मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा...(रफी पुण्यस्मरण)

Submitted by अतुल ठाकुर on 31 July, 2014 - 08:11

mohd_rafi_20130204.jpg

तेरे आने की आस है दोस्त
शाम फिर क्यों उदास है दोस्त
महकी महकी फिजां ये कहती है
तु कहीं आसपास है दोस्त
तु कहीं आसपास है दोस्त

३१ जुलै १९८० च्या रात्रि मोहम्मद रफी नावाचा सूरांचा बादशहा हे जग सोडून गेला. त्याचं हे शेवटचं गाणं. आजही ३१ जुलै आहे आणि नेमका गुरुवारच आहे. त्यावेळी गुरुवारी टीवी वर छायागीत असायचं. रात्री दहा साडेदहाच्या सुमाराला आम्ही सारे रफीप्रेमी पोरके झालो. सर्वसाधारणपणे असं बोलण्याची पद्धत आहे की जगात कुणाचं कुणावाचून अडत नाही. लोक जातात, त्यांची जागा दुसरे घेतात आणि जगरहाटी चालूच राहाते. रफीसाहेब मात्र या नियमाला अपवाद दिसताहेत. या बादशहाचं सिंहासन अजूनही रिकामीच आहे. अलीकडील हिन्दी सिनेमा संगीत आणि त्याचा दर्जा पाहता नजिकच्या काळात तरी ही जागा भरण्याची शक्यता फारच कमी वाटते. गाण्यांच्या लोकप्रियतेचं वय हे आता काही महिन्यांवर आलंय. चित्रपट आठवडाभर धो धो चालले म्हणजे सुपरहिट म्हणवले जातात. आणि त्यामागे पद्धतशीर विक्रीतंत्र राबवलं जातं. हे सारंच माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. पूर्वी भूले बिसरे गीत नावाचा कार्यक्रम रेडियोवर असायचा. गमतीने म्हणावंसं वाटतं की त्या कार्यक्रमात खरं तर आताची नवीन गाणी ऐकवायला हवीत कारण तीच तर विसरली जातात. जुनी गाणी आजदेखिल लोकांच्या स्मरणात आहेत. रफीवर लिहिताना म्हणुनच मला शक्यतोवर आजचा काळ आणि आजचे गायक यांवर लिहायचं नाहीय. यावर कुणालातरी अतिरिक्त नॉस्टाल्जियाचा आरोप करावासा वाटला तर माझा विरोध असणार नाही कारण माझ्याबाबतीत तो आरोप अगदी खरा आहे. रफीवर लिहायचं म्हणजे रफी श्रेष्ठ कसा, किशोर रफी मध्ये रफी वरचढ कसा, वगैरे गोष्टी मांडल्या जातात आणि लगेच तलवारी खणखणु लागतात. आरडी, आराधना, मेरे सपनों की रानी, राजेश खन्ना, अमिताभ यांच्यावर हिरिरीने चाहते बोलतात. त्यामुळे लेख (आणि प्रतिसाददेखिल) नेहेमीच्या वळणावर जातात असं माझं निरिक्षण आहे. नेमकं हेच मला या लेखात टाळायचं आहे. रफीवर अलिप्तपणे लिहिणं मला कठीणच आहे पण नेहेमीपेक्षा काही वेगळे मुद्दे या संदर्भात अभ्यासल्यास काही वेगळं हाती लागतंय का हे पाहण्याचा मानस या लेखाच्या निमित्ताने आहे.

