मुक्तांगणमधील जिव्हाळा, नितिन सर

Submitted by अतुल ठाकुर on 6 September, 2014 - 22:49

पुलंनी कुठेतरी मर्ढेकरांच्या ओळी उद्धृत केल्यात 'हर गार्डाची शिट्टी न्यारी'. मुक्तांगणच्या समुपदेशकांच्या बाबतीत ही गोष्ट अगदी खरी आहे. आपल्याला वाटतं कि व्यसनी माणसांना समुपदेशन करणारे सर्वजण वेगळं असं काय सांगणार? पण येथे प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. प्रत्येकाचा ढंग न्यारा आहे. समस्येशी भिडताना प्रत्येक जण जरी समोरच्याला व्यसनमुक्त करण्यासाठी धडपडत असला तरी त्यांच्या पद्धतीत फरक आहे. त्यामुळे यांच्याशी बोलताना कधीही कंटाळा येत नाही. मुक्तांगणला गेलात कि आधी कसुन तपासणी होते. अंबाड्यातुन तंबाखु लपवुन नेण्याचे प्रकार आढळल्याने तपासणीला पर्याय नाही. आत शिरलात कि डावीकडे वायंगणकरसर. पुढे डावीकडेच हॉल. आणि त्याच्या बाजुला छोट्या छोट्या केबिन्स आहेत. यात समुपदेशक बसतात. तेथेच एका केबिन मध्ये सावळ्या रंगाचे, मिशा राखलेले, मध्यम उंचीचे एक गृहस्थ बसलेले दिसतील. काहीच्या चेहर्‍यावर जिव्हाळा, अगत्य जणु काही लिहिलेलंच असतं अशा तर्‍हेचा चेहरा. ज्याच्याकडे जाताना भीती वाटणार नाही. जे आपल्याला आपुलकिच्या भावनेनेच उत्तर देतील असं वाटावं असंच व्यक्तीमत्व. हे गृहस्थ कदाचित आपल्या केबिनबाहेर देखिल दिसतील. कुठल्याशा विनोदावर खळखळुन हसताना. यांचे नाव नितिन देऊसकर. मुक्तांगणमधील एक ज्येष्ठ समुपदेशक. १९९७ पासुन मुक्तांगणमध्ये कार्यरत असलेले नितिनसर स्वतः व्यसनाच्या विळख्यातुन बाहेर पडुन आज सोळा वर्षे झाली. मात्र आपण व्यसन करीत होतो हे कधीही त्यांनी लपवले नाही. आठ वर्षापुर्वी काही कारणाने पुन्हा व्यसनात शिरण्याची शक्यता निर्माण झाली होती हे ही ते लपवित नाही. मुक्तांगणच्या अनेक मिटिंग्जमध्ये "एक्सेप्टन्स" बद्दल बरेचदा ऐकले. पण हा स्विकार कसा असावा याचे उदाहरण नितिनसरांनी आपल्या वागण्यातुन दाखवुन दिले. अभिमान वाटावा अशी गोष्ट नितिन सरांच्या आयुष्यात घडली ती मुक्तांगणमध्ये उपचार घेत असतानाच. ते व्यसनमुक्त झाल्यानंतर मुक्तांगणने त्यांना येथे जबाबदारी स्विकारण्याबद्दल विचारले. याचे महत्त्वाचे कारण नितिन सरांनी सर्व वॉर्डची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळुन आपली योग्यता सिद्ध केली होती. त्यानंतर नितिनसरांच्या रुपाने एक समुपदेशक आणि रुग्णमित्रांचा मित्र मुक्तांगणमध्ये दाखल झाला.

