ह्या वृक्षप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 August, 2014 - 13:18

"झाडे वाचवा, झाडे जगवा.. पर्यावरण वाचवा, वसुंधरेला जगवा.."
हे तत्व पाचवीतल्या मुलालाही कळते (बाकी वळत भल्याभल्यांना नाही ती गोष्ट वेगळी) त्यामुळे याला नाकारून काही सिद्धांत मांडायचा नाहीये.

साधासाच किस्सा आहे. याच शुक्रवारचा. बस्स तोच शेअर करायचा आहे.

दोघांमध्ये एकच छत्री असल्याचा फायदा उचलत मैत्रीणीला तिच्या घरापर्यंत, म्हणजे अगदी दारापर्यंत नाही पण तिच्या बिल्डींगच्या लिफ्ट पर्यंत माझ्या छत्रीत लिफ्ट दिली. कारचा दरवाजा उघडतात तसे लिफ्टचा दरवाजा उघडून तिला निरोप देत लिफ्ट वर सोडली. अगदी लिफ्ट पहिला मजला पार करून नजरेआड होईपर्यंत पाहिली आणि मग छत्री सरसावत मागे वळलो. मुसळधार पाऊस माझी वाट बघत तसाच थांबला होता. पण मला माझ्या होणार्‍या सासुरवाडीत बेकायदेशीररीत्या जास्त काळ थांबता येणार नव्हते. पाऊसाच्या सोबतीला वाराही असा की आपल्याकडे छत्री असूनही त्याने आडवे शिरत पार कंबरेपर्यंत झोडपून काढावे. त्यामुळे समोरच्या गेटने बाहेर जाण्याऐवजी मी बिल्डींगच्या कडेकडेने छज्जा व्हरांड्याच्या छत्रछायेखाली उजवीकडच्या छोट्या गेटने बाहेर पडायचे ठरवले.....

आणि इथेच घात झाला !

चार पावले नाही चाललो ते अचानक काही कल्पना नसताना ढगफुटी झाल्यासारखे धो धो पाणी मला भिजवून गेले. आधी मला वाटले की साठलेल्या पाण्याच्या वजनाने एखादा पत्रा वा ताडपत्री वाकली असावी आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार सारा साठा माझ्यावर रिते करून गेली असावी. पण पुढे सुरक्षित जागी जाऊन वर पाहिले असता आढळून आले, की ते पाणी पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टांगलेल्या फूलझाडांच्या कुंड्यातून ओघळत होते. दोनचारच काय त्या कुंड्या, पण कोणीतरी कोसळणार्‍या पावसातही त्यांना बादली रिकामी केल्यासारखे पाणी घातले होते. कदाचित हा कार्यक्रम झांडाना पाणी घालण्याचा नसून कुंड्या धुवायचाही असावा. पण ते जे काही होते, त्यात ओल्या कुंड्यांबरोबर मी सुकाही धुतलो गेलो होतो. पाणी टाकणार्‍याने खाली कोणीतरी असण्याची शक्यता लक्षात घेऊनही हे धाडस कदाचित पावसाच्या पाण्यात आपलेही चार तांबे म्हणत केले असावे. माझे नशीब मात्र एवढेच चांगले की आजूबाजुला कोसळणार्‍या पावसामुळे आणि नुकतेच मैत्रीणीला निरोप दिलेला असल्याने, मी हातात मोबाईलशी चाळा करत चाललो नव्हतो. अन्यथा आर्थिक फटकाही पडला असता.

तर..., तोंड वर करून भावी सासुरवाडीतल्या कोणाशी भांडण्याचा पर्याय माझ्याकडे नसल्याने भिजलेल्या श्वानासारखा मुकाट अंग झटकत मी पसार झालो. पण हा प्रश्न मात्र मनात तसाच रेंगाळत राहिला. एवीतेवी आमच्या बिल्डींगमध्येही हे बाल्कनीत कुंड्या लाऊन त्याला नळाच्या पाण्यासारखी धार लागेपर्यंत पाणी घालणार्‍यांची संख्या काही कमी नाहीये. तर आपल्या खालच्या मजल्यावरही माणसे राहतात हे या लोकांच्या वरच्या मजल्यात कधी शिरणार.. ?

तळटीप १ - गार्डनिंगची खरोखर आवड असणार्‍या आणि ती योग्य प्रकारे जपणार्‍यांना हे लागू होत नाही. त्यामुळे फूलझाडे आणि वृक्ष प्रेमींनी हे वैयक्तिक घेऊ नये.

