संशोधन - काळाची गरज

Submitted by सुमुक्ता on 12 August, 2014 - 05:57

मध्यंतरी आमच्या ओळखीच्या एक गृहस्थांकडे जाणे झाले त्यांचा मुलगा बारावी मध्ये आहे. साहजिकच तो पुढे काय करणार ह्या विषयावर त्याच्या आई-वडिलांनी बोलणे सुरु केले. त्याला भौतिकशास्त्र (Physics) या विषयात पुढील शिक्षण घ्यायची इच्छा आहे. अर्थातच त्याचा हा बेत त्याचे आई-वडील हाणून पाडणार आहेत. आजकाल ज्या घरामध्ये दहावी-बारावीतील मुले/मुली आहेत त्या घरात एकाच संवाद असतो -- "अभ्यास कर इंजिनियरिंग (मेडिकलला) प्रवेश मिळवायचा आहे". इंजिनियरिंग आणि मेडिकल ह्यापलीकडे दुसरे क्षेत्र अस्तित्वात नाही आणि आपले मुल इंजिनियर अथवा डॉक्टर झाले नाही तर फार मोठे आभाळ कोसळणार आहे अशी वृत्ती सर्रास दिसून येते.

डॉक्टर किंवा इंजिनियर झाल्यावर पुढे काय करणार? नोकरी नाहीतर प्रॅक्टीस करणार अथवा सॉफ्टवेयर मध्ये जाणार.…. मला संशोधक व्हायचे आहे असं सांगणारे फार थोडे तरुण आढळतील. त्यांना "असल्या" विचारांपासून परावृत्त करण्यासाठी समाजातील अनेक घटक कारणीभूत ठरतात. स्पर्धा हा त्यातील एक प्रमुख घटक. आवड म्हणून एखाद्या विषयाचे शिक्षण घेऊन आणि त्यात सरस कामगिरी करून दाखविण्यापेक्षा, दुसऱ्यापेक्षा मी जास्त यशस्वी आहे हे दाखविण्यातच भूषण मानले जात आहे. आज यश पैशांच्या फूटपट्टी वर मोजले जाते आहे. आणि त्या फूटपट्टीवर संशोधक सदैव अयशस्वीच राहतील. संशोधक मुलगा(गी) आणि लठ्ठ पगाराची नोकरी करणारा(री) मुलगा(गी) ह्यामध्ये लठ्ठ पगारचं बाजी मारतो. हे दुखः दायक असले तरी सत्य आहे. भरपूर पैसा ज्या क्षेत्रामध्ये आहे तिथेच कारकीर्द घडविण्याचा विचार करण्यात खरतरं चूक काहीच नाही. मीही १५ वर्ष पूर्वी तोच विचार केला होता. परंतु भरपूर पैसा मिळवण्याच्या नादात आमची पिढी बाकी कसलाच विचार करताना दिसत नाही.

आज भारतामध्ये हुशार संशोधकांची गरज आहे. नवीन संशोधनासाठी आजही आपण पुष्कळशा प्रमाणावर पाश्चात्य देशांवर अवलंबून आहोत. आपल्याकडे संशोधन होतच नाही असं नाही परंतु लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जेवढे संशोधक निर्माण व्हायला हवेत तेवढे निश्चितच होत नाहीत. भारतीय मुले/मुली हुशार आहेत; परंतु आज आजचा भारतीय तरुण फक्त धावतो आहे पैसा, प्रमोशन, डेडलाईन, अप्रेजल फक्त ह्याच्याच मागे. अनेक हुशार पण असमाधानी अभियंते ह्याच रहाटगाडग्याला जुंपलेले आहेत आणि आय. आय. टी. सारख्या विद्यापीठांमध्ये संशोधकांच्या अनेक जागा रिकाम्या आहेत हे विदारक सत्य आहे. संशोधन क्षेत्राकडे असणारा आपला उदासीन दृष्टीकोन ह्यास कारण कारणीभूत आहे. त्याचबरोबर स्पर्धात्मक युगातील यशाची मोजमापे आपल्याला मेंढरू प्रवृत्तीचे अनुसरण करण्यास भाग पाडत आहे. असली विचारसरणी आपली सर्जनशीलता मारून टाकत आहे असे वाटते.

