महाराष्ट्र टाईम्सची श्रावणक्वीन स्पर्धा - २०१४

Submitted by बेफ़िकीर on 14 August, 2014 - 09:08

दैनिक महाराष्ट्र टाईम्सने आयोजीत केलेल्या श्रावणक्वीन ह्या सौंदर्यस्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष! तूर्त माझ्या हातात असलेल्या कामाच्या निमित्ताने येथे जाऊन ती स्पर्धा पाहणे हे माझ्यासाठी आवश्यक होते व तेथे उपस्थित असलेल्या म.टा.च्या संपादकांची परवानगी मिळाल्यावर आजच्या सत्राला उपस्थित राहिलो.

हे आजचे सत्र अजूनही सुरूच असून पहिल्या पातळीचे निकाल रात्री आठच्या सुमारास लागतील. दुसरे व अंतिम सत्र काही दिवसांतच नियोजित केलेले आहे.

श्रावणक्वीन २०१४ ह्या स्पर्धेचा आंखो देखा हाल येथे लिहावासा वाटला.

महाराष्ट्र टाईम्स ह्या दैनिकाने केलेले आयोजन अतिशय सोपे व शिस्तबद्ध होते. प्रत्येक स्पर्धकाची नोंदणी, पोर्टफोलिओ / सीडी घेऊन ती परिक्षकांच्या विशारास्तव पुढे पाठवणे, स्पर्धकासह एकालाच आतमध्ये प्रवेश देणे, वेळच्यावेळी स्पर्शा सुरू करणे, कोणताही अनावश्यक गोंगाट नाही व कर्कश्श आवाज, गोंधळ, स्पर्धकांच्या तक्रारी वगैरेपैकी काहीही प्रकार नाही.

प्रत्येक स्पर्धकाला एक क्रमांक दिलेला होता व तो क्रमांक कॉश्च्यूमवर डिस्प्ले करायचा होता. अटायरसंदर्भात कोणताही विशिष्ट नियम नव्हता. त्यामुळे काही स्पर्धक पाश्चात्य तर काही पारंपारीक भारतीय पोषाखात आलेल्या होत्या. एकूण वातावरण उत्साहाने भारलेले, रंगीबेरंगी, तरुणाईने सळसळलेले आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत असे होते. सौंदर्यस्पर्धेत दिसण्यासहितच वर्तनही महत्वाचे असल्याने मुळातच सर्वत्र सौजन्यपूर्ण अदब होती. स्पर्धेला कोणतेही इतर स्वरूप प्राप्त होऊ नये व फोकस बिघडू नये ह्यासाठी आयोजकांची भरपूर मोठी टीम सातत्याने कार्यरत होती. रामी ग्रँडच्या देखण्या व डौलदार वास्तूत ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. रामी ग्रँड हे प्रायोजकांपैकी एक आहेत.

प्रियांका राजीव, तेजस्विनी पंडीत, अभिजीत व सिद्धार्थसारखे चोखंदळ व अनुभवी परिक्षक ह्या स्पर्धेचे जजेस होते.

पहिल्याच दिवशी १६० स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता. सुमारे अठरा ते बावीस अश्या वयोगटातील मुली स्पर्धेत प्रामुख्याने होत्या. हे स्पर्धेचे चौथे वर्ष असून ह्यापूर्वीच्या स्पर्धांमधील विजेत्यांना पुढे चित्रपट, मालिका व मॉडेलिंग अशी कामे मिळालेली आहेत. टॅलेंट सर्चचे काम ह्या स्पर्धेमुळे सोपे होत आहे हे निश्चित!

पहिल्या सत्रातील १६० पैकी सुमारे ७८ स्पर्धकांचा सहभाग पाहून मी परतलो.

ह्या सहभागाची रचना अशी होती.

१. स्पर्धकाने व्यासपीठावर येऊन रँपवॉक करणे
२. मग स्वत:ची ओळख करून देणे
३. एक शॉर्ट परफॉर्मन्स करून दाखवणे
४. जजेसनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य व प्रभावी उत्तरे देणे

जमलेल्या सर्व प्रेक्षकांचा प्रतिसादही छान होता. जजेसनी विचारलेले प्रश्नही अतिशय चलाखपणे विचारलेले होते. तसेच अनेक प्रश्न स्पर्धकांना गंभीरपणे विचार करायला लावणारेही होते.