तळटीप क्रमांक २ - आता हे सर्वात महत्वाचे - माझा हा धागा "ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?" या धाग्याचे विडंबन हेतूने काढला नसून सत्यघटनेवर आधारीत आहे. फक्त त्या हिट धाग्याला पुरेपूर मान देत त्याच्या स्टाईलमध्ये शीर्षक दिले आहे. दॅट्स ईट !

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी पटल. कोकणात बागेला शिपण करतात तस वरुन कुंडीतल्या झाडाना पाणी घालण्याचा कार्यक्रम चालू अस तो. सांगायला गेल तर सांगणारे मूर्ख . सहन करीत रहाण्याशिवाय दुसरा उपाय नाही. इतके दिवस मला असे वाटत असे की हे गैर आहे असे वाटणारी मी एकच आहे की काय पण तुमचे विचार वाचून माझ्याबरोबर आहे कोणी तरी म्हणून बरे वाटले.

खालच्या लिस्ट मधल्या सगळ्याचा लसावि काढला
(सो कॉल्ड श्वान्प्रेम, खिडकितल्या बागेला पाणी, नो पार्किंग वर गाडी उभी करणे, समोरची गाडी अजिबात काढता येउ नये अशी गाडी पार्क करणे, सिग्नल तोडणे, जोरजोरात टीव्ही लावणे, दर शुक्रवारी शेजार्‍याला त्रास होइल असा दंगा घालणे, विनाकारण हॉर्न वाजविने, एस्टीच्या खिडकितुन थुंकणे, लेन अफाटरित्या अफाट स्पिडला चेंज करणे, ट्रेन मध्ये गृप असला कि अतिशय हिडीस चाळे करणे, लोकलमध्ये महिलांना टोमणे मारणे, कचरा करणे, कार ड्राइव्ह करत असताना ७० च्या स्पिडला कारचा दरवाजा उघडुन खाली मान घालुन बाहेर थुंकणे आणि मान वर करताच स्टेअरिंग जुन्या पिकचर मध्ये दाखवतात तसे १२० अंशात इकडे तिकडे फिरवणे इत्यादी इत्यादी)

तर उत्तर एकच येते. बाद मनोवृत्ती. दुसर्‍याला त्रास देण्याची मनोवृती. दुसरा त्रस्त झाला कि अजुन भारी वाटणारी मनोवृत्ती. फक्त फरक एवढाच कि काही लोक अजाणतेपणे हे करत असतात. म्हणजे याचा कुणाला त्रास होउ शकतो हेच मुळी त्यांच्या गावी नस्ते. (यात दुसर्‍याला त्रास होण्यासारखे काय आहे बॉ) आणि जरी समजत असले तरी मी कशाला त्याची फिकिर करु मला वाटते ते मी करणार ही मनोवृती.

बाल्कनीतल्या कुंडीत वृक्ष?????? >> बोन्साय लावले असतील.

बाकी, कोसळत्या पावसात झाडांना पाणी घालणारा मनुष्य फारच विद्वान असला पाहिजे.

कोसळत्या पावसात झाडांना पाणी घालणारा मनुष्य फारच विद्वान असला पाहिजे.
>>>
असे विद्वान आम्ही आधी राहायचो तिथे पाहिले आहेत. चेष्टेने त्यांना कारणही विचारून झालेले. तर पावसाचे पाणी पुरेसे तरी नसते किंवा ते वेळी अवेळी पडते, जेव्हा झाडांना तहानभूक लागेल तेव्हाच त्यांच्या कोट्यानुसार पाणी दिले गेले पाहिजे असा त्यांचा युक्तीवाद. स्कूलमध्ये आपणही सायन्सवायन्स जेमतेमच शिकल्याने प्रतिवाद करायच्या भानगडीत कधी पडलो नव्हतो.

आणि हो, लोकहो वृक्ष या शब्दावर जाऊ नका, जेवढी शब्दसंपत्ती माझ्याकडे आहे त्यातलाच एखादा शब्द वापरतो. दॅट्स ईट Happy

हे असे लोक तुम्हालाच(ज्यांना असे अनुभव आलेत असे) कसे काय भेटतात हो?
पुण्या-मुंबईची संस्कार आणि संस्कृती एवढी बदलली आहे?

