मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा...(रफी पुण्यस्मरण)

Submitted by अतुल ठाकुर on 31 July, 2014 - 08:11

mohd_rafi_20130204.jpg

तेरे आने की आस है दोस्त
शाम फिर क्यों उदास है दोस्त
महकी महकी फिजां ये कहती है
तु कहीं आसपास है दोस्त
तु कहीं आसपास है दोस्त

३१ जुलै १९८० च्या रात्रि मोहम्मद रफी नावाचा सूरांचा बादशहा हे जग सोडून गेला. त्याचं हे शेवटचं गाणं. आजही ३१ जुलै आहे आणि नेमका गुरुवारच आहे. त्यावेळी गुरुवारी टीवी वर छायागीत असायचं. रात्री दहा साडेदहाच्या सुमाराला आम्ही सारे रफीप्रेमी पोरके झालो. सर्वसाधारणपणे असं बोलण्याची पद्धत आहे की जगात कुणाचं कुणावाचून अडत नाही. लोक जातात, त्यांची जागा दुसरे घेतात आणि जगरहाटी चालूच राहाते. रफीसाहेब मात्र या नियमाला अपवाद दिसताहेत. या बादशहाचं सिंहासन अजूनही रिकामीच आहे. अलीकडील हिन्दी सिनेमा संगीत आणि त्याचा दर्जा पाहता नजिकच्या काळात तरी ही जागा भरण्याची शक्यता फारच कमी वाटते. गाण्यांच्या लोकप्रियतेचं वय हे आता काही महिन्यांवर आलंय. चित्रपट आठवडाभर धो धो चालले म्हणजे सुपरहिट म्हणवले जातात. आणि त्यामागे पद्धतशीर विक्रीतंत्र राबवलं जातं. हे सारंच माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. पूर्वी भूले बिसरे गीत नावाचा कार्यक्रम रेडियोवर असायचा. गमतीने म्हणावंसं वाटतं की त्या कार्यक्रमात खरं तर आताची नवीन गाणी ऐकवायला हवीत कारण तीच तर विसरली जातात. जुनी गाणी आजदेखिल लोकांच्या स्मरणात आहेत. रफीवर लिहिताना म्हणुनच मला शक्यतोवर आजचा काळ आणि आजचे गायक यांवर लिहायचं नाहीय. यावर कुणालातरी अतिरिक्त नॉस्टाल्जियाचा आरोप करावासा वाटला तर माझा विरोध असणार नाही कारण माझ्याबाबतीत तो आरोप अगदी खरा आहे. रफीवर लिहायचं म्हणजे रफी श्रेष्ठ कसा, किशोर रफी मध्ये रफी वरचढ कसा, वगैरे गोष्टी मांडल्या जातात आणि लगेच तलवारी खणखणु लागतात. आरडी, आराधना, मेरे सपनों की रानी, राजेश खन्ना, अमिताभ यांच्यावर हिरिरीने चाहते बोलतात. त्यामुळे लेख (आणि प्रतिसाददेखिल) नेहेमीच्या वळणावर जातात असं माझं निरिक्षण आहे. नेमकं हेच मला या लेखात टाळायचं आहे. रफीवर अलिप्तपणे लिहिणं मला कठीणच आहे पण नेहेमीपेक्षा काही वेगळे मुद्दे या संदर्भात अभ्यासल्यास काही वेगळं हाती लागतंय का हे पाहण्याचा मानस या लेखाच्या निमित्ताने आहे.

