श्रमलक्ष्मी...

Submitted by झुलेलाल on 16 August, 2014 - 00:31

आपण जगात वावरत असलो तरी प्रत्येकाचं आपापलं असं एक जग असतं, आपल्याभोवती फिरणारं.. अनेकांना आपल्या त्या जगात छान, सुरक्षित वाटत असतं. बाहेरच्या जगातल्या समस्या, दुखं आणि वेदना त्या जगाच्या आसपासदेखील नसतात. मग हे जग सुंदर आहे, असा समज करून घेतला जातो आणि आपण आपल्याच आनंदात विहरत राहतो.
अचानक काही तरी घडतं आणि आपल्या जगाची आणि बाहेरच्या जगाची हद्द पुसली जाते. बाहेरचं जग आपल्या जगात मिसळून जातं आणि सगळं काही सुरक्षित, छान असल्याची समजूतही धुरकट होऊ लागते.
अशा वेळी मन अस्वस्थ होतं. आपल्या जगातच आपण रमून राहिलो, याचा पश्चात्तापही होतो आणि बाहेरच्या जगाशी मिसळण्याची धडपड सुरू होते. आपलं जग विस्तारण्याचाही प्रयत्न नकळतच सुरू होतो आणि बघता बघता आपल्या जगाचं बाहेरच्या जगाशी नातं जडतं. मग आपलं जग आपलं राहात नाही..
...असा विलक्षण आणि समाधानकारक अनुभव पुढच्या प्रत्येक दिवसाच्या जगण्याला आनंद देत राहतो.
सोलापूर जिल्ह्य़ातला सांगोला तालुका म्हणजे दुष्काळाचा बारमाही मुक्काम. साहजिकच आर्थिक कुवत नसलेल्या शेकडो कुटुंबांचा रोजच्या जगण्याचा संघर्ष आणखीनच तीव्र.
विवाहानंतर पुण्यातून सांगोल्यात आलेल्या डॉ. संजीवनी केळकर यांना तोवर या जगाच्या वेदनांची ओळख नव्हती. संजीवनीताई सांगोल्यात आल्या आणि तालुक्याला पहिली महिला डॉक्टर मिळाली. तोवर पुरुष डॉक्टरशी बोलायची लाज वाटते म्हणून ग्रामीण भागातल्या अनेक महिला आपले आजार अंगावर झेलत होत्या. संजीवनीताई आल्या आणि महिला दवाखान्याची पायरी चढू लागल्या. आपल्या आजाराचं इथे नेमकं निदान होतंय हे हळूहळू तालुक्यातल्या महिलांना जाणवू लागलं आणि सांगोला तालुक्यातल्या महिलांशी संजीवनीताईंचं डॉक्टरकीच्या व्यवसायापलीकडचं नातं जुळू लागलं. बायका मनही मोकळं करू लागल्या आणि वेदना जिवंत होऊ लागल्या.
संजीवनीताईंचा हा अनुभव नवा होता. आधीच्या आपल्या जगात असा अनुभव नव्हता हे त्यांना जाणवू लागलं. रुग्ण म्हणून येणाऱ्या अनेक महिलांपैकी प्रत्येकीला काही ना काही समस्यादेखील आहेत, हे लक्षात येऊ लागलं आणि आजारपणातून उभं करण्याइतकंच अशा महिलांना मानसिक हिंमत देण्याचीदेखील गरज आहे हा विचार बळावू लागला.
मनात असे विचार सुरू झाले की अस्वस्थपणा वाढतो. काही तरी केलं पाहिजे ही जाणीव तीव्र होऊ लागते. पण नेमकं काय केलं पाहिजे, हे कळत नसतं. अशाच अस्वस्थ अवस्थेत असताना दवाखान्यात आलेल्या दोन-तीन महिला रुग्णांच्या कहाण्यांनी संजीवनीताईंचं हृदय अक्षरश: पिळवटून निघालं आणि निश्चय झाला. तालुक्यातल्या प्रत्येक महिलेला सक्षम केलं पाहिजे. तिला आवाज दिला पाहिजे. तिला आपल्या शक्तीची आणि क्षमतेची जाणीव करून दिली पाहिजे.. सांगोल्यात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या जन्माची मुळं रुजू लागली होती.
