लोकमित्रकारांच्या शोधात

Submitted by शोभनाताई on 24 July, 2014 - 09:58

Photo0682_0.JPG

माझ्या सासर्‍यांच्याजवळ धार्मिक,ज्योतिषविषयक,संस्कृत साहित्य इत्यादी पुस्तकांचा संग्रह होता ही पुस्तके पाहताना अचानक' लोकमित्र'चा अंक हातात आला.अंक १९३६चा होता आणि संपादक म्हणून नाव होते द.गो.सडेकर यांचे.मागे लिहिले होते 'हे पुस्तक खानापूर जिल्हा बेळगाव येथे द.गो.सडेकर यांनी आपल्या धनंजय प्रेसमध्ये छापिले.व घनं.६४३ येथे लोकमित्र ऑफिसात प्रसिद्ध केले' हा पत्ता तर आमच्या घराच्या शेजारचा होता.माझे कुतूहल चाळवले..

अंक छोट्या पुस्तकाच्या आकाराचा.१०० पानी होता.भरगच्च मजकुरांनी भरलेला होता.विविधताही होती.स्वामी रामतीर्थ,रामकृष्ण परमहंस,विवेकानंद यांची वचने होती.तसेच गटे,यंग,ब्राउनिंग,डिकन्सयांच्या लेखातील सुभाषित वजा वाक्ये होती.कथांमध्ये विनोदी व सामजिक कथा होत्या.सौ स्नेहलता नावाच्या लेखीकेचीही कथा होती.

पाककृतीत श्रीखंडाची,अर्काची,सुंठीची फळाच्या पेपरमिंटाची कृती होती.विशेष म्हणजे या पाककृती देणारे सदाशिव परांजपे नावाचे लेखक होते.

'लंका बेटाचे वर्णन' यात सिलोनची विस्तृत माहिती होती.'धर्मो रक्षती रक्षित:' नावाचा विस्तृत लेख होता.याचे स्वरूप नियात्कालीकाबरोबर बातमिपात्राचेही असावे.कारण प्रासंगिक विचार नावाच्या सदरात देशातील विविध घडामोडी व त्यावर भाष्य होते.

इहवृत्त सदराखाली 'थंडी बरीच पडत असून रोगराई ऋतूमानाप्रमाणे आहे.गावाबाहेर नवीन बांधत असलेले पोष्ट ऑफिस तयार होत आहे.एप्रिल१९३६ पासून ते खुले होईल'.अशी खानापुराची बातमी होती.तसेच नंदगड येथील नागेश महादेव नाईक या २४/२५ वर्षाच्या तरुण मुलाचे देवीच्या आजाराने पुण्यात निधन झाल्याचे वृत्त होते.

समस्यापूर्ती या सदरात ग्वाल्हेर ,सांगली,गोवा, संकेश्वर,कल्याण अशा विविध भागातून प्रतिसाद दिला होता.शब्दकोड्यांच्या उत्तराबाबतही हेच दिसत होते.विशेष म्हणजे' चिं.वी. जोशी यांच्या लघुकथाबद्दल दोन मुद्दे' नावाचा लेख होता.वी.वा.जोशी कन्नडकर यांचे मासिक राशी भविष्य होते.अंकाच्या शेवटी जाहिराती होत्या.यात प्रवासाला निघण्यापूर्वी ठेवण्यासाठी कॉलरा,खोकला,कफ यावर इतर पोटाच्या विकारावर उपयुक्त अशा सुधासिंधू या सुख संपादक कंपनी मथुरा यांची जाहिरात होती.किर्लोस्कर बंधूंच्या पोलादी फर्निचरची जाहिरात होती.वर्गणीदार वाढवण्यासाठी नवीन वर्गणीदार होण्याचे आव्हान देताना १० आणे किमतीचे कोकिळेचे बोल हे पुस्तक बक्षिस देण्याचे आमिष दाखविले होते.

तत्कालीन विविध नियतकालिकांप्रमाणे ज्ञानप्रसार हाच याचा उद्देश असावा.कारण सनातनी सुधारक अशा कोणत्याच गटात बसणारे ते वाटत नव्हते.'धर्मो रक्षिती' मध्ये सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ विचारांची टर उडवली होती.प्रासंगिक विचारात आंबेडकरांच्या धर्मांतरावर लिहिले होते.जुन्या धर्तीच्या कविता होत्या दर्जा तसा सुमार होता.असे असले तरी खानापूरसारख्या तालुक्याच्या गावातून असा अंक निघणे हे विशेष होते.