ह्या स्पर्धेच्या निमित्ताने मला काही निरिक्षणे नोंदवायची इच्छा झाली व ती खालीलप्रमाणे:

१. अश्या स्पर्धा अश्या स्थानिक पातळीवर घेणे हे महत्वाचे वाटते ह्याचे कारण अनेक छुपे रुस्तम कलाकार ह्यातून मिळू शकतात व छोट्या कलाकारांनाही हक्काचे व्यासपीठ मिळते.

२. माणसाची शैक्षणिक पात्रता व अनुभव ह्यांचा विचार करण्यापूर्वी माणूस दिसतो व बोलतो कसा ह्याला प्रचंड प्राधान्य दिले जाण्याच्या ह्या जमान्यात अश्या स्पर्धांमधून स्वतःला व्यवस्थित कॅरी करणे, आत्मविश्वासाने वागणे / बोलणे, सभाधीट होणे अश्या अनेक चाचण्या घेतल्या जातात. ह्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा विजेते व इतर सर्व सहभागी स्पर्धक ह्यांना होतच असतो.

३. निव्वळ दिसणे, निव्वळ पोषाख, निव्वळ परफॉर्मन्स, निव्वळ बोलणे अश्या अनेक निकषांवर दिली जाऊ शकणारी काही कामे असतात. जसे, एखाद्या पंजाबी सूटच्या जाहिरातीत जर स्त्रीचा फक्त फोटोच येणार असेल तर 'पब्लिक स्पीकिंग' किंवा एकूणच 'कम्युनिकेशन स्किल्स'मध्ये विशेष प्रावीण्य नसलेली पण आकर्षक दिसणारी स्पर्धक तेथे पात्र ठरू शकते. आपोआपच उत्पादकांना मॉडेल्सचे एक नवीन दालन मिळते जेथे ते आपापल्या उत्पादनास योग्य भासतील अश्या मॉडेल्सशी चर्चा करू शकतात.

४. शैक्षणिक पात्रतेचा अतिरिक्त ताण सोसणार्‍या आजच्या तरुणाईपैकी अनेकांना शिक्षणाचे प्रचंड दडपण सोसवेलच असे नाही. मात्र त्यांच्यात इतर काही गुणवत्ता असू शकते, जी ह्या स्पर्धेमार्फत समाजासमोर येऊ शकते.

५. एकूणच आधीच्या जमान्यापेक्षा आत्ताची स्त्री अधिक सोशल व आत्मविश्वासाने भारलेली अशी आहे. मात्र व्यासपीठावर भल्याभल्यांची तारांबळ उडू शकते. अश्यावेळी स्पर्धेतील सहभागामार्फत आपल्यातील काही गुळगुळीत गुणवैशिष्ट्ये धारदार बनवून घेतली जाऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न करावेच लागतात.

६. अश्या स्पर्धांमधील सहभागासाठी स्पर्धक शारीरिकदृष्ट्या फिट, लवचीक व जनरल नॉलेजच्या बाबतीत अपडेटेड असावा लागतो. अश्या स्पर्धांमध्ये भाग घेताना आपोआपच स्पर्धकाला हे सर्व प्रयत्न करावे लागतात व त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. ह्याशिवाय. एक विशिष्ट लहानसा परफॉर्मन्स द्यायचा असल्यामुळे एक विशिष्ट कलागुणही शिकून घेऊन तो जोपासावा लागतो व वृद्धींगत करावा लागतो.

अश्या स्पर्धा आयोजीत करणे हे ह्या सर्व कारणांमुळेच एक अतिशय उपयुक्त असे माध्यम आहे. ही उपयुक्तता समाजातील अश्या स्पर्धकांसाठी आहे जे संधीच्या शोधात असतात, काबिलीयत असलेले असतात पण त्या विश्वात त्यांना पाय ठेवायला जागाच मिळू शकत नसते. एक प्रकारे महाराष्ट्र टाईम्सने एक उत्तम पायंडा पाडलेला दिसतो.