आपल्याकडे अभिनयात दिलिप, राज आणि देव आनंद या त्रयीचा एक काळ मानला जातो. त्यांच्या नावाशी अनुक्रमे रफी, मुकेश आणि किशोर हि नावे जोडली जातात. रफी म्हणजे दिलिपचा आवाज, राजचा दर्द म्हणजे मुकेशच, देव गाणार तो मान हलवत किशोरच्याच आवाजात. हे ढोबळ मानाने ठिक असेलही. पण क्लासिक म्हटली गेलेली दिलिपची काही गाणी मुकेशने (ये मेरा दिवानापन है) आणि तलतने (शामे गम कि कसम)गायिली आहेत. राज कपूरची काही सुरेख गाणी मन्नाडेला (मस्ती भरा है समां) मिळालीत. मात्र जरा खोलात शिरुन पाहिलं तर असं दिसतं कि देव आनंदच्या पडद्यावरील गाण्यांचा बराच भाग हा रफीच्या सुरेल गाण्यांनी (दिन ढल जाये, हम बेखुदी में तुमको) व्यापला आहे. यामुद्द्यावर रफी आणि देव या दोघांच्या चाहत्यांचं एकमत होईल. आणखि एक निरिक्षण म्हणजे देव आनंदप्रमाणेच ज्या राजेशखन्नासाठी किशोरचं नाव घेतलं जातं त्या राजेशखन्नासाठी देखिल रफीने (गुलाबी आंखे जो तेरी देखीं, ये रात है प्यासी प्यासी, ये जो चिलमन है) उत्तमोत्तम गाणी गायिली. याचाच अर्थ देव आनंद आणि नंतर राजेश खन्ना या खास किशोरच्या अशा अभिनेत्यांसाठी रफीने अनेक दर्जेदार गाणी गायिली आहेत. मात्र किशोरच्या बाबतीत हा प्रकार फारसा यशस्वी झाला नाही. दिलीपने किशोरचा आवाज "सगिना"चा एकमेव अपवाद वगळता कधीही वापरला नाही. राज कपूरने अपवादासाठीदेखिल किशोरचा आवाज वापरला नसावा. रफी हा कायम शम्मी कपूरचाही आवाज राहीला. शम्मीने पार म्हातारा झाल्यावर "अरमान" मध्ये (सारे जहां कि अमानत है ये) किशोरचा आवाज घेतला. जुबीली स्टार राजेंद्रकुमार रफीच्या आवाजात गायचा. काहीवेळा त्याने मुकेश स्विकारला (हुस्ने जाना इधर आ) मात्र "आप आये बहार आयी" मधल्या "तुमको भी तो ऐसा ही कुछ" चा अपवाद वगळता तो पुन्हा किशोरकडे फिरकला नाही. बाकी राजेश खन्ना, देव आनंद, दिलिप कुमार, राजेंद्रकुमार, शम्मी कपूर यांच्यासारख्या अभिनेत्यांच्या वैविध्यांमध्ये एकमेव रफीचा आवाज हाच समान दुवा होता. ही बाब रफी हा गुणवत्तेत आणि वैविध्यात समकालिनांच्या पुढे होता हे अधोरेखित करते असे मला नम्रपणे वाटते.

अभिनयात भारतभुषण, प्रदिपकुमार यांना आपल्याकडे ठोकळे म्हणण्याचा प्रघात आहे. मला स्वतःला त्यांना लावलं गेलेलं हे बिरुद मान्य नाही. त्यांची अभिनय क्षमता मर्यादित होती. पण त्यांचे चित्रपट हे प्रामुख्याने रफीच्या गाण्यांमुळे चालले यावर वाद होण्याचं कारण नाही. भारत भुषण म्हटले कि "बैजुबावरा" आठवणारच. प्रदिपकुमारचा "ताजमहाल" मधला "जो वादा किया वो निभाना पडेगा" कोण विसरु शकेल? "भीगी रात" चित्रपट माहित नसेलही पण "दिल जो न कह सका" हे प्रदिपकुमारने गायिलेलं क्लासिक गाणं विसरता येत नाही. अभिनयाच्या मर्यादा असलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट रफीने फक्त आपल्या आवाजाच्या जोरावर अजरामर केले आहेत. इतके कि त्या गाण्यांबरोबर ते अभिनेतेही बर्‍यावाईट कारणांसाठी रसिकांच्या कायम लक्षात राहुन अमर झाले आहेत. मात्र "मै ढुंढता हुं जिनको" या मुकेशच्या अप्रतिम गाण्याचा पडद्यावरील अभिनेता शिवकुमार कुणाला आठवतो का? "चन्दन सा बदन" गाणारा सरस्वतीचंद्र मधला मनीष लक्षात आहे का? "चंदा कि किरनोंसे लिपटी हवाये" हे किशोरचं अफलातुन गाणं गाणारा बलदेव खोसा ठाऊक आहे? किरणकुमार खलनायक म्हणुन माहित असेलही पण किशोरचं "तुम कितनी खुबसुरत हो" हे "जंगल में मंगल" मधलं जबरदस्त गाणं किरणकुमारने पडद्यावर गायिलं आहे हे किती जणांना माहित असेल? रफीने पडद्यावर आवाज दिलेले अनेक अभिनेते विस्मृत झाले असतीलही पण ठळक उठुन दिसतात ते भारत भुषण आणि प्रदिप कुमार आणि त्यांचे रफीच्या गाण्यांनी गाजवलेले चित्रपट. अशी उदाहरणे मला किशोर आणि मुकेशच्या बाबतीत चटकन आठवत नाहीत. त्यामुळे फक्त आपल्या गाण्यांनी चित्रपट खेचुन नेणारा गायक म्हणुन देखिल रफीचे नाव समकालिनांमध्ये ठळक उठुन दिसते असे मला वाटते.

