४८ तास

Submitted by सुबोध खरे on 1 September, 2014 - 11:13

हि गोष्ट माझ्या मित्राची आहे.(सर्जन लेफ्टनंट शिवा नायर याने प्रत्यक्ष अनुभवलेली.)ऑपरेशन ब्रासटांक्स १९८६-८७ मधील गोष्ट आहे. हा लष्करी सराव दुसर्या महायुद्धानंतर झालेला सर्वात मोठा सराव होता.तो नौदलाच्या शंकुश या HDW कंपनीच्या जर्मन पाणबुडी मध्ये डॉक्टर म्हणून पोस्टेड होता.त्या सरावासाठी त्यांनी ती पाणबुडी मुंबई बंदराच्या बाहेर काढली आणि त्यानंतर ते पाण्याखाली डुबकी मारून पाकिस्तान च्या दिशेने रवाना झाले.war patrol वर जेंव्हा पाणबुड्या जातात तेंव्हा त्या एक महिना भर पूर्ण पाण्याखालीच राहतात. त्यावेळेला सूर्याचे दर्शन एक महिना भर होत नाही.दिवसभर पाण्याखाली राहून गस्त घालायची आणि रात्री जेंव्हा पूर्ण अंधार असतो तेंव्हा पाण्याच्या खाली ४-५ मीटर राहून टोर्पेडो टयूब ने हवा घेऊन आपल्या बेंटर्या चार्ज करायच्या असा एक महिना काढायचा असतो.माणशी १५ लिटर पाणी दिवसाला मिळते.कपडे धुण्याचा प्रश्नच नसतो. कपडे वापरा आणि फेकून द्या.(disposable) (अंतरवस्त्रांसहित). कावळ्याची अंघोळ ३ दिवसात एकदा. बाकी पाणी पिणे आणि भांडी धुणे या साठी जास्त वापरले जाते.पाण्याचा साठा फारच थोडा असतो बाकी पाणी RO (रिवर्स ओस्मोसीस) या पद्धतीने मिळवले जाते त्यासाठी उर्जा कमीत कमी वापरावायासाठी पाण्याचे रेशनिंग करायला लागते.असो.
त्यांची पाणबुडी मुंबई बंदराच्या बाहेर निघाली आणि डुबकी मारून पाकिस्तानच्या हदीत शिरली.५-६ दिवस गस्त घातल्यावर त्यांच्या gps (गोल्बल पोसीशनिंग सिस्टीम )मध्ये काहीतरी गडबड असावी असे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी एके दिवशी पहाटे ६ वाजता पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस त्यांना आपण नक्की कोठे आहोत याची खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी पाणबुडी अगदी हळूहळू वर आणण्याचा निर्णय घेतला होता.परंतु
जेंव्हा ते पाण्याच्या पृष्ठभागा वळ आले तेंव्हा त्यांना जवळून जाणारया जहाजाची चाहूल लागली. त्यांनी आपला पेरीस्कॉप वर केला तर अगदी जवळ (नजरेच्या टप्प्यात एक पाकिस्तानी नौदलाचे जहाज "बाबर" दिसले (PNS बाबर). त्यांनी पेरीस्कॉप मधूनच आपली परिस्थिती जाणून घेण्यासाठी आजूबाजूला रडार आणि सोनार ने चाचपणी केली असता अजून दोन जहाजे असावीत असा अंदाज आला. एकदम त्यांना असे जाणवले कि आपण पाकिस्तान च्या हद्दीत खोलवर घुसलो आहोत.पाकिस्तानच्या हद्दीत घुसणे हा एक फार मोठा गुन्हाच होता. दुसर्या देशाच्या सागरी हद्दीत परवानगी शिवाय शिरणे ते सुद्धा तुमच्या कट्टर शत्रू असणाऱ्या पाकिस्तानच्या म्हणजे युद्धालाच निमंत्रण. त्या पाणबुडीच्या कॅप्टन च्या लक्षात हि गंभीर बाब ताबडतोब आली.त्याने ताबडतोब पाणबुडीत गंभीर प्रसंग असल्याचा घोष केला. सर्व सैनिक आपापल्या कामाच्या जागेवर ताबडतोब हजर झाले.
कॅप्टन ने पाणबुडीला परत बुडी मारण्याचा आदेश दिला.त्यांनी ती पाणबुडी सागर तळाच्या वर ५० मीटर वर आणून पाणबुडीची सर्व यंत्रे बंद करण्याचा आदेश दिला.
पाणबुडी उत्तर दक्षिण अशी उभी केली जाते.(पाणबुडीच्या लोखंडी आवरणामुळे आणि त्यात असलेल्या मोटार जनरेटर इत्यादी विजेच्या उपकरणांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात फेरबदल होतात.प्रत्येक जहाजात एक mad (magnetic anomaly detector) बसवलेला असतो त्यामुळे पाणबुडीने होणारे चुंबकीय बदल कळू शकतात.सगळी active सोनार बंद केली गेली.(active सोनार मध्ये तुम्ही ध्वनी लहरी