ह्या शिवाय काही इतर निरिक्षणे

कलाप्रकार -

लहान परफॉर्मन्समध्ये बहुतेक स्पर्धकांनी नृत्यच सादर केले. सुदैवाने नृत्यासाठी हिडीस आयटेम साँग्ज न निवडता दर्जेदार गीते निवडलेली होती. पण अगदी कमीजणांनी अभिनय, फक्त एका स्पर्धकाने गीतगायन, फक्त एका स्पर्धकाने योगासने, फक्त एका स्पर्धकाने बालकवींच्या कवितेचे सादरीकरण व फक्त एका स्पर्धकाने स्वतःच्या कवितेचे सादरीकरण केले. ह्यावरून लक्षात येते की डोळ्यांना सहज सुखावणारी जी नृत्यकला ती आत्मसात करून आपण लवकर प्रभावी ठरू शकतो असा एक किंचित चुकीचा विचार तरुणाईत आढळत आहे. कोणतीही कला प्रभावीपणे सादर केली तर उत्तमच दाद मिळवते. नृत्याला चांगले दिवस येत असले तरी तरुण स्पर्धकांचा जणू साचेबद्ध फोकस नृत्याकडे आहे हे मर्यादीत विचारशक्तीचे चिन्ह वाटते.

आत्मविश्वास -

विविध गीतांवर लवचीक शरीराच्या अत्यंत आकर्षक हालचाली करून टाळ्या मिळवणार्‍या ह्या स्पर्धक मुली साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देताना मात्र हातपाय गाळत होत्या. अगदी साधे प्रश्न, जसे मॉडेलिंग आणि अभिनय ह्यातील एकच निवडायचे झाले तर काय निवडशील, अश्या प्रश्नावर प्रथम दोन्ही निवडेन, मग अभिनय निवडेन पण मॉडेलिंगही करेन, मग मॉडेलिंग करता करता अभिनयाची संधी मिळवीन अशी अत्यंत असंबद्ध व आत्मविश्वासाचा दुर्दैवी अभाव असलेली उत्तरे ऐकायला मिळाली. ही उत्तरे देत असताना ह्या मुलींची देहबोलीसुद्धा बिचकल्यासारखी होती. ह्याचा अर्थ असा की नृत्यातील आत्मविश्वास कमावणार्‍या ह्या स्पर्धकांकडे साधे चारचौघांसमोर साध्या साध्या प्रश्नांना उत्तरे देण्याचेही कसब नव्हते. आणि हे शंभरात नव्वद जणींचे होत होते. बहुधा सध्याची पिढी निव्वळ बाह्य सौंदर्यावर भर देत असावी की काय कोण जाणे

संवाद कौशल्य -

एका प्रवाहात, सहजपणे उत्तरे देणे हेसुद्धा शंभरात पाच एक जणींनाच जमले.

भाषा -

फर्डा इंग्लिश बोलू शकणार्‍या मुली अत्यंत दुर्दैवी मराठी बोलत होत्या. प्रश्न कोणती भाषा महत्वाची किंवा कोणत्या भाषेचा अभिमान वगैरे नाही तर प्रश्न हा आहे की माणसाकडे एक विशिष्ट हुषारी असल्यानंतर ती एकाच भाषेत कशी काय वापरली जाते? स्वतःची बोली मराठी भाषा सुधारावी ह्याकडे जरासुद्धा लक्ष दिलेले दिसत नव्हते बहुतेकांनी. मी करेल, मी बघेल, मी म्हणेल हे तर जवळपास प्रत्येकजणच म्हणत होती, पण हल्ली व्यक्ती ह्या विषयाला 'तो व्यक्ती' का म्हंटले जात आहे ते एक समजत नाही आहे. एका मुलीने तर चक्क असे वाक्य वापरले की 'मला माहीत होते की मी त्या स्पर्धेत गेले तर माझी फाटेल'! शब्दप्रयोगांचे साधे अर्थही समजून घेण्याची ह्या लोकांना शुद्ध उरलेली दिसत नाही. पाच सहा जणींनी मात्र अस्खलित मराठीतून उत्तरे दिली. इतर अनेक जणी वाक्य सुरू मराठीत करायच्या, अडखळायच्या आणि मग इंग्लिशमध्ये समारोप करायच्या. हे मुद्दाम की आपोआप ते माहीत नाही. (श्रावणक्वीन ह्या ऐवजीही श्रावणराणी असे म्हणायला हरकत नसावी).