पाश्चात्य देशांमध्ये संशोधन क्षेत्रात प्रगती होण्याची दोन प्रमुख करणे आहेत. एक म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर आलेली आर्थिक सुबत्ता. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याचे असलेले स्वातंत्र्य, आणि हवे ते शिक्षण घेतल्यानंतरही पोटापाण्याच्या व्यवसायाची उपलब्धता. भारतामध्येही आता सुबत्ता येते आहे. तेव्हा आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये बदल घडविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत ह्याकडे सुद्धा बारीक लक्ष पुरविले गेले पाहिजे. लहानपणापासून मुलांच्या सर्जनशीलतेला आणि जिज्ञासू प्रवृत्तीला खतपाणी घातले तरच अधिकाधिक तरुण संशोधन क्षेत्राकडे वळतील. जे संशोधक होणार नाहीत ते आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये निश्चितच सरस कामगिरी करून दाखवतील.

परंतु सर्वप्रथम आपण आपल्या विचारसरणी मध्ये अमुलाग्र बदल घडविणे आवश्यक आहे. साचेबद्ध यशाच्या संकल्पना मोडून काढायला हव्यात ज्यायोगे आपण एकमेकांशी स्पर्धा करणे टाळू शकतो. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईननी म्हटले आहे "प्रत्येक जणच हुशार असतो पण जर तुम्ही माशाची पात्रता झाडावर चढण्याच्या क्षमतेनुसार ठरवाल तर तो मासा स्वतःला मुर्ख समजण्यातच आयुष्य व्यतीत करेल" ( Everybody is a genius. But if you judge a fish by its ability to climb a tree, it will live its whole life believing that it is stupid). आपली पुढची पिढी अशा पारंपारिक रहाटगाडग्याला जुंपली जाणार नाही हे जर आपण सुनिश्चित करू शकलो तर भारत महासत्ता होण्याच्या दिशेने एक मोठे पाउल टाकेल ह्यात शंकाच नाही.

==

*ह्या लेखामध्ये माझे फक्त निरीक्षण नोंदविले आहे.विभिन्न मतप्रवाह असू शकतात ह्याची जाणीव मला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही म्हणता ते अगदी कबूल...माझ्याही ओळखीतील १२ वी च्या मुलीला फिजिक्स आवडते.तिचे आई बाबा ही तू सरळ बी.एस.सी कर आणि पुढे एम.एस.सी ,पी.एच.डी करावासे वाटले तर कर असे म्हणतात.पण तुम्ही लिहिल्याप्रमाणे फ्क्त बी.एस.सी करुन तिच्या पोटापाण्याची काही सोय होईल असे तिला वाटत नाही.शिवाय बी.एस.सी ला समाजात काही पत नसते असे क्लासेस वाले मुलांच्या मनात सतत भरवत असतातच. त्यामुळे मग त्यातल्या त्यात नोकरी ची हमी असलेली इंजिनियरिंगचीच पदवी घ्यावी असे तिला वाटते आहे...
समाजात सर्वसाधारण हेच चित्र आहे.आणि हे बदलण्याची नितांत गरज आहे.

आजकाल ज्या घरामध्ये दहावी-बारावीतील मुले/मुली आहेत त्या घरात एकाच संवाद असतो -- "अभ्यास कर इंजिनियरिंग (मेडिकलला) प्रवेश मिळवायचा आहे".

>> अ़जूनही हेच आहे असे वाटत नाही.

आपल्याकडे आता एकावेळी दोन विषयात स्नातक होता येते का? मुंबई विद्यापिठात हे सुरु झालय म्हणे?

आमच्या शाळेत एक मुलगा होता. खूप हुशार होता. तो बोर्डात येईल अशी सगळ्यांना खात्रीच होती पण त्याचं बोर्ड काही मार्कांनी हुकलं. तो आरामात होता, आम्हालाच जास्त वाईट वाटलं होतं Happy
नंतर बारावीला बोर्डात आला तो. पहिल्यापासून त्याला जेनेटिक्समध्येच संशोधन करायचं होतं. बोर्डात आला तरी त्याचं मत बदललं नाही. मायक्रोबायोलॉजीमध्ये डिग्री घेऊन नंतर तो संशोधनात उतरला.
तो आता माझ्या संपर्कात नाही. 'संशोधनक्षेत्रातले मायबोलीकर' हा धागा पाहिला की मला ह्या वर्गमित्राची आठवण येते आणि त्याने इथे लिहावं असं प्रकर्षाने वाटतं कारण पहिल्यापासून त्याचे विचार ठाम होते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी की संशोधन ह्या द्वंद्वात तो कधी अडकला असं वाटत नाही Happy

आज- काल कॉमर्स घेऊन सी.ए. होण्याकडे बर्‍याच जणांचा कल आहे असे वाटते.

