आपलेच दात आणि आपलेच ओठ !

Submitted by SureshShinde on 26 July, 2014 - 23:49

" गुड मॉर्निंग सर! माझ्या आजच्या पेशंटचे नाव आहे, मंदा देशमुख! नगरजवळच्या कारेगाव येथून ती कालच आपल्या युनिटमध्ये ऍडमिट झाली आहे. तिचे वय अठरा वर्षे असून ती शाळेत जात असते व तिचे वडील शेती करीत असतात. मंदा गेली पंधरा दिवस आजारी आहे. तिच्या मुख्य तक्रारी आहेत सांधेदुखी, ताप येणे, छातीमध्ये धडधड होणे व खाल्ल्यानंतर दम लागणे. गेले पंधरा दिवस तिला ताप येतो आहे. ताप जास्तीत जास्त एकशे एक फॅरनहाइट पर्यंत असतो व सकाळच्या प्रमाणात संध्याकाळी जास्त असतो. तापाच्या सुरुवातीस तिचा उजवा गुडघा सुजून दुखू लागला होता, दोन तीन दिवसांनंतर तो बरा झाला पण लगेचच डावा खांदा दुखू लागला. चारपाच दिवसात तो बरा झाला व डावा कोपर दुखू लागला. त्यानंतर लगेचच दोन्ही मनगटे देखील सुजून दुखू लागली, नंतर पुन्हा डावा गुडघा. आता तर तिला चालताना देखील खूप त्रास होतो आहे. गेले पंधरा दिवस तिला छातीमध्ये धडधड झाल्यासारखे सतत जाणवते व चालताना दम लागल्यासारखे वाटते. गेले दोनतीन दिवस तिच्या दोन्ही पावलांवर थोडी सूज आली असून तिच्या चप्पल तिला घट्ट होत आहेत. ''
पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक चौदामध्ये नुकत्याच "पोस्टींग'' झालेल्या नवीन शिकाऊ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या तुकडीमधील एक चुणचुणीत विद्यार्थी आमच्या युनिटचे मानद तज्ज्ञ व नामवंत मधुमेह तज्ज्ञ डॉ.सुभाष काळे यांना वरील मुलांची केस "प्रेझेंट'' करीत होता.