गाण्यांमधील वैविध्य जर लक्षात घेतलं तर रफी,किशोर आणि मुकेश यांच्यामध्ये मुकेशला वगळावे लागेल. दर्द हाच प्रामुख्याने मुकेशच्या गळ्याचा आणि गाण्याचा देखिल आत्मा होता. अर्थातच त्याने इतर प्रकारची गाणी देखिल गायिली आहेतच. पण मुकेश म्हटल्यावर आठवतात ती दर्दभरी गाणीच. प्रामुख्याने रफी आणि किशोरनेच सर्व तर्‍हेची गाणी गायिली. त्यातही जरी शास्त्रीय बाजाची बरीचशी गाणी मन्नाडे कडे गेली तरी रफीने या प्रांतातही आपली मोहर उठवली. "बैजुबावरा"चे "मन तडपत हरी", मन्नाडे बरोबरच गायलेले "तु है मेरा प्रेमदेवता", "अखियन संग अखियां लागे आज" अशी अनेक सुरेल, रागदारींवर आधारलेली गाणी रफीच्या खात्यात आहेत. एखाद्या "पायलवाली देखना" सारखा अपवाद वगळता किशोरला अशी गाणी क्वचितच मिळाली असावीत. दुसरे क्षेत्र कव्वालीचे. त्यात रफीचा स्वतंत्र ठसा आहे. सार्‍या कव्वाली दर्जेदार नसतीलही मात्र "हसते जख्म" मधली "ये माना मेरी जां मुहब्बत सजा है" सारखी कव्वाली हा मला तरी कव्वालीच्या श्रेष्ठतेचा मानदंड वाटतो. शायरी आणि तत्सम हळुवार गीतांमध्येही रफीचंच पारडं जड भासतं. बहादुरशहा जफरच्या “लगता नही है दिल मेरा उजडे दयार में” साठी रफीच योग्य वाटतो. “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है” हे जेव्हा गुरुदत्त पडद्यावर पोटतिडकीने विचारतो तेव्हा त्याला रफीच्याच आवाजाचा आधार असतो. फार कशाला, "प्यासा" मध्ये "तंग आ चुके है कशमकशे जिंदगीसे हम" ही गुरुदत्तची कैफीयत गाण्याच्या स्वरुपात नाही. मुशायर्‍यात शेर ऐकवावेत त्या तर्‍हेने ते म्हटलं गेलंय. पण त्यामागील आर्त, वेदनेने भरलेला आवाज रफीचा आहे. काव्यगुणांनी युक्त अशी गाणी मिळण्याच्या बाबतीत रफी सुदैवी ठरला असे म्हणणे हे त्याच्यातल्या गुणवत्तेवर अन्याय करण्यासारखे आहे. त्याच्या आवाजाची जातकुळी वैविध्यपूर्ण गाण्यांसाठी योग्य होता आणि त्याची "रेंज" मोठी होती हे मान्य करावं लागेल. त्यामुळेच कदाचित “गाईड” साठी देव आनंद आणि एस्.डी.बर्मनला रफीची गरज भासलीच. सात फिल्मफेअर मिळालेल्या या चित्रपटात किशोरच्या वाट्याला आलेलं एकमेव गाणं म्हणजे “गाता रहे मेरा दिल”. चित्रपटातील भक्तीसंगीताच्या दृष्टीने गायकांचा अभ्यास केला गेला आहे कि नाही माहित नाही पण "तेरे भेरोसे हे नंदलाल", "जय रघुनंदन जय सियाराम" (घराना), "इन्साफ का मंदिर है ये" (अमर), "दुनिया ना भाये मोहे" (बसंत बहार) अशी एकाचढ एक गाणी रफी येथे गाऊन गेला आहे. किशोरची भक्तीगीतं मला चटकन आठवत नाहीत.