पण तरीही संशोधन क्षेत्र निवडणारे विरळाच.

एकतर १० वी- १२वी च्या मुलांची निर्णयक्षमता या कोवळ्या वयात परिपक्व झालेली नसते. त्यामुळे सरसकट सगळेच नाही पण बव्हंशी विद्यार्थी हे पालकांच्या किंवा कुटुंबातील थोरल्या भावंडाच्या सल्ल्यानुसार वागतात.
त्यामुळे आपल्या मुलांसमोर काय-काय पर्याय उपलब्ध आहेत, त्या अभ्यासक्रमानंतर उपलब्ध असलेल्या नोकरी/व्यवसायाच्या विविध संधी याचे अपडेटस सर्वप्रथम पालकांना असावेत. त्यामुळेच साधनाच्या पोस्टला अनुमोदन. अशी माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.

मी सध्या basic sciences भारतीय विज्ञान संस्थेत शिकत आहे . विज्ञान क्षेत्रातील संशोधन करण्यासाठी लागणाऱ्या १२ वी नंतरच्या वेगवेगळ्या वाटा याबद्दल माहिती निश्चितच देउ शकेन .नंतर सविस्तर लिहिते परंतु हे क्षेत्र प्रचंड chalenging आणि आवड असेल तर आनंददायी आहे हे नक्की . पालकांचा विरोध असतो आणि तो योग्यही आहे यात शंकाच नाही ( स्वानुभव )

माझ्या मुलीला भूगोल विषयात संशोधन करण्याची इच्छा आहे. तिच्या कॉलेजातले प्रोफेसर्स तिला सपोर्ट करताहेत पण त्यांच्या मते मुंबईत भूगोलात चांगले पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय नाही. पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई युनिवर्सीटीला जाणे टाळलेलेच बरे. त्यापेक्षा चैनै किंवा नॉर्थमधली विद्यापिठे बरी आहेत. शिवाय भारतात या विषयातल्या संशोधनाचे चित्र अजुनतरी आशादायक नाही. त्यामुळे मी संभ्रमात आहे की पुढे काय करावे.

आता ती कॉलेजच्या दुस-या वर्षाला आहे पण लवकरच हा दारातला प्रश्न घरात येऊन उभा राहिल Happy पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी तिने जीआरई वगैरेची तयारी सुरू केलीय. पण आपल्याकडे खरेच चांगली सोय नाहीये की असुनही आपल्याला त्याची माहिती नाही हा प्रश्न वारंवार माझ्या मनात येत राहतो.

या विषयासंदर्भात भारतातल्या काय स्थिती आहे याची माहिती मिळाल्यास बरे होईल.

दोन प्रकारे विचार होउ शकतो...
१. संशोधनास खरोखर वाव उरलाय का की ज्या पद्धतीने पीएचड्या वाटल्या जातात (व ज्यांचा पुढे नोकरीसाठी सुद्धा उपयोग नसतो) त्यास संशोधन म्हणायचे?
२. संशोधकास इतर स्पर्धात्मक नोक-यांप्रमाणे आमदनी मिळते का?

अवांतर:
माझा मुलगा नौदल आणि कायदे या विषयात पुढे संशोधन करू इच्छितो. इथे नोकरी सोडून संशोधन करणे शक्यच नाही, सुदैवाने आधी नोकरी करावी मग संशोधन करावे अशीच या क्षेत्राची वाट आहे.

आमच्या हुषार चिरंजीवांनी आमच्या गळी त्यांचे संशोधन उतरवलेच. आता करत आहेत भारतातच रासायनिक अभियांत्रिकी मध्ये संशोधन. Happy

संशोधकास इतर स्पर्धात्मक नोक-यांप्रमाणे आमदनी मिळते का?

