रहस्य सप्तसुरांच..... (भाग १)

Submitted by विनित राजाराम ध... on 26 July, 2014 - 08:26

रात्री १२ ची वेळ .....अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे चुकवत अभिषेक बाईक चालवत होता. रेनकोट घातलेला असला तरी पूर्णपणे भिजून गेलेला होता.... रस्त्यावरचे दिवे तर आतमध्ये पाणी गेल्याने काही ठिकाणी बंदच होते. अर्ध्या रस्त्यावर प्रकाश तर अर्ध्या रस्ता काळोखात बुडालेला.... वीजही मधेच कडाडत होती... त्यामुळे एक वेगळचं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.... तरीही अभिषेक घरी यायला निघाला होता.... उशीरच झाला होता त्याला....

कसाबसा अभिषेक त्याच्या एरियात पोहोचला. तिथेही काही वेगळ वातावरण नव्हतं... हवा सुटलेली... त्यात मुसळधार पाऊस ... वीज तर आकाशात धिंगाणा घालत होती.. आणि त्याची बाईक बंद पडली... " शट्ट यार.... हिला काय आताच बंद पडायचं होतं ? "..... खूप प्रयन्त केला त्याने , पण ती बंदच होती.... घडयाळात बघितलं त्याने ..... १२.१५ झाले होते . मग करणार काय ? बाईक ओढत ओढत तो घेऊन जाऊ लागला.... mobile बाहेर काढला तर पावसात भिजून बंद होणार म्हणून तो bag मध्येच राहू दिला... तसं घर आता जवळच होतं परंतु बंद पडलेली बाईक , सुसाट वाहणारा वारा, त्यात पाऊस या combination मुळे अभिषेक वैतागला होता...... कसाबसा पोहोचला घरी… बघतो तर काय... घरात काळोख... त्याने बाजूला डोकावून पाहिलं... " अरेच्या... आजूबाजूला तर लाईट आहे.... आमच्याच घरातली गेली वाटते... " अभिषेकचं घर तसं मोठ्ठ होतं.... बंगलाच जणू काही. त्याच्याबरोबर त्याची बायको, एक नोकर, आई-बाबा आणि लहान भाऊ राहायचे. पण आज कोणीच बाहेर आलेले नव्हते...... अभिषेकनी बाईक बाहेरच उभी केली. भिजलेला रेनकोट काढला आणि दाराबाहेरच्या कुंठीवर अडकवला.... दारावरची बेल वाजवली.... बेल सुद्धा बंद... " काय झालंय इकडे.. " दारावर त्याने थाप मारली.... एकदा ... दोनदा.... आतून कोणाचा प्रतिसाद नाही... दरवाजा त्याने हातानेच ढकलून पाहिला तर दरवाजा उघडाच होता... " दरवाजा उघडा कसा ? " अभिषेकला आता संशय येऊ लागला होता… तसाच तो आतमध्ये आला.... मिट्ट काळोख घरात.. पुढचं काहीच दिसत नव्हतं... बाहेर आकाशात वीज चमकली तरच काहीतरी दिसत होता... चाचपत तो घरात आला.. आणि त्याच्या बायकोला ... आई-बाबांना, भावाला हाक मारू लागला.... कोणताच प्रतिसाद नाही... तेवढ्यात .... " आलात साहेब.... मी तुमचीच वाट बघत होतो."असा आवाज आला, त्याच्या मागून... मागे वळून बघतो तर त्याचा नोकर मेणबत्ती पकडून उभा...