असूया -

स्त्रियांमध्ये सहसा दिसते असे म्हणतात ती असूया मात्र कोणाच्याही वर्तनात, नजरेत दिसली नाही. सर्वत्र खेळीमेळीचे वातावरण होते.

एकूण स्पर्धा उत्तम पद्धतीने सुरू आहे.

बघूयात निकाल काय लागतो ते!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>मला माहीत होते की मी त्या स्पर्धेत गेले तर माझी फाटेल'! शब्दप्रयोगांचे साधे अर्थही समजून घेण्याची ह्या लोकांना शुद्ध उरलेली दिसत नाही.
एका मित्राच्या लहान मुलीने फेसबुकवर दिलेल्या प्रतिक्रियेमधे असलेला "WTF" शब्द वाचून मी गार पडलो होतो.

मी करेल.. हे इतकं नेहमीचं झालंय की 'ते चूक आहे' असं कुणी सांगितलं तर त्याला मूर्खात काढतील... .

माझी फाटेल .. Happy

बेफी वृत्तान्त छान आटोपशीर लिहीलात.:स्मित:

काल मुलीला ओरडावे लागले. काय तर म्हणत होती की डान्स क्लासमध्ये लाईट गेले, म्हणून टिचरने कॅन्डल लावली, मग वार्‍याने ती बुझुन गेली.

आजकाल नवीन शब्दः- हे आपण बोलायला नको, ऐवजी हे आपण बोलुया नको असे म्हणतात.

अवान्तराबद्दल क्षमस्व.

वृतांत छान... श्रावणक्वीन हा शब्दच मला खटकलाय !
रँपवॉक केला म्हणजे क्षमतेची सीमा गाठली का ? तोच एक मार्ग उरलाय का आता स्वतःला सिद्ध करायला ?
स्वरचित भाषण करणे, आयत्या वेळेचा एखादा प्रसंग बघून त्यातून मार्ग काढणे.. असे काही नाहीच का ?

मला आजकाल बघूयात हा शब्द जो सर्रास वापरला जातो त्यातला "त" ही खटकतो.
पहिल्यांदा मी तो अवचटांच्या लेखनात वाचला.

झुक झुक झुक अगीन गाडी... या गाण्यात पळती झाडे पाहू या... अशी ओळ आहे. पाहूयात असा शब्द नाही.
सातत्याने एखादा नवा शब्द वापरला तर तोच रुढ होऊन जातो. माझी सटकली, तंटा नाय.... वगैरे शब्द पण सातत्याने वापरून रुढ होऊन जातील.

दा मलाही हा शब्द फारच खटकतो. श्रावणक्वीन काय..!
मटामध्ये असे शब्द कितीदा वाचनात येतात. उपसंपादकाची डुलकी म्हणावी काय याला..?

वृत्तांत छान! Happy

के. अंजली, ही उपसंपादकाची डुलकी नाही, ही ‘मटा’ची स्टाइल आहे. सविस्तर वृत्तांताबद्दल बेफिंना धन्यवाद.

माणूस ज्या सामाजिक-भौगोलिक-जातीय पार्श्वभूमीतून आलेला असतो त्याप्रमाणे भाषा वापरतो.
मला आलेलो, गेलेलो, मी आली,गेली, आनि, पानि यातलं काहीही खटकत नाही. एखाद्या उ.प्र. मधल्या माणसाच्या दृष्टीने पानी ला पाणी म्हणणं हे गावंढळ असू शकतं. वर्‍हाडातून, खानदेशातून, कोकणातून आलेल्या माणसाने पेठीय मराठी बोललं पाहिजे ही दादागिरी कशासाठी?
आणि हो, श्रावणक्वीन हा शब्दसुद्धा मस्त आहे.
(having said that, या धाग्यातच वीसपंचवीस इंग्रजी शब्द आलेले आहेत!)

इतक्या महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेला महत्वाच्या व्यक्तींनाच आमंत्रित केले जाते.
आपण चीफ गेस्ट म्हणून गेला होतात का बेफिजी ? ( लेखात उलगडा झाला नाही म्हणून अंदाज केला).

