांगता येते का?>>> हा फार पुढचा प्रश्न आहे, झाला होता तो मलेरिआच होता हे तरी होमिओपथिने कळते का?

आपल्यालाच सर्व काही समजते इतरांनी झापडे लावलेली आहेत. सर्व ज्ञान आपल्याचकडे आहे या नोटवर बीबी आला की आपण अ‍ॅक्ट टूचे पुडे मायक्रोवेवमध्ये ठेवावेत.>>>>मी तर कालच ठेवले Sad

Pages