केवढा दचकला अभिषेक..... heart attack यायचा बाकी होता त्याला.. " गाढवा... असं कोण येत का समोर " अभिषेक बोलला ," आणि बाकीचे कुठे आहेत…. लाईट का घालवली आहेस .. " ,"लाईट गेली आहे साहेब , म्हणून मेणबत्ती पेटवली आहे."," आणि बाकीचे कुठे गेले सगळे ? " त्यावर नोकर काही बोलला नाही....... " अरे गधड्या.......... तुला विचारतो आहे मी ", मख्ख चेहऱ्याने नोकर म्हणाला ," चला.... तुम्हाला पण पोहोचवतो तिथे.... " .... आणि तो पुढे चालू लागला... अभिषेकला नक्कीच काहीतरी गडबड आहे याची खात्री पटली होती. तो नोकर त्याला आवडायचाच नाही. काहीतरी वेगळ्याच स्वभावाचा होता तो. संशयी नजर... कामात चोख असला तरी... वेगळाच वाटायचा तो अभिषेकला... अभिषेकला तो main hall मध्ये घेऊन आला. " काय झालं .. थांबलास का ? " अभिषेकने त्याला विचारलं. " असंच.... तुम्हाला काही द्यायचं आहे... हि मेणबत्ती पकडा जरा... " अभिषेकने एका हाताने मेणबत्ती पकडली आणि दुसऱ्या हाताने तो आपली पिस्तुल शोधू लागला. पण पिस्तुल तर बाईक वरच राहिली होती. नोकर वळला. तसा अभिषेकने त्याच्या हातात सुरी बघितली... " काय करतो आहेस हे? " अभिषेक घाबरतच म्हणाला ," नाही.... तुम्ही बोलला होतात ना... बाकीचे कुठे आहेत ते... त्यांच्याकडे घेऊन जातो तुम्हाला... " त्याच्या नोकराने सुरी त्याच्यासमोर रोखून धरली.... जणू काही तो कोणत्याही क्षणाला त्याच्या छातीत भोसकणार.. तेवढयात....तेवढयात....आकाशात पुन्हा वीज जोरात कडाडून गेली.... आणि अभिषेकच्या हातातली मेणबत्ती विझली. पुन्हा भयाण शांतता ... आणि अचानक... घरातले सगळे दिवे लागले... " surprise " घरातली सगळी मंडळी एकत्र बोलली आणि गाऊ लागली .... Happy Birthday To You, Happy Birthday To You, Happy Birthday To Dear अभिषेक ,Happy Birthday To You......... सगळे होते.. अभिषेकच कुटुंब.... त्याचे मित्र-मैत्रीण... शेजारी.. " अरे... हो... आज माझा वाढदिवस आहे... विसरलोच मी... " अभिषेक मनातल्या मनात हसत बोलला... समोर केक होता.... आणि नोकर अजूनही हातात सुरी घेऊन उभा होता...अभिषेकने पुढे येऊन त्याच्या डोक्यावर टपली मारली आणि सुरी घेऊन केक कापला. खूप छान पार्टी जमली होती त्या रात्री.... " काय Inspector अभिषेक ...... घाबरवलं ना तुम्हाला... " त्याची बायको पुढे येऊन बोलली.त्यावर अभिषेक हसला. " घाबरलो... अगं heart attack आला असता मला... खरंच खूप छान surprise होत .. मी कधीच विसरणार नाही हे... "," happy birthday अभी... " अभिषेकचा बेस्ट friend " महेश पुढे येऊन म्हणाला, " काय डॉक्टर साहेब, तुम्हाला पण आठवण होती वाटते माझ्या वाढदिवसाची... " अभिषेक म्हणाला," Inspector, कामात असताना थोडं घरीही देत जावा जरा... " आणि अभी ने पुढे होऊन महेशला मिठी मारली.

अभिषेक Inspector होता आणि महेश डॉक्टर होता .... दोघेही एकत्रच काम करायचे. पोलीस Department साठी... लहानपणापासून मित्र होते ते ... एकत्र वाढलेले... एकत्र शिकलेले... दोघानांही पोलिसात जायचे होते. अभिषेकची निवड लगेच झाली. पण महेशची उंची थोडी कमी असल्याने त्याची निवड झाली नाही. मग त्याने डॉक्टर बनून पोलिसांची medical team join केली. वेगळ्या Department मध्ये असूनही मैत्री तरीही तशीच होती दोघांची. खूप केसेस त्या दोघांनी मिळून सोडवल्या होत्या. म्हणून त्या दोघांची जोडी फ़ेमस होती....

दुसरा दिवस उजाडला.... छान झोप झाली होती. रात्री पार्टीही उशिरापर्यंत चालली होती आणि आज सुट्टीचा दिवस... रोज सकाळी लवकर उठणारा अभी... आज सकाळी १० वाजता उठला... छान फ्रेश वाटतं होतं त्याला, सुट्टी असल्याने आणि वाढदिवस... मूड चांगला होता, कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला असा त्याने मनात plan केला. अंघोळ करून तो तयार झाला. सगळ्या कुटुंबाला आपला plan सांगणार इतक्यात त्याचा mobile वाजला,पोलिस स्टेशन मधून call होता," हेलो... बोला काय झालं ? " , अभिषेकने विचारलं," हेलो सर.... प्रसिद्ध संगीतकार " सागर " यांचा खून झाला आहे.. तुम्हाला लवकर यावं लागेल... त्यांच्या घरी.. "," ठीक आहे.. निघतोच मी." सगळा plan रद्द . अस अनेकवेळा झालं होतं, त्यामुळे कुटुंबाला त्याची सवय झाली होती. अभी काही बोलण्याच्या आधीच त्याची बायको बोलली," मला काही problem नाही , Duty first " .

थोड्याच वेळात अभिषेक पोहोचला तिथे... मिडियावाले तर कधीच पोहोचले होते.. त्यांच्या रूम मधे पोहोचला अभी.... तसे बाकीचे पोलीसही होते तिकडे.. " सर, यांच्या नोकराने फोन करून सांगितलं आम्हाला.. " , "OK , काही मिळालं का घरात ? पुरावा वगैरे ."," नाही सर, फक्त एक letter मिळालं आहे .... त्यातलं वाचून काहीच कळलं नाही आम्हाला.. " ," बघू इकडे... आणि बॉडी post-mortem साठी पाठवा." अभीने Letter उघडून पाहिलं... त्यात काहीतरी वेगळाच मजकूर होता," संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा " डोक्याच्या वरून गेलं अभिषेकच्या... खोलीत त्याने अजून काही पुरावा मिळतो का ते पाहू लागला. रूम मधील सामान होते तसेच होते. कसलीच तोडफोड नाही, उलटा-पालट नाही, मारामारी ... झटापट अस काहीच झालं नव्हत रूममध्ये.... चोरी झाली नव्हती, पैसे... दागिने... कसलीशी महत्वाची कागदपत्र.... सगळ जागच्याजागी होतं…. टेबलावर कपबशी होती तेवढी.. " याचा अर्थ , खुनी.. ओळखीचा व्यक्ती होता.. टेबलावर २ कप आहेत.... घरातल्या वस्तू तशाच आहेत... काहीच चोरी झालेली नाही,मग खून कशाला केला असेल त्याने... " , गोळी मारली होती त्यांना… आणि पिस्तुल बाजूलाच ठेवली होती.. पुरावा म्हणून त्याने ते दोन्ही कप आणि पिस्तुल बरोबर घेतली.