आपल्याकडे अभिनयात दिलिप, राज आणि देव आनंद या त्रयीचा एक काळ मानला जातो. त्यांच्या नावाशी अनुक्रमे रफी, मुकेश आणि किशोर हि नावे जोडली जातात. रफी म्हणजे दिलिपचा आवाज, राजचा दर्द म्हणजे मुकेशच, देव गाणार तो मान हलवत किशोरच्याच आवाजात. हे ढोबळ मानाने ठिक असेलही. पण क्लासिक म्हटली गेलेली दिलिपची काही गाणी मुकेशने (ये मेरा दिवानापन है) आणि तलतने (शामे गम कि कसम)गायिली आहेत. राज कपूरची काही सुरेख गाणी मन्नाडेला (मस्ती भरा है समां) मिळालीत. मात्र जरा खोलात शिरुन पाहिलं तर असं दिसतं कि देव आनंदच्या पडद्यावरील गाण्यांचा बराच भाग हा रफीच्या सुरेल गाण्यांनी (दिन ढल जाये, हम बेखुदी में तुमको) व्यापला आहे. यामुद्द्यावर रफी आणि देव या दोघांच्या चाहत्यांचं एकमत होईल. आणखि एक निरिक्षण म्हणजे देव आनंदप्रमाणेच ज्या राजेशखन्नासाठी किशोरचं नाव घेतलं जातं त्या राजेशखन्नासाठी देखिल रफीने (गुलाबी आंखे जो तेरी देखीं, ये रात है प्यासी प्यासी, ये जो चिलमन है) उत्तमोत्तम गाणी गायिली. याचाच अर्थ देव आनंद आणि नंतर राजेश खन्ना या खास किशोरच्या अशा अभिनेत्यांसाठी रफीने अनेक दर्जेदार गाणी गायिली आहेत. मात्र किशोरच्या बाबतीत हा प्रकार फारसा यशस्वी झाला नाही. दिलीपने किशोरचा आवाज "सगिना"चा एकमेव अपवाद वगळता कधीही वापरला नाही. राज कपूरने अपवादासाठीदेखिल किशोरचा आवाज वापरला नसावा. रफी हा कायम शम्मी कपूरचाही आवाज राहीला. शम्मीने पार म्हातारा झाल्यावर "अरमान" मध्ये (सारे जहां कि अमानत है ये) किशोरचा आवाज घेतला. जुबीली स्टार राजेंद्रकुमार रफीच्या आवाजात गायचा. काहीवेळा त्याने मुकेश स्विकारला (हुस्ने जाना इधर आ) मात्र "आप आये बहार आयी" मधल्या "तुमको भी तो ऐसा ही कुछ" चा अपवाद वगळता तो पुन्हा किशोरकडे फिरकला नाही. बाकी राजेश खन्ना, देव आनंद, दिलिप कुमार, राजेंद्रकुमार, शम्मी कपूर यांच्यासारख्या अभिनेत्यांच्या वैविध्यांमध्ये एकमेव रफीचा आवाज हाच समान दुवा होता. ही बाब रफी हा गुणवत्तेत आणि वैविध्यात समकालिनांच्या पुढे होता हे अधोरेखित करते असे मला नम्रपणे वाटते.