रफी गेल्यावर त्या तर्‍हेने गाण्यार्‍यांचे दिवस आले होते. "तुमने दी आवाज लो मै आ गया" म्हणुन शब्बीर कुमार आला. लक्ष्मीकांत प्यारेलालने "गुलामी"त "जिहाले मिस्किन" सारखं गाणं त्याला दिलं. पण पुढे काहीच झालं नाही. "मय से मिनासे ना साकी से" म्हणत मोहम्मद अजीज आला. नंतर कुठे विरुन गेला कळलेच नाही. रफीच्या हयातीत अन्वरने "मेरे गरीब नवाज" साठी "कस्मे हम अपनी जान कि खाये चले गये" सारखं अप्रतिम गाणं गावुन आशा निर्माण केली होती. पण त्यालाही वाव मिळाला नाही. या माणसांच्या गुणवत्तेबद्दल आदर बाळगुन म्हणावसं वाटतं कि यांची रफीशी कुठल्याच तर्‍हेने तुलना होऊ शकत नव्हती. एकदा दिलीपकुमार तलत आणि रफीची तुलना करताना मार्मिकपणे बोलुन गेला होता 'तलतची गाणी विशिष्ट प्रकारची आहेत ती त्यांनाच आवडतील जे तशा प्रकारची आवड बाळगतात ("जो उस तरहा का जायका रखतें हो" असे शब्द युसुफ साहेबांनी वापरले होते) मात्र रफीची "रेंज" जबरदस्त होती त्यामुळे तो सर्व तर्‍हेची गाणी गाउन गेला असेच युसुफमियांना म्हणायचे असावे. येथे कुठल्याही गायकाला तुलना करुन रफीपेक्षा कमी ठरवण्याचं मी टाळलं आहे. त्यापेक्षा गाण्यांचा, त्यातील वैविध्याचा, पडद्यावर ती गाणी गायिलेल्या अभिनेत्यांचा अभ्यास करुन काही त्यातुन मिळतंय का हे पाहाण्याचा हा प्रयत्न आहे. "जजमेंटल" न बनण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र आज रफीसाहेबांचं पुण्यस्मरण करताना शेवटी ही शास्त्रीय, काटेकोर परिभाषा थोडी बाजुला ठेवावीशी वाटते. कारण माझ्यासाठी रफी हे नाव देवाखालोखाल आहे. आजवरच्या वाटचालीत आनंदाचा फार मोठा भाग रफीसाहेबांच्या गाण्यांनी व्यापला आहे. अशा माणसांबद्दल फक्त कृत़ज्ञताच व्यक्त करता येते. आत्म्याच्या अमरत्वाबाबत फार बोललं जातं. आत्म्याचं तर माहीत नाही पण रफीसाहेब त्यांच्या गाण्यांमुळे खरोखरंच अमर झालेत. "दिल का सुना साज तराना ढुंढेगा" या गाण्यात रफीसाहेब एका ठिकाणी म्हणतात "मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा..." खरं आहे रफी साहेब, तुमच्यानंतर आम्ही तुम्हाला शोधत बसलो. दुसरं कुणीही मिळालं नाही. आता शोध थांबवला आहे. कारण या सम हाच हे सत्य आता आमच्या लक्षात आलंय. तुम्ही आमच्यात नाही आहात हे खरं नाहीच. कधीही तो चिरपरिचित आवाज कानावर पडतो आणि वाटतं 'तु कहीं आसपास है दोस्त...तु कहीं आसपास है दोस्त...'