काहीच तपास लागत नव्हता. दुसऱ्याच दिवशी "सागर" यांचा वाढदिवस होता आणि त्या अगोदरच , आदल्यादिवशी त्यांचा खून झाला होता,खूप पाहुणे आले होते.. त्या सगळ्यांचे बोटांचे ठसे घेण्यात आले. एक गोष्ट होती मात्र कि बाहेरचा कोणीही अनोळखी व्यक्ती नव्हता तिथे... आणि कोणाचेही ठसे त्या पिस्तुलवर किंवा दुसऱ्या कपावर नव्हते. शिवाय सगळी पाहुणे मंडळी.. या " बडया " व्यक्ती होत्या. मोठी नावाजलेली माणस होती. त्यामुळे कोणावरही संशय घेऊ शकत नव्हता अभिषेक... सगळ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. post mortem चा रिपोर्ट आणण्यासाठी तो स्वतः पोहोचला डॉक्टर महेशकडे. " काही तपास लागला का अभी.. ", " नाही रे .... काहीच कळत नाही, कोणताच पुरावा नाही मिळत, कोणाचे बोटांचे ठसे नाही.. तुझा रिपोर्ट काय म्हणतो ? " ," रिपोर्ट जरा विचित्र आहे." ," काय विचित्र ? " , " त्यांची हत्या गोळी मारून नाही झाली आहे." ," काय बोलतो आहेस तू ? " ,"त्यांना विष देण्यात आलं होतं.","मला जरा सविस्तर सांग .","त्यांना जेव्हा त्याने गोळी मारली तेव्हा ते अगोदरच मेलेले होते."," मग गोळी का मारली असेल ? " ," कदाचित confirm करण्यासाठी.... "," आणि पिस्तुल वर कोणाचे ठसे मिळाले का ? " ," नाही , एक गोष्ट आहे... पिस्तुल त्यांचाच आहे.... त्यांनी safety साठी ठेवलेलं असेल कदाचित.... "," कोणत विष वापरलं होतं ? " ," हं ... हेच तर सांगायचे आहे तुला.... खुन्याला science ची चांगली माहिती आहे.... कारण त्याने अगदी साधं विष वापरलं होतं... ","म्हणजे रे " ," मला त्यांच्या शरीरात Plaster of Paris चे कण मिळाले... शिवाय त्या कपात तर तेच सापडलं... " ," मग त्याने काय होणार आहे?"," हेच तर..... जास्त कोणालाच माहित नाही आहे.... Plaster of Paris ची थोडी पावडर जर दुधात किंवा दुधापासून बनणाऱ्या पदार्थात mix केली तर ते एक slow poison बनते. यांनी तर चहा घेतला असणार.... त्यात आरोपीने ती पावडर mix केली असेल... सुरुवातीला काहीच जाणवत नाही… मात्र नंतर त्याचा प्रभाव जाणवू लागतो,किमान २ तासांनी माणूस जीव सोडतो." डॉक्टर महेशने सांगितलं," चांगली माहिती दिलीस मित्रा.. आणि ते पत्र... त्यावरून काही कळल का ?"," हा..... ते जे काही लिहिलं आहे ते कळण्यापलीकडे आहे पण ते अक्षर " सागर " यांचाच आहे. म्हणजे त्या खुन्याने त्यांच्याकडून लिहून घेतलं असेल... मरण्याअगोदर... " सगळीच गुंतागुंत होती....

आठवडा झाला तरी काहीच सुगावा लागत नव्हता.... पुरावे काहीच नव्हते.होतं ते फक्त ते Letter. चौकशीसाठी त्यांच्या नोकराला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले," शेवटची तुझी भेट कधी झाली होती ?"," रात्री १० वाजता... ","आणि त्यांनतर कोण भेटायला आलं होतं का त्यांना?","त्यांचा सावत्र मुलगा आलेला भेटायला... ११ वाजता,पण तो लगेचच बाहेर पडला... १०-१५ मिनिटात…" डॉक्टरच्या रिपोर्ट नुसार " सागर " यांचा मृत्यू रात्री ३ ते ४ दरम्यान झाला होता... " म्हणजे त्यांना.... विष साधारणपणे १,२ च्या सुमारास दिलं असणार... याचाच अर्थ त्यांच्या सावत्र मुलाचा यात काही हात नसणार... मग नक्की आहे तरी कोण ? " बरं... CCTV मधून काही मिळालं असतं तर तेही आरोपीने येण्याअगोदर बंद करून ठेवले होते. विचार करत करत २ आठवडे निघून गेले.. तपासाला काहीच गती येत नव्हती, सारखा तोच विचार अभिषेकच्या मनात...