bedsideTeaching.jpg

हे क्लिनिक घडत होते १९७४ साली वॉर्ड क्र.१४ च्या शेजारी असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी राखून ठेवलेल्या 'क्लिनिक रुम' मध्ये! क्लिनिक रुममध्ये विद्यार्थ्यांसाठी वीस एक खुर्च्या ठेवलेल्या असत व रुग्णासाठी एक कॉट ठेवलेली असे. शेजारीच क्लिनिक घेणाऱ्या म्हणजेच रुग्णाच्या आजाराची माहिती कशी विचारावी, रुग्ण कसा तपासावा, त्याचे निदान कसे करावे हे शास्त्र शिकविणाऱ्या अनुभवी शिक्षकांसाठी एक खुर्ची ठेवलेली असे. आम्ही 'वॉर्डचे रेसिडेंट डॉक्टर्स' आमच्या वॉर्डमध्ये नेमणूक झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक रुग्ण नेमून देत असू. त्या त्या विद्यार्थ्याने आपल्याला नेमून दिलेल्या रुग्णाच्या आजाराची माहिती त्याच्या 'जर्नल' नावाच्या वहीत लिहून व तपासण्यांच्या नोंदी करुन त्यावर आमची सही घ्यावयाची असे. दररोज सकाळी एका विद्यार्थ्याची व त्याच्या रुग्णाची 'क्लिनिक' साठी निवड होत असे. त्या पेशन्टची केस त्या दिवशी क्लिनिक घेणाऱ्या सिनियर डॉक्टरांना एका ठरावीक पद्धतीने प्रेझेंट करावी लागत असे. आपण तो रुग्ण कसा तपासला, आपल्याला आजाराची काय काय लक्षणे दिसून आली व त्यावरुन काय प्राथमिक निदान केले हे सरांना व त्याबरोबरच इतर सर्व विद्यार्थ्यांना सांगावे लागत असे. सर ते सर्व ऐकून त्या विद्यार्थ्याच्या उणिवा दाखवीत असत अथवा स्वतः पेशंट कसा तपासावा हे दाखवीत असत.
मंदा देशमुख या रुग्णाच्या कॉटवर नेमणूक झाली होती राजू मोतीवाला नावाच्या एका हुशार विद्यार्थ्याची. मंदा देशमुखने दाखल होण्यापूर्वी तिच्या गावातील 'लोकल' डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती. पण आजारात काहीच फरक न पडल्याने व प्रकृती खालावत चालल्यामुळे त्यांनीच तिला पुण्याला पाठविले होते. राजू मोतीवालाने तिच्या तब्येती विषयक खूपच माहिती जमा केली होती. सध्याचा आजार होण्यापूर्वी सुमारे एक महिना आधी तिला जोरदार घसादुखी झाली होती. हळदीचे दूध, गरम पाण्याची वाफ इ. घरगुती उपायांनी ती हळूहळू बरी झाली होती. मंदाच्या सध्याच्या आजाराचा व तिच्या घसादुखीचा एकमेकांशी काही संबंध असेल याची तिच्या आईवडिलांना मुळीच कल्पना नव्हती. मात्र राजू मोतीवालाला काही दिवसांपूर्वीच "संधिवात व त्यामुळे होणारा हृदयविकार' या विषयावर ऐकलेले भाषण आठवले व मंदाला त्या प्रकारचाच काही आजार असायची शंका आली होती. ही केस डॉ.सुभाष काळे यांना प्रेझेंट करायची असल्यामुळे त्याने या आजारा संदर्भातील सर्व माहिती रात्रीच वाचून काढली होती. अनेक साथीचे आजार अथवा संसर्गजन्य आजार हे काही अतिसूक्ष्म जिवाणू अथवा विषाणूपासून होतात. 'बॅक्टेरिया' हा या सूक्ष्म जीवांचा एक प्रकार असतो. या बॅक्टेरीयांचे अनेक प्रकार असून त्यांच्या वैशिष्ट्यांप्रमाणे त्यांना ओळखता याचे अशी नावे दिलेली आहेत. बॅक्टेरीया हे एक-पेशीय प्राणी असून त्यात नरनारी असा लिंगभेद नसतो. त्याच्या ठरावीक वाढीनंतर त्यांच्या शरीरातील डी.एन.ए.चे व शरीरावरील आवरणाचे दोन भाग होऊन दोन नवे जीव तयार होतात. ही क्रिया दर वीस मिनिटांनी होते. मुबलक खाद्य पदार्थ उपलब्ध असल्यास त्यांची प्रजा अत्यंत भरभर वाढते. हे बॅक्टेरीया म्हणजे प्रथिने तयार करणारे नैसर्गिक कारखानेच! मानवाने मोठ्या चतुराईने बॅक्टेरीयाच्या या वाढीचा उपयोग इन्शुलीन सारखी औषधे कृत्रिम रीतीने तयार करण्यासाठी करुन घेतला आहे. इन्शुलीन तयार करणारे जनुक मानवी पेशीतून वेगळे करुन ते काही विशिष्ट बॅक्टेरीयांच्या 'डी.एन्.ए.'मध्ये जोडले जाते. असे जनुक संक्रमित बॅक्टेरीया आपली पैदास वाढवीत असतानाच 'इन्शुलीन'चीही पैदास करतात. हेच इन्शुलीन शुद्ध करुन मधुमेही रुग्णांना वापरतात.