माझी नितिनसरांची भेट ही संशोधनानिमित्त झाली. मुक्तांगणला मला अडचण येत नाही. पण आधी इतर ठि़काणी बराच त्रास काढला आहे. त्यामुळे ताक देखिल फुंकुन पिण्याची सवय लागली आहे. मात्र नितिनसरांना विनंती करताच त्यांनी इतक्या अगत्याने आपली वेळ दिली कि पुढे मला त्यांच्याकडे जाण्यात कसलाच संकोच वाटला नाही. हा माणुस समोरच्याचा अवघडलेपणा नाहीसा करतो. मी त्यांच्यासमोर जाऊन बसलो. प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि लक्षात आले कि एरवी अगदी साधे सरळ वागणार्‍या, हसत राहणार्‍या आणि हसवणार्‍या या माणसाने व्यसन आणि व्यसनी माणसांबद्दल फार खोल विचार केला आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोणातुन नितिन सर बोलतात. बोलताना समर्पक उदाहरणे देतात. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या बोलण्यात दुराग्रह नसतो किंवा कुठल्याही प्रकारचा अट्टाहास नसतो. एखादी गोष्ट झाली म्हणजे झालीच पाहिजे. होत नाही म्हणजे काय ही जी एक परफेक्श्निस्ट माणसाकडे नकळतपणे असहिष्णुता आलेली असते त्याचा मागमुसही नितिनसरांकडे नाही. त्यामुळे त्यांच्या सहवासात वातावरण सौम्य होऊन जाते. माणुस मोकळा होतो. हा अनुभव खुद्द मलाच आला. नितिन सरांनी व्यसनाची कारणे सांगताना उद्दीपनाचं महत्त्व सांगितलं. माणुस सुरुवातीला बियर पिणार नाही कदाचित पण त्या काचेच्या ग्लासमधल्या फेसाळणार्‍या, सोनेरी द्रवाचं आकर्षण त्याच्या मनावर कोरलं गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे पहिला ग्लास तोंडाला लावताना हे आकर्षणच परिणाम करुन जातं. या उद्दीपनांचा नितिनसर विचार करतात. त्याबरोबर परिस्थिती आणि संगतीचा परिणामही ते नाकारीत नाहीत. माणसाला सुरुवातीला व्यसन हा आजार आहे हे माहीत नसतं मात्र व्यसनाचे दुष्परिणाम दिसु लागतात आणि तरीही तो त्यात वाहवत जातो त्यामुळे व्यसनाला तो स्वतःच जबाबदार असतो असे नितिन सर ठामपणे सांगतात.

आपल्या समाजात काही व्यवसायात व्यसनाशिवाय चालुच नाही अशी ठाम समजुत असते. नितिनसरांना हे मान्य नाही. मात्र त्यांची मते हि अनुभवावर आधारलेली आहेत. निव्वळ तर्कावर नव्हेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टेम करणारा पण संपूर्ण निर्व्यसनी असलेला माणुस ठाऊक आहे. ते त्याचं उदाहरण आवर्जुन देतात. सैन्यात व्यसन न करणारे अधिकारी आहेत हे देखिल ते आग्रहाने सांगतात. सरांकडे गोष्टींचा अफाट साठा आहे. त्या सांगण्याची सुंदर, सौम्य शैली देखिल आहे. एक गोष्ट मोठ्या मॅडमची आणि एक गोष्ट छोट्या मॅडमची जी त्यांनी मला सांगितली ती येथे दिल्यावाचुन राहवत नाहीय. एका अतिश्रीमंत माणसाचा मुलगा मोठ्या मॅडम म्हणजे मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांच्या वेळेस उपचार घेत होता. तो व्यवस्थित राहात असताना त्याच्या वडिलांनी मुक्तांगणला प्रचंड देणगी देऊन तीन इमारती बांधुन देण्याची तयारी दर्शविली. मोठ्या मॅडमनी ठाम नकार दिला. अशा तर्‍हेने अतिश्रीमंतांच्या देणग्या घेऊन त्यांच्या दबावाखाली राहण्यास त्या तयार झाल्या नाहीत. शिवाय त्या गांधीवादी होत्या. मुलगा श्रीमंताचा म्हणुन वेगळी ट्रीटमेंट देण्यासही त्यांचा नकारच होता. मुक्तांगणमध्ये जातपात, आर्थिक दर्जा न पाहता माणसाला आजारी म्हणुनच पाहिले जाते. त्यामुळेच मुक्तांगणमध्ये गरीब श्रीमंत न पाहता सारेजण एकत्र राहतात हे नितिनसरांनी अभिमानाने सांगितले.

