देखो देखो भाई ये ठाकूर क्या कह रहा है ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 September, 2014 - 16:20

रामलाल मंडळी,
म्या ठाकूर ..
म्हंजी तुमचा पाटील असतो नव्हं, तसा म्या भी गावचा मुखिया ठाकूर. लई चालते आम्हा ठाकूर लोकांची गावात. एकेकाळी माझी भी चालायची. पण त्या भैताड गब्बरने सगळा विस्कोट करून ठेवला आन...... सोडा, पुढला इतिहास तुम्हा समद्यांना ठाव असेलच. पण त्या इतिहासाच्या पुढे जो वर्तमान घडला, बिघडला, तो थोडक्यात सांगाया आज मी इथे आलोय.

गब्बरला कानून के हवाले करून जय ढगात आन वीरू बसंतीला घेऊन शहरात निघून गेला. तुमचे पॉपकॉर्न संपले तसे तुम्ही भी थिएटर खाली केला. तुमच्यासाठी पिच्चरचा दि एण्ड झाला तरी आमची जिंदगानी अजून बाकी होती. तुम्हाला ठाव असेलच, आपल्या कानून के हाथ किती भी लंबे आनं चौडे असले तरी त्येंना खाज भी लई सुटतेया. त्या भैताड गब्बरने कोणा पांडूच्या हातात संभाजी पुडक्यासंग एक बाप्पू थमावले आन सुटला फुकणीचा. कोकण रेल्वे पकडली आणि दूधसागर धबधबा बघत बघत थेट रामगढला आला. रात्रीचा वक्त होता. म्या झोपलो होतो. माज्या उशाशी येऊन उभा राहीला आणि म्हणू लागला, "ठाकूर मला पाव, ठाकूर मला पाव". मला झोपेत काही समजले नाही. मी रामलालला म्हणलो, या सुकाळीच्याला पाव दे आणि हाकलव पुढे.. पण तरीभी गब्बर पुन्हा म्हणाला, "ठाकूर मला पाव, ठाकूर मला पाव". मंग मी म्हणलो, तथास्तु.. तशी काढली त्याने कुल्हाडी आणि कापले माझे पाय.. तसाभी मायझंव ऐकणार्‍यातला नव्हता. मागच्या वक्तालाभी "ये हाथ मुझे दे दे ठाकूर म्हणत होता" आन मी "नै नै" बोलत होतो तरीभी खांद्यापासून कापून काढले होते.

तर माझे कापलेले पाय बघता लगेच रामलालने आपला पगार डब्बल करून मागितला. म्हणला, आता तुमच्या हातांचीच नाही तर तुमच्या पायांची कामे भी मलाच करावी लागणार. आता रोज सकाळच्याला पाठीले टांगून तुम्हाला रानात मलाच न्यावे लागणार. मी नाय म्हटले तर एकलाच रानात निघून गेला, तो परत आलाच नाही. दुसर्‍या दिवसापासून मौसीजी पण गावात दिसायची बंद झाली. मले पहिल्यापासूनच दोघांवर डाउट होता.

हिकडे गब्बरचा धुमाकूळ आता पुन्हा सुरू झाला. भैताड मोकाट सुटला होता. आधी फक्त होळीलाच यायचा. आता दसरा, दिवाळी, बैसाखी, ईद.... जल्ला बैलपोळा भी सोडेनासा झाला. मंग मी त्या गब्बरचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा दोन गब्बरू जवान एकत्र आणायचे ठरवले. म्हटलं पैला चान्स जयवीरूच्या पोरांसनीच देऊया. तर त्या जयच्या पोराले जास्त काही काम नव्हते तसे तो लगेच डेट देऊन मोकळा झाला. मी त्याला म्हणालो, भाऊ या गब्बरचे काहीतरी कराले पाहिजे. आज त्याने गावाकडे येऊन प्रत्येक घरातून दोन बाटली रॉकेल घेऊन गेला. तसे तो म्हणाला, "ठाकूर तुम्ही आयडिया का नाही करत?" मी म्हटलं कंची आयडीया, तर काय बोल्ला नाय.