अभिनयात भारतभुषण, प्रदिपकुमार यांना आपल्याकडे ठोकळे म्हणण्याचा प्रघात आहे. मला स्वतःला त्यांना लावलं गेलेलं हे बिरुद मान्य नाही. त्यांची अभिनय क्षमता मर्यादित होती. पण त्यांचे चित्रपट हे प्रामुख्याने रफीच्या गाण्यांमुळे चालले यावर वाद होण्याचं कारण नाही. भारत भुषण म्हटले कि "बैजुबावरा" आठवणारच. प्रदिपकुमारचा "ताजमहाल" मधला "जो वादा किया वो निभाना पडेगा" कोण विसरु शकेल? "भीगी रात" चित्रपट माहित नसेलही पण "दिल जो न कह सका" हे प्रदिपकुमारने गायिलेलं क्लासिक गाणं विसरता येत नाही. अभिनयाच्या मर्यादा असलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट रफीने फक्त आपल्या आवाजाच्या जोरावर अजरामर केले आहेत. इतके कि त्या गाण्यांबरोबर ते अभिनेतेही बर्‍यावाईट कारणांसाठी रसिकांच्या कायम लक्षात राहुन अमर झाले आहेत. मात्र "मै ढुंढता हुं जिनको" या मुकेशच्या अप्रतिम गाण्याचा पडद्यावरील अभिनेता शिवकुमार कुणाला आठवतो का? "चन्दन सा बदन" गाणारा सरस्वतीचंद्र मधला मनीष लक्षात आहे का? "चंदा कि किरनोंसे लिपटी हवाये" हे किशोरचं अफलातुन गाणं गाणारा बलदेव खोसा ठाऊक आहे? किरणकुमार खलनायक म्हणुन माहित असेलही पण किशोरचं "तुम कितनी खुबसुरत हो" हे "जंगल में मंगल" मधलं जबरदस्त गाणं किरणकुमारने पडद्यावर गायिलं आहे हे किती जणांना माहित असेल? रफीने पडद्यावर आवाज दिलेले अनेक अभिनेते विस्मृत झाले असतीलही पण ठळक उठुन दिसतात ते भारत भुषण आणि प्रदिप कुमार आणि त्यांचे रफीच्या गाण्यांनी गाजवलेले चित्रपट. अशी उदाहरणे मला किशोर आणि मुकेशच्या बाबतीत चटकन आठवत नाहीत. त्यामुळे फक्त आपल्या गाण्यांनी चित्रपट खेचुन नेणारा गायक म्हणुन देखिल रफीचे नाव समकालिनांमध्ये ठळक उठुन दिसते असे मला वाटते.

गाण्यांमधील वैविध्य जर लक्षात घेतलं तर रफी,किशोर आणि मुकेश यांच्यामध्ये मुकेशला वगळावे लागेल. दर्द हाच प्रामुख्याने मुकेशच्या गळ्याचा आणि गाण्याचा देखिल आत्मा होता. अर्थातच त्याने इतर प्रकारची गाणी देखिल गायिली आहेतच. पण मुकेश म्हटल्यावर आठवतात ती दर्दभरी गाणीच. प्रामुख्याने रफी आणि किशोरनेच सर्व तर्‍हेची गाणी गायिली. त्यातही जरी शास्त्रीय बाजाची बरीचशी गाणी मन्नाडे कडे गेली तरी रफीने या प्रांतातही आपली मोहर उठवली. "बैजुबावरा"चे "मन तडपत हरी", मन्नाडे बरोबरच गायलेले "तु है मेरा प्रेमदेवता", "अखियन संग अखियां लागे आज" अशी अनेक सुरेल, रागदारींवर आधारलेली गाणी रफीच्या खात्यात आहेत. एखाद्या "पायलवाली देखना" सारखा अपवाद वगळता किशोरला अशी गाणी क्वचितच मिळाली असावीत. दुसरे क्षेत्र कव्वालीचे. त्यात रफीचा स्वतंत्र ठसा आहे. सार्‍या कव्वाली दर्जेदार नसतीलही मात्र "हसते जख्म" मधली "ये माना मेरी जां मुहब्बत सजा है" सारखी कव्वाली हा मला तरी कव्वालीच्या श्रेष्ठतेचा मानदंड वाटतो. शायरी आणि तत्सम हळुवार गीतांमध्येही रफीचंच पारडं जड भासतं. बहादुरशहा जफरच्या “लगता नही है दिल मेरा उजडे दयार में” साठी रफीच योग्य वाटतो. “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है” हे जेव्हा गुरुदत्त पडद्यावर पोटतिडकीने विचारतो तेव्हा त्याला रफीच्याच आवाजाचा आधार असतो. फार कशाला, "प्यासा" मध्ये "तंग आ चुके है कशमकशे जिंदगीसे हम" ही गुरुदत्तची कैफीयत गाण्याच्या स्वरुपात नाही. मुशायर्‍यात शेर ऐकवावेत त्या तर्‍हेने ते म्हटलं गेलंय. पण त्यामागील आर्त, वेदनेने भरलेला आवाज रफीचा आहे. काव्यगुणांनी युक्त अशी गाणी मिळण्याच्या बाबतीत रफी सुदैवी ठरला असे म्हणणे हे त्याच्यातल्या गुणवत्तेवर अन्याय करण्यासारखे आहे. त्याच्या आवाजाची जातकुळी वैविध्यपूर्ण गाण्यांसाठी योग्य होता आणि त्याची "रेंज" मोठी होती हे मान्य करावं लागेल. त्यामुळेच कदाचित “गाईड” साठी देव आनंद आणि एस्.डी.बर्मनला रफीची गरज भासलीच. सात फिल्मफेअर मिळालेल्या या चित्रपटात किशोरच्या वाट्याला आलेलं एकमेव गाणं म्हणजे “गाता रहे मेरा दिल”. चित्रपटातील भक्तीसंगीताच्या दृष्टीने गायकांचा अभ्यास केला गेला आहे कि नाही माहित नाही पण "तेरे भेरोसे हे नंदलाल", "जय रघुनंदन जय सियाराम" (घराना), "इन्साफ का मंदिर है ये" (अमर), "दुनिया ना भाये मोहे" (बसंत बहार) अशी एकाचढ एक गाणी रफी येथे गाऊन गेला आहे. किशोरची भक्तीगीतं मला चटकन आठवत नाहीत.