" आज काहीतरी नक्की भेटलं पाहिजे ." असा विचार करून अभिषेक पोलिस स्टेशनमध्ये आला..खुर्चीवर बसणार तोच त्याचा फोन वाजला, " hello, Inspector अभिषेक " ,"yes सर.... बोला.. " अभिच्या सरांचा फोन होता... " अभिषेक... एक केस आहे... तुम्हाला तातडीने पोहोचावं लागेल.. " ," OK,सर .. कुठे जायचे आहे ? "," क्रिमिनल लॉयर " रेशमा टिपणीस" यांचा काल त्यांच्या घरी खून झाला आहे. लवकरात लवकर पोहोचा तिथे." अभिषेक तसाच पोहोचला तिथे.... मिडिया तर त्याच्याही अगोदर पोहोचली होती तिकडे," या मिडीयाला अगोदर कशी माहिती मिळते."," माहित नाही सर... आमच्याही अगोदर हे आलेले होते. " ," त्यांना बाहेर करा आधी.... तपासात गडबड होईल नाहीतर.... " तसं हवालदारने त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं.... अभिषेकने तपास सुरु केला.... पुन्हा तसंच सगळं... गोळी मारून हत्या... पुरावे काहीच नाहीत.. चहाचे कप... तसंच Letter , तोच मजकूर.... रूम मधल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी.... post mortem चा रिपोर्ट तोच... " हा खून... त्यानेच केला आहे.... ज्याने सागर यांचा खून केला होता.... पद्धतही तीच आहे. चहाच्या कपात पुन्हा मला Plaster of Paris ची पावडर मिळाली. त्यांच्या पोटातही तेच मिळालं... गोळीही त्यांच्या safety gun मधून मारली गेली आहे, तीसुद्धा त्या मेल्यानंतर.. ", " आणि अजून काही मिळालं का तुला तिकडे अभी.. "," बाकी काहीच नाही... ना बोटांचे ठसे.... ना काही पुरावे... मिळालं ते letter आणि तोच मजकूर.... "संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा " कश्यासाठी खून होत आहेत ते कळतच नाही आहे. "

सागरप्रमाणे रेशमा यांचाही खून त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी झाला होता.... दोन्ही खुनात खूप साम्य होतं.... खून रात्रीचाच झाला होता, साधारण ३-४ च्या दरम्यान... CCTV बंद करून..... वाढदिवसासाठी आलेले पाहुणे, त्यातही कोणीच नव्हतं.. संशय घेण्यासारखं... एका महिन्यात २ प्रसिद्ध व्यक्तीची हत्या आणि अभिषेक व डॉक्टर महेश या दोघानाही आरोपीला पकडण्यात यश आलं नव्हतं. खूप तपास चालू होता, दोन्ही हत्येचा… कसलेच धागेदोरे हाती लागत नव्हते.... पुरावेच नव्हते त्यांच्याकडे.... मग कोणाला अटक करणार... २ महिने होत आलेले , तरी काहीच प्रगती नव्हती. अभीवर सुद्धा त्याच्या मोठ्या अधिकारीचं प्रेशर होतं. हल्ली रोज उशिरा येऊ लागला होता अभिषेक घरी. दोन्ही केसेस मध्ये बुडून गेलेला अगदी तो.. अशातच एका सकाळी , तो नुकताच आंघोळ करून चहा घेत होता, तयारीसुद्धा झाली नव्हती आणि त्याला call आला ... " Hello सर, TV लावा लवकर , Breaking News आहे... " ," काय आहे ? " अभिषेकने वैतागूनच फोन कट केला आणि TV चालू केला, " प्रसिद्ध नृत्यदीरदर्शक गजेद्र यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला आहे... पोलिस तपास करत आहेत.. " पुढंच काहीच त्याने ऐकल नाही. अभी ने तशीच पोलिसची वर्दी चढवली आणि निघाला तो घटनास्तळी. मिडिया नेहमी प्रमाणे त्याच्या अगोदर पोहोचली होती. त्यांचा अभिषेकला खूप त्रास व्हायचा. त्यांच्याकडे एक नजर टाकून अभी त्यांच्या खोलीत पोहोचला, बाकीचे पोलिस इतर ठिकाणी तपास करत होते... अभिषेकने एक नजर फिरवली रूममध्ये... पुन्हा तसच सगळं.... कुठेही तोडफोड नाही, मारामारीची चिन्ह नाहीत... तशीच " Well Plan Murder "... तेच Letter, तोच मजकूर.... एकच गोष्ट वेगळी होती ती म्हणजे चहाचे कप नव्हते.त्याऐवजी एक रिकामा ग्लास होता तिथे... अभीनी तोही मग डॉक्टर महेश कडे पाठवून दिला.

