वेदिका - मलाही कोतबो- शेल्डन कूपर

Submitted by वेदिका२१ on 4 September, 2014 - 19:17

नमस्कार,
मी डॉ. शेल्डन कूपर. मूळ टेक्सासचा, आता कॅलिफोर्नियात. काय म्हणता? मला मराठी कसं येतं? अहो तो माझा मित्र राजेश आहे ना, त्याला सांगून इंडियाहून मराठी बालभारतीची पुस्तकं मागवून शिकलो. मला काय कठीण आहे म्हणा! आंतरराष्ट्रीय ख्यातीचा, जगातला एक चमत्कार असलेला scientist आहे मी. आता मी मराठी का शिकलो हा प्रश्न असेल. अहो तोच तर माझ्या इथल्या कोतबोचा विषय आहे.

त्याचं असं झालं, एकदा सर्फिंग करता करता मी मायबोलीच्या साईटवर पोचलो. साईट तर आवडली पण भाषेचा प्रॉब्लेम. मग ते राजकरवी पुस्तकं मागवून शिकलो. मग मायबोलीवर रीतसर मेंबरशीप घेतली. इथे आल्याआल्या लक्षात आलं- नुसतं मराठी येत असून उपयोग नाही- अभ्यास हवा- मग खूप शिकलो कायकाय- मोदी विरुध्द सोनिया, मराठी पाककृती, बॉलिवुडचा इतिहास, सचिनचे स्कोअर्स, जुळून येती रेशिमगाठीची स्टोरी (त्याला स्टोरी आहे का मुळात? असो तो मुद्दा नाहीये), ज्योतिषाबद्दल मतं, वगैरे. सगळा अभ्यास करुन माबोवर आलो.

आणि इथेच माझ्या समस्येची सुरुवात झाली. कसं आहे ना (हो हो तू तिथे मीमधल्या सत्यजीतला स्मरुन-इथलं वाचून तूतिमी binge-watch केली)..असो..तो मुद्दा नाहीये..तर कसं आहे ना..मायबोलीवर येण्याआधी मी जगातला सगळ्यात हुशार मानव आहे, मला सगळ्यातलं सगळं कळतं अशी आपली माझी एक समजूत होती. पण इथे आल्यावर पहातो तर इथे सगळेच हुशार. आणि सगळ्यांनाच सगळ्या गोष्टींमधलं उच्च नॉलेज. मला कॉंप्लेक्स यायला लागला हो फार.

काही काही आयडीज ना, सगळ्याच विषयांवरच्या चर्चेत सारखे एकावर एक पोष्टी टाकत असतात. कुठल्याही धाग्यावर बघा-हे एक-दोन आयडी आहेतच (इतका वेळ माबोवर असतात तर आपली नोकरी किंवा धंदा किंवा डॉक्टरीकीची प्रॅक्टिस कधी करतात देव जाणॆ!). आता मलाच वाटायला लागलं की मला यांच्याइतकं काहीच कळत नाही.

माझे मित्रमैत्रिणी मला कायम म्हणतात की शेल्डन तू कितीही वाद घालू शकतोस. तुझ्याशी वाद घालून आम्ही थकतो पण तू आपला मुद्दा सोडत नाहीस. पण काय सांगू लोकहो, इथे माबोवर लोकांची वाद घालण्याची क्षमता पाहून मीही हात टेकले हो. मूळ मुद्दा काय होता धाग्याचा हे मी धागा वाचताना विसरुनच जाऊ लागलो.

मला सस्पेन्स आवडत नाही..सस्पेन्स असला तर मी तो सोडवल्याशिवाय राहात नाही. मग ते राजने दाखवलेली पत्त्यांची जादू असेल वा एखादया मधेच कॅन्सल झालेल्या शोचा शेवट असेल. पण इथे कोण कोणाचा डूआयडी याचा किती हो सस्पेन्स- डोक्याला मुंग्या आल्या राव!

अर्थात मी काही इथे मायबोलीबद्दल तक्रारींचा पाढा वाचायला आलो नाहीये. इथले वेगवेगळे टॉपिक्स, उपक्रम, सामाजिक कार्य, सहजपणे मदत करणारे मेम्बर्स यांचं मला खूप कौतुक वाटलं. गणेशोत्सव तर खूपच आवडला. एकदा इथे मेम्बर झालात की ही साईट तुम्ही सोडूच शकत नाही. तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सापडतोच.

पण इथल्या काही चर्चांमध्ये भाग घेतल्यावर मी पार भंजाळलो हो. कोणाच्या तरी मुद्दयाला बिनतोड उत्तर दिलं, तर त्या आयडीने आधीच म्हटलं होतं- हेमाशेपो. दुसऱ्याला उत्तर दिलं तर त्याने इतकं लांब प्रत्युत्तर दिलं ते पूर्ण वाचूनही मला काहीही समजलं नाही. अजून एका ठिकाणी चर्चेत भाग घेतला तर म्हणे इथे काय चर्चा करायची आणि काय नाही हे आमचं २००८ मध्येच ठरलंय आणि नवीन मेम्बर्ससाठी आम्ही त्यात बदल करणार नाही.