... त्या दिवशी आईच्या आधाराने एक मुलगी संजीवनीताईंच्या दवाखान्यात आली. भयंकर अशक्त. पाऊलही पुढे टाकण्याचं त्राण तिच्या अंगात नव्हतं. पाऊलभर चालली की धापा टाकत होती. हिमोग्लोबीनचं प्रमाण घसरलेलं. खरं म्हणजे तिला रक्त देण्याची गरज होती. त्या वेळी सांगोल्यात रक्तपेढी नव्हती. तिची अवस्था पाहून संजीवनीताई तिच्या आईवर खूप चिडल्या. मुलीच्या आरोग्याची काळजी घेतली नाही. म्हणून आईला खूप रागावल्या. आई गप्प राहून, खाली मान घालून सगळं निमूटपणे ऐकत होती.‘उद्यापासून मुलीला रोज एक अंडं खायला दे’ असं संजीवनीताईंनी त्या आईला सांगितलं आणि त्या आईचा बांध फुटला.. ती हमसून रडू लागली... आणि संजीवनीताईंनी डॉक्टरची भूमिका बाजूला ठेवली. तिच्या पाठीवर थोपटून तिला शेजारी बसवून घेतलं. तिला विश्वास दिला आणि आईचं मन मोकळं होऊ लागलं..
आपल्या आजारी मुलीला डॉक्टपर्यंत घेऊन येण्यासाठी प्रवासाचे पैसे उभे करण्याकरितादेखील त्या आईने शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे हात पसरले होते!‘अशा परिस्थितीत, मुलीला पौष्टिक अन्न कुठून देणार?’ आईनं हतबलपणे विचारलं आणि संजीवनीताई निरुत्तर झाल्या.मग अस्वस्थता आणखीनच वाढली. तोवर, गरिबीविषयीच्या कल्पनादेखील तोकडय़ाच होत्या. गरिबीचं रूप इतकं भीषण असू शकतं, ही जाणीव मन पोखरू लागली.
असे किती-तरी अनुभव येतच राहिले.घरात रोज दुधाचा रतीब घालणाऱ्या एका मुलीला नवऱ्यानं टाकलं होतं. पण एक दिवस अचानक तो आला, रागानं शिव्याशाप देत तिला घरातून फराफरा ओढत अंगणात आणलं आणि रॉकेल ओतून पेटवून देऊन निघूनही गेला.. तिची आई ऊर बडवत संजीवनीताईंकडे आली. तिचा आकांत पाहावत नव्हता. मुलीला ताबडतोब दवाखान्यात आणलं आणि सत्तर टक्के जळालेल्या अवस्थेत तिचा मृत्यूपूर्व जबाब लिहून घेतला. तिला मरणानंतर तरी न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी!
तिच्यावरचे उपचार अखेर व्यर्थ ठरले. ती गेली. पण तिच्या जबाबामुळे नवऱ्याला शिक्षा झाली.
.. अशा कितीतरी बायकांना रोज निमूटपणे, ब्रदेखील न काढता अन्याय सहन करावा लागतो हे जाणवत होतं. अशातच वन खात्याच्या नर्सरीत काम करणारं एक जोडपं दवाखान्यात आलं. बाई गरोदर होती. संजीवनीताईंनी तिला तपासलं आणि त्या खूप रागावल्या. गुप्तरोगाचं निदान झालं होतं. त्यांनी नवऱ्याचीही खरमरीत हजेरी घेतली.दोघंही खाली मान घालून निमूटपणे ऐकून घेत होते. अचानक त्या बाईला हुंदका फुटला. मग संजीवनीताईंनी तिला बोलतं केलं.
तिनं सांगितलेली हकीकत ऐकून त्या अक्षरश: थिजल्या होत्या... नर्सरीतून माणसं कमी करणार असं बरेच दिवस चाललं होतं. असं झालं तर तिथं काम करणाऱ्या या जोडप्याची उपासमार अटळ होती.म्हणून रोजगार टिकवण्यासाठी नर्सरीच्या मुकादमाला रोज रात्री मुक्कामाला घरी आणायचा निर्णय घेतला गेला. नवरा रात्री घराबाहेर अंगणात झोपू लागला. हे सहा महिने सुरू होतं... तिच्या पोटातलं मूल आपलं नाही, हे सांगताना तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या वेदनांनी संजीवनीताई कळवळून गेल्या.
गरिबीचं आणखी एक बीभत्स रूप विक्राळपणे समोर आलं आणि अस्वस्थ मनातली तळमळ संपली. काय करायला पाहिजे हे नक्की झालं. तालुक्यातल्या महिलांना शक्ती द्यायची, असं संजीवनीताईंनी ठरवलं. आता नुसती डॉक्टरकी करून चालणार नाही. असा निर्धार करून त्यांनी मनात कामाचं स्वरूप नक्की केलं.डॉक्टरकीमुळे गावात अनेक महिलांशी ओळख होती. अनेकींशी मैत्री झाली होती आणि पेशंट म्हणून येणाऱ्या तालुक्यातल्या अनेक बायकांशी जिव्हाळ्याचं नातंही जडलं होतं. संजीवनीतार्इंशी मन मोकळं करताना या बायकांना आश्वस्त वाटायचं.
