एका संध्याकाळचा निरोप…!

Submitted by चेतन.. on 24 July, 2014 - 08:28

वेळ: एक संध्याकाळ

.... तसं पहायला गेलं तर त्याच्या तिच्या आयुष्यात संध्याकाळचं महत्व अनन्यसाधारण… त्याच्या तिच्या असंख्य क्षणाची मूक साक्षीदारंच ती… त्यांच्या "क्षणांना" झालेली सुरुवात… त्यांनी गाठलेली सर्वोच्च पातळी… त्यांचे रुसवे-फुगवे…. लटके-झटके… थोड्या काळाचाच का होईना पण झालेला विरह… गच्च भरून आलेलं आभाळ … नंतर धायमोकलून कोसळलेला पाउस… आणि मग काही वेळानं अगदी स्वच्छ पडलेलं उन… हे सगळं सगळं तिनं अनुभवलेलं… त्यांच्यासोबत… त्यांच्यातलीच एक होऊन… आणि त्यांना नं जाणवू देता…

अगदी लांब गावाबाहेर एक तळं होतं… तिथे ही संध्याकाळ आणि कधी कधी हा पाउस त्यांना नेहमी भेटायचा.… ते तळं मुळात फार्फार सुंदर… छोटंसंच. त्याचा तीनचतुर्थांश किनारा हिरवाच आणि एका भागावर सिमेंटनं बसायला जागा केलेली. एका बाजूला उसाचं शेत. तर एका बाजूनं पायवाट गेलेली. संध्याकाळेच्या सुमारास पक्ष्यांचे थवेच्या थवे चोचभरून पाणी घेऊन जायला काहीच क्षण उतरून जातात तो नजारा खरंच बघण्यासारखा असतो. कधी कधी एखादाच बगळा किंवा बगळ्यासारखा दिसणारा (ह्यातलं ज्ञान अगदी म्हणजे अगदीच तोकडंय राव Sad ) एखादा पक्षी ध्यान लावून असतो. पश्चिमरंगी कागदावर सुर्य आपला मस्त फटकारे मारत असतो. अधूनमधून आगंतुक आलेल्या ढगाआडून लहान मुलासारखा लपाछपीचा खेळ खेळत असतो. ………. आणि हे तळं पावसाळ्यात जे काही खुलतं ना… बस्स काहीच बोलू नये…
.
.
तर अश्याच एका पावसाळ्यातल्या संध्याकाळी त्या दोघांचं ठरलं, त्याच तळ्याकाठी भेटायचं. खरंतर ते दोघं ह्या अश्या वेळेस भेटायची ही काही पहिली वेळ नव्हती, तरी पण ह्या भेटीला जरा वेगळीच किनार होती. हे असं इतकं अचानक तिनं का भेटायला बोलावलं असेल? तिचा फोनवर आवाज जरा विचित्रच वाटत होता. काय झालं असेल? बहुधा सर्दीच झाली असेल. साधारण सर्दीतच असा आवाज होतो आणि फोनवर आवाज आहे त्यापेक्षा जरा जास्तच विचित्र वाटतो. नाहीतरी हिला सवय आहेच पावसात भिजायची… तोच बादला असेल. त्यात बाहेरचं काही अचरबचर खाणं झालं असेल… दुसरं काही नसणारे… खरंच नसणारे??

नाही नाही… माझ्या मनात जे काही विचार यॆताहेत तसं काहीही झालेलं नसणारे… उगाच मन नाही नाही ते विचार करत असतं… शंकेखोर मन सैतानाचं घर असतं… काही नसेल झालं… एक आठवडा ही पोरगी भेटली नाहीये म्हणून अस्वस्थ झालीये बाकी काही नाहीये.…

नेहमीप्रमाणे वेळेआधीच पोहोचून… कधी घडाळ्याकडे तर कधी तिच्या वाटेकडे अश्या त्याच्या अस्वस्थ नजरा फिरत होत्या… तर कधी वर आभाळातल्या देवाकडे "तसं काही नसणारच्चे पण तसं काही घडूही देऊ नकोस" असे त्याचे जोडलेले हात विनवत होते. आणि....... ती आली… त्याच्या काळजाचा ठोका चुकला… नेहमीसारखाच… एक नाही दोन नाही तब्बल आठ दिवसांनी ते भेटत होते… कित्ती मोठ्ठा विरह… नुकताच पाउस पडून गेल्यामुळे तीच्या वाटेवर जरा चिखल होता तेंव्हा, "आपके पांव बहोत खुबसुरत है, इन्हे किचड पर मत रखिये, मैले हो जायेंगे" असा काहीसा त्यानं एडीट केलेला फिल्मी डायलॉग त्याला आठवला. आता ती आली कि आपण हा मारायचा म्हणजे ती नेहमीसारखं खुदकन हसणं सांडेल आणि आपण ते खाली पडू नं देण्याचा अभिनय करायचा असं त्यांनं ठरवलं. हे असलं आपण आधी कधी केलं नाहीये… तिलाही ते आवडेल… आणि "तू ना… नेहमी असं काही करतोस ना... कि… श्श्शी बाबा…" असं म्हणून छानपैकी लाजून ती आपलं डोकं आपल्या छातीवर ठेवेल. अश्या विचारात असताना ती कधी समोर आली हे त्याला कळलंच नाही. काहीच नं बोलता ती पटकन त्याच्या गळयात पडली आणि तिनं एक फार मोठा आवंढा गिळलाय हे त्याला जाणवलं.