असा अंक आपल्या शेजारच्या घरातून निघत होता आणि आपल्याला त्याची माहितीही नव्हती याची खंत वाटली.द.गो.सडेकरांचा त्यांच्या घरातील बाहेरच्या खोलीत लावलेला मोठा फोटो मला आठवत होता.याशिवाय द.गो.सडेकर आणि लोकमित्र यांच्या खुणा खानापुरात मला तरी दिसल्या नाहीत.येथील लोकाना इतिहासाची जाण नाही हे चीनी प्रवाशाचे इतद्देशियासंबधीचे उद्गार आठवले छोट्या गावात तांत्रिक दृष्ट्या उत्तम छपाई असलेले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर खप असणारे मासिक चालवणार्‍या सडेकरांबद्दल कुतूहल जागृत झाले.हा माझा विषय नाही म्हणून मी दुर्लक्ष करू पाहात होते.आणि माझ्याही नकळत लोकमित्राकारांच्या शोधात होते.

सडेकरांच्या वंशजांकडे बरीच माहिती मिळेल असे वाटले होते.पण त्यांच्याकडे एक चीठोराही नव्हता.जे काही होते ते धुळाप्पाच्या चीरमोर्‍याच्या दुकानात रद्दीला घातले गेल्याचे समजले.सडेकरांच्या कन्या रोहिणी वागळे खानापूरच्या मुलींच्या शाळेत मुखाध्यापिका होत्या.वयोमानाप्रमाणे काही आठवत नसल्याने माहिती मिळाली नाही. माझ्या वडिलांनी मात्र त्यामानाने बरीच माहिती पुरवली.'लोकमित्रमध्ये काम केलेल्या तंत्रज्ञाला बाहेर कोठेही डोळे झाकून घेतले जाई.चिं.वी.जोशींचे सुरुवातीचे लिखाण लोकमित्रमध्ये होते. लोकामित्रमध्ये लिहिणार्‍या लेखकाना प्रतिष्ठा प्राप्त होई.शंकरराव किर्लोस्करांनी लोकमित्रकारांचा किर्लोस्करवाडी येथे सत्कार केला होता.एकदा मुकुंदराव किर्लोस्कर खानापूरला आले होते आम्ही सर्व यळ्ळुर गडावर सायकलनी गेलो होतो' माहिती मिळवण्यासाठी थोडे धागेदोरे मिळत होते.

मुकुंदराव किर्लोस्करांच्याकडे साशंकतेनेच फोन केला.त्यांचा प्रतिसाद अनपेक्षित होता.फोनवरून ते भरभरून बोलत होते.'मी नुकताच गोव्यावरून आलो येताना खानापूर लागले जुन्या आठवणी जागृत झाल्या.मी त्यावेळी लहान होतो.लोकमित्रांच्या घरी राहिलो खरा पण मला त्यांची फारशी माहिती नाही.माझ्या वडिलांनी खानापुरवरून चाललास तर सडेकराना अवश्य भेटून ये.असे सांगितल्याने मी गेलो होतो.' पुढे ते म्हणाले, 'तुम्हाला भेटायचं असेल तर केंव्हाही फोन करून या'त्याना लोकमित्रबद्दल माहिती नसेल तर जाण्यात अर्थच नव्हता..

या दरम्यान बा.रं. सुंठणकरांचे १९व्या शतकातील महाराष्ट्रावर पुस्तक छापून आले.बा.रं. सुंठणकर बेळगावचे आणि इतिहासाचे अभ्यासक.त्याना निश्चित माहित असेल असे वाटून त्यांच्याकडे फोन केला.त्यांच्याकडून लोकमित्र हे चांगले मासिक होते आणि आर्थिक चणचणीमुळे बंद पडले एवढेच समजले.