रिपोर्ट हि तेच होते, मागच्या दोन खुनांसारखे... फक्त त्या ग्लासमध्ये दुध होतं. " यावेळी त्याने चहाच्या ऐवजी दुधात पावडर मिसळली आहे. " महेशने अभी ला माहिती पुरवली. " तुला काय वाटते महेश.... कशासाठी खून करत असेल तो ? " अभिषेकने महेशला विचारलं," मलाही काही कळत नाही, तरीही काहीतरी कारण नक्की असेल त्याचं आणि त्या Letter वरून काहीच कळत नाही ना... " ," गेल्या ४ महिन्यात ३ नावाजलेल्या व्यक्तिच्या हत्या झाल्या आणि मला काहीच मिळत नाही. " ," कदाचित तुझ्याकडून काही सुटत असेल बघ " ," नाही रे . काहीच नाही... एकही पुरावा नाही मिळत... कुठेच त्याचे फिंगर प्रिंट्स नाही आहेत, Letter हि तो मरणाऱ्या व्यक्तीकडून लिहून नंतर त्यांना मारतो... CCTV बंद करतो... कसलाही आवाज न करता स्वतःचा काम पूर्ण करतो.. विचित्र आहे अगदी.. " ," अरे अभी... पण तूच म्हणतोस ना.... आरोपी कितीही हुशार असला तरी काहीना काही पुरावा मागे सोडतोच, मग आता काय झालं ? " , " नाहीच भेटत आहे रे पुरावा." मग दोघेही शांत झाले, थोड्यावेळाने दोघेही आपापल्या घरी गेले.

अभिषेकला तर झोपच लागायची नाही आता.. मिडिया खूप त्रास देत होती पोलिसांना... तिसऱ्याच दिवशी, अभिषेक पुन्हा काहीतरी शोधण्यासाठी " गजेंद्र " यांच्या घरी गेला, अगदी सकाळीच, त्याने शोधायला सुरुवात केली.... आणि त्याचा फोन वाजला.... हल्ली फोन वाजला कि त्याला तेच वाटायचं सारखं," Hello Inspector अभिषेक speaking... कोण बोलतंय... ? " , " Hello .... मी महेंद्र यांचा मुलगा बोलतो आहे.... लवकर या तुम्ही इकडे ... " , " Hello....Hello....काय झालंय नक्की .. "," माझ्या पपांना गोळी मारलीय कोणीतरी" तो रडतच सांगत होता. अभिने फोन कट केला... "सावंत... चला गाडी काढा लवकर... " , " काय झालं सर... आताच तर आलो होतो ना पुरावा शोधायला.. " ," हो... पण आपल्याला जावं लागेल ." ," कुठे सर ? " ," बिजनेसमन महेंद्र माहित आहेत ना... त्यांची हत्या झाली आहे."

अभिषेक त्याच्या टीमसहित पोहोचला त्यांच्या घरी, मिडीयाने त्यांना आल्या आल्याचं घेरलं..... ," काय करताय तुम्ही .... गेल्या ४ महिन्यात ४ था खून... तुम्ही पकडत का नाही खुन्याला... "अभिषेक काहीही न बोलता Dead Body जवळ आला... तीच पद्धत खून करण्याची... Letter लिहिलेलं... सगळं तेच पुन्हा... यावेळी मिठाईचा बॉक्स होता तिथे... खूप तपास करूनही काहीही नाही मिळालं. Dead Body आणि मिठाईचा बॉक्स त्याने चाचणीसाठी डॉक्टर महेश कडे पाठवून दिलं. विचार करतच तो बाल्कनीत आला,घराबाहेर मिडिया तशीच होती. त्यांचा तर अभिषेकला खूप राग यायचा. पण यावेळेस कुणास ठावूक.... त्याला त्यांच्याकडे बघून काहीतरी आठवलं. ," सावंत... त्यांच्यापैकी एकाला वर घेऊन या इथे माझ्याजवळ" ," OK सर... " तसं एका पत्रकाराला वर घेऊन आले... पत्रकार जरा घाबरलेलाच होता," काय झालं सर ? मी काही चूक केली आहे का ? मलाच बोलावलं म्हणून विचारलं मी... "," नाही... मला काही प्रश्न विचारायचे होते... विचारू का ? " तसा पत्रकार थोडा relax झाला. ," विचारा ना सर.. " ," आतापर्यंत ४ हत्या झाल्या... तुम्ही होतात ना प्रत्येक वेळेस तिथे... " ," हो सर , In fact आम्हीच पोहोचलो होतो... तुमच्याही अगोदर... " , " हेच..... हेच विचारायचे आहे मला... आमच्या अगोदर कशी खबर मिळाली प्रत्येकवेळेस .... " तसा पत्रकार जरा बावरला... " मला .... प्रत्येक वेळेस call आले होते... " ," कसले फोन ? " ,"हेच कि... यांचा यांचा खून झाला आहे…. तर त्यांच्या घरी पोहोचा लवकरात लवकर.. "," साधारण किती वाजता call यायचे ? " , " चारही वेळेस call पहाटे ४.३० लाच आलेले होते." ," आणि हे फक्त तुलाच आले होते कि खाली जमलेल्या मिडिया ला सुद्धा आले होते. " ," हो... बहुतेक सगळ्यांना call गेले होते, अगदी same timing ला.. " अभिषेकने अजून काही पत्रकारांना बोलावलं, त्यांचाही तेच उत्तर होतं... अभिषेकने त्या सगळ्यांची call History चेक केली.सगळ्यांनाच ४.३० ला call आले होते. नंबर मात्र वेगळाच होता. अभिषेक पोलिस स्टेशन मध्ये आला, त्याने त्याच्या computer expert ला विचारलं," हो सर, असा एक program आहे ज्यावरून सगळ्यांना एकत्रच call करता येतो."," कस काय ? " ,"एक program आहे... त्यात फक्त तुम्हाला तुमचा record केलेला message टाकायचा असतो आणि नंतर कोणाकोणाला तो call करायचा आहे त्यांचे नंबर टाकायचे... बसं.. सगळ्यांना एकदम call जातात. " चांगली माहिती मिळाली होती अभिषेकला. आता post mortem चा रिपोर्ट बाकी होता.