"ए काय गं… ए वेडाबाई…" तिच्या केसातून हात फिरवत त्यानं विचारलं.
"………. "
"अगं… काय झालं…. वेडूले… "
"……………."
"कसं गं… आठंच दिवस झालेत आणि…."
"ग….प…. " ती भरलेल्या आवाजात त्याचं वाक्य तोडत म्हणाली.
च्यायला आपलं डायलॉग मारायचं राहिलंच कि राव… श्या…. जाऊ दे… पण…. अजून कितीवेळ असं… कुणीतरी येईल एकदम… मग?
"ऐक… हे बघ… कोणी येईल एकदम… हे असं … नाही बरं…. इतका वेळ…. ऐक…"
"कसं…. राहू…. मी तुझ्या… शिवाय… " ती तुटक तुटक असं काही म्हणाली.
"पण कशाला कोणाला कोणाशिवाय रहायचंय?? आणि हे काय बोलतियेस तू??" तिची मिठी सोडवत तो तिला म्हणाला.

"आपण… त्या….तिथे…. बसायचं?" एका पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवत ती म्हणाली. तिथे जरा कोरडी जागा दिसत होती. दोघं तिथे ती जागा जरा झटकून बसले. तिचे डोळे अगदी लालेलाल दिसत होते. आभाळाचं आणि डोळ्यांचं किती वेगळं असतं नै. जेव्हढा जास्त पाउस पडेल तेव्हढं आभाळ जास्त मोकळं आणि स्वच्छ होतं. बघायला खूप छान वाटतं आणि डोळे…आधीपेक्षा जास्त लाल आणि हळवे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा झरण्याचा बॅकलॉग ते दुसर्यांचा डोळ्यातून भरून काढतात.

"काय झालं गं??" विचारताच त्याच्या नकळत त्याच्या बोटांनी अढी घातली. आणि ते तिच्या लक्षात आलं.
"तुझी बोटं मोकळी कर…… त्याचा काही उपयोग… नसतो… जे घडतं…. ते घडतंच…. " ती मान वळवत जड आवाजात म्हणाली.. खरंतर त्याला ही सवय तिच्यामुळेच लागली होती बरं…
"इकडे बघ…. काय झालं? कोणी काही बोललं का?" आता पाउस त्याच्याकडे वळू लागला होता.
"आता.... आपल्यालाच …"
"काय??"
"बंद करावं लागेल……. बोलणं…आणि…. भेटणं…. सुद्धा… "
"हे काय यार तुझं…. नेहमीचंच झालंय…. नेहमी नेहमी का वड्याचं तेल वांग्यावर काढायचं? काय झालंय आता नवीन? च्यायला इथ करपून चाललंय सगळं… एकदा दोनदा ठीके … नेहमी नेहमी?" तो अगदी वैतागून उठणार एव्हढ्यात त्याचा हात गच्च धरून त्याला बसवत ती म्हणाली….
"घरच्यांनी… माझं… लग्न… ठरवलंय…. पुढच्याच आठवड्यात…"
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स………… तो मटकन खालीच बसला.
"मलाही … माहित नव्हतं … इतकं अचानक…… होईल हे सगळं"
सुन्न आणि कुंद वातावरण झालं सगळं अचानक…
"मी खूप……… पण… नाही ….... "
"………………………"
"हात … जोडले …. रे…. बाबांनी…. आणि…. "
"……. "
"मी…… हरले…… रे…. "
….
….
थरथरणार्या ओठांमधून सारे शब्द विरून जावेत
भिरभिरणार्या डोळ्यांमधून सारे शब्द भरून यावेत
अगदी अवचित विरून गेली त्याची तिची सारी स्वप्नं
दोघांनीमिळून लहानपणी सोडलेल्या कागदाच्या नावेत
तिच्याशिवाय त्याची नाव पैलतीरी कशी जावी??