यानंतर निवडक विनोदी कथांचा कोळारकरांनी संपादित केलेला संग्रह हातात पडला.त्यात खरे नावाच्या लेखकांनी लिहिलेली लोकमित्रमधील कथा होती.हा लोकमित्र कोणता याचा उल्लेख नव्हता.मी पुस्तक प्रकाशित करणार्‍या संजय प्रकाशनकडे फोन केला.त्यांच्याकडे मूळ नियतकालिके नव्हती.मुंबई मराठी ग्रंथालयात ती मिळतील असे सांगितले.लेखकांचा मिरजेचा पता पुस्तकात होता.तेथे जोडकार्ड पाठवले.लगेचच लेखकांच्या सुनेचे उत्तर आले.'१०/१५ दिवसांपूर्वी माझ्या पतींचे निधन झाले.मला विशेष माहिती नाही.माझे दीर पुण्यात राहतात त्याना भेटा'.हाही प्रयत्न व्यर्थच ठरला.

किर्लोस्करांनी सत्कार केला म्हणजे सत्काराचे वृत्त किर्लोस्कर मासिकात निश्चित आले असणार,किर्लोस्कर प्रेसमध्ये गेले.आता किर्लोस्कर प्रकाशन न राहाता अपूर्व कडे हस्तांतर झाले होते. एका काळोख्या खोलीत जुने अंक धूळ खात पडले होते.तेथून सडेकारांच्या सत्काराचे वृत्त असलेला अंक शोधणे जिकीरीचे होते,वेळखाऊ होते.माझे स्वत:चे व्याप सांभाळून वेळ देण्याची माझी तयारी नव्हती.माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते.कारण तसे ते योग्य दिशेने नव्हते.इतिहासाची साधने कशी शोधायची,त्यासाठी लागणारे कष्ट याची मला जाणीव होती पारन्तु मी समाजशास्त्राची प्राध्यापिका,कोणी इतिहासाची व्यक्ती हे काम करेल माझा याच्याशी काय संबंध अशी भूमिका योग्य मार्गांनी जाण्यास परावृत्त करीत होती.तर खानापुराची रहिवासी असून मला लोकमित्रकारांची माहिती नाही याची खंत निरर्थक प्रयत्न करायला भाग पाडत होती.एकूण लोकमित्रकारांनी मला झपाटले होते.

आणि एक दिवस नियतकालिकांची सूची चाळताचाळता मला लोकमित्रकारांची माहिती सापडली.इतके दिवस हा संदर्भ पाहण्याइतकेही कष्ट मी घेतले नाहीत.याबाबत मनातल्या मनात मी थपडा मारून घेतल्या.शेजारून निघणार्‍या नियतकालिकाची मी माहिती मिळऊ शकले नाही.आणि इतक्या नियतकालिकांची संपादकांची माहिती मिळविताना आपल्या समाजाची इतिहासाची जाण पाहता किती कष्ट पडले असतील.अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेणार्‍या दातेंच्याबद्दल मन आदरानी भरून आले.घर,नोकरी सांभाळून उरलेल्या वेळात संशोधन करणार्‍या आम्ही आमच्या पिढीची कीव कराविसी वाटली.

सूचित लोकमित्र व द.गो.सडेकर यांच्याबद्दल पुढील माहिती होती.

'जुलै १८९१ पहिला अंक १८९६ पर्यंत मुद्रक बेळगाव समाचार.

नोव्हेंबर १८९६ धनंजय छापखान्याची स्थापना. यापुढील मुद्रक धनंजय छापखाना.

उद्देश सामान्य मराठी वाचकाच्या गरजा पुरविणे.

स्वरूप - चरित्रे,निबंध,गोष्टी,स्थळ वर्णने,कविता,मासिक,समालोचन,वाड्मयविहार,सुभाषित संग्रह,पुस्तक परिचय,मुलांचे जग,शोधबोध विनोद,भाषा वैचित्र्य,संस्था समाचार,प्रासंगिक विचार,महिला मनोरंजन.'हे स्वरूप ब्रीदवाक्याला अनुसरूनच होते.

'ब्रीदवाक्य - जितके अपुणासी ठावे तितके हळूहळू शिकवावे शहाणे करुनी सोडावे सकलजन - रामदास

२३व्या अंकापासून ब्रीदवाक्य - अद्वेष्टा सर्वभूतांनां मैत्र,करुण,एवंच | निर्ममो निरहंकारा : समदु:ख सुख:समो

३१व्या अंकापासून जननी जन्मभूमी स्वर्गादपि'

ज्ञान प्रसार ते राष्ट्रप्रेम अशा समाजातील बदलाच प्रतिबिंब नियतकालिकांच्या इतिहासात दिसत तसच इथंही दिसत होत.