सोडता आणि त्याचा येणारा प्रतिध्वनी तुम्ही "ऐकता") फक्त बाहेरून येणारे आवाज ऐकण्यासाठी passive सोनार चालू होते. म्हणजे बोलणे बंद होते आणि ऐकणे चालू होते.
इकडे पाकिस्तानी जहाजांची हबेलंडी उडाली होती.भारतीय पाणबुडी कुठेही शोध न लागता एकदम पाकिस्तानी पण हद्दीत शिरते हि गोष्ट त्यांच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची होती.ताबडतोब तिकडे रेड अलर्ट जाहीर झाला होता त्या भागात फिरणारी सर्व पाकिस्तानी जहाजाना पाचारण केले गेले शंकुश ला असे जाणवले कि बाबर बरोबर पाकिस्तानी नौदलाची आणखी तीन जहाजे आजूबाजूला फिरत होती आलमगीर,शहाजहान आणि खैबर.ते अतिशय अटीतटी ने(desparately) भारतीय घुसखोर पाणबुडीचा शोध घेत होते.
शंकुशमध्ये सर्व लोक पूर्ण तणावाखाली होते. जर त्यांचा शोध लागला असता तर पाकिस्तानी नौदलाने त्यांना जलसमाधी दिली असती. आणि हि गोष्ट जगाला कळली सुद्धा नसती.पाणबुडीचा शोध लागला तर तिला बुडवणे एकदम सोपे असते. शत्रूची विमाने त्याच्या आसपास डेप्थ चार्जस (खोलवर फुटणारे पाण सुरुंग) टाकतात. त्याच्या स्फोटामुळे होणार्या लहरींनी पाणबुडीचे कवच(hull) फाटते आणि पाणबुडीला जलसमाधी मिळते.
पाणबुडी पाण्याच्या खाली फार वेगाने पळू शकत नाही आणि वर आली तर ताबडतोब बॉम्ब टाकून तिला बुडवले जाते शत्रूच्या भूमीवर मरण येणे ते सुद्धा जगाला न कळता. प्रेताला अंत्यसंस्कार नाही. कुटुंबाला अर्धा पगार सात वर्षे पर्यंत. काही बातमी नाही कुठे गेले केंव्हा येणार ?
एखादा सैनिक जर युद्धात व तत्सम परिस्थितीत जर हरवला गायब झाला तर त्याचे प्रेत सापडेपर्यंत त्याला (missing इन action ) जाहीर करतात. यानंतर पुढील ७ वर्षे त्याची वाट बघण्यात त्याच्या कुटुंबाची अवस्था गंभीर होते. ज्यावेळी विमान दुर्घटनाग्रस्त होते आणि कोसळते किंवा आग लागते अथवा पाणबुडी जर बुडाली आणि त्यात एखादा सैनिक वाचण्याची शक्यता नसेलच तर तेंव्हा त्याची न्यायालयीन चौकशी करून (missing in action, presumed dead)(आघाडीवर गहाळ बहुधा मृत) हे जाहीर करतात. त्यावर त्याच्या कुटुंबाची मान्यता स्वाक्षरी घेतात आणि मग त्या कुटुंबाला सर्व भरपाई विमा निवृत्तीवेतन इ. दिले जाते.या परिस्थितीत प्रेत मिळाले नाही तरी कुटुंबाला सर्व आर्थिक फायदे त्वरित मिळू शकतात. पण जर कोणताच ठावठिकाणा नसेल तर सात वर्षे थांबण्याशिवाय पर्याय नाही. युद्धकैदी समजून कुटुंबाला ७ वर्षे पर्यंत अर्धा पगार दिला जातो आणि त्यानंतर वरीलप्रमाणे पूर्ण आर्थिक फायदे दिले जातात
परत विषयाकडे
सर्व नौसैनिकांच्या काळजाचे ठोके चुकत होते. वर थोड्याथोड्या वेळाने एखादे पाकिस्तानचे जहाज आवाजाच्या टप्प्यात येत होते आणि जात होते.
लोकांना जेवणाची शुद्ध होती न झोपेची.त्यातून काही शूर सैनिक म्हणु लागले नाहीतरी मरायचे आहे तर एकदोन पाकिस्तानी जहाजांना बुडवून मरुया. टोरपेडो किंवा क्षेपणास्त्रे डागुया.अशा परिस्थितीत कॅप्टन च्या नेतृत्वाची कसोटी लागते.आपला तणाव दूर ठेवून सर्व सैनिकांना डोके थंड ठेवण्यास सांगायला लागते.एक एक क्षण एका एका वर्षासारखा भासत होता. ऑफ डयूटी माणसाना झोप येत नव्हती कूक ला स्वयंपाक सुचत नव्हता जेवणार्यांना भूक नव्हती.करण्यासारखे काहीच नव्हते. आय सी यु च्या बाहेर असणार्या लोकांसारखी परिस्थिती होती. फक्त फरक एवढाच होता कि इथे स्वतः च आय सी यु मध्ये होते.