रफी गेल्यावर त्या तर्‍हेने गाण्यार्‍यांचे दिवस आले होते. "तुमने दी आवाज लो मै आ गया" म्हणुन शब्बीर कुमार आला. लक्ष्मीकांत प्यारेलालने "गुलामी"त "जिहाले मिस्किन" सारखं गाणं त्याला दिलं. पण पुढे काहीच झालं नाही. "मय से मिनासे ना साकी से" म्हणत मोहम्मद अजीज आला. नंतर कुठे विरुन गेला कळलेच नाही. रफीच्या हयातीत अन्वरने "मेरे गरीब नवाज" साठी "कस्मे हम अपनी जान कि खाये चले गये" सारखं अप्रतिम गाणं गावुन आशा निर्माण केली होती. पण त्यालाही वाव मिळाला नाही. या माणसांच्या गुणवत्तेबद्दल आदर बाळगुन म्हणावसं वाटतं कि यांची रफीशी कुठल्याच तर्‍हेने तुलना होऊ शकत नव्हती. एकदा दिलीपकुमार तलत आणि रफीची तुलना करताना मार्मिकपणे बोलुन गेला होता 'तलतची गाणी विशिष्ट प्रकारची आहेत ती त्यांनाच आवडतील जे तशा प्रकारची आवड बाळगतात ("जो उस तरहा का जायका रखतें हो" असे शब्द युसुफ साहेबांनी वापरले होते) मात्र रफीची "रेंज" जबरदस्त होती त्यामुळे तो सर्व तर्‍हेची गाणी गाउन गेला असेच युसुफमियांना म्हणायचे असावे. येथे कुठल्याही गायकाला तुलना करुन रफीपेक्षा कमी ठरवण्याचं मी टाळलं आहे. त्यापेक्षा गाण्यांचा, त्यातील वैविध्याचा, पडद्यावर ती गाणी गायिलेल्या अभिनेत्यांचा अभ्यास करुन काही त्यातुन मिळतंय का हे पाहाण्याचा हा प्रयत्न आहे. "जजमेंटल" न बनण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र आज रफीसाहेबांचं पुण्यस्मरण करताना शेवटी ही शास्त्रीय, काटेकोर परिभाषा थोडी बाजुला ठेवावीशी वाटते. कारण माझ्यासाठी रफी हे नाव देवाखालोखाल आहे. आजवरच्या वाटचालीत आनंदाचा फार मोठा भाग रफीसाहेबांच्या गाण्यांनी व्यापला आहे. अशा माणसांबद्दल फक्त कृत़ज्ञताच व्यक्त करता येते. आत्म्याच्या अमरत्वाबाबत फार बोललं जातं. आत्म्याचं तर माहीत नाही पण रफीसाहेब त्यांच्या गाण्यांमुळे खरोखरंच अमर झालेत. "दिल का सुना साज तराना ढुंढेगा" या गाण्यात रफीसाहेब एका ठिकाणी म्हणतात "मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा..." खरं आहे रफी साहेब, तुमच्यानंतर आम्ही तुम्हाला शोधत बसलो. दुसरं कुणीही मिळालं नाही. आता शोध थांबवला आहे. कारण या सम हाच हे सत्य आता आमच्या लक्षात आलंय. तुम्ही आमच्यात नाही आहात हे खरं नाहीच. कधीही तो चिरपरिचित आवाज कानावर पडतो आणि वाटतं 'तु कहीं आसपास है दोस्त...तु कहीं आसपास है दोस्त...'