यानंतर संपादन आणि संपादकांची माहिती होती.संपादक द.गो.च होते. सहाय्यक बदललेले दिसत होते.

'संपादक- द.गो.सडेकर व सहाय्यक म्हणून ना.ह.आपटे, वर्ष २६ ना.ना. गुणाजी,वी.वा हडप,वर्ष ३० का. रा.पॉलन ठाकर वर्ष ३१ चं.ह.पळणीटकर वर्ष ३३ याशिवाय कृ.ना आठल्ये,के.द. काशीकर यांची नावेही सह संपादक म्हणून होती.'

द.गोंची माहिती पुढीलप्रमाणे होती.

जन्म जुलै १८६० ,मृत्यू २८ नोव्हेंबर १९४१ .

शिक्षण मराठी पाचवी.ग्रंथ प्रकाशन,संपादन,मुद्रण,व्यापारउद्यम,समाजकार्य,कोश चरित्रकार,

संपादक - लोकमित्र

सूचीत लोकमित्र कारांची माहिती मिळाली परंतु ती अधिक कुतूहल चाळवणारी.पाचवी पर्यंत शिकलेल्या द.गो.ना नियतकालिकाची प्रेरणा कुठून मिळाली? याचे तंत्रज्ञान ते कोठे शिकले.?आर्थिक मदत कोणी केली?त्यांच्या मृत्युला ७५ वर्षेच झाली नाहित तोवर खानापूरकर त्यांना कसे विसरले? लोकमित्रकारांचा शोध अपुराच आहे.तरी २८ नोव्हेंबर या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली म्हणून हे लेखन

यापुढे मात्र मला शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध घेऊन कुतूहल शमवायाचे आहे.लोकमित्रचे जुने अंक किंवा इतर माहिती असणार्‍यानी कृपया त्याबाबत माहिती कळवावी.

(तरुणभारत बेळगावच्या २८ नोव्हेंबर १९९४ च्या अंकात हा लेख छापून आला होता.)
लेख छापुन आल्यावर ८/१०च पत्रे आली.यात लोकमित्रची माहिती देणारे एकही नव्हते.
माझा शोध तिथेच थांबला.पण हे काम न केल्याची खंत मधुनच डोक वर काढते.लोकमित्रच्या पहिल्या अंकाला जुलैमध्ये १२३ वर्षे झाली.आणि जुलैमध्येच द.गों.चा जन्म.त्यानिमित्त्याने त्याना आदरांजली.
मायबोलिकरांकडुन अधिक माहिती मिळाल्यास स्वागत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकमित्र ची तुमच्याकडे जी प्रत आहे त्याचे मुखपृष्ठ स्कॅन करून इथे देता येईल का? आवाहन करायला चित्र असेल तर थोडे सोपे जाते.

द.गों.चे सहायक म्हणून ना. ह. आपटे व वि. वा. हडप यांचीं नांव आहेत व ते साधारण त्या किंवा त्यानंतरच्या काळात अग्रेसर असलेले कांदबरीकारच असावेत; त्यांच्या कादंबर्‍यांच्या प्रस्तावनेत याबद्दल उल्लेख/ माहिती असण्याची दाट शक्यता आहे. [आपण जिद्दीने शोध घेताय म्हणून हा संभाव्य 'क्ल्यू' देण्याचा मोह आंवरला नाहीं]

'लोकमित्र'चे जुने अंक लक्ष्मी रस्त्यावरच्या गोखले हॉलच्या शासकीय ग्रंथालयात मिळतील. मी तिथे चारपाच वर्षांपूर्वी एकदोन जुने अंक बघितल्याचं मला आठवतं आहे.

अजय्,भाउ नमसकर, चिनुक्स प्रतिसादाबद्दल आणि सूचनांबद्दल खुप खुप धन्यवाद.
अजय माझ्याकडे असलेल्या अंकाचे मुखपृष्ठ मी तरुण भारतला पाठवले होते.तरुणभारतमधिल लेखात ते छापले आहे.
त्यावरुन स्कॅन करता आलेतर पाहिन.भाउ क्ल्युबद्दल आभार.
चिनुक्स, खरतर मी त्यावेळीच शासकीय ग्रंथालयात जायला हव होत.पण आच कमी पडली.आता नक्की पाहिन.पटवर्धनांसारखे पंचाहत्तरीतही संशोधन करणारे आजुबाजुला असल्याने प्रेरणा मिळते.