insulinProdn.jpg

अशी अनेक औषधे तयार करण्यासाठी ही जैविक पद्धती आता वापरली जात आहे. जणू 'बॅक्टेरीया' आपले गुलामच झाले आहेत! पण तरीदेखील आजार तयार करणारे खूप प्रकारचे बॅक्टेरीया आजही मानव जातीस त्रास देत आहेत. गोलाकार असलेले जे बॅक्टेरीया फक्त एकाच दिशेमध्ये वाढू शकतात ते सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासले असता मण्याच्या माळेप्रमाणे दिसतात. यांना स्ट्रेप्टोकोकाय असे म्हणतात. अनेक दिशांमध्ये वाढू शकणारे बॅक्टेरीया द्राक्षाच्या घडाप्रमाणे दिसतात. स्ट्रेप्टोकोकाय मानवी शरीरावर हल्ला करण्यासाठी अनेक घातक संयुगे तयार करतात. अशाच एका घातक संयुगाचा उपयोग मानवाने रक्तवाहीन्यांच्या जीवघेण्या आजारासाठी केला आहे. त्यातील एक औषधाचे नाव आहे, 'स्ट्रेप्टोकायनेज'! रक्ताची गुठळी विरघळवणारे हे औषध मानवाने प्रयोगशाळेत तयार करुन त्याचा वापर हृदयविकार व अर्धांगवायूच्या झटक्यामध्ये करुन अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे. आपल्या शरीरामध्ये जेव्हा त्वचा अथवा अंतःत्वचा यांची सुरक्षा भेदून शरीरत प्रवेश करतात तेव्हा आपल्या शरीरातील संरक्षक पेशी त्यांना गिळंकृत करतात व त्याच्या शरीरावरील प्रथिनांना ओळखणारी प्रतिप्रथिने-'अँटीबॉडीज' तयार करतात. अशी विशिष्ट अँटीबॉडी तयार करणाऱ्या संरक्षक पेशीची एक नवीन टोळी तयार होते. पुन्हा जेव्हा कधी असे ओळखीचे प्रथिन असणारे बॅक्टेरीया शरीरात शिरले की ताबडतोब या प्रशिक्षित संरक्षक पेशी अँटीबॉडीज तयार करुन रक्तात सोडतात व त्यामुळे या बॅक्टेरीयाचा नाश केला जातो. मात्र काही बॅक्टेरीयाच्या आवरणातील प्रथिने आपल्या शरीरातील प्रथिनाशी जवळचे साम्य असणारे असतात. यालाच म्हणतात 'मोलेक्युलर मिमिक्री' म्हणजेच 'संयुगांची नक्कल'. त्यामुळे तयार झालेल्या अँटिबॉडीज बॅक्टेरीयांना तर चिकटतातच पण आपल्याच शरीरातील पेशींनाही चिकटतात व काही विचित्र आजार निर्माण करतात. या आजारात शरीरात बॅक्टेरीया नसतात पण त्यांच्यामुळे तयार झालेल्या आपल्या अँटिबॉडीज व आपलेच शरीर असे युद्ध सुरु होते. 'आपलेच दात आणि आपलेच ओठ'! या अशा एका आजाराचे नाव आहे 'ऱ्हुमॅटीक फिव्हर'. अशा रुग्णांचे सांधे दुखतात, ताप येतो व मुख्य म्हणजे हृदयाला सूज येते. कालांतराने सांधेदुखी बरी होते पण हृदयाची सूज ओसरताना मात्र हृदयाच्या झडपा कायमच्या निकामी होतात व हृदयविकार तयार होतो. म्हणूनच म्हणतात 'ऱ्हुमॅटीक फिव्हर' हा सांध्याला केवळ चाटून जातो पण हृदयाला मात्र चांगलाच चावून जातो. असेच दुसऱ्या एका जातीच्या स्ट्रेप्टोकोकायमुळे झालेल्या त्वचा संसर्गामुळे मूत्रपिंडास सूज येऊन 'नेफ्रायटीस' हा आजार होतो. म्हणून घसादुखी अथवा त्वचेवरील जखमांमध्ये झालेला संसर्ग याच्याकरिता लवकरात लवकर वैद्यकीय सल्ल्यानुसार 'अँटीबॉयॉटीक ' औषधे घेतल्यामुळे पुढे भविष्यकाळात होणारे गंभीर आजार शंभर टक्के टाळता येतात. पेनिसिलीनसारख्या या औषधांमुळे बॅक्टेरीयांभोवती असलेले आवरण तयार होण्यास प्रतिबंध होतो व मग असे संरक्षक कवच नसलेले दुबळे बॅक्टेरीया शरीरातील संरक्षक पेशी पटकन मारु शकतात.
