manee - मलाही कोतबो : संता सिंग

Submitted by manee on 6 September, 2014 - 09:58

ओये… किथ्थे…
पेहचाणा???
याद शाद है के भूल ही गये हमको….
नाहीच ना ओळखलंत? कसं ओळखाल?? पूर्वी आमचं नाव घेतल्याशिवाय एक दिवस जायचा नाही तुमचा आणि आज विसरून पण गेलात? कमाल करता!!
मी संता... संता-बंता वाला संता… ओये तुमचा favourite संता सिंग यार…

काय सांगू ओ, हल्ली दिवस फार वाईट आलेत. आता कसलं favourite आणि कसलं काय म्हणा. कुण्णी कुण्णी म्हणून बघत नाही आमच्याकडे. आहे भरण्यात दिवस संपतो आणि उसासे टाकण्यात रात्र… का काय विचारताय? तुम्हाला ठाऊक नाही?? तुम्हा सर्वांमुळे तर झालाय हे सगळं आणि तुम्हाला माहित नाही???
हल्ली एक नवा विनोद आमच्या नावावर खपेल तर शप्पथ. आठवा कि तुम्हीच, आमच्या नावाने शेवटचा joke forward केलात त्याला किती दिवस झाले? आठवा आठवा…. आठवा महिना सुद्धा संपला पण आम्हा संता-बंता वर एक्क भी नवा joke नाही आला ह्या नव्या वर्षात. तुमच्या मायबोलीच्या भाषेत TRP का काय म्हणतात तो कमी झाला आमचा… कमी कसला, संपलाच कि हो पार. हायो रब्बा, असाही दिवस पाहावा लागेल, कभी सपणे में भी नही सोच्चा था जी… :'(

आणि ह्या सगळ्याला कारण कोण? तर ती काल आलेली टिचभर मुलगी. ती कोण कुठची आलिया आलीया पासून.. आपलं हे… आलिया आल्यापासून तुम्ही सगळे पार विसरूनच गेलात कि मला. इतने सारे सालों का याराना अपना.. असा विसरायचा असतो का? एका TV show मध्ये २-४ फुटकळ उत्तरं दिली तिने, एवढंच तिचं कर्तृत्व. त्या जीवावर माझी जागा देऊन टाकली तुम्ही तिला? क्यो? किस ख़ुशी में??

अहो खऱ्या आयुष्यात असे नमुने तर कितीतरी सापडतील आजूबाजूला. आपले राजकारणी बघा, कधी कुठे कुणाला काय आणि कसं बोलतील काहीही नेम नाही. पण कुणीही स्वत:ची लोकसभेची सीट सोडून आमची सीट बळकावायला कध्धी आले नाहीत… मग ते कुणीकडचे शहजादे का असेनात. फार लांब कशाला जाताय, त्याच show मध्ये तिच्याच शेजारी बसून तो वरूण नाही का तितकाच मठ्ठासारखा उत्तरं देत होता. पण तरी त्याची हिम्मत सुद्धा नाही झाली हो असला अभद्र विचार करायची. हे असलं पाप मनात देखील आलं नसेल त्याच्या. ओ जी… वड्डा सोणा मुंडा!

पण ही आलिया. कानामागून आली आणि तिखट झाली. बरेच महिने बघतोय आम्ही, जिकडे जावं तिकडे आपला तिचाच बोलबाला. facebook म्हणू नका, whatsapp म्हणू नका, प्रत्येक विनोदामध्ये ही आहेच. आमचे विनोद सरळ सरळ ढापले की तिने. उत्तरेकडच्या दोन गोष्टी अढळ आहेत अशी खात्री होती आमची, एक तो ध्रुवतारा आणि दुसरे आम्ही संताबंता… 'विनोद सम्राट' म्हणून मोठ्या कष्टाने मिळवलेली आम्ही पदवी… धक्का मारके गिरा दिया बंदी ने हमे, आणि आमच्या खुर्ची वर ठाण मांडून बसून राहिली आहे आता.
अहो उद्या पनवेलच्या त्या नवीन एअरपोर्ट ला 'आलियाक्रुझ' म्हणून नाव देऊन मोकळे होतील आणि तुम्ही तमाशा बघत बसून रहाल नुसते. आमच्या बिचाऱ्या बंताने जायचं कुठे मग? करा की हो तुम्ही काहीतरी. तुमच्या गणपती बाप्पाला साकडं का काय म्हणतात ते घाला लवकर.

आमचे सिद्धूपाजी बोलून गेले आहेत, Nobody travels on the road to success without a puncture or two. म्हणून एवढे दिवस गप्प बसलो होतो. पण आता बास झालं. गणपती बाप्पाला सांगा जरा कि हे पंक्चर लवकर काढ आता. आलियाला तिचं काम करू द्या और हमको हमारा. जिंदगीभर तेरी आरती उतारेंगे जी हम…

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages