अथिरापल्लीचे अद्भुत

Submitted by मामी on 12 August, 2014 - 10:08

हा मणिरत्नमचा आवडता स्पॉट आहे म्हणे! त्याच्या बर्‍याच सिनेमात आहे हा. रा-वन मध्येही होता. त्या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी अभिषेक आणि ऐश्वर्या राहिले होते त्याच रुममध्ये आम्हीही म्हणजे अभिषेक अग्रवाल, ऐश्वर्या अग्रवाल ( Blush ) राहिले. भरीला आमच्याबरोबर आराध्या अग्रवालही होती. ते हे - अथिरापल्लीचं रेन फॉरेस्ट रिझॉर्ट .

अथिरापल्ली हे फारसं माहित नसलेलं केरळमधिल ठिकाण. तिथे फक्त एकच गोष्ट बघण्याजोगी - अथिरापल्लीचा धबधबा! पण काय सांगू, हे रिझॉर्ट इतक्या मोक्याच्या जागी वसवलंय की दृष्ट काढून टाकावी.

त्या हिरव्यागार झाडीच्या कोंदणात लपून अखंड ध्रोंधारत असलेल्या त्या नितांतसुंदर धबधब्याचं सौंदर्य अनुभवण्यासाठीच फक्त या रिझॉर्टची निर्मिती करण्यात आली आहे. बाकी आजूबाजूला जवळपास एकही हॉटेल नाही. फक्त हेच एक सुंदर रिझॉर्ट. बस्स.

रिझॉर्टच्या साईटवर हा आशियातील सर्वात मोठा धबधबा असल्याचं म्हणतात. खखोदेजा. आणि मोठा आहे की नाही ते माहित नाही पण सुंदर नक्कीच आहे.

इथे रहा आणि सकाळी डोळे उघडल्यापासून फक्त ते निसर्गाचं अद्भुत न्याहाळा. अगदी रात्री झोपल्यावरही तो आवाज कानात गुंजत राहतोच.

रिझॉर्टची रचनाच अशी की सर्व खोल्यांमधून समोरच धबधबा दिसावा. वरच्या पातळीवर असलेल्या रीसेप्शन आणि रेस्टॉरंटसमोर तर छानपैकी लॉन आहे. त्याच्या रेलिंगवर रेलून तासनतास धबधबा बघत बसून रहा. रात्री तिथे टेबल मांडून कँडल लाईट डिनरही घेता येतं.

हा रुममधून दिसणारा :

आणि हा त्या रूमच्या भल्यामोठ्या बाथरूममधिल जाकुझीत बसून बघता येण्यासारखा :

रिझॉर्टमधीलच दुसर्‍या एका रूममधून :

रिसेप्शन आणि रेस्टॉरंट :

जरा उजवीकडे वळूयात :

पुन्हा एकदा उजवीकडे वळलात तर समोर दिसेलच :

दुसर्‍या दिवशी सकाळी रिझॉर्टचा माणूस बरोबर घेऊन आम्ही धबधबा जवळून बघण्याच्या मिषानं एक जंगल ट्रेलही करून आलो.

धबधब्याकडे जाण्याचा रस्ता :

समोर झाडीतून आलेली वाट चालून, हा प्रस्तर उतरून खाली आलो की समोरच नदी लागते आणि याच स्थळी ती कड्यावरून उडी मारते :

इथून समोर नजर टाकली तर झाडीत लपलेलं रिझॉर्ट दिसतं.

प्रस्तराच्या बाजूनं एक पायवाट उतरून आपल्याला धबधब्यापाशी अगदी जवळपर्यंत जाता येतं.

धबधबा मनसोक्त पाहून झाल्यावर खालूनच जंगलातील पायवाटेनं रिझॉर्टवर परत आलो.

या रिसॉर्टमध्ये ट्रीहाऊसही आहे. पण त्याकरता बरंच आधी बुकिंग करावं लागेल. जमलं तर नक्की जा.

