काही सुटे शेर

Submitted by सुप्रिया जाधव. on 27 August, 2014 - 01:36

प्रकाशाला तुझ्या आधार माझा
जरी मी क्षुद्र आहे कण धुळीचा

++++++++++++++++++++++++++++++

नदयांनी वाहणे अर्ध्यातुनी ज़र सोडले असते
समुद्राने क्षितीजाला कसे रे गाठले असते

++++++++++++++++++++++++++++++

फोडून उकल करण्याची तू नकोस तसदी घेवू
'नाही' या शब्दामध्ये कुठले जोडाक्षर नाही

++++++++++++++++++++++++++++++

गाठू म्हणता धाप लागते त्याला
उतरंडीवर त्रेधा उडते माझी

कशाचेच सोयरे ना सुतक त्याला
कशाकशावर श्रध्दा जड़ते माझी

+++++++++++++++++++++++++++++++

तुझी होत जाते तुला वाचताना
खुजी होत जाते तुला गाठताना

+++++++++++++++++++++++++++++++

मी कोण माझी हे मलाही धड कळत नाही
तू कोण या फंदात मी हल्ली पडत नाही

+++++++++++++++++++++++++++++++

मने गुंतवू ठरावीकश्या मुदतीसाठी
वर्षानंतर व्याजाचा दर बदलत नसतो

+++++++++++++++++++++++++++++++

आजही नुसताच काथ्याकूट झाला
आजही आलो न कुठल्या निर्णयाप्रत

+++++++++++++++++++++++++++++++

पाठ तो फिरवून जातो नेहमी पण...
ऐनवेळी तोच करतो पाठराखण

+++++++++++++++++++++++++++++++

लेखणीतुन सर्व काही व्यक्त करता येत नाही
सांगते शब्दाविना जे......तो मनावर घेत नाही

++++++++++++++++++++++++++++++

रस्त्यावरच्या रहदारीने व्याकुळला तो
प्रवासातल्या सहवासाने मोहरले मी

==================================

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुट्या शेरांच्या जमीनी हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो हेही नोंदवतो. उस्फूर्तता अधिक असलेल्या ह्या शेरांच्या जमीनीत पूर्ण गझला होणे अनेकवेळा शक्य होत नाही असा अनुभव!

सुट्या शेरांच्या जमीनी हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो हेही नोंदवतो. उस्फूर्तता अधिक असलेल्या ह्या शेरांच्या जमीनीत पूर्ण गझला होणे अनेकवेळा शक्य होत नाही असा अनुभव!

सहमत नाही. मलाही असेच वाटत होते अगदी गेल्या महिन्यापर्यंत.
काही शेरांच्या निश्चितच गझल होऊ शकतात.
उदा.
तुझी होत जाते तुला वाचताना
खुजी होत जाते तुला गाठताना

ही उत्कृष्ट आणि शक्य जमीन आहे.
मनावर घेण्याचा अवकाश आहे.
स्वानुभवावरून बोलतोय.

समीर

काही शेरांच्या निश्चितच गझल होऊ शकतात.>>> हेच मलाही म्हणायचे आहे. काही'च' शेरांच्या, सर्व नव्हे! म्हणजे करायला कशाचीही गझल करतात लोक आजकाल, पण ते एक जाऊ देच Wink

सुट्या शेरांच्या जमीनी हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो हेही नोंदवतो. उस्फूर्तता अधिक असलेल्या ह्या शेरांच्या जमीनीत पूर्ण गझला होणे अनेकवेळा शक्य होत नाही असा अनुभव!>>हे मला एका व्यक्तीच्या गजलांबाबत नेहमी वाटायचे... Happy

सुप्रियाजी मस्त आहेत शेर!

मी कोण माझी हे मलाही धड कळत नाही
तू कोण या फंदात मी हल्ली पडत नाही << सुंदर शेर >

काही सुटे मिसरे खूप खूप आवडलेत.