प्रदीपा मलाही कोतबो - गणपती बाप्पा

Submitted by प्रदीपा on 3 September, 2014 - 05:22

नमस्कार मंडळी,
काय मला नाही ओळखलंत...? गेले पाच - सहा दिवस माझाच उत्सव साजरा करताय ना...!! आज जरा चिंटू ची डेनिम, पिवळा टी आणि स्पोर्ट्स शूज चढवलेत... मला मस्त वाटतोय हा पोशाख.. पण हाय रे देवा... माझी भक्त मंडळी मला ओळखेनात कि काय..? बदलु कि काय ?? पण हे ही बरेच आहे... मला भरपुर धमाल करता यैल या वेषात.. तर असो!!

काल माझी आई आली नि तेव्हापासुन् मंडळींचं अमंळ दुर्लक्षच होत आहे माझ्याकडे.. पण आज मज्जा... आई साठी आज खास पुरणा-वरणाचा नेवैद्य... आज त्या कविता कडे कोंबडी वडे पण आहेत म्हणे... मला कसं कळलं??... अहो... ती कालपासून वाटस अप वर सांगुन राहिलीय अन काय..!

ही मंडळी मायबोली वर भेटतात, चॅट वर भेटतात, गटग करतात, धमाल करतात. मी पण आता कार्तिक भैय्या, नारद मुनी, पिताश्री माताश्री या सगळ्यांना आपल्या पण अश्या ऍक्टीव्हिटीज चालु करुयात असा प्रस्ताव मांडणार आहे... ते असो!! तर सांगायचा मुद्दा हा की गेले पाच सहा दिवस मुंबैमधेच मुक्काम आहे.. पहिल्याच दिवशी एक छानसं मोठ्ठं घर बघुन जेवायला गेलो.. माझी झोकात पुजा-बिजा केली पुरुष मंडळी नी पण घरी सकाळपासुन जमलेल्या काक्या, माम्या मावश्या नी आत्या... स्वैपाकघरात पटापट हात चालवतील तर शपथ. नुसती तोंडच चालू या बायकांची... "कायपण बेंगरुळ घ्यान आहे आत्याबाईंचं.. त्या पोराला वळण लावावं ना नीट..." असे म्हणणार्‍या काकींची छोटी सुमी आली.. गळणारं शेंबडं नाक घेउन.. "आई, माझं नाक काढ..." ( या सात वर्षाच्या घोडीला नाक पुसायचं वळण लावायला काकी नेमक्या विसरल्या..).. सुमी आल्यावर काकडी कोचणार्‍या काकीनी जे केलं ते आपण नाय ब्वा सांगणार... तर या बायकां च्या उखाळ्या पाखाळ्यांमधुन एकदाच झालं ते जेवण... आणि दाखवला एकदाचा नेवैद्य.... पण हाय राम सगळं जेवण अळणी... कश्यातच मिठाचा पत्ता नाही... बाया मिठ मसाला लावुन बोलण्यात एवढ्या गुंग... कि जेवणात मिठ घालायला विसरल्या... नि ही पुरुष मंडळी एवढी सोशिक.. तशीच जेवुन उठली.. नि मग बायकांचे एक्मेकांवर शेरे चालू..."क्काय हे मंगल वहिनी.. तरी मी म्हणत होते... सगळं बरोबर टाकलयं ना बघा म्हणुन.." यंव नि त्यंव... अहो काय सांगू? ... उकडीचे मोदक़, वरणभात, मसालेभात, आळुवडी, पावटे घालुन पडवळाची भाजी, कोशिंबिर, पापड कुरडया... असला फक्कड बेत होता जेवणाचा पण....मी फक्त मोदक नी सांडगे पापड खावुन बाहेर पडलो.. Happy