अशातल्याच सात-आठ जणींनी आठवडय़ातून एकदा एकत्र यायचं ठरवलं.काम कसं सुरू करायचं याचा कोणताच आराखडा तयार झालेला नव्हता. एकत्र आल्यावर वर्तमानपत्रं, पुस्तकं वाचायची, त्यावर चर्चा करायची असं काही आठवडे चाललं आणि लक्षात आलं की या बायकांना बोलायचंय, त्यांना व्यक्त व्हायचंय. त्याचीच त्या जणू वाट पाहात होत्या.
मग मिळून साऱ्याजणींनी लहान-मोठय़ा स्पर्धा सुरू केल्या. बायकांची परस्परांशी जवळीक निर्माण होऊ लागली. त्या आपले विचार व्यक्त करू लागल्या.
हा काळ साधारण ३७ वर्षांपूर्वीचा. देशात आणीबाणी लागू झाली आणि सांगोल्यात जमणाऱ्या या महिलांनी काही-तरी रचनात्मक काम उभारायचं ठरवलं.
आता संजीवनीताई एकटय़ा नव्हत्या. गावातल्या, तालुक्यातल्या अनेक महिला त्यांच्यासोबत होत्या.मग मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू झाले. पुढे बालक मंदिराचा विचार आला, पण शिक्षिका नव्हत्या. काही महिलांनी पोस्टाद्वारे बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करायची तयारी सुरू केली, पण बालवाडीसाठी हातात पैसे नव्हते. पुण्यातील प्रसिद्ध जादूगार विजय रघुवीर हा संजीवनीताईंचा क्लासमेट. त्यांनी सांगोल्यात चॅरिटी शो करायचं कबूल केलं आणि बघता बघता २२ हजार रुपये उभे राहिले. हॉस्पिटलमधल्याच एका खोलीत बालक मंदिर सुरू झालं होतं. गावातली अनेक मुलं येऊ लागली. त्यांना चांगल्या सवयी लागल्या. घरातलं मुलांचं वागणं बघून आई-वडीलही सुखावले पण बालवाडीनंतर पुढे पुन्हा तिथल्याच, त्याच शाळेत जाऊन हे संस्कार कसे टिकणार, या प्रश्नानं पालक बेचैन झाले.
...एका शाळेच्या जन्माची प्रक्रिया इथे सुरू झाली होती. पालकांच्या हट्टामुळे या प्रक्रियेनं वेग घेतला आणि पहिलीचा पहिला वर्ग सुरू झाला. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी थेट मंत्रालयातून शाळेची मंजुरी मिळवून आणली आणि एका वेगळ्या संकल्पनेची शाळा सांगोल्यात सुरू झाली. ग्राममंगलच्या धर्तीवरच्या या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना अध्यापन क्षमतेचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि शाळा फोफावत गेली. आज सांगोल्यात ही शाळा एक आदर्श म्हणून उभी आहे. इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर श्रमसंस्काराचेही धडे दिले जातात. त्यांच्या भावी आयुष्यातल्या स्वयंपूर्णतेचा पाया इथे भक्कम केला जातोय..
तालुक्यातल्या अनेक कुटुंबांमध्ये महिलांची घुसमट होतेय, हे संजीवनीताईंना दिसत होतं. १९९० मध्ये सांगोल्यात महिलांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला व मदत केंद्र सुरू केलं आणि महिलांच्या समस्यांना वाचा फुटू लागली. असंख्य अन्यायग्रस्त महिलांवरील अत्याचाराच्या कहाण्या जिवंत झाल्या. २००४ मध्ये या केंद्राला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आणि सांगोल्यात ‘मैत्रीण’ नावाची संस्था उभी राहिली. अन्यायग्रस्त, आर्थिक समस्यांना तोंड देताना हतबल ठरलेल्या महिलांसाठी नवा प्रकल्प उभा राहिला.