मंदा देशमुखला खरोखरच 'ऱ्हुमॅटीक फिव्हर' झाला होता. छातीचा एक्स-रे व ईसीजी यावरून तिच्या हृदयाला आलेली सूज स्पष्ट दिसत होती. 'एएसओ' नावाची अँटीबॉडी तपासणी तिला स्ट्रेप्टोकोकायचा संसर्ग होऊन गेल्याचे दाखवीत होती. तिला पेनिसिलीन, ऍस्पीरीन व स्टेरॉईड अशा उपाययोजना केल्यामुळे पुढील तीनचार दिवसातच तिची तब्येत बऱ्यापैकी सुधारली. मंगळवारी सकाळी डॉ.सुभाष काळे यांनी तिला घरी जाण्यास परवानगी देखील दिली. मात्र तिला पुन्हा स्ट्रेप्टोकोकाय जंतूंचा संसर्ग व ऱ्हुमॅटीक फिव्हर होऊ नये म्हणून वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत दर महिन्यातून एकदा 'पेनिसिलिन'चे इंजेक्शन घेण्याचा सल्ला व त्याचे महत्त्च समजावून सांगण्याचे ते विसरले नाहीत.
नेहमीप्रमाणे पुन्हा बुधवार उजाडला. आमच्या युनिटचा ओपीडीचा दिवस. वॉर्डच्या इन्चार्ज सिस्टरांनी नवीन दाखल होऊ घातलेल्या रुग्णासाठी नवीन दहा कॉट स्वच्छ चादरी व लाल ब्लॅंकेट व उशी ठेवून तयार करुन ठेवल्या होत्या. त्या दिवशी राजू मोतीवालाच्या कॉटवर पुन्हा एक तरुण मुलगीच दाखल झाली. तिचे नाव होते शकुंतला पाटील! वीस वर्षांची शकुंतला दिसण्यास अत्यंत आकर्षक, गौर वर्ण व उत्तम बांध्याची होती.
युनिटच्या ईमर्जन्सीच्या दिवशी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नवीन रुग्णाची टिपणे आपल्या जर्नलमध्ये नोंदविण्यासाठी विद्यार्थी संध्याकाळीच वॉर्डमध्ये येत असत. स्वतः रुग्ण तपासून निदान करण्याची संधी तेव्हाच मिळत असे. नवीन नवीन प्रकारचे रुग्णही पाहायला मिळत असत. शकुंतलाची 'हिस्टरी' घेण्यासाठी राजू मोतीवालाने तिच्या कॉटशेजारील स्टुलावर बैठक मारली व तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. पण ती मुलगी काहीच बोलत नव्हती. हातपाय आखडून ती कॉटवर झोपली होती. तिच्या शेजारीच तिची आई उभी होती. राजूच्या प्रश्नांना तिनेच उत्तरे द्यायला सुरुवात केली. त्या मायलेकी पुण्याजवळच्या पाटस या गावामधून आल्या होत्या. "डॉक्टर, माझ्या मुलीला संधिवात झाला आहे. गेली दहा दिवस तिला खूपच ताप येत आहे. शरीरातील सर्व सांधे सुजले आहेत, दुखताहेत, तिला धड चालताही येत नाही. जेवण तर पारच तुटले आहे. आम्ही गेले तीन-चार दिवस केडगावमधील मिशन दवाखान्यात इलाज घेतला पण काहीच गुण नाही. तेथील डॉक्टरांनी हे पत्र दिले आहे असे म्हणून तिच्या आईने एक कागद मोतीवालाच्या हातात दिला. केडगाव मिशन हॉस्पिटल हे त्या भागातील एक चांगले हॉस्पिटल असून त्या भागातील लोकांना गेली अनेक वर्षे अत्यल्प मोबदल्यामध्ये उत्तम वैद्यकीय सेवा देण्याबाबत प्रसिद्ध होते. मोतीवालांनी भरभर त्या पत्रावरुन नजर फिरवली.