माणसांकडुन चुका घडतात आणि नितिनसर त्या कधिही लपवत नाहीत. मात्र अशा काही गोष्टी घडल्या तर मुक्तांगणमध्ये त्या कशातर्‍हेने हाताळल्या जातात याचेही एक उदाहरण त्यांनी दिले. कुणी अतिप्रसिद्ध व्यक्तीच्या जवळचा माणुस मुक्तांगणमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी सर्वसामान्य मानवी स्वभावानुसार तेथिल एखाददुसर्‍या कर्मचार्‍याने त्या व्यक्तीसाठी थोडी लगबग जास्त केली. माणसाभोवतीच्या वलयाचा परिणाम असतोच. त्यानंतर छोट्या मॅडम म्हणजे आताच्या संचालिका मुक्ता मॅडमनी एक मिटिंग घेतली. त्यात अशा लगबग करणार्‍या माणसांचे कौतुक केले. आणि त्यांची छाती फुगत असतानाच त्याला टाचणीदेखिल तेथेच लावली. त्या म्हणाल्या,"छान काम केलंत पण अशीच लगबग तुम्ही सर्वांसाठी करावीत अशी माझी अपेक्षा आहे. सर्वांनाच ते प्रसिद्ध असल्याप्रमाणे, मोठे असल्याप्रमाणे तुम्ही वागवले पाहिजे". प्रत्येक माणुस महत्त्वाचा आहे हे शिकवण मुक्तांगणमध्ये अशा तर्‍हेने झिरपली आहे. आणि त्याला कारणीभुत आहेत ते असे शिक्षण देणार्‍या मोठ्या मॅडम आणि मुक्तामॅडमसारख्या संचालिका, त्याच बरोबर नितिनसरांसारखे अशा गोष्टी लक्षात ठेऊन त्याप्रमाणे वागणारे मुक्तांगणचे शिलेदार.

नितिनसर जेथे कुठे जातात तेथे बहुधा सकारात्मक काम आणि उदाहरणे हुडकुन काढतात. आणि ती आपल्या रुग्णमित्रांना सांगतात. भारतात सुनामी आली असताना दोन हात आणि संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अंदमानातील बाई त्यांना माहित आहेत. अतिनैराश्य येऊन त्यांचा आयुष्यातील रस नाहीसा झाला होता. एका ख्रिश्चन धर्मगुरुने त्यांना तुम्ही स्वार्थी आहात म्हणुन फटकारले. फक्त स्वतःचाच विचार करीत आहात. आता दुसर्‍यांना मदत करा, जे जे भेटतील त्यांना आपले कुटुंब माना, त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवा म्हणजे तुम्हालादेखिल आनंद मिळेल असे सांगितले. आज त्या बाई अंदमानात एक अत्युकृष्ट गाईड म्हणुन काम करीत आहेत. नितिन सर ही गोष्ट निव्वळ एक सक्सेस स्टोरी म्हणुन सोडुन देत नाहीत. त्याचा वापर व्यसनी रुग्णमित्रांसाठी कसा करता येईल याचा विचार करतात. अवघड परिस्थिती येते. जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया ही तर मुक्तांगणची प्रार्थनाच आहे. मग करायचं काय्? आपल्यातल्या कमकुवतपणावर काम करायला हवं. भुतकाळात लक्ष देण्यापेक्षा वर्तमानाला महत्त्व द्यायला हवं. जर आपल्यातल्या कमकुवतपणावर उपाय केला नाही तर मी मागे जातो आणि या माझ्या घसरगुंडीला जबाबदार कोण असतो? तर मीच. त्यामुळे व्यसनाला परिस्थिती कारणीभुत असते हे निव्वळ व्यसन लपवण्यासाठी सांगितलेलं निमित्त आहे असं तात्पर्य नितिन सर या गोष्टीतुन काढतात. व्यसन हा एक आजार आहे. त्यावर औषध नाही. तो मला झालेला आहे. आता मी पुन्हा कधीही सोशल ड्रिंकर होऊ शकणार नाही. एक ग्लासदेखिल पिऊ शकणार नाही हे वास्तव प्रखरपणे स्विकारण्याची आवश्यकता असते. मात्र नितिन सर हे अशा तर्‍हेने सांगत नाहीत. दुधापासुन एकदा दही झाले कि झाले. त्याचे पुन्हा दुध होणे अशक्य असे उदाहरण ते देतात. अशी उदाहरणे देऊन संकल्पना रुग्णमित्रांच्या गळी उतरवणे ही नितिनसरांची खासियत आहे.