शोभनाताई....

आत्ताच हा "लोकमित्र" शोधयात्रा लेख वाचला. ना.ह.आपटे आणि वि.वा.हडप हे दोघेही मराठी साहित्याच्या वाटचालीतील अग्रेसर कादंबरीकार होते. त्यांची उमेदवारीतील वर्षे सडेकरांच्यासोबतीने गेली आहेत यावरून लोकमित्रकारांचा लोकसंग्रहात त्या पातळीचे अनेक प्रतिभाशालींची नावे असतील.

"लालन बैरागीण" ही अत्रे कन्या शिरीष पै यांची कादंबरी. ज्यावेळी वाचली होती त्यावेळीच अशाच एका ज्येष्ठ वाचकाकडून समजले होते की बेळगावचे एक सडेकर नामक लेखकांनीही "लालन बैरागीण" नामक कादंबरी लिहिली आहे; पण त्यात पानिपताच्या संग्रामाचे जास्त वर्णन आहे. ती कादंबरी मला मिळाली नाही. पण आता तुमचा लेख वाचल्यावर जाणवते की बेळगावचे म्हटले जाणारे सडेकर हेच मूळचे खानापूरचे द.गो.सडेकर असतील. अर्थात तुम्हाला मिळालेल्या माहितीत द.गो.सडेकरांचा
"....ग्रंथ प्रकाशन,संपादन,मुद्रण,व्यापारउद्यम,समाजकार्य,कोश चरित्रकार, संपादक.." असे उल्लेख असले तरी "लेखक" असा नाही....त्यामुळेही "लालन बैरागीण" लिहिणारे सडेकर आणि लोकमित्रकार सडेकर एकच असतील का हीदेखील शंका आता मनी आली आहे.

लेख आवडला. आपल्याला मार्गदर्शन नाही करु शकत पण पुढे काय झाल ते वाचायला आवडेल.
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा !!

छान लेख. लोकमित्रचे आज स्मरण होत आहे यानेदेखील साडेकर यांना शांती लाभत असेल.
मनोरंजन वगळता त्या काळातील मासिकांबद्दल फारशी माहिती नव्हती. वर्णनावरुन आशयसमृद्ध अंक दिसत आहे.
आपल्याकडे अर्काईव्हिंग त्याकाळात तितकेसे प्रचलित नसावे. अगदी १९८० च्या आसपासपर्यंत सुरू असलेल्या सत्यकथेच्याही डिजीटल कॉपीज किंवा संकलन केलेले खंड इ. उपलब्ध नाहीत तर १९४० च्या अंकाची काय कथा !

लोकमित्रमध्ये ग्वाल्हेरहून प्रतिसाद आल्याचा उल्लेख केलात त्यावरून एक गोष्ट मनात आली. त्याकाळी दळणवळणाची किंवा संभाषणाची साधने नसूनही बृहन्महाराष्ट्र मुख्य मराठी साहित्यधारेशी संलग्न होता. आज तितकासा भासत नाही. खरेतर नेट मोबाईलच्या जमान्यात जास्त सहभाग अपेक्षित होता. आजकाल इंदोरमध्ये काही कार्यरत मंडळी आहेत पण ग्वाल्हेरात काही काळ घालवला तिथे फारशी जाग दिसली नाही.

शोभनाताई कित्ती सुंदर आहे हा लेख. तुमच्यामुळे खूप माहिती मिळाली. द. गो. सडेकर खूपच ग्रेट. तुम्ही इथे शेअर केलंत म्हणून तुमचे धन्यवाद.

तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

एखादी बाब आपल्या विषयाशी संबंध नसतो तरी भावते आणि तिचे काही समाधानकारक संदर्भ मिळत नसतील तर भयंकर अवस्थता येते, ती जास्त जास्त डिवचत रहाते. अशा विषयाचा मिळतील त्या क्षीण धाग्यादो-यांना पकडून चिकाटीने पाठपुरावा करून मागोवा घेणं ही अत्यंत सहनशक्तीची गोष्ट आहे.. शोभनाताई, हा तुमचा सडेकरांच्या शोधाचा कधीच्या काळचा सुरू झालेला प्रवास, जो अजूनही चालूच आहे, तो पूर्ण होण्याची तुमची कळकळ वाक्यावाक्यातून आम्हाला पोचते आहे.

