अरुंधती कुलकर्णी - मलाही कोतबो : मी एक डुप्लिकेट आयडी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 4 September, 2014 - 07:11

मी आहे एक डुप्लिकेट आयडी! तुम्ही मला ओळखलंच असेल. आणि नाही ओळखलंत तरी बिघडत नाही. मी सदोदित वेगवेगळी नावे व रूपे घेऊन मराठी भाषिक संकेतस्थळांवर भिरभिरत असतो. (काय करणार! आपलं इंग्रजी तसं अर्धं-कच्चं आहे ना, राव!) मला निरनिराळी रूपे धारण करण्यात खूप मजा येते. मनातील सारे सल, चिडचिड, संताप, हेवा, वैताग, मळमळ, गरळ.... जे काही म्हणून आहे ते मी या संकेतस्थळांच्या पानांवर ओतत असतो. माझ्या बडबडीला भलेभलेही घाबरतात असा माझा संशयच नव्हे, तर पक्का दावा आहे! मला व माझ्या वावराला इतर वाचक घाबरतात, मला दबून राहतात, मी हल्ला केला की गप्प बसतात आणि माझ्या अक्राळविक्राळ गर्जना ऐकल्या की धूम ठोकतात!

पण आज इथे मी माझ्या मनातली वेदना उघड बोलून दाखवणारच आहे! मला हे कधीपासून कोणाला तरी सांगायचे आहे... पण काय करणार! हवी तशी संधीच मिळत नव्हती. आता इथे हक्काचे व्यासपीठ मिळालेच आहे तर त्या संधीत हात-पाय धुवूनच काय, सचैल स्नानच करून घेतो! तर, माझ्या पहिल्यावहिल्या रूपाची व नावाची आठवण अजूनही माझ्या मनात रेंगाळते. भले ती लोकांच्या मनातून कधीच पुसली गेली असू देत. त्या रूपात मी एका कुचकट, तर्कट, खवीस म्हातार्‍याचा अवतार घेतला होता. काय घाबरायचे लोक माझ्या प्रतिक्रियांना! मी त्यांना सतत घालून-पाडून, लागेल असे बोलायचो, टोमणे हाणायचो. त्यांची आंतरजालावरची पातके - प्रमाद खोदून त्यांच्या पुढ्यात त्यांचे माप घालायचो. लोक भीती-लाज-शरमेपोटी अर्धमेले व्हायचे, काहीजण तर अंतर्धानच पावायचे. निरनिराळ्या संकेतस्थळांची भूमी मी या अवतारात पादाक्रांत केली आणि तिथे माझ्या जहरी अस्तित्वाचे निशाण फडकवले. पण माझा हा विजय अनेकांच्या डोळ्यांत खुपला. त्यांनी माझी तक्रार त्या त्या स्थानांच्या प्रशासकांकडे केली आणि माझी गच्छंती झाली!

परंतु एका अवताराची समाप्ती झाली म्हणून मी हार मारणार्‍यांतील नव्हतो. तात्काळ मी दुसरे रूप व नाव धारण केले. या अवतारात मी एक माथेफिरू, सैरभैर सुटलेला नवतरुण बनलो. मला हवं तसं वागणारा, हवं ते बोलणारा... तर मी काहीही बोलायला लागलो की बाकीचे लोक आपल्या 'ज्येष्ठत्वा'चा गैरफायदा घेऊन मला पकवत बसत. मी त्यांना अपमानित केले, त्यांची छीः थू केली, त्यांना शाब्दिक चाबकांचे फटकारे दिले.... पण तरी ही मंडळी आपसांत '' जाऊ देत, लहान आहे तो अजून वयाने... कळेल त्याला हळूहळू...'' अशी चर्चा करू लागले. मला त्यांचा करुणेचा व ते कोणीतरी विशेष असल्याचा स्वर सहन होईना! त्यांचे कोणाचे कौतुक झाले की माझ्या तळपायाची आग मस्तकी जात असे. कानांतून धूर निघत असे. मग मी त्यांच्या आगेमागे वेडे-बिद्रे शब्द-भुईनळे उडवत बसे. त्यांना उद्देशून अचकट-विचकट शेरे, विधाने करत असे. पण तरी ते ढिम्म होते. दिवसेंदिवस त्यांचा असा हा माझ्याप्रती असणारा तुच्छतापूर्ण दृष्टिकोन मला सहन होईना! शेवटी मी शब्दमहासागराच्या खोल तळाशी जाऊन जीभ हासडून, कळफलक तोडून जीव दिलाच एकदाचा!