मला आता इतकं, इतकं सामान्य वाटायला लागलंय ना की मी सायन्टिस्टची नोकरी सोडून सर्वसामान्य मगल माबोकरांसारखी आयटीत नोकरी करायचं ठरवतोय. चारचौघांसारखं असावं माणसाने. बिल, जेफ आणि मार्कला सीव्ही फॉरवर्ड केलाय. तिघेही म्हणाले की शेल्डया दोस्ता तुझा काय इंटरव्ह्यू घ्यायचा! एक आईस बकेट चॅलेन्जचा व्हिडियो पाठव आणि मग नोकरी पक्की समज. मीच अजून ठरवलं नाहीये कुठचा जॉब घ्यायचा- आधी इथे माबोवर विचारुन मग ठरवेन. आणि त्या माकडांवर संशोधन करणाऱ्या महाबोअर एमीशी ब्रेक-अप करुन शेजारच्या पेनीला लग्नाची मागणी घातली परवा. लेनर्डपेक्षा जरा बरा नवरा मिळतोय म्हटल्यावर ती हो म्हणेल याची खात्री होतीच पण ती तर म्हणाली की माझ्यावर ती आधीपासूनच एकतर्फी प्रेम करते. घ्या! बायकांच्या मनात काय असेल ते कधी कोणाला कळलंय! मी आणि पेनीने मग आईला कळवलं फोन करुन. आईसाहेब एकदम खुशीत! लगेच लग्नाच्या तयारीला लागते म्हणाली. काय आहे- आईचंही पटतं पेनीशी चांगलं, उगाच नंतर सासू-सून भांडणं नकोत.
’मी आणि पेनी आणि दिवस असा हा रेनी’ अशी एक गझल पण लिहून टाकली मी- टाकणारे नंतर माबोवर. मग ह्यूस्टनला जॉब ट्रान्सफर घेऊन आईजवळच राहीन म्हणतो. सर्वात लाडका मुलगा आहे मी तिचा.
आणि ते सुपरस्मार्ट जीनियस सुपरबेबी जन्माला घालण्याचं खूळही निघालंय आता डोक्यातून. आता सर्वसामान्यांसारखाच मी,पेनी, एक-दोन पोरं असा चौकटीतला संसार करीन म्हणतो.

पण त्याआधी माझा मूळ प्रश्न- मायबोलीमुळे माझे पाय जमिनीवर आलेत या सत्याचा कसा स्वीकार करु? मला सांगा प्लीज की मायबोलीमुळे मला माझ्या हुशारीबद्दल आलेला कॉंप्लेक्स मी कसा दूर करु?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

good one!

मस्तच!

<<(इतका वेळ माबोवर असतात तर आपली नोकरी किंवा धंदा किंवा डॉक्टरीकीची प्रॅक्टिस कधी करतात देव जाणॆ!). >>

...यही तो ! बालभारती वाचून मराठी शिकून हे येणार नाही हो शेल्डनपंत!
आमच्या वेदांमध्ये हजारो वर्षांपासून ही सर्वांगीण साधना कशी जमवावी हे सांगून ठेवलेले आहे.
Happy

कहर!

हे सगळं नेमकं त्या शेल्डन कूपरलाच का बोलावेसे वाटले ते कळले नाही. त्याच्या जागी दुसरं कोणतंही नाव असतं तरी चाललं असतं. शेवटचे सव्वा/दीड परिच्छेद काय ते बदलावे लागले असते.

धन्यवाद सगळ्यांना Happy

मराठी कुडी - मला शेल्डन-पेनी जोडी आवडते म्हणून ते तसं लिहिलंय Happy
मयेकर- तुम्ही big bang theory बघता का?

वेदिका, हा धागा तुम्ही विरंगुळा मधे काढला आहे Uhoh
मायबोली गणेशोत्सव २०१४ ग्रूप मधे धाग काढायचा होता. बदलता येईल का ग्रूप आता?

मस्तं लिहिलंय. मजा आली.

>>>एकुलता एक मुलगा आहे मी तिचा

नाही, नाही. शेल्डनला भाऊ आहे. जॉर्ज ज्युनिअर.

बहीण 'मिसी' सगळ्यांना माहिती असते. भावाचा उल्लेख बहुतेक एकाच कुठल्यातरी एपिसोडमधे आहे. संदर्भ आठवत नाही.

ओह भाऊ पण आहे का? करेक्ट करायला पाहिजे मग..धन्यवाद मृण्मयी Happy
मला फक्त ती जुळी बहीण माहीत आहे!

बहीण 'मिसी' सगळ्यांना माहिती असते. भावाचा उल्लेख बहुतेक एकाच कुठल्यातरी एपिसोडमधे आहे. संदर्भ आठवत नाही. >> त्याची आई लेनर्ड्ला सांगते ना कि देवाने मला बाकीची दोन मुले दिली आहेत ज्यांना अजून हँडलींग लागत नाही त्यात आहे. त्याच्यातच ती खास सर्दन अ‍ॅक्सेंटमधे शेल्डनला झाडते तो सीन जबरदस्त आहे. "I'm sorry did I start my statement with if it may please you your highness" मी एकदा पोरीवर प्रयोग करून पाहिला Happy