वर्‍हाडातून, खानदेशातून, कोकणातून आलेल्या माणसाने पेठीय मराठी बोललं पाहिजे ही दादागिरी कशासाठी?
>>

सहमत आहे, हि दादागिरी म्हणा वा अट्ट्टाहास म्हणा बरेचदा मराठी आंतरजालावर जाणवतो.
हा खरे तर वेगळ्या धाग्याचा विषय होईल म्हणून ईथे लेखनसीमा. (कोणी वाढवलाच विषय तर येतो परत) तुर्तास श्रावणक्वीनला शुभेच्छा Happy

बर्‍यापैकी सकारात्मक लिहीले आहे ते आवडले. नाहीतर बर्‍याच लोकांचा सौंदर्यस्पर्धांकडे 'एक सादरीकरण' म्हणून बघण्याऐवजी नाकं मुरडण्याकडेच कल अधिक असतो.

दिनेश, श्रावणक्वीन ह्या शब्दाबद्दल मीही मूळ लेखात लिहिलेले आहे Happy

सूज्ञ प्रतिसाददात्यांचे आभार Happy

छान लिहीले आहे. इंटरेस्टिंग निरीक्षणे. वाक्यात अधूनमधून रॅण्डम इंग्रजी शब्द टाकले की आपण तरूण पिढीपर्यंत पोहोचतो असे मटावाल्यांना ( व इतरही अनेक पेपर वाल्यांना) वाटते त्यामुळे असे अनेक कृत्रिम इंग्रजी शब्द, मराठी-हिंदी-इंग्रजी मिश्र शब्द कायम दिसतात. आणि हे सगळे सहसा मार्केटिंग वाले ठरवतात. कदाचित श्रावणक्वीन शब्दात त्यांना आवश्यक तो परिणाम दिसला असेल तरूणाई साठी. त्यामुळे मला नाही खटकला.

बेफिंनी वरती चुकीचे मराठी बोलण्याबद्दल लिहीले आहे. अमुक एका ठिकाणचीच मराठी बोलावी अशी अपेक्षा केलेली दिसत नाही. मी करेल, तो व्यक्ती वगैरे कोणत्या भागातील रूढ बोलीभाषा आहे का? मला तरी माहीत नाही.

फर्डा इंग्लिश बोलू शकणार्‍या मुली अत्यंत दुर्दैवी मराठी बोलत होत्या. >>> हे आश्चर्य आहे. मी इंग्रजी अत्यंत चांगली व आपली मातृभाषा अत्यंत वाईट बोलणार्‍या व्यक्ती फारशा पाहिल्या नाहीत. या जर मराठी बेकार बोलत असतील तर बहुधा इंग्रजी सुद्धा त्या सध्या प्रचलित स्लँग आहे तशा बोलत असतील. अर्थात मॉडेलिंग मधे ते चालून जाईल.

अजय, भारतात फ'कारांती शब्द फार कॉमनली बोलला/सोशल साईट्सवर अतिशय कौतुकाने वापरला जातो असं बघण्यात आलेलं आहे. आपण इथे मुलांनी ऐकू/बोलू नये ह्याकरता प्रयत्नशील असतो.

ते करून बघेल, वापरून बघेल टाईप मायबोलीवरही बरंच वाचायला मिळतं. महाराष्ट्राच्या दुसर्‍या कोणत्या भागात बोललं जात असल्यास कल्पना नाही.

छान वृत्तांत. रँप वॉक आत्मविश्वासाने करणे हे खरेच अवघड आहे. व नीट केल्यास परिणाम कारक ठरते.

अभिनय व मॉडेलिंग एकदम खूप जणी करतात अगदी करीना सुद्धा. त्यात काही वावगे नाही. उत्तर बरोबर आहे.

छान लिहीलंय.

>>मी करेल, मी बघेल, मी म्हणेल
हे मी खानदेशकडच्या लोकांकडुन ऐकलं आहे.