माझी ही निष्प्राण, निश्चेष्ट अवस्था काही महिने टिकली असावी. आंतरजालाच्या समयरेषेत काही महिन्यांचा काळ हा काही दशकांचा मानायला काहीच हरकत नाही. थोड्याच काळात संस्थळांवरील लोकांची बोली, त्यांचे नेहमीच्या सरावातील शब्द, संदर्भ, शब्दांची लघुरूपे, एकमेकांना लाडाने हाका मारायची नावे, पदव्या-बिरुदावल्या... साऽऽरे काही बदलते. तर, मी जेव्हा एका विचारवंत पंडित विद्वानाचा अवतार घेऊन आंतरजालीय जगात पुनश्च प्रवेश केला तेव्हा मला या अडचणीने प्रचंड ग्रासले. काही महिन्यांपूर्वीचे बरेच संदर्भ आता जुने झाले होते. मुख्य म्हणजे आधीच्या अवतारातला मी कोणाच्याच आठवणीत नव्हतो. किती विद्ध झाले म्हणून सांगू माझे काळीज!
त्या अवतारात मी खूप लोकांना वेगवेगळ्या तर्‍हेने छळले. माझ्या प्रकांडपांडित्याचे नमुने सादर करत मी त्यांच्या भोंदूगिरीबद्दल त्यांना पछाडायला सुरुवात केली. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल आक्षेप घ्यायला सुरुवात केली. आणि त्यांनी कोणी प्रशासकांकडे गळे काढण्याअगोदर मीच प्रशासकांच्या दारात जाऊन तक्रारींच्या हिरवळीत गडाबडा लोळायला सुरुवात केली. माझी खात्री आहे की प्रशासकही मला वचकून होते. माझ्या कावेबाजपणाचे मलाच खूप कौतुक वाटत होते. मी माझ्याजवळच्या सर्व शाब्दिक तलवारी, भाले, बर्च्या, क्षेपणास्त्रे, अणुबाँब जय्यत तयार ठेवल्याचा आणि शत्रुपक्षावर चिकाटीने हल्ला करत राहिल्याचाच परिणाम असावा तो! मी या विजयाच्या धुंदीत सर्वत्र धुमाकूळ घालत असताना अचानक एक दिवस मला दुसरा एक डुप्लिकेट आयडी भेटला. त्याने मला त्याची कर्तृत्वगाथा सुनावल्यावर मी अवाक झालो. तो त्याचा ३३२वा अवतार होता! तो एकाच वेळी वेगवेगळे अवतार घेऊन शत्रुपक्षाला चारी मुंड्या चीत करत असे. एखाद्याला नामोहरम करण्याचे त्याचे कसब वाखाणण्याजोगे होते. त्याचे ते अफाट कर्तृत्व पाहिल्यावर मी निराशेच्या गर्तेत जो रुतून बसलो ते बाहेर येण्याचा काही मार्गच दिसेना!