खरंतर अश्या वेळेस कसं रिअ‍ॅक्ट व्हायचं? कसं वागायचं? हे काहीच माहित नसल्यामुळेही असेल कदाचित पण तो अगदीच शांत बसला. फार जोराचा धक्का बसल्यावर काहीकाळ नेमकं काय झालंय ते समजत नाही. आणि जेंव्हा समजतं तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. जखम सहन करण्यापलीकडे काहीच पर्याय उरलेला नसतो. अर्थात काळ नावाचं औषध असतंच म्हणा पण ते लागू होतं काहीकाळानंतरच ना??… तो… का ही का ळ…. सहन करणं सोप्पं असतं?

त्या दोघांमध्ये बराच काळ शांतता वहात होती. आगंतुक आलेल्या एका ढगामागे लपलेल्या मावळतीच्या सूर्यानं बहुधा डोकं बाहेर काढायचं नाकारलं असावं… तो तस्साच त्या ढगाच्या आधारे मावळतीला निघाला असावा. त्याचा एकदम वाढलेला श्वासोच्छ्वास जरा नियमित होऊ लागला. त्याची एकदमच तापलेली कानशिलं पुर्वावस्थेत येत होती. आता क्रॉस्ड फिंगर्स काही बदल घडवणार नाहीत हे समजलेलं असूनही अजून एकमेकांना सोडायला तयार नव्हती. ती तशीच ठेवून तो उठला…
"बो… ल…… की…" ती
त्याने एक दीर्घ उसासा सोडला.
"बो…. ल… मला…. गुदमरतंय…. प्लीSSSSSज…"
……
……
तशी त्याच्या आयुष्याची बरीच पानं तिच्याच सुगंधानं भरलेली
आणि त्याखाली तिच्या संमतीची तिची सहीसुद्धा ठरलेली
आयुष्य नव्याने कळतं म्हणे असं आयुष्य पुन्हा चाळताना
चुकून मधून राहिलेल्या रिकाम्या जागा भरताना
आता… आयुष्याची अपुरी गाथा कशी नव्याने लिहावी….

……
……

"काय… बोलू……. मुळात……"
"…………"
"काय…... राही... लंय…. बोलायला… " असं म्हणून डोळ्यातून ओघळणारं पाणी निपटत....त्याने जोरात एका लहानश्या दगडाला लाथ मारली. पण तो दगड लहान नव्हताच. एका मोठ्या पुरल्या गेलेल्या दगडाचं टोक फक्त वर आलं होतं. वास्तवसुद्धा काहीसं असंच असतं नै..... दिसतं एक दशांश आणि खोल रूतलेलं असतं नऊ दशांश.... बर्फासारखं....त्यामुळे होणार्या अपघाताची तिव्रता खूप वाढते..... पुढं काय आणि कसं वाढून ठेवलंय याचा नेमका अंदाज येत नाही आणि आलाच तरी तो तितकासा बरोबर नसतो.. त्याला खूप जोरात लागलं. तो अस्फुटसं कळवळला. तिला ते जाणवलं आणि पटकन ती उठली….
"लागलं का रे खूप?…… बघू बरं …. "
अंगठ्याला ठेच लागल्यासारखं झालं होतं… थोडं रक्तही वहात होतं.
"कसं रे…. किती लागलंय हे…. " ती.
तो आपला शून्यात….
……
……
त्याला जखम होताच ती मारायची हळुवार फुंकर…
तेंव्हा ती दिसायची पार्वती सारखी…. आणि तो भासायचा शंकर….
तरी सुद्धा कधी चंद्र ओला व्हायचा… अख्खी रात्र ओली व्हायची…
त्याचं.. तिचं.. भांडण होताच कळी फुलाला पटकन टाळी द्यायची…
तिचा कसलाही शब्द त्याच्यासाठी होती सुंदर ओवी….

……
……
काय बोलायचं? …. कसं बोलायचं?…. मुळात का बोलायचं?…. तसा बोलून काहीच फायदा नाहीये… उलट बोललं तर जास्त त्रासंच होईल… शब्दानं शब्द वाढेल… आधीच आभाळ गच्च भरून आलंय… ते आत्ताच कोसळणं दोघांसाठीपण चांगलं नाहीये. नाही, आपण काहीच बोलायचं नाही… नकोच ते… म्हणून त्याने पाठ फिरवली.