प्रत्येक क्षेत्रात आमदनीचा विचार करावा का? आमदनी चांगलीच असावी याबाबत दुमत नाही, पै-पैची चिंता करण्यात आयुष्य जावे असे अजिबात वाटत नाही. पण जेव्हा खो-याने पैसे ओढले जातात तेव्हाच त्या क्षेत्रात मुलाने प्रगती केली असे मानणे कितपत योग्य? खो-याने ओढलेल्या पैश्यांबरोबरच कामाचे समाधान, त्यातुन मिळणारा आनंद आणि यामुळे असलेले आनंदी आयुष्य या गोष्टीही तितक्याच महत्वाचा नाहीत का? म्हणजे हे सगळे मिळत आहे, पण पैसा मात्र खो-याने मिळत नाहीय तर आवश्यक आहे तेवढाच मिळतोय असे असले तर त्या मुलाने चुकीचे फिल्ड निवडले, आपली हुशारी वाया घालवली असे म्हणायला हवे काय? प्रत्येकाने आवडीच्या क्षेत्रात काम करावे म्हणताना याचाही विचार व्हावा असे वाटते.

छान लेख... संशोधन क्षेत्रातही करियर होऊ शकते ही जाण गेल्या काही वर्षातलीच. चांगली गोष्ट आहे ही.
त्यासाठी वेगळ्या प्रकारची क्षमता लागते, आणि आवडही असावी लागते. सुदैवाने आज मुलांनी असा कल
दाखवला तर पालक ऐकून घेतात आणि सल्ला / मदत देतातही. मला तरी चित्र आशादायी वाटतेय.

नाही साधना असे नक्कीच नाही. खो-याने पैसे मिळवण्यात गैर नाही नि थोडक्यात समाधानी असण्यात ही गैर नाही, पण भारतात संशोधन, खेळ या क्षेत्रांकडे त्यागाची / गरीबीची, पैसे न देणारी क्षेत्रे म्हणूनच पाहिले जाते ही चूक आहे. म्हणून मुले पुढे जाण्यास कचरतात.

मला एक कळत नाही, इंजिनीयरींग ला जाउन संशोधन करता येत नाही का?, मेडीकल ला जाउन संशोधन करता येत नाही का? या दोन्ही क्षेत्रातला संशोधन करण्याचा वाव संपला आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

कोणाला फिजिक्स खरेच आवडत असेल तर इंजिनीयरींग करता करता फिजिक्स चा अभ्यास चालू ठेवता येत नाही का? हल्लीच्या जमान्यात तर हे शक्य झाले आहे.

कोणी बारावीतला मुलगा मला फिजिक्स मधे संशोधन करायचे आहे असे म्हणत असेल तर त्याला गंभीर पणे घेण्यासाठी त्याने आधी काय दीवे लावले आहेत ते बघायला नको का?

माझ्या मते "त्या" बारावीमधल्या मुलाला स्पष्ट सांगावे, आधी आयआय्टी मधे प्रवेश मिळवुन दाखव, जर प्रवेश मिळण्याइतकी बुद्धी आणि कष्ट करण्याची तुझी तयारी आहे असे दिसले तर मग तू BSc फिजिक्स कर.

'संशोधन क्षेत्रात पैसे मिळत नाहित' हे नीट समजले नाही. आणि गलेलठ्ठ पगार म्हणजे नेमका किती ते पण लिहा.
उदा. ५० हजार महिण्याचे - ठिक
१ लाख - जरा बरे
१.५ लाख - उत्तम
२.० लाख - अतिउत्तम
.
.
.. किती लाख म्हणजे - गलेलठ्ठ?

अगदीच अवांतरः
त्या फूटपट्टीवर संशोधक सदैव अयशस्वीच राहतील>>> Rofl

निपा, तुमचं म्हणण पटतंय, पण त्या फूटपट्टीवर संशोधक सदैव अयशस्वीच राहतील>>> का बर?
संशोधनामध्ये कंपनी फंडेड प्रोजेक्ट्स असतात की. अप्लाईड RND मध्ये पैसे मिळतात, विद्यापीठात बरंच संशोधन असंच असतं.
लेखिकेला कदाचित तरुणपणी संशोधन शक्य झालं नाही असं वाटलं, मग त्या आता 'संशोधन' करत आहेत का कसं? मला हा लेख दुसऱ्याने असं करावं स्टाईल वाटला, म्हणून काही गोष्टी पटून सुद्धा नाही आवडला.
साधना, नाही पटलं. >>खो-याने ओढलेल्या पैश्यांबरोबरच कामाचे समाधान, त्यातुन मिळणारा आनंद आणि यामुळे असलेले आनंदी आयुष्य या गोष्टीही तितक्याच महत्वाचा नाहीत का? >> हे म्युच्युअली एक्सक्लूझीव आहे असं का वाटतंय? लुळी पांगळी श्रीमंती.... असं म्हणायचय का?