तुमचे सडेकरांबद्दलचे कुतूहल अगदी पटण्यासारखे आहे. ज्या काळात हे नियतकालिकाचे काम ते करत होते, महाराष्ट्राबाहेरच्या प्रदेशांमधे तो पोचवत होते, पुढे नावारुपाला आलेले लेखक घडवत होते, तत्कालिन यशस्वी उद्योजक त्यांना आदरास पात्र मानत होते, त्या अर्थी नक्कीच हा विलक्षण ताकदीचा माणूस असला पाहिजे. आणि तुमची शेजारात राहूनही अनभिज्ञतेची खंतही त्यामुळे समजते.

या स्वरुपाची एक खंत माझ्या मनातही आहे. माझे आजोबा गुरुनाथ नारायण जोशी आणि महात्मा गांधी स्वातंत्र्यसंग्रामात काही काळ तुरुंगात शेजारशेजारच्या कोठडीत होते. सुटकेनंतर त्यांचा आपसात पत्रव्यवहारही झाला होता. गांधीजींचे आजोबांना 'प्रिय मित्र भाई जोशी' या ओळीने सुरू होणारे पोस्टकार्ड मी वाचायला लागेपर्यंत घरात होतं. आज ते कुठं गहाळ झालं काही कल्पना नाही. केवळ हुतात्मा बागेतल्या स्तंभाव्यतिरिक्त आजोबांचे इतर काही संदर्भही नाहीत. नाही म्हणायला त्यांना मिळालेला ताम्रपट मात्र आहे. पण त्या पत्रामुळे, ते पाहिलेलं असल्यामुळे अस्वस्थता येते, ते नीट जपून न ठेवलं गेल्याची खंत आहे.
एक अभिमानाची खूण पुढे जात राहिली असती. तुमच्यासारख्या आणखी कुणा संशोधकाला त्याची नक्की काही मदत होऊ शकली असती. अर्थात असे प्रत्येकाकडेच भूतकाळातले काही जपून ठेवण्याजोगे संदर्भ असतात.

आम्ही काही काळ सदाशिव पेठेत रहात होतो तेव्हा आमच्या खालच्या घरात संस्कृत पंडित चिं. गं काशीकर रहात. मोठमोठे विद्वान त्यांना भेटायला येत आणि त्यांचे अस्खलित संस्कृतात मोठमोठ्याने संवाद चालत. ते जाता-येता कानावर पडत. आमच्याशी मात्र ते आमच्यातलेच एक होऊन बोलत. काशीकरआजोबा गेल्यावर बहुतेक सगळ्या मुख्य वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या निधनाची बातमी आणि कारकिर्दीचा आढावा दिला होता. तेव्हा ख-या अर्थाने हा माणूस किती मोठा होता याची जाणीव झाली.

तुमच्या लेखाने ह्या आठवणी जाग्या केल्या. हा लेख म्हणजेही एक संशोधनच आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या ह्या अभ्यासूवृत्तीला माझा मनापासून सलाम!

ज्या पोटतिडकीने आणि चिकाटीने तुम्ही हा शोध चालवलाय त्याकरता सलामच तुम्हाला ...

ग्रेट आहात तुम्ही ....

त्याकाळातही श्री सडेकरांसारखे एक जगावेगळे व्यक्तिमत्व होते तर ....

शोभनाताई, तुमच्या चिकाटीला सलाम!
जुन्या गोष्टी, जुने लोक काळाच्या ओघात मागे पडतात. पण त्यान्ची ओळख सगळ्या जगाला व्हावी म्हणुन तुम्ही कळकळीने धड्पडत आहात. तुमची धडपड नक्कीच व्यर्थ जाणार नाही. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा! Happy
तुमच्या या शोधाचे अप्डेटस प्लिज इथे देत रहा. आम्हाला नक्कीच उत्सुकता राहील.

shobhanatai chan mahiti.

aamachya library madhe baghate kahi milat ka te.

शोध परत चालू केलास तर Happy
मायबोलीच्या माध्यमातून तुला नविन माहिती मिळो. Happy
लहान्पणी सुटीत खानापूरला जायचो तेव्हा बराच काळ शेजारी छापखान्यात छपाई पाहण्यात जायचा. लोकमित्र सारख काम अन छपाई झाली तिथे लग्नाच्या पत्रीका अन जाहिरातींची हॅन्डबिल छपताना पाहिलीत. Sad

प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद.सर्वाना अपडेटस देण्यासाठी तरी शोध जारी ठेवावा लागणार.इन्ना तेथे आता छापखानाही नाही.