माणसामाणसांमधील नात्यांवर नितिनसर भर देतात. आपल्याकडे अजुनही सुदैवाने कुटुंबव्यवस्था टिकुन आहे. त्याचा परिणाम रुग्णमित्रांच्या रिकव्हरीवर होत असतो. मुक्तांगणमध्ये दाखल करताना हा येथे मेला तरी चालेल म्हणणारे आप्तेष्ठ दुसर्‍याच दिवशी काळजीने आपल्या माणसाची चौकशी करीत असतात. नितिन सरांनी एका व्यसनमुक्त रुग्णमित्राचे एक सुंदर उदाहरण दिले होते. व्यसनाच्या काळात बरेच पराक्रम केलेला हा मित्र आता आपल्या बहिणीला तोंड देण्यास कचरत होता. नितिनसरांनी त्याची मानसिक तयारी केली. बहिणीकडे गेलास तर फार काय होईल? ती थोबाडीत मारेल. ती खा. जास्तीत जास्त वाईट काय होईल याची कल्पना मित्राला आली आणि धीरही वाटला. सारे बळ एकवटुन तो बहिणीला भेटायला गेला. आणि थोबाडीत तर खावी लागली नाहीच पण बहिणीने त्याचे आनंदाने स्वागत केले. दुरावलेली नाती पुन्हा जुळवण्याचा हा एक प्रयोग होता. अशा हृद्य गोष्टी मुक्तांगणमध्ये रोजच घडत असतात. व्यसन सोडण्यासाठी रुग्णमित्रांची कशी तयारी हवी याबद्दल नितिनसर मार्मिकपणे बोलतात. वील पॉवर पेक्षा विलिंगनेसवर त्यांचा भर आहे. व्यसन सोडायचे आहे असे खुद्द त्या माणसाला वाटले पाहिजे. एक आजोबा बियर पित बसले होते. नात मांडीवर येऊन बसली. तिचा पापा घेताना बियरच्या वासाने शिसारी येऊन तिने तोंड फिरवले आणि आजोबा स्वतः होऊन व्यसन सोडण्यासाठी मुक्तांगणमध्ये दाखल झाले. नितिनसर अशा तर्‍हेचे व्यसनाच्या स्विकाराचे महत्त्व खुप मानतात आणि त्यावर पुढची प्रगती अवलंबुन असते असेही आवर्जुन सांगतात.

फॉलोअपचं महत्त्व नितिनसरांनी सुरेख उलगडुन सांगितलं. मुक्तांगणमधुन बाहेर पडल्यावर पथ्य पाळणे आवश्यक आहे. कारण व्यसन हा आजार आहे आणि तो उलटु शकणारा आजार आहे. गाडीला जशी सर्विसिंगची आवश्यकता असते तशीच व्यसनमुक्त मित्राला देखिल फॉलोअपची आवश्यकता असते. आणि मुक्तांगणकडुन तर आयुष्यभर फ्री सर्विसिंग मिळते. मुक्तांगणमधुन बाहेर पडल्यावर माणुस आयुष्याच्या पहिल्या मजल्यावर असतो. तेथुन घसरला तर कमी लागते. मात्र जसजशी व्यसनमुक्त राहण्याची वर्ष वाढत जातात, त्याची प्रगती वरच्या मजल्यावर होत जाते. या प्रगतीचे फायदे तर मिळतच जातात पण वरच्या मजल्यावरुन पडल्यास कंबरडेच मोडण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनमुक्त राहुन वर्षे जितकी जास्त जातील तितकी जबाबदारी जास्त असते. नितिनसर अशी चपखल उदाहरणे देऊन आपल्याला फॉलोअप किती महत्त्वाचा आहे ते सांगतात. त्यांच्या त्या सौम्य शैलीतुन आणि हसर्‍या चेहर्‍याने जेव्हा हे सांगितलं जातं तेव्हा रुग्णमित्राला ते पटकन पटत असेल तर नवल ते काय? आणि नितिनसरांपासुन त्यांचे रुग्णमित्र काहीही लपवु शकत नाहीत. रुग्णमित्रांच्या देहबोलीतुन ते पटकन ओळखु शकतात कि काहीतरी गडबड आहे. ते कुणालाही थेट विचारत नाहीत. त्याला वेगळ्याने भेटतात. एकच साधा प्रश्न करतात. तु कसा आहेस? तुझं कसं चाललंय? या साध्या प्रश्नांसमोर रुग्णमित्रांचा कडेकोट बंदोबस्त ढासळतो आणि ते घडाघडा बोलु लागतात.

नितिनसरांबद्दल थोडक्यात लिहिता येणार नाही. त्यांच्याकडील गोष्टींचा परामर्ष घेण्यासाठी एक लेख अपुराच आहे. मात्र निव्वळ आपल्या सौम्य वागण्यातुन माणुस उपचारक म्हणुन किती परिणामकारक होऊ शकतो याचं नितिनसर म्हणजे चालतं बोलतं आदर्श उदाहरण आहे हे नक्की.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख , तुमच्यामुळे मुक्तांगणाच्या पाठीच्या एक एक कण्याची माहीती मिळत आहे.