रिपोर्ट काही वेगळा नव्हता... तीच वेळ खून करण्याची... पण यावेळेस तिथे मिठाईचा बॉक्स सापडला होता," काय सापडलं मिठाई मध्ये.. ? " ," मिठाईत नाही, त्याच्यावर सापडलं.. " ," काय " ," मलाही तेच वाटत होतं कि पावडर मिठाईत mix करून दिली असणार... पण त्याने मिठाईवर पावडर टाकून त्यांना खायला दिली असेल.... "," असं होय.... " ," बाकी काही मिळाला का पुरावा वगैरे.. ", " नाही रे... खूनी भलताच हुशार आहे... काहीच मागे ठेवत नाही.. ","अरे हो... एक सांगायचं राहून गेलं तुला." तसा महेश उठला आणि एक पेन घेऊन आला.. " हे काय ? " , "हा पेन त्यांच्या मुठीत सापडला..... बहुदा याच पेनाने त्यांनी ते letter लिहिलं असेल, त्या खुन्याने त्यांच्याकडून लिहून घेतलं असेल... " अभिषेकने ते पेन पाहिलं... " यावर काही बोटांचे ठसे मिळाले का ? " ," हो.... फक्त " महेंद्र" यांचे ठसे होते पेनवर.","म्हणजे नक्की हा त्या आरोपीचा पेन असणार... अजून काही माहिती मिळाली का या वरून.. ",अभीने महेशला विचारलं," एक गोष्ट आहे…. हा पेन इतर पेनांपेक्षा थोडा लहान आहे... त्यामुळे नॉर्मल रिफिल्स यात जातंच नाहीत,म्हणून रिफीलचा मागचा भाग थोडा कट करावा लागतो... बघ पेन उघडून.. " अभिषेकने पेन उघडून रिफील बघितली... महेशच म्हणणं बरोबर होतं, त्याने रिफील थोडी कापली होती आणि तीही थोडी तिरकी," अशी का कट्ट केली रिफील त्याने ? " ," तो पेन बघ जरा... जिकडे पेनाचं बटन प्रेस करतो,तिथे थोड तिरकं बटन आहे म्हणून तिरका कट्ट दिल्याने रिफील बरोबर राहते एकदम."," आता हा पेनच मला कदाचित आरोपीकडे पोहोचवणार बहुतेक" अभिषेक बोलला. " ते कसं काय ? " डॉक्टर महेशने विचारलं. " तू एवढं सगळं पाहिलंस... पण महत्त्वाची गोष्ट विसरलास . "," ती कोणती ? " ," पेन जर निरखून पाहिलास तर कळेल... हा खुप जुना पेन आहे. मला तरी आठवते... साधारण ९-१० वर्षापूर्वी असे लहान पेन मिळायचे... आणि त्याचं वेळेस त्याच्या रिफील सुद्धा मिळायच्या... आता असले पेन मिळतही नाही आणि रिफ़िलही नाही."," मग या वरून तुला काय कळलं ? " डॉक्टर महेशने विचारलं," माणसाला जर एखादी सवय लागली.. मग ती चांगली असो किंवा वाईट ,ती सहजासहजी सुटत नाही. त्याचा पेन जरी आता आपल्याकडे असला तरी जेव्हा तो कोणताही नवीन पेन वापरायला घेईल तेव्हाही रिफील भरताना,तशीच कट्ट करेल. " अभीने आपला विचार मांडला." अरे अभी , मग आता काय तू सगळ्यांचेच पेन चेक करणार आहेस तू का ? ","जमलं तर तसही करू."