हर्पेन हे अति झाल. कुठे इन्द्राचा ऐरावत कुठे शामभटाची तट्टाणी.
अशोक सूचीमध्ये लेखक असल्याच नव्हत.त्यानी लिहिलेली महालसा वगैरे देविचि स्तोत्रे आहेत.मुद्रण तन्त्रज्ञानाबद्दल्च्या उत्त्मतेबद्दल मात्र एका पत्रातुन समज्ले.माझे एक काका मोहन देशपांडे स्वतः इन्जिनिअर होते.त्यानी लिहिल्यानुसार 'खानापुर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचे १० रुपयाचे भाग सर्टिफिकेट माझ्या वडिलांच्या नावानी असलेली (नाव मोडी लिपित लिहिलेले) धनन्जय प्रेस येथे छापलेली आहेत.त्यावेळचा कागद आणि छपाइ आता असलेप्रमाणेच उत्तम आहेत.ही सर्टिफिकेट १९२२ सालची आहेत.'काकाना १९४०/४१चा अंक सुवर्ण महोत्सवी असल्याचे ही आठवत होते.त्यांच्या मते लोकमित्र बंद पडण्याचे आर्थिक चण्चण येण्याचे एक कारण मासिकाचे अंक १९४० साली गोव्याहून दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर सर्वच्या सर्व परत आले कारण गोवा सरकारने बाहेरच्या मासिकांवर वर्तमानपत्रावर बंदी घातली.लोक्मित्र जास्तित जास्त गोव्यात खपत असल्याने आर्थिक फटका बसला असावा.

शोभनाताई....

कोणत्याही उद्योगाला बसतो तो प्रामुख्याने आर्थिक फटकाच. सडेकरांनी तर अगदी इकडूनतिकडून असेच पैसे उभे केले असणार "लोकमित्र" साठी आणि त्यातच पोर्तुगिज सरकारने मुंबई राज्यातून येणार्‍या मासिक वर्तमानपत्रांवर बंदी घातल्याने तिकडे पाठविलेले ते अंक जसेच्या तसे परत आल्यावर झालेले नुकसान भरून न येण्यासारखेच असते. "अभिरुची", "सत्यकथा" यांच्यासारख्या दर्जेदार आणि लोकप्रिय मासिकांनाही आर्थिक पाठबळ नसल्या कारणानेच नावावर कुलूप लागल्याचे पाहावे लागले, हा इतिहास आहेच.

द.गो.सडेकर यानी आत्मचरित्र लिहिले होते....अशी काही बातमी १९९४ नंतर झालेल्या शोधप्रवासात तुम्हाला मिळाली आहे का ? हे विचारायचे कारण म्हणजे मी तुमचा लेख वाचून झाल्यावर उत्सुकतेने डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या साईटवर जाऊन "डी.जी.सडेकर" नावाने शोध घेतला, तर मला खालील माहिती उपलब्ध झाली....ती इथे पेस्ट करतो...

Title

Anant Rang, Sadekar D.G.

Subject
Biography
Language Marathi
Barcode
99999990102987
Year
1980
BookReader-1

मात्र बूक रीडरवर ऑनलाईन रीडिंगसाठी क्लिक केल्यानंतर "लिंकवर मॅटर सापडत नाही" असे नकारार्थी उत्तर येते. प्रसिद्धी वर्ष १९८० आहे....हा गोंधळच आहे, कारण लोकमित्र सडेकर यांचे निधन १९४१ मध्ये झाल्याची तुम्ही माहिती दिली आहे. त्यामुळे "अनंत रंग" हे त्यांचेच चरित्र असेल तर मृत्युनंतर ४० वर्षानी ते प्रसिद्ध झाले असे मानले गेले तर ते पुस्तक रुपात कुणी आणले आहे का...? हाही प्रश्न आहेच.

पुण्याच्या आयुका डेटा सेंटर इथे मराठीतील सर्व पुस्तकांचे डिजिटायझेशन झाले होते, तिथे आपल्या परिचयातील कुणी असतील तर या संदर्भात अधिकची माहिती मिळू शकेल अशी आशा आहे.