पण हळूहळू मी त्या नैराश्यावर मात मिळवली. एकामागोमाग एक असे अनेक आयडी बनवले. आता मी किमान डझनावारी डुप्लिकेट आयडींचा मालक आहे. त्यासाठी मी एक तक्ता बनवलाय. त्यात त्या त्या डुप्लिकेट आयडीचे व्यक्तिमत्त्व, त्याचा हुद्दा - व्यवसाय, त्याची शैक्षणिक व वैचारिक पार्श्वभूमी, त्याच्या बोलण्यातील संदर्भ, तो वापरत असलेल्या भाषेचा बाज, त्याची कौशल्ये, त्याचे शत्रू, त्याचे मित्र, त्याचे अनुयायी इत्यादी सर्व गोष्टींची तपशीलवार नोंद केली आहे. तो तक्ता मी रोज अद्ययावत ठेवतो. त्यात बारीक-सारीक गोष्टींची नोंद करतो. कोणत्या धाग्यांवर मी कसे प्रतिसाद दिलेत वगैरे लिहितो. पण खरं सांगू? या कामातच माझा इतका वेळ जातोय की आता मी लिहू कसा व कधी? त्यातच माझ्या काही अवतारांना कंटाळून व त्यांनी केलेल्या उपद्रवामुळे चिडून काही प्रशासकांनी माझा त्यांच्या संस्थळांवरचा प्रवेशच बंद करून टाकला. मग काय!! मला आता मागच्या दरवाज्याने वेगळ्या नावाने तिथे प्रवेश घ्यावा लागतो.... आणि मी लिहिलेल्या धाग्यांवर मला स्वतःलाच वेगळ्या नावाने लिहावे लागते, माझे स्वतःचे कौतुक करावे लागते, माझ्या विरोधकांचा नि:पात करावा लागतो... आणि त्याचे श्रेय त्या वेगळ्या नावाच्या मला.... मग माझ्या एका डुप्लिकेट आयडीला माझ्या दुसर्‍या डुप्लिकेट आयडीचा हेवा, असूया, मत्सर, द्वेष वाटायला लागतो. मग ते दोघे तिथेच भांडू लागतात. त्यांच्या भांडणात माझा तिसरा डुप्लिकेट आयडी सामील होतो. माझा चौथा डुप्लिकेट आयडी तिथे जाऊन काड्या लावतो. माझा पाचवा डुप्लिकेट आयडी मग प्रशासकांकडे आमच्या भांडणाबद्दल लटकी तक्रार करतो. माझा सहावा डुप्लिकेट आयडी ''जाऊद्यात हो, तुम्ही लक्ष देऊ नका,'' असे प्रशासकांना विनम्र आवाहन करतो..... सारी माझीच रूपे, माझेच अवतार....!! मला ''अहं बह्मास्मि|'' चा इतका सुंदर प्रत्यय यायला लागला असतानाच अचानक माझे ते सारे सहाही डुप्लिकेट आयडी गोठविले जातात. माझी खाती बंद केली जातात. त्या सहांचा प्रवेश स्थगित केला जातो. मग उरलेल्या सहांची कुमक घेऊन मला रणांगणात उतरणे भाग पडते!

या सार्‍या साहसी प्रवासात मी खूप खूप दमलोय हो! कोणी मला टेकायला जागाही देईनात. आणि एवढे सगळे करूनदेखील लोक मला तुच्छतापूर्ण, क्षुद्रतेची वागणूक देतात. माझा अनुल्लेख करतात. माझ्याकडे किंवा मी केलेल्या शब्दताडनाकडे ढुंकूनही बघत नाहीत. मी वेगळ्या रूपात त्यांच्याशी लाडिक बोललो तरी मला झटकून टाकतात. मी भयावह रूप धारण करून त्यांना धमक्या दिल्या, त्यांच्या तक्रारी केल्या तरी एखाद्या चिलटाप्रमाणे मला उडवून लावतात. शेवटी माझीच प्रतिबिंबे मला आधार देतात, त्यांनाच मला आसरा द्यावा लागतो... असा हा मी एकही हक्काचा आसरा नसलेला, कोणाच्याही मनात थारा नसलेला डुप्लिकेट आयडी....!!

पुढच्या खेपेस जेव्हा तुमची-माझी एखाद्या धाग्यावर, एखाद्या संस्थळावर गाठ पडेल तेव्हा मला ओळख द्याल ना? माझा सन्मान कराल ना? माझ्या शब्दांचे तुषार झेलाल ना? माझ्या धमक्यांनी व अकांडतांडवाने भयग्रस्त व्हाल ना? सांगा ना!! प्लीज!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स! Happy

मस्त ! Happy