"सदर रुग्णाला 'ऍक्युट ऱ्हुमॅटीक फिव्हर' झाला असून आम्ही गेले तीन दिवस तिला पेनिसिलीन व ऍस्पीरीन दिले आहे. पण तिला काही एक फरक पडत नाही. तिच्या हृदयाचे ठोके एकशेचाळीस पर्यंत असून 'डिगॉक्सीन' हे औषध देऊनही तिचे ठोके कमी होत नाहीत. तिच्या हृदयाला सूज येऊन त्याचे कार्य कमी झाले आहे. अशा रुग्णांवर आमच्या छोट्या हॉस्पिटलमध्ये उपचारांची सोय नसल्यामुळे तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये पाठवीत आहोत. धन्यवाद!''
मोतीवालांनी तिची तपासणी करुन आपल्या जर्नलमध्ये नोंदी केल्या व 'ऱ्हुमॅटीक फिव्हर व मायोकार्डीयटीस विथ फेल्युअर' असे निदान लिहून ठेवले. उद्या सकाळच्या राऊंडला डॉ.काळे आपल्याला नक्कीच शाबासकी देतील याची मोतीवालांना खात्री वाटत होती. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणेच बरोबर साडेनऊ वाजता डॉ.सुभाष काळे सर वॉर्डात येऊन दाखल झाले. पहिलाच पेशंट होता 'शकुंतला पाटील'. मी सरांच्या युनिटचा हाऊसमन असल्यामुळे तिची त्या केसविषयीची माहिती सरांना सांगत होतो. माझे बोलणे चालू असतानाच सिस्टरांनी चपळाई करुन पेशंटच्या कॉटभोवती दोन तीन पडदे उभारुन आडोसा तयार केला होता. डॉ.काळे सर शकुंतलाचे नखशिखांत परिक्षण करीत होते. तिचा हात हातात घेऊन नाडी पाहत होते. तिचे पाय, पोट, छाती तपासत होते. मी शकुंतलाचे केलेले निदान जणू त्यांना पटत नव्हते. काही तरी खटकत होते.
"मुलांनो, मी तुमच्या मताशी सहमत नाही. या मुलीला संधिवात आहे यात शंकाच नाही पण तो ऱ्हुमॅटीक फिव्हर मात्र नाही. ऱ्हुमॅटीक फिव्हरमध्ये बॅक्टेरीया नसतात, त्यामुळे 'पू' तयार होत नाही. तिच्या अनेक साध्यांमध्ये 'सेप्टिक' झाल्याची लक्षणे आहेत. तिच्या उजव्या स्तनामध्ये देखील 'पू' झाला आहे. याचा अर्थ तिच्या शरीरामध्ये कोठेतरी 'सेप्टिक फोकस' आहे. तिच्या छातीचा एक्स-रे व स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. माझा राऊंड संपल्यानंतर तिच्या आईला मला साईड रुममध्ये भेटण्यास सांगा''. डॉ.काळे यांनी नर्सला सूचना केली.
सरांच्या तर्कशुद्ध विचारपद्धतीमुळे आम्ही अवाक झालो होतो. खरोखरच आमच्या मनात हा विचार आलाच नव्हता. भरभर काम उरकण्याच्या गडबडीत व अनुभवाच्या अभावामुळे ही महत्त्वाची लक्षणे आमच्या नजरेतून सुटली होती व आमचे प्राथमिक निदान चुकले होते.
राऊंड संपवून हात धुऊन आम्ही सरांच्या सोबत शेजारच्या रुममध्ये शिरलो. शकुंतलाची आई तेथेच उभी होती. "बाई, तुमच्या मुलीची तब्येत अतिशय गंभीर आहे. या आजारातून ती बरी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तिच्या शरीरामध्ये कोठेतरी 'पू' झाला आहे.
तिचे लग्न झाले आहे काय?
तिची मासिक पाळी कधी आली होती?
तिची आई खूपच घाबरलेली होती तिला बोलताही येत नव्हते. आम्ही पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर मात्र ती अचानक रडू लागली. थोड्या वेळानंतर तिने आपल्या भावनांना आवर घातला व जी माहिती दिली ती अतिशय धक्कादायक होती.
