धरतीवरील स्वर्ग (काश्मिर भाग - २) सोनमर्ग, गुलमर्ग

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 July, 2014 - 04:08

धरतीवरील स्वर्ग (काश्मिर भाग - १) दल लेक - http://www.maayboli.com/node/49570

दल लेक मध्ये दूसर्‍या दिवशी सुर्यनारायणाने मुलायम ढगांना स्पर्शत, डोंगर्-झाडांतून बागडत आपली कोवळी किरणे पाण्यात सोडल्याने सकाळ प्रसन्न झाली होती. ह्या प्रसन्न लहरीतच आम्ही सोनमर्गच्या मार्गाला निघालो. आज पाउस नाही ह्या आनंदात असतानाच सोनमर्गच्या मार्गावर गेल्यावर पुन्हा ढगांची गट्टी जमू लागली.

सोनमर्गचा डोंगर चढण्यापूर्वी सुंदर नदी लागते. येताना ह्या नदीवर थांबून फोटो काढू असा प्लान ठरवून गेलो होतो.

आज बर्फाच्या डोंगरावर जायच म्हणून आम्ही सगळेच खुष होतो. घाट चढू लागताच थंडीची जाणीव होऊ लागली. राधाची तब्बेत इथे थोडी नरमच होती. मिस्टरांनाही थोडी कणकण जाणवत होती. जस जसे पुढे जात होतो तसतसे डोळे निसर्गाचा नजारा खिडकीबाहेर पाहण्यासाठी स्थिर रहात होते. वाहती नदी, डोंगरातील गर्द झाडी, डोंगरावर पहुडलेले ढग आणि बर्फाछदीत लांबून दिसणार्‍या डोंगराच्या रांगा अप्रतिम
नजारा दाखवत होत्या.

सोनमर्ग जवळ येऊ लागला तसा एका ठिकाणी थोडासा बर्फ साठलेला दिसला. लगेच कोणीतरी ओरडले बर्फ तो बघा बर्फ. लगेच गाडी थांबवून फोटो घेणे चालू झाले. पुढे अशा छोट्या छोट्या साचलेल्या बर्फाचे बरेच कोडकौतुक झाले.

(गाडीतून काढलेले फोटो)

आता मात्र प्रचंड थंडी जाणवू लागली. राधाला पुर्ण शाल मध्ये लपेटून घेतले आणि मी खाली न जाण्याचा तेंव्हाच निर्णय घेतला. इतकी थंडी होती की फक्त बच्चे कंपनी आणि मुलिंचे दोन
काकाच बर्फात जाऊ शकले आम्ही बाकी सगळी मंडळी गाडीतच कुडकुडत त्यांची वाट पाहत बसलो. कधी एकदाचे परत जातोय असे झाले होते. पण गाडीतून अफाट पसरलेले बर्फाचे डोंगर पाहून धन्य धन्य वाटले. इथे फोटोही मी काढू शकले नाही त्याबद्दल दिलगिरी.

जाताना जो उत्साह होता येताना तो मावळला काय काळवंडलाच होता. डोळेभरून पाहिलेल्या बर्फाने ने डोळे इतके गारठले होते की येतानाच्या छोटया बर्फाच्छदीत भागाचे आता अप्रुप वाटत नव्हते. नदीवर थांबायची काय तिथून पळायचीच घाई जास्त होती. श्रीनगर मध्ये पोहोचलो तिथेही पाउस सुरू झाल्याने थंडी वाजत होती. दल लेकचे वातावरण पुन्हा गारेगार झाले होते. ह्या दिवसा पुरती आमची वस्ती हाउस बोट मध्ये होती. लेक मधून जाताना शिकार्‍या वाल्याने आमची अवस्था पाहून पुन्हा तोच डायलॉग मारला "काश्मिर का मौसम और बम्बईका फैशन मिनटोमे बदल जाता है" Lol

(कुणालाही निरुत्साही होऊ नये माझ्या वरच्या लिखाणावरून. बर्फाच्छदित नजारे अप्रतिम आहेत काश्मिरमध्ये. फक्त तब्बेती ठिक नसल्याने तो निरुत्साह होता नाहीतर मी पहिली धावले असते बर्फात असे सगळेच म्हणत होते :हाहा:)