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख... अजूनही रफीसाहेबांना विसरता येत नाही.

माझ्या आवडीची काही गाणी..

मेरी दुनियामें तूम आये ( हीर रांझा ),
तूमसे कहू इक बात परोंसी ( दस्तक ),
कही एक सुंदर नाजूक सी लडकी ( शंकर हुसेन)
तूमने मुझे देखा होकर ( तिसरी मंझिल ),
नैन लड गयी है तो ( गंगा जमना )
उनके खयाल आये तो ( लाल पत्थर )
झलकाये जाम ( मेरे हमदम मेरे दोस्त )
किसीके याद मे ( जहॉं आरा )
बात मुद्दतके ये घडी ( जहाँ आरा )
ये जो चिल्मन है ( मुहोब्बत कि मेहंदी )

अतुल, भक्ती संगीतात... सुख के सब साथी, दुख मे ना कोय. ( सगीना -- बहुतेक )
बडी देर भयी कब लोगे खबर मोहे राम ( बसंत बहार ) पण अप्रतिमच आहेत.

अतुल....

"महंमद रफी" हे असे एक नाव जे आपल्या हृदयात वसलेले आहे आणि व्यावहारिक भाषेत बोलायचे झाल्यास जरूर त्यांच्या निधनाला ३५ वर्षे होत आली असली तर त्यांची स्मृती तीळभरसुद्धा कमी झालेली नाही...होणेही नाही. नेमकी हीच भावना तुमचा वरील लेख स्पष्ट करीत आहे. रफी, किशोर, मुकेश, मन्ना डे, महेन्द्रकपूर....पाच नावे. अशी नावे की ज्यानी आपापल्या परीने चित्रपट संगीताद्वारे आपल्या आयुष्याला एक मधुरता दिली जी आपण कायम जपू इच्छितो. "हा मोठा की तो मोठा" अशा धर्तीची तुलना या क्षेत्रात आपण टाळूच शकत नाही....आणि या मुद्द्यावर तासोनतास चर्चा झाली तरी उठताना वादाची सतरंजी एखाद्या निकालाने झटकली गेली असेही होत नाही. उद्या पुन्हा जमल्यावर पुन्हा हाच खेळ नव्याने.

पांढर्‍या सूर्यप्रकाशात सात रंग असतात हे न्यूटनने जरी खूप वर्षांपूर्वी सांगितले असले तरी एकच गळा गाण्यातील सर्व भाव...नऊ रस दाखवू शकतो हे आपण रफीकडून विविध प्रकारची गाणी ऐकत असलेल्या दिवसापासून माहीत करून घेतले आहे....ही खरेतर ईश्वरदत्त देणगी. अनेक गायकांची नावे तुम्ही वानगीदाखल दिली आहेत लेखात, पण गेली ६० वर्षे रफीचा सूर कानांना लुभावत आहे....दरम्यान कित्येक गायक आले मागून पण पुढे जायच्या आधीच धापा टाकत बाजूलाही झाल्याचे आपण पाहिले आहे. अर्थात अशा उदाहरणामुळे रफीचे श्रेष्ठत्व शाबीत होते असे नसून जो आवाज पूर्णत्वाने आपल्या नित्य दिनाशी बांधला गेला आहे त्याशिवाय आपण संगीतमय जीवन कल्पूच शकत नाही असे झाले आहे....ही रफीची जादू.