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख... माझा पण आवडता गायक...

हरि ओम हरि ओम... मन तरपत हरि दरशन को....
बाबुल कि दुआए लेती जा....

छान लिहीले आहे. थोडा स्वाभाविक रफी बायस जाणवतो, कारण किशोर बद्दलचे अनेक संदर्भ नकळत आपोआप आलेले आहेत. पण लेख रफीवरचा आहेत त्यामुळे नो प्रॉब्लेम :).

माझा मोस्ट फेवरिट किशोरच. पण रफीचीही असंख्य गाणी आवडतात.
(राज कपूर बद्दल उल्लेख आहे - त्याच्या एका जुन्या 'प्यार' नावाच्या चित्रपटात त्याला किशोरचा आवाज होता असे वाचले होते. ते गाणे पूर्वी तरी कोठे सापडले नाही).

याच्या आवाजाची जातकुळी वैविध्यपूर्ण गाण्यांसाठी योग्य होता आणि त्याची "रेंज" मोठी होती हे मान्य करावं लागेल. त्यामुळेच कदाचित “गाईड” साठी देव आनंद आणि एस्.डी.बर्मनला रफीची गरज भासलीच. >>> रफीची रेंज मोठी होती यात वादच नाही, पण गाईडची ती गाणी रफी ला मिळाली कारण किशोर तेव्हा अमेरिकेत होता. 'गाता रहे' साठी मात्र म्हणे एसडी किशोरकरता अडून बसले, व त्यामुळे तो परतल्यावर ते रेकॉर्ड झाले. संदर्भ 'एक होता गोल्डी'. यात रफीला कमी लेखत नाहीये, त्याने ती सुंदरच म्हंटली आहेत. 'तेरे मेरे सपने...' माझे प्रचंड आवडते आहे. त्यातील संगीतातही एक प्रकारचा गोडवा आहे. ते सतत बॅकग्राउंडला वाजणारे वाद्य व्हायोलिन आहे असे मला वाटायचे - तो सॅक्सोफोन आहे असे याच पुस्तकातून कळाले. रफीची इतर अनेक गाणी त्याने स्वत:च्या गायकीवर दर्जेदार केली आहेत, पण हे गाणे संगीतानेही तितकेच वर उचलले आहे. व अभिनयानेही.

याउलट 'जिंदगीभर नहीं भूलेगी...' पाहताना असे वाटते की भारत भूषण ला 'तू फक्त तेथे उभे राहून गाणे म्हंटल्यासारखे कर, बाकीचे रफी बघून घेइल' असे सांगून तेथे शूट केले असावे असे वाटते :). कलाकाराने पडद्यावर गाणे आणखी खुलवायला हवे, तसे येथे वाटत नाही. 'मेरे मेहबूब तुझे ...' मधे राजेन्द्र कुमार ने वन डायमेन्शल का होईना पण थोडातरी रंग भरला आहे. कलाकाराने गाणे खुलवण्याचे माझ्या दृष्टीने उत्तम उदाहरण म्हणजे दिलीप कुमार चे 'नैन लड जई है..." मधले काम. रफी व दिलीप दोघांनी धमाल उडवली आहे. मला असे स्वाभाविक नाच - जे 'बसवले आहेत' असे वाटत नाही- बघायला खूप आवडतात ('माय नेम इज अ‍ॅन्थनी गोन्साल्विस' हे बच्चन-किशोर चे बेस्ट उदाहरण). हे स्पॉन्टेनियस असतील तर या हीरोज ची कमाल आहे व प्रत्यक्षात 'बसवलेले' असतील तर दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शकांची.

मस्त लेख अतुल.:स्मित: आवडता गायक किशोर असला तरी रफीबद्दल प्रचन्ड आदर आहे.:स्मित:

बैजुबावरा काय किन्वा बसन्त बहार काय. रफीने हृदयालाच हात घातलाय.

माझी आवडती गाणी

दुनिया न भाये मोहे अब तो बुलाले चरणोमे

प्रभु तू दयाळु कृपावन्त दाता

कभी रात दिन हम दूर थे, दिन रात का अब साथ है.

Pages