सर्वच सैनिक अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले होते.प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची चिंता होती. कुणाचे नुकतेच लग्न झाले होते त्याला आपल्या नव्या बायकोची चिंता होती कुणाची मुले अर्धवट वयाची होती.तर कुणाचे लग्नच झालेले नव्हते त्याला एव्ढ्या लवकर काहीच जग न बघता वर जायचे नव्हते
कोणीच फारसे बोलत नव्हते.एखादा उत्तेजित होऊन जास्त बोलत होता.भावनांचा कल्लोळ म्हणावा तसा प्रकार चालू होता. केवळ बेंटरीवर कमीत कमी उपकरणे चालवीत असल्यामुळे इंजिनिअर लोकांना काही काम नव्हते. शिवा नायर लोकांना शांत ठेवण्याच्या नादात उपदेश करीत होता. त्याच्याच (गावरान) भाषेत सर्वांची इतकी फाटली होती कि तोंडापर्यंत आल्यामुळे लोक हसत असावेत असा भास होत होता.(अर्थात त्याच्या शब्दात -- हे सर्व आत्ता बोलणे सोपे आहे तेंव्हा सर्वांच्यातोंदाचे पाणी पाळले होते. सर्वाना आपले पूर्वायुष्य आठवत होते आणि आपण जगलो तर काय काय करता येईल अशी प्रत्येकाने उजळणी चालू ठेवली होती.
पाणबुडीत दिवस आणि रात्र याला कोणताच अर्थ नसतो. पूर्ण वेळ अंधार आणि आतले दिवे चालू. बैटर्या वाचवण्यासाठी कमीत कमी दिवे चालू होते.ए सी पण अगदी कमी होता त्यामुळे लोक घामाघूम झालेले.असे २४ तास गेले.आजूबाजूला फिरणारी जहाजांची वर्दळ कमी झालेली होती. काही लोकांनी कॅप्टनला आता आपण निघूया म्हणून भुणभुण करण्यास सुरुवात केली. दोन तीन वेळा असे झाले कि कॅप्टन आता निघावे अशा विचारात होता तेवढ्यात पाकिस्त्नानी जहाजाची चाहूल लागली आणि हा बेत रहित करावा लागला.
मुळात प्रत्येक जहाजाचा आपला एक विशिष्ट आवाज तयार होतो.त्याच्या जनरेटर, मोटार, पंखे इ मुळे. हा प्रत्येक आवाज आणि त्यात्या जहाजाची चुंबकीय स्वाक्षरी (magnetic signature) हि गुपचूप रित्या नोंद केलेली असते. त्या आवाजाच्या विशिष्ट प्रकारामुळे आणि त्या चुंबकीय स्वाक्षरी मुळे जहाज कोणते हे तुम्हाला ओळखता येते.हा अभ्यास नौदलाला शांततेच्या काळात करावा लागतो.
तसेच आपल्या जहाजाची चुंबकीय आणि ध्वनी स्वाक्षरी (magnetic and sound signature) सुद्धा आपल्या पाणबुडीच्या संगणकात साठवायला लागते अन्यथा शत्रूची समजून आपलीच बोट बुडविली जाईल.आपल्या पाणबुडीची किंवा जहाजाची चुंबकीय स्वाक्षरी कशी कमी होईल या साठी त्याचे चुंबकीय क्षेत्र जाणून घेऊन त्याच्या १८०अंश उलट क्षेत्र त्यावर टाकले कि हि स्वाक्षरी कमी होते(DEGAUSSING).
शिशुमार , शंकुश शल्कि या HDW कंपनीच्या जर्मन पाणबुड्या अत्यंत शांत (silent )आणि अगदी कमी चुंबकीय स्वाक्षरी असणाऱ्या असल्यामुळे त्या SSK (submarine to submarine killer) म्हणून ओळखल्या जातात.या पाणबुड्या अतिशय कमी आवाज करीत पाण्याच्या खालून जातात आणि शत्रूच्या पाणबुडीतून केलेल्या आवाजाच्या वासावर जाऊन त्याचं नायनाट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.शेवटि ४४ तास झाल्यानंतर कोणताही आवाज आला नाही. पाकिस्तानच्या नौदलाच्या अपेक्षेत हि पाणबुडी एवढ्या काळात पळून गेली असेल असे असल्यामुळे ते आवाज क्षीण होत गेले. शेवटी ४४ तासानंतर पहाटे २ वाजता कॅप्टनने पाणबुडी च्या ballast tanks मध्ये हवा भरायला परवानगी दिली या tank च्या आत मध्ये पाणी भरून घेतले कि पाणबुडी जड होऊन पाण्याखाली जाते. जेंव्हा तुम्हाला वर यायचे असते तेंव्हा त्या टंक मध्ये दबावाखाली असलेली(compressed ) हवा भरून पाणी