थंडी प्रचंड जाणवत होती. पारा जास्तच खाली झाल्यासारखे जाणवत होते. बोटवरच्या कर्मचार्‍यांना उद्या जात असलेल्या गुलमर्ग च्या वातावरणाबद्दल माहिती विचारली तर तिथे कदाचीत चांगल वातावरण असेल असे त्याने सांगितले त्यामुळे आम्हाला हायसे वाटून आम्ही दुसर्‍या दिवसाच्या उबेच्या प्रतिक्षेत झोपुन ती रात्र काढली. सकाळी वातावरण पुन्हा थोडे स्थिरस्थावर झाले होते. पण थंडी होतीच. आम्ही पटापट आटपून गुलमर्ग च्या वाटेला निघालो. तिथे जाऊन आपण आता शॉपिंग करू, बाहेर थोडे हिंडू, राधालाही थोड मोकळ फिरायला मिळेल शिवाय आमचे गंडोले बुक केलेले होते. थंडी नसेल तर गंडोल्यातही राधाला सफर घडवू अशी अनेक स्वप्ने रंगवत आम्ही गुलमर्गच्या जवळ पोहोचलो. गुलमर्गचा नजारा म्हणजे स्वप्नातही रंगवत नाही त्यापेक्षा सुंदर स्वर्गिय सौंदर्याचे ठिकाण. पुर्ण बर्फाच्चदीत डोंगर, मोठी सरळ वाढलेली झाडे, डोंगर उतार त्या उतारावरही बर्फ जणू वाहतोय आणि ओसाड जागाही फुलांनी बहरून सुशोभित केलेली धरती.

पण जवळ गेलो तसे पुन्हा कडाक्याची थंडी आमचा पाठलाग करत आलीच. हात पाय गारठू लागले आणि गाडीतून खाली उतरण्याचा, राधाची तब्बेत सुधारलेली होती तरीपण राधाला उतरवण्याचा धिरच होत नव्हता. श्रावणीला बाकिच्यांबरोबर गंडोला राईड साठी पाठवले आणि आम्ही दोघे राधाला घेऊन सरळ हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये हिटर नव्हता पण जास दिव्यांच्या प्रकाश योजनेमुळे थोडे उबदार वाटले. राधाला आता ताईची सारखी आठवण येत होती म्हणून आम्ही बालकनीतून ताईची वाट पाहत आणि बाहेरचा नजारा फोटोत आणि डोळ्यात साठवत टाईमपास केला.

ह्या फोटोत डोंगर पुर्ण हिरवा दिसत असला तरी डोंगराचा तळ बर्फाने आच्चादलेला आहे.

नजारा पहात असताना पटकन खाली जाऊन फुलांचे क्लोजअप फोटो काढून यावा अशी सुप्त इच्छा मनात प्रकट होत होती. मुले आल्यावर त्यांना घेऊन फोटो काढून ये असे मिस्टरांनी सुचवलेही पण त्यांना यायला वेळ झाला आणि तो दिवसही तसाच गेला. दुसर्‍या दिवशी पहलगामला निघायचे होते. विचारपुस केल्यावर तिथे मार्केट जवळ आहे आणि वातावरणही फिरण्यासारखे आहे हे ऐकून पुन्हा एकदा हायसे वाटले. हॉटेलमधून उतरल्यावर मात्र मी जमतील तसे भराभर तिथल्या फुलांचे फोटो काढून घेतले आणि डोळ्यात तिथले निसर्ग सौंदर्य साठवून घेतले त्यामुळे उत्साही वाटू लागले आणि आम्ही पहलगामच्या दिशेने निघालो.

क्रमश...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, मस्त फोटो आणि वर्णन ही >>> +१

ओसाड जागाही फुलांनी बहरून सुशोभित केलेली धरती.
>> खरच किती सुंदर आहेत ती फुल. Happy पु.ले.शु.

़स्मिर खरच स्वर्ग आहे...

आप्रतिम फोटोज..

आम्ही केल्ल्या टुर ची आथवण झाली..

सुन्दर..

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

जिप्स्या इथे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.