"काटा"

Submitted by -शाम on 21 August, 2014 - 09:42

सकवार फुलांनी सैल सोडल्या गाठी
हरवल्या निरागस निखळ गुलाबी भेटी

पर्णांच्या कर्णी कूजन ते वांझोटे
स्पर्शात उलगडे चर्येमागील खोटे

कैफात उतरते चंद्रचांदणे पदरी
हिरव्या शेजेची लाघव लगबग सारी

आसक्त तमाचे मोहन स्वप्नांवरती
संस्कार किनारे वाहुन नेते भरती

अनिवार सरींनी चिंब निथळते काया
गात्रातुन रुजते घटकेभरची माया

वाटते युगाची नौका खाई गोते
ही रीतच झाली की मन माझे कोते

सरसरून उठतो काटा परि हा देही
सुकुमार फुलांचे गर्भ वाहती डोही

---------------------------------------- शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त शब्दकळा. चांगली कविता वाचताना क्षणभर थरार उमटतो, आत्ताही तसेच झाले. रेशमी धाग्यांच्या गुंत्यातून शब्द सोडवून वाचावेत असा काहीसा complex वाचनानुभव ! शारीर आणि अव्यक्त भावनांचं मिश्रण घटकेत गूढ तर घटकेत सोपं वाटणारं.
अनेक दिवसांनी तुमची कविता वाचली. Worth waiting for.

आसक्त तमाचे मोहन स्वप्नांवरती
संस्कार किनारे वाहुन नेते भरती

अनिवार सरींनी चिंब निथळते काया
गात्रातुन रुजते घटकेभरची माया

वाटते युगाची नौका खाई गोते
ही रीतच झाली की मन माझे कोते

हा भाग फारच प्रभावी !

आसक्त तमाचे मोहन स्वप्नांवरती
संस्कार किनारे वाहुन नेते भरती<<< सुंदर

अमेय ह्यांच्याशी सहमत Happy

शामराव - तुम्ही नेहेमी जेवढ्या सहज-सोप्या शब्दात लिहिता ते इथे नसल्याने एवढी अपिल झाली नाही - कदाचित माझ्या आकलनशक्तिचाही दोष असेल ...

अमेय, बेफि धन्यवाद!!!
शशांक , कविता खरे तर रसिकाला हृदयाच्या हातांनी उलगडू द्यावी पण एखाद्या वेळी असाही गुंता होऊ शकतो.
कविता अनाकलनीय झाल्यासारखे वाटल्यास हा संदर्भ

शामराव - तुम्ही नेहेमी जेवढ्या सहज-सोप्या शब्दात लिहिता ते इथे नसल्याने एवढी अपिल झाली नाही -

सहमत.