अशोक,मला तरी माहित नाही.तसे असते तर त्यांच्या नातेवाईकांकडून समजले असते.त्यांचा एक नातू अजून खानापुरात आहे.तुमच्या सूचनेप्रमाणे आयुका डेटा सेंटरमध्ये पाहीन.तुमच्या प्रयत्नाबद्दल धन्यवाद.

कोणाकडे सत्यकथेचे अंक पहायला - वाचायला मिळतील का? सत्यकथा, किर्लोस्कर ही नावे इतकी तेजाळलेल्या वर्णनांनी जिथे तिथे हरेक साहित्यिकासंदर्भात ऐकलेली आहेत, की प्रचंड उत्सुकता आहे ही काय चीज होती ते पहायची. माझ्या वाचनालयांमधे यापूर्वी चौकशी करून झालेली आहे, उपलब्ध नाहीत. असतील तरी देणारही नाहीत. तेव्हा कुणी घरगुती पातळीवर खंड सांभाळून ठेवले असतील तरच शक्यता.

विषयांतराबद्दल क्षमस्व शोभनाताई.

Shasakeeya granthalayat saryakatha, kirloskar asa sagaLa upalabdha aahe.

ते सामान्य वाचकांना केवळ वाचनासाठी देतील का, काही कल्पना आहे का तुला?
मी फोन करते तुला, इथे त्याबद्दल चर्चा करत नाही.

shasakeey granthalay sarvansathi khula asta, saee.
Tithe basun vachave lagtil.
Me satyakathache ank phoenix madhun anun vachale hote. Ti library ajun suru ahe ki nahi shanka ahe.

सई...

"सत्यकथा" अंकांसंदर्भात तू करत असलेली चौकशी मला आनंददायी वाटली. खजिनाच सापडेल तुला त्या गुहेत जर तुला प्रवेश मिळालाच तर. वार्षिक बांधीव अंक सांभाळण्याची एक प्रथा असते....जी लायब्ररी सायन्सच्या कोर्सेसमध्ये शिकविण्यात येते. माझा नोकरीच्या कालखंडात मी कित्येक कॉलेज लायब्ररीजमधून अशा (बांधीव) अंकांची कपाटे पाहिली आहेत. टीएलएस, एनकाऊंटर, रीडर्स डायजेस्ट यांच्याजोडीने सत्यकथा, ललित अशा छोटेखानी मासिकांचे वार्षिक बांधीव ग्रंथ मी पाहिले, हाताळले....पण किर्लोस्कर, स्त्री, मोहिनी, हंस असे अंक माझ्या पाहाण्यात आले नाही.

अर्थात संबंधित ग्रंथपाल हे अंक घरी वाचायला देत नाहीत, कारण त्याना "रेफरन्स" (जसे एनसायक्लोपिडीया) चा टॅग लागलेला असल्याने त्याच ठिकाणी तुम्हाला त्यांचे वाचन करायला लागते....नोट्स काढता येतात.

सत्यकथा असो वा ललित यांच्या सध्याच्या मॅनेजमेन्टने या अंकांचा हा दुर्मिळ म्हटला जाणारा ठेवा कॉम्प्युटरच्या साहाय्याने कायमस्वरूपात जतन करावा असा कधी विचार केलेला दिसत नाही....तथापि ललित चे बारा अंक एकत्रितरित्या प्रकाशित करण्याची कोठावळ्यांची परंपरा होती.....पण तीही ठणठणपाळ प्रसिद्धीच्या झोतात होते त्या काळात.

पुण्याच्या फर्गसन आणि एस.पी. मध्ये सत्यकथे उपलब्धतेच्या संदर्भात तुला चांगली माहिती मिळू शकेल असे वाटते.

वरदा, मामा, थँक्स अ लॉट!
वरदा, फिनीक्स कुमठेकर रोडवर आहे तेच ना? विंचुरकर वाड्याबाहेरचं? मी चौकशी करते.

[मामाश्री, मला वाटलेलं तुमच्याकडे असतील Wink ]

सई क्षमस्व काय म्हणतेस या निमित्याने जुन्या अंकांबद्दल चर्चा झाल्यास चांगले आहे.मी अशोकशी याबाबत पुर्ण सहमत आहे.नविन पिढीला याबाबत उत्सुकता आहे हेही आनांददायी.

Pages