मग त्येच्यानंतर परत एक दिवशी मी त्याला म्हणालो, भाऊ हा गब्बर काही ऐकून नाही राहिला, आता हफ्त्याला चार डुक्कर मागून राहिला ........... तर तो पुन्हा म्हणाला, "ठाकूर मंग तुम्ही आयडिया का नाही करत?" .. जल्ला मी त्याला कायपण प्रॉब्लेम सांगितला की हेच बोलायचा, ठाकूर तुम्ही आयडिया का नाही करत, ठाकूर तुम्ही आयडिया का नाही करत. पण कंची आयडिया म्हटले की काही बोलायचा नाही. मग एक दिवशी मीच वैतागून म्हटले, जल्ला तुला काय हवी ती आयडिया कर बिन्धास्त, आपली फुल्ल परमिशन. तर लुकडीचा पाण्याच्या टाकीवर एक मोबाईलचा टॉवर लावून गेला. याने गब्बर कसा आपल्या रेंजमध्ये येणार होता त्यालाच ठाऊक. पण याचा एक फायदा तर झाला, गावात वीज नाही तरी उगाच पाण्याची टाकी कशाला बांधून ठेवलीय म्हणून नावे ठेवणार्‍या लोकांची त्वांडा तरी बंद झाली.

त्याच्या नंतर मी वीरूच्या पोरांना बोलावले. सर्वात पैला थोरला सनी, लिओन नाही हं, देओलच पाय आपटत आपटत आला आणि आल्या आल्या रामगढ रेल्वेस्टेशनचा बोर्ड उखडून काढला. गावात शिरताच ठाकूर बलवंतराय के कुत्ते म्हणत माझ्याच दोन माणसांना बुकलून काढला. मी मनातल्या मनात म्हटलं, ह्यो बापापेक्षा आगाऊ दिसतोय, हे प्रकरण काही आपल्याला झेपायचे नाही. मंग मी मधल्या बॉबीला, डार्लिंग नाही हं (तो ही बाकी मधलाच म्हणा) बोलावणे धाडले. त्याच्या केसांचा झुलता मनोरा बघून मी मनातल्या मनात म्हटल याला पैला हरिराम नाई कडे धाडायला हवे. पण आता शेवटची लाईफलाईन वापरून धाकल्यालाही बोलावूया म्हटले. तर तो म्हणला, मी अ‍ॅक्शन हिरो नाहीये. मी अ‍ॅक्टींग करतो... मी म्हणलं, ब्वार्र !

मंग कुठूनतरी समजले की असल्या कामात कोणीतरी करण अर्जुन भी फेमस आहेत. त्येंका बघूक गेलो तर ते करणअर्जुन नावाला जागत आपसात भांडून राहिलेले. मंग मागून समजले की बरे झाले त्येंच्याकडे मदत मागाया गेलो नाही. त्यांची खानदानी दुश्मनी कोण्या ठाकूरशीच होती. आमच्यातल्या काही ठाकूर लोकांनी व्हिलनगिरी भी चिक्कार केली असल्याने त्याचे भी दुष्परीणाम भोगावे लागतात. मंग यांच्याच एका तिसर्‍या भावाकडे गेलो. तो म्हणे नुकताच एसीपी राठोड झाला होता आणि त्याची भी गावोगावी जाऊन डाकू पकडण्याच्या कामात मास्टरी होती. पण मी काही बोलायच्या आधी तोच मला बघून म्हणाला, "क्या ठाकूर तेरे को कितने बार बुलाया तू कभी आता नही.." जल्ला इथे भी ठाकूर बदनाम. मोठ्या मुश्कीलीनेच तिथून पळ काढला.

सरतेशेवटी मी हार मानून गब्बरला स्वताहून पकडायचा हट्ट सोडून दिला आणि सरकार दरबारी मदत मागायचे ठरवले. पण तिथे जाऊन पाहतो तर काय, कित्येक गब्बर तिथे अगोदरच मौजूद होते. त्यांनी मला मदत करायचे आश्वासन दिले आणि चक्क पाळलेही. गब्बरला त्यांनी रामगढच नाही तर पार तालुक्याबाहेर हुसकावून लावले. शेवटून दुसरे वृत्त हाती आले तेव्हा गब्बर पाकिस्तानमध्ये आश्रय घेऊन असल्याचे समजले. शेवटच्या वृत्ताबाबत मात्र गोपनीयता पाळण्यात आली ..

पण आतासा रामगढचा कायापालट होऊ लागलाय. हल्ली लोकं स्वखुशीने घरटी दोन बाटल्या शेंगदाणा तेल आणि आठवड्याला चार कोंबड्या सरकार दरबारी जमा करू लागलेत. त्यांच्यामते अच्छे दिन आने वाले है. मला भी वाटते अच्छे दिन यायला सुरूवात झाली आहे. गावात बिजली आलीय. बसंती टांगा चालवायची, बिजली रिक्षा चालवते. मी व्हिलचेअर चालवतो. आपली आपणच. कारण रामलाल अजून जंगलातून परत आलेला नाही. मौसी मात्र परत आलीय. पण ती आल्यापासून शांतच आहे. गावात आता नुसते बुजुर्ग लोक उरलेत. बसंती गेली आणि गावची जवानी गेली. रहिमचाचा मात्र अजून भी जिते आहेत. पण इतना सन्नाटा क्यू है भाई डायलॉग आतासे मारत नाहीत. कारण गावात चौबीसो घंटे सन्नाटाच असतो. चाकाच्या खुर्चीवर बसल्याबसल्या मी हल्ली एकच विचार करत असतो, ये होली कब आती है, ये होली कब आती है ..