>>वर्‍हाडातून, खानदेशातून, कोकणातून आलेल्या माणसाने पेठीय मराठी बोललं पाहिजे ही दादागिरी कशासाठी?
पण त्या त्या भागातली बोलीभाषा जरी निराळी असली तरी अशा व्यासपीठावर मराठी व्याकरणानुसार बोलणे हे अपेक्षा करणे काही चूक नाही असे मला वाटते. पेठी लोक मराठी व्याकरणानुसार बोलतात ही काही त्यांची चूक नाही. नाही का Proud

>>एखाद्या उ.प्र. मधल्या माणसाच्या दृष्टीने पानी ला पाणी म्हणणं हे गावंढळ असू शकतं.
पण उ.प्र. मधला माणुस मराठीत बोलला तर त्यानी "पाणी" असंच म्हणायला पाहिजे आणि आपण हिंदीत बोलतो तेंव्हा "पानी".

भाषा शुद्ध किंवा अशुद्ध ह्या चर्चेत पेठीय वा ईतर भागांमधली भौगोलिक असा मुद्दाच नाहीये / नसावा. भौगोलिक विविधतेनुसार येणारा विशिष्ठ हेल, काही खास शब्द, वाक्प्रचार, म्हणी ह्यांना कधीच कुणी विरोध केलेला नाहीये. पण कुणी चांगली, शुद्ध मराठी बोलण्याचा आग्रह धरला की लगेच 'पेठीय', 'पुणेरी' वगैरे आरोप करून हिणवणं अप्रस्तुत आहे.

सायो, आम्ही सुद्धा मुलांना भारतवारी मधे असे बरेच शब्द 'वापरायचे नाही' असं कटाक्षानं सांगत होतो (sh** हे असंच एक उदाहरण).

स्पर्धेच्या आयोजनाच्या माहितीबद्दल धन्यवाद .झी चानेलच्या डान्स इंडियाच्या सिलेकशन राउंड मी आवर्जून बघतो .

छान वृत्तांत बेफिकीर. श्रावणक्वीन हा शब्दच ओरखडा उमटल्यासारखा आहे.

>>साधे चारचौघांसमोर साध्या साध्या प्रश्नांना उत्तरे देण्याचेही कसब नव्हते. आणि हे शंभरात नव्वद जणींचे होत होते. बहुधा सध्याची पिढी निव्वळ बाह्य सौंदर्यावर भर देत असावी की काय कोण जाणे >>
तसंच असावं..
'तो व्यक्ती ' हे हल्ली channel पत्रकारितेत ऐकू तर येतेच,क़्वचित प्रिंट मिडीयातही वाचायला मिळते. एक प्रकारे रूढ होत चाललं आहे भाषेचं असलं बेशुद्धीकरण .दुर्दैव भाषेचं !

खरं आहे. 'तो व्यक्ती', 'अनेक संध्या' (opportunities ह्या अर्थी), 'अनेक मुर्त्या' (idol ह्या अर्थी), हे कुठल्याही प्रादेशिक / भौगोलिक accent चा भाग नसून, चुकिचं मराठी आहे. मध्यंतरी सकाळ ने बातमी दिली होती: 'केजरीवाल सरकारी घर 'खाली' करणार'. आणी कालच त्यांनी अशी बातमी देखील दिली होती की 'जगात *** रूग्ण एबोला ने 'प्रभावित'. ह्या दोन्ही गोष्टी सरळ सरळ 'हिंदीतून मराठी' दाखवतात.

रमा माधव सिनेमाच्या शेव्टी स्क्रॉलिन्ग टायटल्स होती त्यात चक्क शहाय्यक दिग्दर्शक असे लिहीलेले आहे.
सहाय्य क असायला हवे हे त्यांना माहीत नसेल का? दोन तीन नावे पण चुकीची लिहिलेली होती. हे तर अप लोडिन्ग च्या आधी प्रूफ रिड करणे शक्य होते ना.

खाली करणे/असणे हा पेठीय पुणेरी बोलीभाषेतीलच वाक्प्रयोग आहे बरं का Wink

कायमच 'रिक्षा खाली आहे का?' असंच पुण्यात विचारतात - निदान ७०च्या दशकापासून तरी.