कुंड्यांमधे काळजीपूर्वक पाणी घातले तरी खालच्या भोकांमधून जास्तीचे पाणी बाहेर पडणारच आहे त्याला पर्याय नाही. कुंड्या भरण्याची रचना, झाडाची गरज वगैरे गोष्टी आहेत.
कुंड्यांच्या स्टँण्डमधे कुण्ड्यांच्या खाली ठेवण्यासाठी एक ट्रे मिळतो. झाडाला घालताना सांडलेले पाणी, कुंडीच्या खालच्या भोकांमधून बाहेर आलेले पाणी त्यात जमा होते.
त्या ट्रे ला एकाच बाजूला भोक ठेवता येते ज्यातून पाण्याचा निचरा होतो. जनरली ते भोक अश्या ठिकाणी करून घेता येते की जिथून पाणी पडले असता कमीतकमी त्रास होईल.

ज्यांच्यामुळे त्रास होईल त्यांना ही माहिती सांगून बघा. अनेकांना हे माहित नसते.

जून महिन्यातलीच गोष्ट.नवर्‍याचे सचैल सिंचन जरासाठी चुकले.नंतर २० मिनिटे वरून धबधबा चालू होता.वॉचमनने वर जाऊन सांगितल्यावर पाणी थांबले.(सकाळचे दहा वाजले होते.) झाडांना पाणी आणि आजूबाजूची स्वछता कामवालीच्या वेळात चालली होती.बरं,सुशिक्षित (डॉक्टर) वगैरे आहेत.२-४ दिवसांनी वॉचमननेत्या डॉ.नी तारे तोडलेले सांगितले की 'हो! वरून पाणी घातले की खालीच येणार".

कुंडीखाली थाळ्या ठेवल्या की जास्तीचे पाणी त्यात जमा होते (मुळात पाणीव्यवस्थित घातले तर थाळीतपण साचत नाही.)आणि इमारतीवरही डाग पडत नाही.

आपल्या कुंडीतील झाडाना घातलेले पाणी खालती गळता कामा नये असं मुळी कोणालाच वाटत नाही.
मुळात . आणि महाजनो ये गतः स पंथः या न्यायाने जो हे करु नका सांगेल तोच मूर्ख ठरतो. आपल फ्लोअरिंग दुसर्‍याच सीलिंग आहे हेच गावी नसत. सार्वजनिक जागा सुशोभित नाही तरी निदान स्वच्छ तरी ठेऊ या हा विचारच नाहीये आपल्याकडे. यामुळेच मग आपला कचरा रात्रीच बाहेर ठेवणे, कचरे वाल्याची दंडी झाली तर तो कचरेवाला येऊन नेईपर्यंत तिथेच रहाणे, पाळीव प्राणी असतील तर त्यांनी केलेल्या घाणीची सोसायटीतील घाणीची जबाबदारी न घेणे, गॅलरीच्या ग्रिल मध्ये गळणारे कपडे वाळत घालणे, लिफ्ट असेल तर असंख्य अडगळीच्या वस्तू जिन्यांत ठेवणे या गोष्टी सर्रास केल्या जातात. जेवढा पैसा जास्त तेवढी ही वृत्ती जास्त अस कधी कधी वाटत पण कधी कधी हे पैशाशी रिलेटेड नाही अस ही वाट्त. कंफ्युजड आहे.
जसा आपला देश, जस आपल गाव तशीच आपली हौसिंग सोसायटी. हे चित्र माझ्या हयातीत तरी बदलणे शक्य नाही असच मला वाटायला लागल आहे पण माझ्या अजून पचनी पडत नाहीये खूप त्रास होतो.

अंगावर गॅलरीमधल्या कुंडीतले पाणी पडणे हे नगण्य वाटेल ईतका भयंकर प्रकार याची देही याची डोळा बघितलाय आणि गॅलरीमधल्या कुंड्या विशेषतः गॅलरीच्या भिंतीवर ठेवलेल्या, किती धोकादायक ठरु शकतात हे आठवुन अजुनही जिवाचा थरकाप होतो आणि असले प्रकार करणार्‍या लोकांसाठी अक्षरशः तळतळाट होतो...

मी आणि माझे वरीष्ठ, संजिव ऑफिस सुटल्यावर ठाण्यातल्या एका रस्त्यावरुन स्टेशन कडे निघालो होतो. ते भराभर पुढे जात होते. मी काहिशी मागे पडले म्हणून मी संजिवला हाक मारली. आणि ते क्षणभर थांबले. त्याचक्षणी त्यांच्या अगदी पुढ्यात एक मोठे झाड लावलेली, मोठी, पुर्ण मातीनी भरलेली कुंडी आकाशातुन कोसळली. मायक्रो सेकंदानी कपाळमोक्ष होण्यापासुन वाचले ते.