एका सुंदर लेखामुळे रफींची आठवण अजूनही उजळून निघाली...त्याबद्दल तुमचे अभिनंदन.

मला किशोर आवडतो. पण मी रफीच्या प्रेमात पडलो तो "पांव छु लेने दो फूलों को इनायत होगी" हे ऐकल्यावर. निव्वळ स्वर्गीय.

काही वर्षांपूर्वी, सकाळच्या लेक्चर्स / प्रॅक्टीकल्स ना हजेरी लावून, दुपारी घरी टंगळ-मंगळ करत असताना, दुपारी १.३० वाजता विविधभारती वर 'आप की फर्माईश' (तेच ते झुमरीतलैय्या से चुन्नू, मुन्नू और उनके बहोत सारे साथी वालं) मधे रफी चं, 'फिर वह भूलीसी याद आयी है' ऐकलं होतं. त्यात, 'आँख में बूंद भर जो पानी है| प्यार की इक यही निशानी है| रोते बीती है जो बिताई है|' ह्या कडव्याला 'रोते बीती' ला जी जागा रफी ने घेतलीये, त्यावर म्हणजे 'वाह! मैं सदके जावा' असं वाटलं होतं. खरच रडू 'कोसळणार' असं तेव्हा वाटलं होतं आणी आज ईतक्या वर्षांनी ते गाणं ऐकताना, त्या जागेवर, पुनःपुन्हा तेच वाटतं.

मला असं वाटायचं की मी मुकेश चा फॅन आहे (आणी तसा आहे देखील), पण खरं सांगायचं तर मी फक्त श्रवणीय गाण्याचा फॅन आहे असं जेव्हापासून जाणवलय तेव्हापासून त्या श्रवणीय गाण्यात (अगदी सोनु निगम, श्रेया घोषाल वगैरे धरून), रफी च्या गाण्यांची संख्या (दर्जा विषयी काय बोलावं. तो प्रांत जाणकारांसाठी ठेवावा) खूप मोठी आहे. रफी ची गाणी मनात घर ही करतात आणी मनावर गारूड ही करतात, असा तो रफी अंतर्बाह्य झपाटतो.

आता रफी ला श्रद्धांजली म्हणून दिवसभर यु-ट्यूब वर रफी लावून काम करणार.

छान लेख, रसिक दिग्गजांच्या प्रतिक्रिया.अनेक अनेक उल्लेखनीय गाण्यांमधला तो रेशमी अनुनयस्वर ..त्यातून आत्ता आठवतं ते एक युगुलगीत आहे ''सारा मोरा कजरा चुराया तूने '' ( दो दिल) अशी किती गीतं आपल्या जगण्यातला एक एक दिवस सुंदर करणारी रफीसाहेबांची,
त्यांच्या दिलदारपणाच्या कथा हा एक स्वतंत्र विषय..

सुंदरच लेख अतुलराव. यादगार गायकाची तितकीच सुरेख आठवण.
तुलना करण्यात अर्थच नाही कारण मामा म्हणतात तसे सतरंजी घालून बसावे लागेल (तसेही बसू कधीतरी !)

बाबा मुकेशचे आणि काका किशोरचे प्रचंड फॅन असल्याने रफीची गाणी तितक्या तन्मयतेने लहानपणी ऐकू शकलो नाही. शेजारील वस्तीत कायम दर्दभरे फिल्मी नगमे चालू असायचे त्यामुळे ती रडकी वाटणारी गाणी नावडेनाशी झाली.