सांगोला तालुक्यात मेंढीपालनाचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. मेंढीपालनापासून संगणकापर्यंत सर्व बाबींचं शिक्षण देणारं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू झालं आणि महिलांना स्वयंविकासाची वाट सापडली. अनेक महिला उत्साहाने शिक्षण घेऊ लागल्या, पण व्यवसायासाठी पैसा उभा करण्याचं आव्हानही होतं. म्हणून स्वयंसहायता गट स्थापन करण्याचं संजीवनीताईंनी ठरवलं. आज तालुक्यात २६८ बचत गट आहेत आणि दोन हजारांहून जास्त महिलांनी स्वयंरोजगाराचं व्यवसाय शिक्षण घेऊन कुटुंब उभं करण्याचं आव्हान आत्मविश्वासानं स्वीकारलंय.पारंपरिक व्यवसायाला प्रशिक्षणाची जोड मिळाली आणि महिलांची हिंमत वाढली. तिच्या शब्दाचं वजनही वाढलं आणि कुटुंबातली किंमतही वाढली. परिणामी कुटुंबातलं सौख्य वाढलं. स्त्रीला कुटुंबात सन्मान मिळू लागला आणि आपल्यात झालेल्या या परिवर्तनाच्या साक्षात्काराने स्त्रिया अचंबित झाल्या. आपण आधी काय होतो आणि आता काय झालो या जाणिवेनं सुखावल्या.
अशा अनेक स्त्रियांनी स्वयंविकासाच्या यशोगाथा निर्माण केल्या आहेत. शकुंतला खडतरे नावाच्या महिलेनं पाच हजारांचं कर्ज घेऊन चप्पलचा कारखाना सुरू केला. आज आठवडय़ाची उलाढाल ८० हजारांच्या घरात आहे, याचं श्रेय शकुंतलाबाई कृतज्ञतेनं संजीवनीताईंना देतात.. या वर्षी शकुंतलाबाईंच्या या कामाचा संस्थेनं गौरव केला. शकुंतलाबाईंना ‘श्रमलक्ष्मी’ पुरस्कार दिला गेला आणि तालुक्यातल्या इतर महिलांचा आत्मविश्वासही दुणावला.
इथली दख्खन मेंढी प्रसिद्ध आहे. तालुक्यात घोंगडय़ा बनविण्याचा परंपरागत व्यवसाय चालायचा, पण काळाच्या ओघात घोंगडय़ांची मागणी कमी होत गेली आणि अनेक कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष तीव्र होऊ लागला. मग लोकरीपासून कलात्मक वस्तू बनविण्याचं नवं तंत्र या कुटुंबांना शिकविण्याचा प्रकल्प संजीवनीताईंनी हाती घेतला. आता इथे तयार होणाऱ्या लोकरीच्या जाकिटांना जोरदार मागणी आहे.कुटुंबं आर्थिकदृष्टय़ा स्थिरावली तरी आरोग्याबाबत जागरूक नसतील तर कुटुंबांचं स्वास्थ्य चांगलं राहात नाही. तालुक्यातल्या खेडोपाडी आरोग्य सुविधांचा अभाव होता. बालमृत्यू, बाळंतपणातील आजार आणि मृत्युदरही वाढता होता. ही समस्या लक्षात घेऊन गावोगावी आरोग्यदूत योजना सुरू करण्याचं ठरलं आणि त्या त्या गावातील चुणचुणीत मुलींची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. मोबाइल क्लिनिक सुरू झाली. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या गावात आरोग्य तपासणी शिबिरं सुरू झाली. मुलींना आजार ओळखण्याचं आणि त्यावरील तात्पुरत्या उपायांचं हिमोग्लोबीन, रक्तदाब तपासणीचं शिक्षण देण्यात आलं आणि गावातील गर्भवती महिला, बालकांच्या आरोग्याबाबत कुटुंबंही जागरूक झाली. आरोग्य जपण्याचं महत्त्व उमगू लागलं. तरुणाईच्या उंबरठय़ावरील मुलींच्या समस्या, त्यावरील उपाय आणि पालकांच्या जबाबदाऱ्या समजावून देण्यासाठी कार्यक्रम आखले गेले.
आता तालुक्यात माता, बालकं आणि उमलत्या कळ्या निर्भर झाल्या आहेत. संजीवनीताईंच्या सामाजिक जाणिवेतून उभ्या राहिलेल्या माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठानने सांगोला तालुक्यात विकासाचा एक आगळा आदर्श उभा केला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख. माझा व संजीवनीताईंचा प्रत्यक्ष परिचय नाही, परंतु माझ्या आईची ही वर्गमैत्रीण. त्यामुळे आईकडून यांच्या कार्याबद्दल कायम कौतुक ऐकत आले आहे. त्यांना भेटायचा व त्यांचे काम पाहायचा योग मात्र अद्याप जुळून आलेला नाही.