बाहेर टाकले जाते आणि पाणबुडी हळूहळू वर येते. जशी शंकुश पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ आली तेंव्हा पेरीस्कॉप बाहेर काढून परत एकदा बघितले कि आजूबाजूला कोणी नाही. त्यानंतर कॅप्टनने पाणबुडीला पृष्ठभागावरस्नोर्केल पातळीवर म्हणजे फक्त एक नळी बाहेर दिसते ज्यातून हवा घेतली जाते आणि धूर बाहेर सोडला जातो. पाणबुडी पाण्याच्या खालीच राहते आणण्याचे आदेश दिले आणि पूर्ण वेगात तिला भारताकडे कूच देण्याचे आदेश दिले.पुढील चार तास कोणीही काहीही बोलत नव्हते कारण एखादे पाकिस्तानी जहाज वाटेत भेटले तर काय घ्या? ४ तासात त्यांनी जवळ जवळ १००-१२० कि मी अंतर कापले आणि ते आन्तरराष्ट्रीय सागरी सीमेत पोहोचले.
यानंतर उजळ माथ्याने सर्व जण एक एक करून पाण्याच्या पृष्ठभागावर आला आणि मोकळ्या हवेत श्वास घेतला. शिवा नायर म्हणाला कि कोणाला रडावेसे वाटत होते कोणाला ओरडावेसे वाटत होते. लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत विभिन्न होत्या. डॉक्टर म्हणून मला आणि कॅप्टन ला सभ्यतेने वागावे लागत होते.मला तेथेच दारू प्यावीशी वाटत होती.(पण समुद्रावर गेल्यावर दारू पिण्याची परवानगी नाही.)कॅप्टनने GPS खराब झालयामुळे कमांडकडे मदत मागितली. मुळात ४८ तास कोणाशीच संपर्क नसल्यामुळे HQ हेड क्वार्टर चे लोक जरा काळजीत होते पण प्रत्यक्षात काय झाले होते ते त्यांना हि माहित नव्हते. कमांड ने त्यांना परत येण्यास सांगितलेअसा तर्हेने ४८ तास जीवाला लागलेला घोर शेवटी संपला.
नंतर युध्द सराव संपल्यावर च्या विश्लेषणात पाकिस्तान नौदलाचे विचित्र वर्तन या वर चर्चा सुद्धा झाली. त्यांच्या बोटी एका विशिष्ट तऱ्हेने वर्तन का करीत होत्या ते नौदलाच्या इतर लोकांना कळले नाही. पाणबुडीच्या कॅप्टनने वरील गोष्ट FOSM ) flag officer submarines पाणबुड्यांचा सर्वोच्च अधिकारी च्या कानावर हि गोष्ट घातली तेंव्हा त्याने तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला काही वर्षांनी हि गोष्ट इतरांना सांगितली गेली कारण त्या वेळेला राजनैतिक प्रतिक्रिया काय होतील हे सांगणे कठीण होते.(नौदल युद्धखोरी करीत आहे.शांततेच्या दूतांच्या हातात कोलीत मिळाले असते
शिवा नायर च्या म्हणण्याप्रमाणे collective behaviour in crisis (संकटकाळातील माणसांची प्रतिक्रिया) हि इतर काळापेक्षा एकदम वेगळी असते.
माणसे अतिशय मित्रत्वाने वागतात किंवा एकदम तिरसट पणे वागू लागतात.
धन्यवाद
हाच लेख इतरत्र (मिसळपाव) वर प्रसिद्ध केलेला आहे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! एकदम थरारक. कॅप्टनच्या निर्णयशक्तीचं कौतुक. अशा आणिबाणीच्या प्रसंगी अगदी भलेभले तणावाखाली चुकीचे निर्णय घेऊ शकतात.