पण त्या फूटपट्टीवर संशोधक सदैव अयशस्वीच राहतील>>> का बर?>>>> ते वाक्य माझं नाहिय. मुळ लेखातलं आहे. मला हसु त्या वाक्याबद्दल आलं. आता का हसु आलं हा प्रश्न असेल तर त्याचे पार्शिअल उत्तर तुम्हीच दिलेय.

माझ्या मते "त्या" बारावीमधल्या मुलाला स्पष्ट सांगावे, आधी आयआय्टी मधे प्रवेश मिळवुन दाखव, जर प्रवेश मिळण्याइतकी बुद्धी आणि कष्ट करण्याची तुझी तयारी आहे असे दिसले तर मग तू BSc फिजिक्स कर.>>>> याचे पण लॉजिक पटले नाही. या दोन गोष्टींचा काहि तरी संबंध असेल असे वाटत नाही.

<मी सध्या basic sciences भारतीय विज्ञान संस्थेत शिकत आहे . विज्ञान क्षेत्रातील संशोधन करण्यासाठी लागणाऱ्या १२ वी नंतरच्या वेगवेगळ्या वाटा याबद्दल माहिती निश्चितच देउ शकेन .नंतर सविस्तर लिहिते परंतु हे क्षेत्र प्रचंड chalenging आणि आवड असेल तर आनंददायी आहे हे नक्की . पालकांचा विरोध असतो आणि तो योग्यही आहे यात शंकाच नाही ( स्वानुभव )> लीलावती तुम्ही आयसर मधे शिक्षण घेत आहात का?तुमचे अनुभव लिहा ना... आपल्या देशात खरे तर संशोधन क्षेत्रासाठी सरकार भरपूर स्कॉलरशिप्स देते आहे.बोर्डाच्या १ पर्सेंटाईल मधे असणार्‍या आणि basic sciences मधे डिग्री घेणार्‍या विद्यार्थांना ५००० प्रती महिना.(डिग्रीची तीनही वर्षे) तरी सुध्दा विद्यार्थी या कडे आकर्षिले जात नाहीयेत.संधोधन आणि उद्योग क्षेत्र हातात हात घालून चालतील तर शक्य आहे असे वाटते.

याचे पण लॉजिक पटले नाही. या दोन गोष्टींचा काहि तरी संबंध असेल असे वाटत नाही.>> निपा योग्य दिशा मिळण्यासाठी लायकी सिद्ध करावी लागते याचे भान मुलाला असावे म्हणून सुचवलेला उपाय असावा हा, की जो आयआयटी मधे प्रवेश मिळवू शकतो पण केवळ रस असल्याने संशोधनाकडे वळला किंवा वळू पाहतोय.

माझ्या मते "त्या" बारावीमधल्या मुलाला स्पष्ट सांगावे, आधी आयआय्टी मधे प्रवेश मिळवुन दाखव, जर प्रवेश मिळण्याइतकी बुद्धी आणि कष्ट करण्याची तुझी तयारी आहे असे दिसले तर मग तू BSc फिजिक्स कर>>>> याचे पण लॉजिक पटले नाही. या दोन गोष्टींचा काहि तरी संबंध असेल असे वाटत नाही.>>>>>>

@निपा - याचे लॉजिक असे की. - फिजिक्स मधे संशोधन करणे ही फार फार अवघड गोष्ट आहे. फिजिक्स नुस्ते समजण्या साठी बर्‍यापैकी वरचा बुद्ध्यांक असणे जरुरीचे आहे. तसेच संशोधन करण्याच्या लेव्हलला पोचण्यासाठी आधी बराच अभ्यास आणि परिक्षा चांगल्या मार्कानी पास होणे अपेक्षीत आहे. कोणी मी फिजिक्स मधे संशोधन करणार असा दावा करत असेल तर आधी आयाआयटी किंवा बारावीच्या परिक्षेत उत्तम मार्क मिळवुन नको का दाखवायला.