ती म्हणाली, "साहेब, माझ्या लेकीचे लग्न झालेले नाही. आमची लेक अतिशय देखणी आणि उफाड्याची. पण तिने गावात आम्हांला तोंड दाखवायला देखील जागा ठेवली नाही. तिला उलट्या व्हायला लागल्यावरच मला संशय आला. खोदून विचारल्यावर ती कबूल झाली. पण त्या मुलाचा बाप आमच्या गावचा पाटील. त्यांची न् आमची काय बरोबरी. त्याच्या वडिलांची लग्नाची तयारी नव्हती. मग काय, मीच छातीवर दगड ठेवला व तिच्या मायांगात काडी घातली. पुन्हा एकदा अश्रू अनावर झाल्याने ती बोलण्याची थांबली. दोनचार दिवसात पोरगी मोकळी झाली.'' प्रतिष्ठेसाठी शकुंतलाच्या आईने शकुंतलाचा जीव चांगलाच धोक्यात घातला होता. त्यावेळी आत्तासारखी सोनोग्राफीची सोयदेखील नव्हती. पण आता निदान स्पष्ट झाले होते, 'सेप्टिक ऍबॉरशन'!
डॉ.काळे सरांनी तातडीने स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टरांना 'रेफरन्स' लिहिला. क्लोरोमायसेटीन, जेन्टामायसिन ही ब्रॉडस्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स शिरेतून सुरु केली.
तासाभरातच ओपीडी संपवून स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.सुलोचना गायकवाड यांनी वॉर्ड क्र. १४ च्या साईडरुममध्ये शकुंतलाला तपासले. तिच्या गर्भाशयाच्या मुखातून 'पू' बाहेर येत असलेला त्यांनी आम्हांला दाखविला. हृदय विदारक दृष्य होते ते.
"तिच्या आईला बोलवा, मी त्यांच्याशी बोलू इच्छिते'' डॉ.गायकवाडांनी सिस्टर इन्चार्जला सांगितले. "बाई, तुझ्यासाठी वाईट बातमी आहे. मन घट्ट कर. तुमची मुलगी शंकूंतला तीन महिन्याची गरोदर आहे. तिच्या गर्भाशयामध्ये जंतूचा संसर्ग होऊन पू झाला आहे. गर्भपिशवी म्हणजे पुवाची पिशवी झाली आहे. तो 'पू' तिच्या सर्व शरीरात पसरत चालला आहे. तिचा जीव वाचविण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे तिची गर्भपिशवी ऑपरेशन करुन काढून टाकावी लागेल व हे ऑपरेशन ताबडतोब म्हणजे आताच केले तरच तिचे प्राण वाचतील.''
शकुंतलाच्या आईने मटकन जमिनीवर बैठकच मारली. पुन्हा एकदा अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. तोपर्यंत शकूचे वडीलही आले होते. आम्ही एका कागदावर झालेल्या सर्व गोष्टीची माहिती लिहून ऑपरेशनकरिता संमतिपत्र तयार करुन त्यावर त्या दोघांच्या सह्या घेतल्या. डॉ.काळे सरांनाही कळविले. ऑपरेशनला आता आणखी उशीर होणे म्हणजे रुग्णाच्या प्राणाशी गाठ होती. पुढील दोन तासातच भरभर चक्रे फिरली. रक्ताच्या तीन बाटल्या 'रिझर्व्ह' केल्या. तिचा रक्तगट 'बी' पॉझिटिव्ह होता. माझाही तोच असल्यामुळे मी रक्तदान केले. तिच्या वडिलांनीही रक्त दिले. अभिमानाची गोष्ट म्हणजे, राजू मोतीवालाचा ब्लड ग्रुपही तोच असल्यामुळे त्यानेही रक्तदान केले. ऑपरेशन थिएटर, भूलतज्ज्ञ डॉक्टर इत्यादी सर्व प्राथमिकता पूर्ण करुन शकुंतलाची शस्त्रक्रिया झाली. तीच गर्भाशय पूर्णपणे सडले होते. ते काढून उदरपोकळीचे 'टॉयलेट' म्हणजे स्वच्छता करुन आतील स्त्राव बाहेर येण्यासाठी "ड्रेन' नावाची रबरी नळी ठेवली होती. तिची भूल उतरेपर्यंत राजू मोतीवाला आणि त्याचे मित्र तिच्या शेजारीच उभे होते. निसर्ग किती दयाळू आहे पहा