यात बदल घडला तो 'खोया खोया चांद' आणि 'तेरे मेरे सपने अब एक रंग है' या दोन गाण्यांमुळे. संगीताच्या फूटपट्टीवर ही गाणी कुठे बसतात माहित नाही पण रफीची रेंज, मधाळ तरीही व्याकूळ करून जाणारा आवाज याची जाणीव करुन देण्यासाठी ही गाणी 'गाईड' ठरली Happy
मग पुढे हळूहळू समग्र ओळख होत गेली, आवड जोपासली गेली.

अतुलजी, क्या बात है! सारखं सारखं ह्या धाग्यावर येतोय, काही नविन (?) गाणी / माहिती कळतेय क ते बघायला. रफी ची गाणी तर चालूच आहेत बॅकग्राऊंड ला.

भारतीने आठवण काढलेल्या गाण्यासारखीच गाणी

१) लूटी जहाँसे बेवजह पालखी बहार की, ( वो हम ना थे, वो तूम न थी )
२) फीर आने लगा याद मुझे प्यार का आलम ( सोबत शारदा बहुतेक )
३) दो बदन प्यारकी आगमे जल गये, एक चमेली के मुंडवे तले ( सोबत आशा )
४) वो है जरा खफा खफा, तो नैन यू चुराये है ( सोबत लता )
५) आज मौसम बडा बेईमान है, आनेवाला कोई तूफान है
६) आज की रात, ये कैसी रात, के हमको नींद नही आती ( सोबत सायरा बानो )
७) जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है ( सोबत शारदा बहुतेक )
८) छा गये बादल नीलगगन पर, खुल गया कजरा साँझ ढले ( सोबत आशा )

भारती....

"दो दिल" च्या त्या युगल गीताची आठवण काढलीस आणि मन रफीसोबतीने चटदिशी गेले ते आरती मुखर्जीकडे. बंगालची लताच आरती म्हणजे. हिंदीमध्ये लताआशाच्या बरोबरीने ती आपले स्थान निर्माण करू शकली नाही ते साहजिकच; पण बंगाली चित्रपटांतून तिचा आवाज सातत्याने ऐकू येतो. "दो दिल" च्या जोडीने मला आठवतात तिचे "तपस्या" ("दो पंछी दो तिनके...") आणि "मासूम" मधील "दो नैना और एक कहानी"....

रफीच्या निमित्ताने ही गायिका आठवली....छान वाटले.

>>सुख के सब साथी, दुख मे ना कोय. ( सगीना -- बहुतेक ) <<
गोपी.

आजच्या काळात मोहम्मद रफि साहेबांच्या आवाजाच्या जवळपास कोण जाउ शकत असेल तर तो म्हणजे सोनु निगम...

तशी रफीची बरीच गाणी आवडती आहेत. पण अत्यंत आवडतं गाणं: ये दुनिया उसीकी जमाना उसीका.

अख्ख्या गाण्यामध्ये रफीने जो दर्द ओतलाय त्याला तोड नाही. त्या गाण्यावरचा शम्मी म्हणजे बोलायचं काम नाही, बघायचंच!!!!!

खूप छान लेख.. ..

भारती दीदी..
तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे फिर ये सुबह ये शाम रहे ना रहे दो दील मधलंच ना?

स्वप्न झरे फुलसे मित चुभे शूल से - अंगावर शहारे आले होते गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा. नीरजचे अप्रतिम शब्द.
दिल पुकारे आ रे आ रे --- गोडवा
पास बैठो तबियत बहाल जायेगी, मौत भी आ गायी हो तो टल जायेगी
आंखो ही आंखो में इशारा हो गया - ओपी चं अप्रतिम संगीत
आजकी रात मेरे दिलकी सलामी ले ले
आये बहार बनके लुभाकर चले गये
आप युंही अगर हमसे मिलते रहे
आप के हसीन रुख पे आज नया नूर है
अभी न जाओ छोडकर
ऐसे तो ना देखो … गोडव्याची परिसीमा
हम आपकी आंखोमे
हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये
-----------------
दमलो टाईप करून. सध्या माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एवढीच टंकतो…