८ महिने होतं आले होते... त्या ४ हत्येचा शोध अजूनही लागला नव्हता.. तपासाला गती येत नव्हती.. अभिषेक आणि डॉक्टर महेश, यावरचे tension अजूनही तसंच होतं... आरोपी अजूनही मोकाट फिरत होता. अभिषेकची झोप कधीच उडाली होती. पहिलीच अशी केस त्याला मिळाली होती कि त्याने त्याला संपूर्ण हलवून सोडलं होतं..... घरी उशिरा येणं... रात्र-रात्रभर केस विषयी काम करत बसणं.. उशिरा झोपणं.. लवकर उठून पोलिस स्टेशनला जाणं. या सगळ्यांमुळे त्याची तब्येतही खालावली होती... असंच चालू होतं सगळं, आणि अशाच एका दिवशी, सकाळी.... पुन्हा... अभिषेक चा फोन वाजला," Hello सर , लवकर पोहोचा पोलिस स्टेशनमध्ये ."," काय झालं ? " ," सर,आपल्या Department चे परेश सर आठवतात ना.. "," हो... २ वर्षापूर्वी रिटायर झाले ते ना.. "," हो.... हो सर... त्यांचा खून झाला आहे."," काय ? " अभिषेक उडालाच. तसाच पोहोचला धावत धावत त्यांच्या घरी. तिकडे पोहोचल्यावर, तसंच सगळं पुन्हा.....मारण्याची पद्धत,Letter, चहाचा कप, तसचं सगळं... अभिषेकला काय करावं तेच कळत नव्हतं आता. पत्रकारांनाही त्याचं वेळेस call आले होते. २ पत्रकारांचे फोन रेकॉर्ड केले होते. आवाज रेकॉर्ड केलेला होता. त्यावरून काहीच कळलं नाही.विचार करून डोक्याचा भुगा झाला होता अभीच्या. त्याचा मित्र, डॉक्टर महेश सुद्धा त्याला काहीही मदत करू शकत नव्हता. " अभी, मला वाटते... तुला आरामाची गरज आहे .. " , " अरे .... कसा काय आराम करू... बघतो आहेस ना, ५ हत्या झाल्या…त्याची नावाजलेल्या लोकांच्या आणि मी काय करतोय.... काहीच नाही... त्यावर तू म्हणतोस आराम कर... कसा करू आराम.. " अभिषेक रागातच बोलला, तसा महेश गप्प बसला....अभीला स्वतःच्याच बोलण्याचा राग आला, " Sorry यार, माझं डोकंच चालत नाही रे."," म्हणून तुला सांगतो मी... ,थोडा आराम कर... मग Fresh mind नी पुन्हा तपास सुरु करू... कसं " ," ठीक आहे... मी विचारून बघतो सरांना." दुसऱ्याच दिवशी त्याने त्यांच्या Senior अधिकाऱ्यांना सुट्टी बद्दल विचारलं... त्यांनाही माहित होतं कि गेले ८ महिने तो या केसेसमधे एवढा गुंतून गेलेला होता कि एकही सुट्टी घेतली नव्हती. त्याची तब्येतही खालावली होती… त्यांनी त्याला सुट्टी देण्याचे ठरवले." ठीक आहे, Inspector अभिषेक... तुम्ही ७ दिवस सुट्टी घ्या.. पण ८ व्या दिवशी कामाला वेळेवर हजर राहा. "

सुट्टी तर मिळाली होती पण शहरात राहिलो तर अभिषेकला तेच ते सतावत राहणार म्हणून त्याच्या बायकोने गावाला जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे त्याचं मोठ्ठ घर होतं. तिकडेच गेले ते. तिथे खूप शांतता होती.आराम मिळाल्याने अभीला जरा बरं वाटलं होतं, त्याने त्या शांत जागी त्या केसेसचा पुन्हा नव्याने तपास सुरु केला.... दोन पूर्ण दिवस अभिषेकने त्या पाचही केसेसचा पूर्ण अभ्यास केला... " आज , काहीतरी भेटलं वाटते तुम्हाला.. "अभीच्या बायकोने त्याला विचारलं," काहीतरी नाही... खूप काही मिळालं... आता फक्त महेशला बोलावयाचे आहे इकडे... " लगेचच त्याने महेशला फोन करून गावाला बोलावून घेतलं आणि महेश पोहोचलाही लगेच." बोल अभी, काय एवढया तातडीने बोलावून घेतलंस." ," अरे.... केस संबंधी चर्चा करायची होती." , " हा... बोल, काय झालं ? " ,"OK.... पहिली तू सांग माहिती.. कि तुला आतापर्यंत काय काय माहिती मिळाली आहे.. " ," पहिली गोष्ट... खून हा रात्रीचाच होतो, ३ ते ४ दरम्यान... आरोपीला science ची चांगली माहिती आहे. Plaster of Paris हे दुधात किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थात mix केलं कि त्याचं slow poison तयार होते, हे त्याला माहित आहे. तेच देऊन तो लोकांना मारतो, त्यानंतर त्यांच्याच पिस्तुल मधून गोळीही मारतो.... दुसरी गोष्ट, आरोपी ओळखीचाच असणार.. कारण येवढ्या रात्रीचा एखाद्याच्या खोलीत जाणार... तेही दरवाजाचा lock न तोडता... मग तो ओळखीचाच असणार... शिवाय कोणतेही फिंगर प्रिंट्स मिळत नाहीत. याचा अर्थ तो कुठेही स्पर्श करत नसणार किंवा हातात glove घालत असणार.... कोणतेच पुरावे मागे ठेवत नाही,CCTV कॅमेरे बंद करतो. म्हणजेच त्याला पोलिसांची आणि ते कसा तपास करतात याची चांगली जाण आहे... बस्स एवढंच मला माहित आहे... तुला सांगतो ना अभी... एवढा चलाख , तल्लख बुद्धीचा माणूस मी अजून नाही बघितला कुठे..... बरं.... तुला काय सापडलं ते सांग. "