की ऑपरेशन होताच तिच्या नाडीचे ठोके नव्वदपर्यंत खाली आले. जणू शकुंतलाच्या आयुष्याला लागलेले ग्रहण सुटत चालल्याची ती पूर्वसूचनाच होती. पुढील तीनचार दिवसांत शकुंतलाच्या तब्येतीत भरभर आणि भरपूर सुधारणा झाली. दोन आठवड्यांमध्ये ती पूर्ण बरी झाली पण या प्रसंगाने व्यथित होऊन की काय तिची जणू वाचाच गेली होती. एवढा मोठा आघात एवढ्या लहान वयात तिने मोठ्या धैर्याने सहन केला होता. आमची, तिची तशी चांगलीच ओळख झाली होती. मोकळ्या वेळात तिला थोडेसे बोलते करण्याचा प्रयत्न मी व सिस्टर इनचार्ज मिळून अनेक वेळा केला. पण तिने आपले मन कधीही मोकळे केले नाही. तिला डिसचार्ज देताना आमची मने भरुन आली होती. जणू आमचे एक अदृश्य नाते तयार झाले होते. मी तिच्या आईला बाजूला घेऊन आता गावातील लोकांना काय सांगणार असे विचारले. "सांगीन अपेंडीक्सचे ऑपरेशन झाले म्हणून आणि तशीच वेळ आली तर आम्ही तिघे दुसऱ्या गावी निघून जाऊ. कष्ट काय कोठेतरी करायचेच. या गावात नाही तर दुसऱ्या. तसाही त्या गावाचा वीट आला आहे आम्हांला. बघू काय होते ते.'' मोठी धाडसाची बाई !
वरील प्रसंगाला जवळजवळ तीन महिने होऊन गेले. दैनंदिन नवनवीन रुग्णांच्या उलाढालीमध्ये मी शकुंतला पाटीलला पूर्ण विसरलो. एके दिवशी बुधवारी ओपीडी संपवून मी वॉर्डमध्ये काम करीत बसलो होतो. सिस्टर इनचार्ज एका जोडप्याला घेऊन माझ्याकडे आल्या व जवळजवळ ओरडल्याच. "डॉक्टर, या मुलीला ओळखले का?'' क्षणभर मीही गोंधळलो. पण माझ्या लक्षात आले की माझ्या समोर हिरवा चुडा घालून हाताला मेंदी लावून चमकणारे मंगळसूत्र घालून उभी असलेली हसतमुख नवरी होती आमची पेशंट शकुंतला पाटील ! त्या दोघांनी खाली वाकून पाय धरले, नमस्कार केला. "सर, तुम्ही मला अनेक वेळा विचारले होते तेच हे, विश्वासराव ! परवाच आमचे लग्न झाले. जेजुरीला जाण्याआधी तुमच्या सर्वांच्या आणि या वॉर्डच्या दर्शनासाठी येण्याची कल्पनाही त्यांचीच !
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गावी नेल्यानंतरच्या घटना वेगाने घडल्या होत्या. विश्वासच्या कानापर्यंत ही सर्व बातमी पोहोचली होतीच. आपला जीव शकुंतलावर जडला असल्याची जाणीव त्याला झाली होती. आपल्या भावनावेगामुळे व आपल्या वडिलांच्या हट्टामुळे शकुंतलाला कोणत्या दिव्यातून जावे लागले हे ऐकून त्याची झोपच उडाली होती. अखेर आईवडिलांनी समजावून सांगण्यात तो यशस्वी झाला व त्यांना लग्नाला राजी केले. शकुंतलाला मूल होणार नाही याची कल्पना तिच्या आईवडिलांनी दिल्यावर तो पण हेच म्हणाला होता की, अनेक जोडप्यांना परमेश्वर मूलबाळ देत नाही. आम्हांला हे लग्नाआधीच कळाले एवढेच ! काही दिवस दुरावलेला 'विश्वास' परत मिळाल्याचा आनंद शकुंतलेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. महाकवी कालिदासाच्या 'शाकुंतल' नाट्याने भारावून जाऊन जर्मन कवी गेट आनंदाने नाचला होता. गेटची तीच भावनिक स्थिती वॉर्ड क्र. १४ चा सर्व स्टाफ देखील अनुभवत होता.
इति शाकुंतलम्!
• • •