त्याने पाठ फिरवताच तिला अगदी चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र झालं… अगदी आवेगात त्याला फिरवावं आणि एकदा कडकडून मिठी मारावी असंही तिला वाटलं… पण तिनंही तिला थांबवलं… ती तरी काय करू शकत होती म्हणा. सार्या दुनियेच्या विरोधात जायच्या ताकदीची ती… बाबांसमोर …. काहीच नव्हती. आणि नेमका घाव तिथेच पडला.
"नुसता तू नाही रे … मी पण जळणारे रे… खूप जळणारे… खरंच मी नाही रे काही करू शकले… आणि …. नाही काही करू शकत… इतकं सगळं अचानक झालं ना …. हे सगळं…. तुला पण कळवणं शक्य नव्हतं रे … इकडे बघ ना … ए सोन्या…. "
………. त्यानं बघितलं नाहीच.
"…. माझी…. सो न सा ख ळी" त्याचं अगदी लाडाचं नाव घेऊनही तो वळला नाहीच.
……
……
माझ्यामागे करशील रे काय?? नको निघायला म्हणतायेत पाय…
सूर्याशी काय कशीही दोस्ती करेन रे…. पण खूप छळेल चांदणसाय…
खूप त्रास होतोय सख्या तुला सोडून जाताना…
तुझ्या काळजात अडकलेलं माझं काळीज काढून घेताना…
असलीच कसलीतरी ओळ तेंव्हा तिच्या ओठी यावी...

……
……
सुर्य आता जवळपास अस्ताला गेलाच होता. त्यानं शेवटपर्यंत ढगांआडचं डोकं बाहेर काढलंच नाही. तळमळणाऱ्या डोळ्यांची साथ आता हुळहुळलेलं तळं देत होतं. निपचित शांत पहुडलेलं रान आणि अगदी मंद मंद वाहणारा वारा वेळ अजून कातर बनवत होता. आभाळ तर इतकं भरून आलं होतं कि कोणत्याही क्षणी कोसळेल. त्याच्या वाट्याला आता अग्निहोत्र्यांचा वसा येणार होता. आता त्याचं जगणं हे एक धगधगतं यज्ञकुंड होणार होतं. ज्यातल्या समिधा म्हणजे त्याची-तिची स्वप्नं. आणि ती…. तीची ह्या वेळेस फक्त एकंच अपेक्षा होती कि त्याने तिच्याकडे वळून पहावं.… बस्स. पण तो किती हट्टी, हे तिला चांगलंच माहित होतं.
"एकदाच वळून पाहशील…. "
"……. जा … तू…. "
"ए क दा च…. "
"………"
ती त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं तिचा हात झटकला.
"चिडलायेस??… "
"नाही……. आयुष्यभराचा.. आनंद एकवटलाय नं... आज…. तोच.. साजरा करतोय… "
"पण मी तरी… काय… करू…. शकणार…. होते रे…."
"जा…. तू…. "
"खरंच…. जाऊ? "
"…… हम्म"
......
......
"चला…. निघायचं??" दोघांच्याही नजरा निरुत्तर…
बोटांच्या अस्वस्थ चाळ्यांनी वेळ अजून होतीये कातर…
काळ तर सूडंच उगवतोय पण निरोप घ्यायचा कसा??…
दोघांकडे दोघांकडचा कुठलातरी हवा ठसा…
.
.
जाताना पटकन तिची शेवटची मोहोर त्याच्या गाली उमटावी…

त्याचा निरोप घेताना तिची पापणी जड व्हावी.… आणि
तिची जड पापणी पाहून त्याच्या काळजात कळ यावी…

......
......

गवत ओलं जरी असलं तरी त्यावर पाऊल ठेवलं कि आवाज होतोच.
"खरंच गेली कि काय? काहीच आवाज नाहीये होत" असं म्हणून त्यानं झर्रकन मागं वळून बघितलं तर ती नव्हती..... कुठलीही मोहोर नं उठवता...ज्या वाटेवरून आली होती त्याच वाटेवर अगदी शांत शांत पावलं टाकत ती चालली होती. त्याच्या मनात आलं… असं पळत जावं… तिला कडकडून मिठी मारावी. साचलेलं सगळं मोकळं होऊ द्यावं. आता तो तसं पाउल उचलणार तेव्हढ्यात त्याच्या लक्षात आलं… ही तुळस आपल्या अंगणात नाहीये फुलणार…. दुसर्याचं अंगण सजवणारे…. तिला असं डागाळणं बरं नाही.
.
.
ती जात होती…. तो बघत होता… ती दिसेनाशी होईपर्यंत त्याने त्याची पापणीही मिटू दिली नाही. ती दिसेनाशी झाली… आणि आत्तापर्यंतची पडणारी भूरभूर धायमोकलून कोसळणारी सर झाली….
.
.

आणि विशेष म्हणजे… त्या तश्या अवस्थेत सुद्धा….
.
.
त्याच्या बोटांनी आपली साथ सोडली नव्हती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

..