" या सुट्टीत, खूप काही गोष्टी पुढे आल्या. खूप अभ्यास केला मी या गोष्टींचा. तो आपल्यावर दबाव टाकण्यासाठी, त्या मिडीयाला आधी call करतो... तेही computer वरून,वेगळीच पद्धत एकदम. या ५ खुनांमध्ये खूप गोष्टी common आहेत. तू बोलला होतास ना… काहीतरी नजरेसमोर आहे,पण ते दिसत नाही… " अभी बोलला," हो... बोललो होतो मी ... त्याचं काय ? " डॉक्टर महेश म्हणाला," त्याचं Letter वाचलस ना तू... तोच तर Clue आहे."," कसं काय ? " महेशने विचारलं. " सुरुवातीपासून सांगतो.... " सागर " यांचा खून झाला,त्याच्या दुसऱ्यादिवशी त्यांचा वाढदिवस होता, बरोबर. " ," बरोबर" ," आणि इतर ४ खूनही तेव्हाच झाले... प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर... " महेशने प्रत्येकाच्या Date चेक केल्या. " हो... रे , माझ्या लक्षातच नाही आलं.... " ," आणि पाचही व्यक्ती नावाजलेल्या होत्या त्यामुळे वाढदिवसासाठी पाहुणे अगोदरच आलेले होते, त्यांच्या घरी... त्यांच्या राहण्याची सोयही केलेली होती त्यांनी. याचाच फायदा आरोपीने घेतला..... त्या Guest पैकीच कोणीतरी खुनी आहे... " , " अरे पण अभी, सगळे पाहुणे V.I.P. आहेत ना .... आपण त्यांच्यावर पुराव्याशिवाय आरोप करू शकत नाही. " मी सगळ्या लिस्ट चेक केल्या, ज्या या सर्वांच्या बर्थडे पार्टीच्या होत्या... त्यात मला काही नावं common दिसली... असे एकूण १५ जण आहेत, कि ज्यांची नावं सगळ्या लिस्ट मध्ये आहेत.... अजून एक गोष्ट आहे. " ," ती कोणती? " ," सागर यांच्या बर्थडे लिस्ट मध्ये या इतर चार जणांचीही नावं होती." , " काय ? " डॉक्टर महेश उडालाच. " हो... शिवाय, यांचाही लिस्टमध्ये एकमेकांची नावं होती... याचा अर्थ कळला का तुला ? " , अभिने महेशला विचारलं... " हो.... याचा अर्थ असा कि हे सगळे एकमेकांना चांगले ओळखत होते…"," बरोबर बोललास अगदी. "

" आणि त्या Letter वरून काय कळलं तुला ? " डॉक्टर महेशने अभिषेकला विचारलं." त्या Letter मध्ये काय लिहिलं आहे. " संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा " .... तुला माहिती आहेत ना संगीतातले सात सूर कोणते ते ? " , " हो..... सा, रे, ग, म, प,ध,नी , सा.... " महेशने लगेच बोलून दाखवले," अरे , पण ' सप्तसूर' असं म्हटलं आहे ना त्या Letter मध्ये, मग सूर तर आठ आहेत ना... " महेशने अभिषेकला विचारलं," शेवटचा किंवा वरचा " सा " धरत नाहीत. त्यामुळे "सप्तसूर" असेच म्हणतात सगळीकडे. " ," हो... पण त्याचा इथे काय संबंध ? " ," संबंध आहे... या सगळ्यांच्या नावाचे पहिलं अक्षर बघ जरा आणि हे सूर बघ."," हो.... अगदी बरोबर.... "सा" वरून सागर , "रे" वरून रेशमा, "ग" वरून गजेंद्र,"म" वरून महेंद्र आणि "प" वरून परेश.... म्हणजे तो त्यांचाच खून करत आहे,ज्यांची नावं या सुरांवरून सुरु होतात." महेश बोलला," बरोबर, पण एक गोष्ट मला कळत नाही... या अक्षरांवरून कितीतरी जण आहेत... मग तो यांनाच का मारत आहे आणि का ? ... " ," कदाचित.... यांचा काहीतरी संबंध असेल एकमेकांशी किंवा त्या खुन्याशी... ","असेलही कदाचित... ते जर कळल तर पुढचे खून आपण थांबवू शकतो आणि त्यालाही पकडू शकतो." अभी बोलला. " एक मिनिट... " महेश मधेच बोलला,"आता तो " प " या सुरावर पोहोचला आहे... याचा अर्थ अजून दोन खून होणार आहेत ... ? " ," हो अजून दोन खून.... तरच " सप्तसूर " पुन्हा एकत्र येतील... अस त्याचं म्हणणं आहे... पण कोण आहेत ते दोघे जण.... खरंच…कोण असतील ते आणि त्यांना कोण मारणार असेल ? "

-----------------------------------------------------to be continued-------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users