याचे पण लॉजिक पटले नाही. या दोन गोष्टींचा काहि तरी संबंध असेल असे वाटत नाही.>> निपा योग्य दिशा मिळण्यासाठी लायकी सिद्ध करावी लागते याचे भान मुलाला असावे म्हणून सुचवलेला उपाय असावा हा, की जो आयआयटी मधे प्रवेश मिळवू शकतो पण केवळ रस असल्याने संशोधनाकडे वळला किंवा वळू पाहतोय.>>>>>> बरोबर विनिता.

खरेखुरे संशोधन करण्यासाठी नेहमीच्या इंजिनीयर पेक्षा जास्त बुद्धीमत्ता असणे गरजेचे आहे. ती तशी आहे असे "त्या" मुलानी सिद्ध नको का करायला.

माझ्या मते लेखिका जेंव्हा संशोधन म्हणते तेंव्हा तिला सरकारी संस्थांमधले research assistant अभिप्रेत नसावेत.

फक्त संस्थांमध्येच होतो तो रिसर्च का?आपण परत फूटपट्टी लावली,अगदी नकळत्पणे.किती भिनलेली असते एखादी गोष्ट.

पदवीधर नाहीत असेही रिसर्च करत असतात.एसी मध्ये बसून केला जातो तो रिसर्च अशी व्याख्या रुढ झाली आहे.

टोचा, उत्तर लिहलेबद्दल आभारी.
आणि खरेखुरे संशोधन करण्यासाठी नेहमीच्या इंजिनीयर पेक्षा जास्त बुद्धीमत्ता असणे गरजेचे आहे.>>>>> नॉट पटेश.

वरच्या दोन्ही साठी थोडक्यात लिहतो. संशोधन (माझ्या मते) एक थॉट प्रोसेस आहे. तुमच्या व्याखेत बसणारे कितीतरी स्कॉलर्स संशोधनात कुचमाकी ठरतील तर त्याच व्याखेत अ‍ॅव्हरेज असणारे संशोधनात अव्वल ठरतील. आइन्स्टाइन यांचे उदाहरण या संदर्भात कितीतरी ठिकाणी देण्यात येते.

मला वाटते कि संशोधन म्हणजे नक्कि काय अभिप्रेत आहे हे लिहले तर मला इथे अजुन लिहता येइल.

मी काही मराठी शाळांमध्ये 'संशोधनाकडे वळा' या विषयावर ८ ते १० वीच्या मुलांना प्रेझेंटेशन दिले आहे. त्यावर सविस्तर लिहिन तेंव्हा माझ्या मते संशोधन काय आहे ते लिहेन.

जाता जाता : आपण (अगदी लहान बाळासकट) सगळे संशोधन आहे / असतो / असेन. Happy

अनेक हुशार पण असमाधानी अभियंते ह्याच रहाटगाडग्याला जुंपलेले आहेत आणि आय. आय. टी. सारख्या विद्यापीठांमध्ये संशोधकांच्या अनेक जागा रिकाम्या आहेत हे विदारक सत्य आहे. >>> जागा रिकाम्या आहेत आणि रहाटगाडग्याला जुंपलेले यांचा अतिशय बादरायण सम्बन्ध आहे. जागा भरण्याचे निकष काय असतात हे माहित नाही का? अनेक दर्जेदार रिसर्च पेपर असले तरी भारतात नोकरी मिळण्यासाठी तेवढ पुरेस नसत. वय, लिंग , जात-पात, काका-मामा इ इ सगळी गणिते सांभाळण्यापेक्षा इतर काहीही फुलफिलिंग कराव. मी तरी कुठल्याही तरुण व्यक्तीला हाच सल्ला देईन - आवडीचे काम कर. मग ५-१० वर्षे तिथे जम बसला की काही त्यात रिसर्च करता येईल का ह्याचा शोध घे. अदर वे अराउंड इज हार्ड.

साधना, जाऊदेत तुझ्या लेकीला परदेशात. अजूनही सोशल आणि अर्थ सायन्सेस या विषयांसाठी परदेशाच्या तोडीचे संशोधन विभाग इथे क्वचितच असतात. मला स्पेसिफिकली भूगोलाविषयी माहित नाही, पण तिथेही चित्र फारसं वेगळं असेल असं वाटत नाहीये

Pages