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लगेच पुढचा लेख .सुरेख सुरेख आणि सुरेखच.
शेवटचा प्रसंग वाचताना तर खरच खूप आनंद झाला( घटना १९७४ सालची असली तरी आणि १९७४ सालची आहे म्हणूनच . आज काल असे मुल होणार नाही हे मान्य करून लग्न करणारे बरेच आहेत का ? ) Happy बायकांना काय काय सहन करावे लागते Sad

यापुर्वीच्याही एका लेखात काडी मुळे झालेल्या संसर्गाचा उल्लेख होता म्हणजे हा अघोरी आणि भयानक प्रकार सर्रास वापरात असावा.

सुंदर लेख. शेवट आवडला.

म्हणूनच . आज काल असे मुल होणार नाही हे मान्य करून लग्न करणारे बरेच आहेत का ?>>> "बरेच" माहित नाही, पण एका मैत्रीणीला लग्नाआधीच मूल होणार नाही हे माहित असूनदेखील तिच्या प्रियकरानं तिच्याशीच लग्न केलं. अगदी मागच्या डीसेंबरमध्ये लग्न झालं!

फारंच सुरेख लेख - १९७४ मध्ये अशा मानसिकतेचा नवरा होता हे वाचून आश्चर्यमिश्रित आनंद झाला.

बायकांना काय काय सहन करावे लागते !! >>>> +१००

फारंच सुरेख लेख - १९७४ मध्ये अशा मानसिकतेचा नवरा होता हे वाचून आश्चर्यमिश्रित आनंद झाला.

बायकांना काय काय सहन करावे लागते !! >>>> +१००>>>>>>>+१०००००

डॉकटर साहेब, तुमचे लेख हे नेहमीच उत्कंटतावर्धक आणि माहितीपुर्ण असतात आणि म्हणुन मी नेहमीच त्याची आतुरतेन वाट बघत असतो.

मधलं ऑपरेशनचं वर्णन वाचताना कालवाकालव होत होती पण शेवटी सुखांत पाहून जीव भांड्यात पडला! पण दुर्दैवाने सगळ्याच मुली इतक्या भाग्यवान नसतात हे वास्तव आहे Sad

धन्यवाद डॉ.साहेब, आपली अशी अनुभवांची पोतडी आमच्यासमोर उलगडून दाखवत आहात त्याबद्दल.
केवळ शब्दातीत अनुभव आहेत.

लेख नेहेमीप्रमाणेच मस्त !
प्रतिष्ठेसाठी शकुंतलाच्या आईने शकुंतलाचा जीव चांगलाच धोक्यात घातला होता. > बापरे ! भयाण!
शेवट मात्र सुखद .

सुंदर लेख. वाचायला सुरुवात केल्यावर लगेच लक्षात आले होते की हा"ऱ्हुमॅटीक फिव्हर"
मी देखिल ऱ्हुमॅटीक फिव्हर ची पेशंट होते. मी सातवीत असताना निदान झाले ... ते दिवस डोळ्यासमोर उभे राहीले. माझ्या वयाच्या बाविस वर्षापर्यंत मी 'पेनिसिलिन'चे इंजेक्शन घेतले. सुरवातील दर १५ दिवसांनी आणि नंतर दर महीन्यानी. प्रत्येक इंजेक्शनच्या दिवशीचा आईचा काळजावलेल, भेदरलेला चेहरा आठवतो... दर वेळी.. काय हे माझ्या लेकीच्या मागे लागले...

असो.. आता मी पुर्णपणे नॉर्मल आहे... त्या वेळच्या आमच्या डॉक्तरांचं निदान अचुक होतं.. मनापासुन धन्यवाद त्यांना.. आणि डॉ शिन्दे तुम्हालासुध्दा... आज खुप आठवणी जाग्या केल्यात तुम्ही!

प्रसंगाचे वर्णन सुरेख केलं आहे डॉक तुम्ही. शकुंतलावर गुदरलेला प्रसंग जीवघेणा असला तरिही तुमच्या सारख्या देव माणसांमूळेच ती वाचली. पण विश्वास सारख्या माणसांनीही त्याला हातभार लावला. Happy

ज्या काळात आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ही घटना घडली ते पाहता विश्वासचा फार अभिमान वाटला. करुन सवरुन नामानिराळे राहणे तर शक्य होतेच पण 'मूल होऊ शकणार नाही' हेच किती सबळ कारण होते शकुंतलाला नाकारण्याचे.
ही घटना चित्रपटात पाहिली असती तर फार आदर्शवादी दाखवलंय, इतकी माणुसकी दाखवली जाईल हे अशक्यच असं एकदातरी मनात आलंच असतं.

ही घटना लोकांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद Happy

सर, आपल्या वैद्यकीय कथांचा एखादा चाहता आपली कथा एखाद्या ठिकाणी पुनर्मुद्रित करु शकतो का? तुमच्या कथांची मालिका चालवली तर चालेल का?
माहितीसाठी विचारले आहे.

Pages