अमा- बरं तर बरं तुम्ही रमा-माधव चं इंग्लिश ब्रोशर नाही बघितलं. भयाण चुका आहेत - द राघोबा वगैरे

कायमच 'रिक्षा खाली आहे का?' असंच पुण्यात विचारतात - निदान ७०च्या दशकापासून तरी. >>>

हो अगदी खरयं. अवांतर होईल पण एक गंमत आठवली

माझी आजी रिक्षा शोधताना बोळाच्या तोंडाशी उभं राहून आत जाणार्या रिक्षांना "खाली होतीय का?" असं मोठयाने विचारायची. आम्ही खूप हसायचो.

अमा- बरं तर बरं तुम्ही रमा-माधव चं इंग्लिश ब्रोशर नाही बघितलं. भयाण चुका आहेत - द राघोबा वगैरे>> हो का? अरे बापरे. मी हिंदी, इंग्रजी, मराठीत कॉपीरायटिंग चे काम केले आहे व्याकरण व स्पेलिन्ग , युसेज बरोबर असणे ह्यावर तुमच्या कामाचे पैसे मिळणे अवलंबून असते. व आपले प्रोफेशनल प्राइड पण असते.

जसे वरील संदर्भात मॉडेलिन्ग / अ‍ॅक्टिंग करायचे असल्यास व्यवस्थित दिस्णे, ग्रूमिन्ग बरोबर असणे .
मिनिमम अभिनयाचे ज्ञान/ टॅलेंट असणे महत्त्वाचे. एखादी मुलगी प्रत्यक्षात उत्तर देउ शकली नाही तरी ती एक अभिनेत्री म्हणून क्यामेर्‍या पुढे चांगला पर्फॉरमन्स देउ शकते. पण त्यासाठी त्या मुलीला आतून ज्ञान / अंतर्भुत टॅलेंट असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच्या स्पर्धा वेगळ्याच असतात. श्रावण क्वीन म्हणजे सौंदर्य स्पर्धा
छान दिसणे ग्रूमिन्ग, सभाधीट असणे पुरेसे असणार. ह्यात भाग घेण्याच्या अनुभवाचा फायदा मुलींना होतो.

रिक्षा खाली आहे का अगदी पुणेरी आहे. मी व आई फिरायचो तेव्हा खाली आहे का असेच विचारायचो. ७० चे दशक

"खाली करणे/असणे हा पेठीय पुणेरी बोलीभाषेतीलच वाक्प्रयोग आहे बरं का" - पुण्यात वापरला जाणारा वाक्प्रचार म्हणून काही तो बरोबर नाही ठरत Happy

वृतांत आवडला. सगळी निरीक्षणं पटली.
भाषे बद्दल नोंदवलेली निरीक्षणांना पूर्ण अनुमोदन.
महाराष्ट्रात प्रत्येकच प्रांतात वेगवेगळ्या बाजाची मराठी बोलल्या जाते. सर्व साधारण दैनंदीन वापरात त्या त्या बाजाची मराठी
वापरायला हरकत नसावी. पण व्यासपीठावर बोलताना शुद्ध मराठीचे किमान निकष पाळायलाच हवेत असं मला वाटतं.
आमच्या वर्हाडात सर्वसाधारण पणे नेहेमीच पानी,काऊन?, करून रायलो,जाउन रायलो असे शब्द वापरले जातात. पण
शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेत,व्यासपीठावरील कुठल्याही कार्यक्रमात शुद्ध मराठीच वापरावी लागायची आणि त्यासाठी ओरडाही खावा लागला होता.
आजकाल शुद्ध मराठीचा आग्रह धरला की लगेच त्याला 'पेठीय मराठी' म्हणून का हीणवल्या जातं हेही कळत नाही?
या वरून पु. लं. चा 'एकेकाचे मराठी' हा सुरेख लेख आठवला.
भारती दीदी आणि फारेंड यांनी मटा बद्दल लिहीलेला प्रतिसाद ही पटला. मटा मधील मराठी केवळ भयानक या सदरात मोडंतं.
आजकाल झी मराठी इ. वाहिन्यांवरील चित्रपट वृत्तांकन करणारया निवेदीकांचं मराठी ही भयानक असतं. .(उ.दा. श्वेतांबरा सावंत) पण दुर्दैवानं तेच कूल म्हणून खपतयं. .

Pages