वर पाहिलं तर तिथे बर्‍याच गॅलर्‍यांमधुन अश्या भरपुर कुंड्या दिसत होत्या. नेमकी कुठुन पडली याचा काहीच अंदाज येत नव्हता. तरी त्या बिल्डींगमधे शिरलो. एक-दोन फ्लॅटधारकांना सांगायचा प्रयत्न केला तर 'वो हमारा नहिं होगा...' या टाईपचीच उत्तरे मिळाली.

अजुनही संजिवचा फोन कधिही आला तरी त्यांच पहिलं वाक्य असतं, " स्वरा, आपकी वजहसे जिंदा हुं.."

मनीमोहोर,
जेवढा पैसा जास्त तेवढी ही वृत्ती जास्त अस कधी कधी वाटत पण कधी कधी हे पैशाशी रिलेटेड नाही अस ही वाट्त. कंफ्युजड आहे.
>>
नाही हे पैश्यांशी रिलेटेड नाही. हि वृत्ती आहे, स्वभाव आहे. जेव्हा गरीब असे करतात तेव्हा "हे लोक कधी सुधारणार नाहीत" असा आपण उल्लेख करतो, आणि श्रीमंत जेव्हा करतात तेव्हा "पैश्याचा माज हो, बाकी काही नाही" असे बोलतो. दॅट्स ईट !

स्वरा (स्वप्नांची राणी),
आपला अनुभव खराच डेंजर आहे. समजू शकतो काय मनस्थिती असावी त्यांची. स्वता कधी अनुभवलेला नाही, पण माझा एक मित्र आहे, त्याने हा असला प्रकार दुसर्‍या एकाशी घडताना पाहिलेला. आणि ते पाहून याच्या मनात कुंडीफोबिया असा तयार झाला आहे की हा कुठल्याही बिल्डींगखालून जिथे वरून काही कोसळण्याची शक्यता आहे अश्या ठिकाणहून जात तर नाहीच पण साधे बिल्डींगबाहेर पडतानाही डोक्यावर हात ठेऊन, एक नजर वर ठेऊन, झरझर बाहेर पडतो.

ऋन्मेऽऽष,

माझ्या मते इमारतीबाहेर जड वस्तू टांगायला कायद्याने परवानगी नसायला पाहिजे. चूभूदेघे. तत्ज्ञ लोकांनी अधिक प्रकाश पाडावा.

आ.न.,
-गा.पै.

निवांत म्हणताहेत त्याप्रमाणेच नव्हे तर दुसर्‍याचा विचार करण्याची कुवतच नाही राहिली आता.
कुंड्यांच्या खालच्या ताटल्यात जमा होणारे पाणीदेखील रोजच्यारोज साफ करणे गरजेचे आहे कारण त्यात डास अंडी घालतात. खरे तर कुंडीतून खाली ओघळेपर्यंत पाणी घालायची गरजच नसते. जेमतेम माती ओली राहील एवढेच पाणी घालायचे.

अहो हे वृक्षप्रेम तर काहीच नाही, पुण्यात ब-याच ठिकाणी अगदी मुख्य रस्त्याच्या मधोमध वृक्ष असतात ज्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते, हे वृक्ष का काढले जात नाही म्हणून मी महापालिकेत चौकशी केली तर त्यांचे उत्तर असे होते,
कोणतेही झाड उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय तोडले तर गुन्हा दाखल होतो , भले त्या झाडाने कोणाचा बळी घेतला असेल तरीही ते झाड काढण्यासाठी किंवा शिफ्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाचे खेटे मारावे लागतात (कमीत कमी ६ महिने )
चूकून जरी एखाद्याने झाडाची फांदी तोडली तर ,या बाबी माहित असलेले पुण्यातील वूक्षप्रेमी तांडव करतात आणि अक्षरशा छ्ळतात. वूक्ष लावावे त्याचे संगोपन करावे याच बाजूने मी आहेच पण रस्त्याची रुंदी वाढवताना मध्येच एखादा वूक्ष ठेवून वाहन चालवणा-याला म्रूत्युच्या दारात ढकलणे कितपत योग्य आहे.

कुंड्यांच्या खालच्या ताटल्यात जमा होणारे पाणीदेखील रोजच्यारोज साफ करणे गरजेचे आहे कारण त्यात डास अंडी घालतात. खरे तर कुंडीतून खाली ओघळेपर्यंत पाणी घालायची गरजच नसते. जेमतेम माती ओली राहील एवढेच पाणी घालायचे. >>>>+१ Happy