नास्तिक

Submitted by सुरज डोंगरे on 28 August, 2014 - 14:58

ते म्हणतात ना,
लहान मुलं समाजाचं अनुकरण करतात…
…मग त्याला मी अपवाद कसा ?
ते मंदिरात गेलेत,
अन त्यांच्या मागे मागे मी …

त्यांनीच दाखविला,
तो दगडाचा देव आणि ते देवाचं देऊळ;
का बरे ?
ती असीम भीती आणि
आंधळी श्रद्धा खोलवर रुजवत गेलो…

होती त्याची भीती की आदर,
कुणास ठाऊक …
अजाणपणे मी सुद्धा;
त्याची भक्ती करत गेलो…

ते सांगत गेलेत, मी ऐकत गेलो,
मुकाट्याने आचरण करत गेलो…
स्वतः चेच अस्तित्व सिद्ध न करणाऱ्या त्याला,
माझ्या अस्तित्वाला कारणीभूत ठरवत गेलो…

चरत बसलो सगळे ग्रंथ बेभानपणे,
डोळ्यांवर काळी पट्टी बांधत गेलो…
अखेर असा हरवून बसलो स्वत्वाला की ,
आयुष्यातील प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टीची जबाबदारी
त्याच्यावर टाकत गेलो…

बहुतेक तेव्हा गहाण ठेवले असावेत,
सगळे तर्क-विचार त्याच्या दरबारात…
अता “देवाचा माणूस की माणसाचा देव ?”
… हा प्रश्न मनाला विचारात गेलो…

पार थकलो जाळून-जाळून,
देवारयात अगरबत्त्या अता…
ठोकून अखेरचा नमस्कार,
माझ्यातील नास्तिक शोधत गेलो…

--सुरज

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली.मुले लहान असतानाच आपण त्यांना श्रद्धेचे इंजेक्शन देवून मानसिक दृष्ट्या पंगु करून टाकतो. मोठी होवून त्यांना स्वताला ठरवू द्या त्यांना नास्तिक व्हायचे कि आस्तिक.

छान

स्वतः चेच अस्तित्व सिद्ध न करणाऱ्या त्याला,
माझ्या अस्तित्वाला कारणीभूत ठरवत गेलो…<< व्वा !

छान कविता . Happy