- समाप्त .. ??

१ .. लेखात कोणताही राजकीय वा सामाजिक संदेश लपलेला नाही. तरीही लेखकाच्या परवानगीशिवाय तो शोधण्याचा प्रयत्न केल्यास दंडनीय अपराध समजला जाईल.
२ .. कोणतेही नाव-स्थळ-धर्म-साधर्म्य आढळल्यास त्याला योगायोग समजावा किंवा त्यात विनोद शोधावा.
३ .. ठाकूर आपल्या उमेदीच्या काळात बारा गावचे पाणी प्यालेला असल्याने दर दुसर्‍या पॅराग्राफमध्ये त्याची भाषा बदललेली असण्याची शक्यता आहे.... ती गृहीत धरा.
४ .. हे स्पर्धेचे युग असले, तरी ऋन्मेऽऽष हा द्वापारयुगातील आत्मा असल्याने हा लेख कोतबो स्पर्धेसाठी लिहिलेला नाही. तरीही, लेखन अमुकतमुक विभागात हलवा, शीर्षकात बदल करा, शब्दखुणा याच ठेवा, वगैरे सूचनांचा भडीमार टाळा.
५ .. लेखात एखादा फारच असभ्य वा शिवराळ म्हणवला जाणारा शब्द आढळल्यास तो अर्थाच्या अज्ञानातून आला आहे असे समजावे. तसेच कंबरेच्या खालचे एखादे वाक्य दिसल्यास ती काळाची गरज समजून ठाकूरला माफ करावे.

शोले हि हिंदी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वोत्कृष्ट कलाकृती असून तिला अजरामर बनवायला योगदान दिलेल्या सर्वच महान आत्म्यांची माफी मागून .....
सर्व तळटीपा शांतचित्ताने वाचून घेतल्याबद्दल,
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हीलचेअरकशी वापरता ठाकूरजी?
व्हॉईस अ‍ॅटोमॅटेड आहे का?
आणि रामलालची बाकीची कामे कशी करता?

बाकी लेख मस्तं!
कोतबोत चालला असता.

मस्त

साती, पिक्चरमध्ये जेवढे दाखवले जाते तेवढाच विचार करायचा असतो, बाकीचे का कसे कायकू चा लोड नाही घ्यायचा Proud

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तीनही Happy

छान लिहिलंय की
पुन्हा वाचताना फ्रेश लिखाण वाटले
प्रतिसाद त्या मानाने कमीच आलेत
जरूर वाचा...

एसीपी राठोड म्हटल्यावर माझ्या डोक्यात ते 'डोन्ट अँग्री मी' वाले राठोड आले, ते सुद्धा आजकाल गब्बर इज बॅक म्हणताहेत.
खेडा नाका वाले राठोड ही मस्त.

मस्त लेख.

आताच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते 'डोन्ट अँग्री मी' वाले राठोड हे एसीपी नसून एएसपी राठोड आहेत.

देखो देखो भाई ये ठाकूर क्या कह रहा है ..
Submitted by ऋन्मेऽऽष on 6 September, 2014 - 01:50

छान लिहिलंय की
पुन्हा वाचताना फ्रेश लिखाण वाटले
प्रतिसाद त्या मानाने कमीच आलेत
जरूर वाचा...
Submitted by ऋन्मेऽऽष on 31 December, 2018 - 01:48

{{{ पण आता शेवटची लाईफलाईन वापरून धाकल्यालाही बोलावूया म्हटले. तर तो म्हणला, मी अ‍ॅक्शन हिरो नाहीये. मी अ‍ॅक्टींग करतो... मी म्हणलं, ब्वार्र ! }}}

ह्यो धाकला वीरुचा मुलगा नसून पुतण्या आहे.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_Hindi_film_families#Deol_family

Abhay Deol (actor – nephew of Dharmendra)

त्यामुळे ज्याला मधला म्हंटलेय तो बॉबीच धाकटा ठरतो (जर सावत्र बहिणी विचारात घेतल्या नाहीत तर).