दाजीपूरची जंगलयात्रा

Submitted by prajo76 on 27 August, 2014 - 04:37

उंच डोंगरांच्या कुशीत वसलंय भारतीय गव्यांचं वसतिस्थान असलेलं दाजीपूर अभयारण्य. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांच्या सीमेवर वसलंय तालुका गाव राधानगरी. राधानगरी जलप्रकल्प हा दाजीपूर

अभयारण्यातच सामाविष्ट केलेला आहे. एप्रिल महिन्यातल्या एका सकाळी आम्ही दाजीपूरला उतरलो. घाटावर असल्यामुळे हवा सुंदर थंड होती. जरासे धास्तावतंच जंगलखात्याच्या कार्यालयात गेलो.

कुणीच नव्हतं. शांत.. स्तब्ध..
जरावेळानं एक हडाडलेला तरुण आला. शिरगणती चालू असल्यानं जंगलात प्रवेश वज्र्य आहे असे म्हणाला. आम्ही खट्टावलो.. पण जंगलात पायी गेलात तर काही हरकत नाही असे तो म्हणाला..

मनात कुठेतरी सुखावलो. मुक्काम शोधत एम. टी. डी. सी. मध्ये आलो. सुंदर शांत ठिकाण.. दूरवर डोंगररांगा.. राधानगरी प्रकल्प दिसताहेत..भानावर आलो, पाठीवरच्या सॅक खाली

ठेवल्या. पायऱ्या चढून आत गेलो. प्रशस्त पडवी होती. समोर नकाशा, तसेच गवा आणि सांबराची चित्रे.
दुपारी जेवून जरासे लवंडलो. दगदग.. धावपळ काही नाही. उन्हं कलली, निघालो.. जंगल भटकंती करण्याची तीव्र इच्छा.. पायवाट चांगली मळलेली होती. पाणथळ जागेत आलो. अनेक

पक्ष्यांचे आवाज मनाला साद घालणारे.. उगीचचं पाण्यात काठी बुचकळली.. चारपाच बेडूकमासे उडून पुन्हा पाण्यात गडप झाले. या पाण्यावर संध्याकाळी गवे येतात. पण निश्चितता मात्र नाही.
बगळे मात्र चिक्कार दिसले.. पाणथळ जागेत ते मासे, कीटक, बेडूकमासे असे काहीबाही खातात.
सांजावलं.. परत फिरलो.. वातावरण एकदम स्तब्ध झालं.. थंड..
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. पहाटेचं दव अजून पडलेलं होतं.. धुक्याची घट्ट दुलई अजून दूर झाली नव्हती.. तडक रानाची वाट धरली. दाजीपूरच्या पश्चिमेस सिंधुदुर्ग जिल्हा आहे. इथून

१५ किमी वर कोकणांतलं फोंडा हे गाव लागतं.. या गावामुळेच या घाटाला फोंडाघाट हे नाव रूढ झालं. एक तरुण वाटय़ाडय़ा घेतला अन् तडक आत जंगलात घुसलो. दूरवर कुठतरी भेकराच्या ओरडण्याचा आवाज झाला. दाजीपूरच्या जंगलात भेकरं चिकार आहेत. पण त्यांची चोरटी शिकारही वाढली आहे.
या सदाहरित जंगलात पाणकोंबडय़ा तसेच रानकोंबडय़ाही आहेत. दाट जंगलात फिरताना या रानकोंबडय़ांची लोळण पाहिली. विणीच्या दिवसांत रानकोंबडय़ा या लोळणी तयार करतात. जवळच असलेल्या

खोलगट खड्डय़ात अंडी घालतात व उबवतात. दाट झाडीतून एका पठारावर आलो. तो एक रानकोंबडा काही चरत असलेला दिसला. सावधपणे पुढे होणार इतक्यात आमची चाहूल लागून एकदम फडाडला आणि एका पेरूच्या झाडाच्या तुऱ्यात जाऊन बसला. आता उन्हं तापली होती. उंबराच्या पाण्याजवळ आलो आणि भाकरी सोडल्या. परतताना वाटेत गवे दिसले. मोठं रांगडं जनावर! यथेच्छ जेवून पुन्हा तयार झालो.
एका तासाने काही कळण्याच्या आतचं एक शेकरू आमची वाट उलटून पलीकडे गेली. मोठं देखणं जनावर! ही राक्षसी खार अंदाजे अडीच ते तीन फूट लांबीची. रंग करडा. झुपकेदार शेपूट. याचं दर्शन झाल्यावर जंगलातल्या सफारीचं सार्थक झालं असं जाणवू लागलं. राधानगरी पाणलोट क्षेत्राचं जंगल खूपचं छान आहे. या जंगलात, अनेक पक्षी आश्रयाला आहेत. उगाई देवी नावाचं देवीचं देऊळ आहे. पूर्वेला म्हणजे उगवतीला असल्यामुळे हिला उगाई देवी म्हणतात. वाटेत हेळू नावाचा कोकणी रानमेवा चाखला. चिकूसारखे दिसणारे, पण चवीला आंबट असे हे हेळू फळ!

संध्याकाळ झाली. उन्हं कलली. थंड वाऱ्याचे झोत अंगावर झेलत समाधानानं मुक्कामी परतलो. रात्री पुन्हा फेरफटका मारला. आकाशात चांदण्यांचा सडा पडलेला. मन फुलून आलं. परत फिरलो आणि झोपी गेलो...

(सदर लेख लोकसत्ता मधे प्रकाशित झाला होता. तारिख. बुधवार, २७ जून २०१२.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख चांगला. जरा सविस्तर हवा होता. फोटो असले तर अधिक चांगले.
लहानपणी कोल्हापूर ते मालवण, असा प्रवास करताना एस टी नेहमीच या घाटातून जात असे. त्या वेळी तिथे मधे गावे नव्हती त्यामूळे एस टी कुठे थांबतच नसे. चालकांना पण थांबवायची नसे ती. नंतरही पावसाळ्यात एक दोनदा मुद्दाम या घाटातून प्रवास केला. ज्या ठिकाणी कोल्हापूरची हद्द संपते ती जागा भन्नाट आहे.

लेख चांगला. जरा सविस्तर हवा होता. फोटो असले तर अधिक चांगले. >>>>> हो फोटो ड्कविण्याचा प्रयत्न करतो. लेख सविस्तर हवा होता हे अगदि खरे.

लेख छान आहे, पण परिच्छेद देताना काही ठिकाणी गोंधळ झालाय ते जरा संपादित करा आणि फोटो जरूर डकवा.

अवांतर-<< चिकूसारखे दिसणारे, पण चवीला आंबट असे हे हेळू फळ!>>> हेळू का अळू?