फ़ार फ़ार हळवी तार छेडलीत, अतुलभाऊ. रफ़ीसाहेब अत्यंत (अत्यंत) आवडत्या गायकाम्मधले एक.
मदन मोहनचं "तुम जो मिल गये हो" रफ़ीनं कसल्या उंचीला नेऊन ठेवलय. धम्माल गाण्यांमधे किशोरचा नंबर पयला आणि तो एकच नंबर लावण्याआधी रफ़ीचं "मेरि जा बल्ले बल्ले" (काश्मीर की कली), "नैन लड जै है" (गंगा-जमना??) ऐकायलाच हवं.
मला तरी काही क्षणांचा साक्षी होण्याचा वर मिळाला तर ह्या दोन गाण्यांचं रेकॊर्डिंग अनुभवायचय... स्टुडियोत उभं राहून.
रफ़ीच्या फ़िल्मेतर गझलांबद्दल नाही लिहिलत? प्लीज. लिहाच अतुल.
अप्रतिम लेख हे सांगायला हवं?

__/\__

बता ऐ जिंदगी ये राझ क्यूँ हैं ?
ये जिनेका नया अंदाज क्यूँ हैं ?
खामोशी अगर मौत हैं आदमी की,
रफी की हर तरफ आवाज क्यूँ हैं ?

ना फनकार तुझसा तेरे बाद आया, मोहम्मद रफी तू बहोत याद आया !

http://mohdrafi.net/star-speaks

श्री ४२० ह्या सिनेमातली गाणी मन्ना डे, मुकेश ह्यांनी गायलेली आहेत.
पण रमया वस्तावैय्या ह्या गाण्यात रफीसाहेबांनी काही थोड्या ओळी त्याही कुठल्यातरी एक्स्ट्राच्या तोंडी गायलेल्या आहेत. पण त्यातली ती शेवटची तान जबरदस्त आहे. सगळ्या गाण्यावर कळस चढवते.
जबरदस्त ताकदीचा पण अत्यंत सुरेल आवाजाचा हा गायक म्हणजे देवाची देणगीच.

वाह! अतुलसाहेब अतिशय सुंदर लेख.. लेखाच दर्जा सुधा रफ़ी सारखाच.. कोणाला न दुखावणारा... लोकांना सचिन आवडतो कारण तो मैदना इतकाच मैदाना बाहेर ग्रेट आहे... त्याच वागण बोलण सभ्य आहे... रफ़ी हे तसेच होते आणि म्हणून ते लोकांना जास्त आवडतात... त्यांचे किस्से ऐकले तर ते किती निश्पाप, सभ्य होते हे कळते... रफ़ींना सलाम.. लेखाला सलाम...

अतिशय सुरेख लेख Happy

प्रदिपकुमारचा "ताजमहाल" मधला "जो वादा किया वो निभाना पडेगा" कोण विसरु शकेल? "भीगी रात" चित्रपट माहित नसेलही पण "दिल जो न कह सका" हे प्रदिपकुमारने गायिलेलं क्लासिक गाणं विसरता येत नाही. अभिनयाच्या मर्यादा असलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट रफीने फक्त आपल्या आवाजाच्या जोरावर अजरामर केले आहेत.>>>>याच्यासाठी हजारो मोदक Happy Happy

रच्याकने, माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एकः
"कही एक मासूम नाजुकसी लडकी, बहोत खुबसुरत मगर सांवलीसी"

चित्रपटः शंकर हुसेन

अप्रतिम लेख..रफी अत्यंत आवडतो...

१ जो वादा किया वो निभाना पडेगा
२ जरा सामने तो आओ छलिये
३ अजहुन आये बालमा
४ दिल जो न कहे सका
५ अभि न जाओ छोडकर
६ रोशन तुम्हीसे दुनिया

Pages