रस्त्या रस्त्या वर मंडळांची डेकोरेशन बघत फिरलो.. मंडळाच्या कार्यकर्त्यांना देणगी गोळा करण्यात मोठा इंटरेस्ट... मला मखरात बसवुन सगळी गायब होतात ती विसर्जनाच्या मिरवणुकीलाच उगवतात. नाही म्हणायला माझ्यासाठी धागडधिंगा म्युझिकल ट्रीट ची सोय करुन ठेवतात. पण तुम्हाला सांगू ... हल्लीची गाणी पण वसकन अंगावर येतात हो... त्याला ' गणराज रंगी नाचतो' ची खुमारी नाहीच.. काल बोरिवलीत माझी विसर्जनाची मिरवणुक निघाली होती.. रस्ता गर्दीनं फुलून गेलेला.. त्यात वेळ संध्याकाळची म्हणजे गर्दीचा उच्चांक त्यात पावसाची रिपरिप.. जनेरेटर सेट चा टेम्पो, त्यामागे उत्साही कार्यकर्ते नी त्यामागे सजवलेल्या गाडीमधे मी... जनरेटर सोबतच असल्याने.. गाणी आणी रोषणाई मधे कमतरता नव्हतीच्. मिरवणुकीतली तरुणाई " तु ने मारी एंट्रीया.." गाण्यावर बेधुंद थिरकत होती... त्यामुळे मिरवणुक मुंग़ीच्या पावलाने पुढे सरकत होती.. मी मात्र मागच्या गाडीत बसुन मिरवणुकीमुळे खोळंबा झालेली बस, रिक्षा, नी इतर वाहनांची भली मोठी रांग पहात बसलो होतो.. माझ्या भक्त मंडळींनी जणू काही मला ते ट्रॅफीक बघायलाच बसवले होते जणु...!! यापेक्षा मोठी गंमत... काल गौराई आली ना तर तिला घर फिरवुन दाखवताना एक कॉलेज कन्यका तालात येउन गाणं म्हणत होती.." ये दुनिया पित्तल दी.. ओ बेबी डॉल मैं सोने दी..." आणि मी हे बघुन हळूच आईकडे बघुन डोळा मारला... तर मलाच ओरडा बसला.. " हत मेल्या, तुला काय भावना कळणार पोरीच्या... या लेकीच्याच हट्टापाई माझ्या जून्या पितळी मुखवट्यांऐवजी यावेळी मस्त लाकडी कलरफुल मुखवटे आलेत घरी..." तर हे अस आहे...

पण आज माझी मज्जा आहे.. आज तिखट गोड सगळे च पदार्थ चाखीन म्हणतो.. प्रदीपाने सांगितलय..माबोकरांच्या घरी काय काय मस्त पदार्थ बनत आहेत आणि नेवैद्याचा थाट कोणाकडे कसा आहे ते...! तिकडे फोटो टाकुन मंडळी हैराण करताहेत... कढीगोळे, कॅंबेरीचा सॉस, नाचोज, लाडू, पेढे... झालस्तर बटाटा वडे लसणीच्या चटण्या, कानवले, धपाटे...मला तर काय खाऊ नि काय नको असे झालयं याशिवाय प्रत्येक घरातले नेवैद्याचे पान् आहेच... पंचमहाभुतांची ओळख होतेय माबोकरांच्या फोटोंमधुन.. ही भुते जर इतकी सुन्दर असतील तर त्यांना महाभुतॆ नका म्हणु राव.

त्या विनार्च च्या लेकीने.. अनन्याने मला तर इतक्या विविध रुपात पेश केलं आहे कि क्या बात है.. ! मोठी मंडळी नेहमी मला टिळक, नेहरु करतात..अगदी गेला बाजार कारगिलचा सैनिक तरी करतात च. नि यावेळी जय मल्हार बनुन ती भलीमोठी तलवार सांभाळावी लागतेय. पण या पठ्ठीने मला मस्त पैकी पुस्तक वाचत लोळत पडायची मुभा दिलीय. मधेच वेळ मिळेल तसा क्रिकेट, ताय्कवोंदो या खेळांची पण मी प्रॅक्टीस करू शकतो.

तुमच्याशी बोलत बसायला वेळ नाही... अजुन दोन चार च दिवस उरलेत.. अजुन माबोकरांचे चौसष्ठ कलांचे अविष्कार बघायचेत.. जिप्सी ने कॅमेर्‍याबरोबर केलेली करामत बघायचीय, मानुषीताई, आरती, शोभाताई, नंदिनी, नलिनी, प्राची, अमेय, जिप्सी, आशुडी यानी बनवलेले 'सुशी', 'मोमो'सह सर्व देशी विदेशी पदार्थ चाखायचेत. सो आता पळतो..:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पहिल्यान्दाच लिहितेय..
एवढे मराठी तुन टंकन पहील्यांदाच करतेय..
चुका असतील तर सांभाळुन घ्या बरं. Happy

दिपे जबरी लिहिलंयस , पहिल्यांदाच लिहीलंयस असं वाटतही नाही, माझीही आठवण काढलीस , धन्यवाद

प्रदिपा कित्ती मस्त लिहील आहेस ग...माबोकरांना छान सामावून घेतलस...तुझ्या लेखनात स्वतःचे नाव पाहून अनन्या तर हरखूनच गेली...☺

छानच लिहीलं आहे. तुम्ही सांगितलत म्हणून समजलं नाहीतर पहिल्यांदाच लिहील्या सारखं वाटतच नाहीये.

धन्यवाद सर्वाना....
तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांवरुन वाटु लागलय...कि..... माझा हा पहिलाच प्रयत्न, ...अगदीच काही टाकाऊ नाही झालाय...:)

पुन्हा एकदा मनःपुर्वक धन्यवाद....
___/\____