**************************************************************************************************

खास लोकाग्रहास्तव माहितीत भर घालत आहे. Happy

ऑक्टोबर २०१२ ला आम्ही केरळची ट्रीप केली. मुन्नार, अथिरापल्ली आणि कोची ही ठिकाणं निवडली. तीनही ठिकाणची बुकिंग्ज नेटवरून सर्च करून केली. मुंबईहून फोनवरूनच कोची एअरपोर्टपासून एक कार विथ ड्रायव्हर रेंट केली होती. तो पूर्ण ट्रीपभर आमच्याबरोबर होता. त्यामुळे डोक्याला त्रास नव्हता. नशिबानं ड्रायव्हरही चांगला होता.

अथिरापल्लीला ट्री हाउसमध्ये राहण्याची खूप इच्छा होती. पण ते ऑलरेडी बुक्ड होते. पण तोवर मनात ट्रीहाऊसची हौस दाटून आली होती म्हणून मुन्नार बाहेर एक एलि एकोफ्रेंडली रिझॉर्टमध्ये ट्रीहाऊस बुक केले. पहिल्या रात्री ते उपलब्ध नव्हते म्हणून एक रात्र त्यांच्या साध्या रुममध्ये काढली. ती एक खरंतर अगदी छोट्याश्या टेकटीवरची छोटीशी खोपटीच होती. शेजारूनच एक सुरेख झरा वाहत होता. मला तर जामच आवडली. आतमध्ये अगदी बेसिक गोष्टी. पण बुकिंगच्या वेळी मॅनेजरनं या सगळ्याची व्यवस्थित कल्पना दिली होती. त्यामुळे आम्ही ओके होतो.

पण हाय रे दैवा, रात्री नवर्‍याच्या पायावर एक जळू चढली. मग त्या झोपडीवरचं माझं मन उडालंच. लेक तर पहिल्यापासून कुरकुरत होतीच तिला आणखी स्फुरण चढलं.

दुसर्‍या दिवशी ब्रेफानंतर ट्रीहाऊस रिकामं झाल्यावर आम्ही त्याची पहाणी केली आणि एकूण स्वच्छता पाहता अजून एक रात्रं इथं घालवणं शक्य नाही या मतावर एकमत झालं. पैसे परत मिळणार नव्हते. त्यामुळे ते तसेच सोडून मुन्नारला आयत्यावेळी क्लब महिंद्र मध्ये राहिलो. त्यांनी तर स्वतःहून अपडेट करून एक भलामोठा सुईट दिला.

पण त्या इकोफ्रेंडली रिझॉर्टमध्ये खाल्लेली केरळी चिकन करी आणि भात आणि दुसर्‍या दिवशी ब्रेकफास्टला खाल्लेलं पुट्टु आणि कडला करी जन्मात विसरता येणार नाही. इतकी अस्सल आणि रोबस्ट चव होती त्या दोन्ही पदार्थांना.

कोचीला बोटहाऊसचंही मुंबईहून आधीच बुकिंग करून टाकलं होतं. बोटहाऊसमधून फेरी मारताना छान वाटतं पण रात्रं काढणं जरा बोअरच झालं. एका किनार्‍याला लावून ठेवतात. तिथे डास असतात वगैरे मुळे थोडा हिरमोड झाला.

अथिरापल्लीला दोन रात्री खूप झाल्या. मुन्नारहून अथिरापल्लीच्या वाटेवर एक स्पाईस गार्डन लागते ती बघता येईल. जेवण रिझॉर्टमध्ये चांगले होते. आणि धबधब्याच्या वाटेवर ७-८ छोटी छोटी रेस्टॉरंटस आहेत तेथे एकदा लंच घेतलं - लोकल जेवण जेवायचं होतं म्हणून. ते ही चांगलं होतं.

काही फोटो नंतर अ‍ॅड करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याला जोडून मुन्नार , कोची वगैरे करता येते काय? रूम्स फारच कोस्टली आहेत ते साहजिकच आहे कारण एवढ्या जंगलात सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या म्हणजे प्रत्येक गोष्ट शहरातून न्यावी लागते. कूर्गची रिसॉर्टही महाग आहेत. मोठ्या शहरातली ५ स्टार हॉटेल्स या तुलनेत स्वस्त असतात कारण स्पर्धा हेही आहे.

आशियातला सर्वात मोठा धबधबा असे वर्णन साईटवर आहे खरे पण तसे असेल वाटत नाही. धब धबा त्याच्या रुंदीवर आणि उंचीवरही मापला जातो. हा कशात बसतो?

Pages