पूर्ण लेख संपेपर्यन्त धडधडत राहिले..काळजी वाटत राहिली. सुखरूप आले हे कळताच हुश्श झाले..
खरोखर अश्या प्रसंगांना खंबीर राहण्याचं, प्रसंगावधान ठेवण्याचं ट्रेनिंग कितपत होत असेल बरं.. !!!

माय गुडनेस .... खरोखरंच पूर्ण लेख संपेपर्यन्त धडधडत राहिले..काळजी वाटत राहिली ....

काय काय प्रसंगांना आपल्या जवानांना तोंड द्यावे लागत असेल - कल्पनाही करवत नाही ....

पाकिस्तानच्या जहाजांची नावे मस्त आहेत. आलमगीर शहाजहान. अब्दाली या नावाचे एक क्षेपणास्त्रही आहे म्हणे.

Happy

थरारक अनुभव... वाचतानाच अस्वस्थ व्हायला होतेय. त्या काळात त्या लोकांची काय अवस्था असेल याची कल्पनाही करवत नाही.

अगदी ग्रेगरी पेक वा जीन हॅकमन कॅप्टनच्या भूमिकेत असून त्याच्या कंट्रोलमध्ये ही अगदी जीवावर बेतलेली घटना घडत आहे आणि दोन्ही देशातील तणावाचे वातावरण सोबतीला, असा रोमहर्षक चित्रपट पाहात असल्यासारखे वाटले......कप्तानाने अशास्थितीत मनावर तसेच हालचालीवर किती तीक्ष्ण नजर ठेवली पाहिजे याचे प्रत्यंतर तुमच्या लेखात स्पष्ट उमटले आहे.

"...सर्व नौसैनिकांच्या काळजाचे ठोके चुकत होते...." ~ लेख वाचतानाही शेवट काय झाला असेल इकडेच लक्ष असल्याने आमच्याही काळजाचे ठोके चुकत होते...इथेतर हे नौसैनिक क्षणाक्षणाला तप्त होत चालेल्या परिस्थितीशी अगदी असहाय्यपणे सामना करत होते....कारण लढाईलाही परवानगी नव्हती....गप्प राहायचे.

कमालीच्या औत्सुक्याचा घटनाक्रम....सांगण्याची हातोटी पट्टीच्या लेखकासारखी म्हणून श्री.खरे यांचे खास अभिनंदन.

जबरी! खरच रोमान्चक. सुरेख लिहीलय.

डॉ. खरे तुम्ही क्लार्क गेबल आणी बर्ट लॅन्केस्टरचा रन डीप रन सायलेन्स पाहीला असेलच. त्याची सहज आठवण झाली.