चित्रपट ओळख - लाइव्ह्ज ऑफ अदर्स

Submitted by बिपिन कार्यकर्ते on 22 July, 2014 - 09:55

लहानपणी शाळेत असताना संस्कृतमधे, 'स्त्रियश्चरित्रं, पुरुषस्य भाग्यम् | देवो न जानाति, कुतो मनुष्यः||' असे एक सुभाषित आम्हाला शिकवले गेले होते. त्याचा अर्थ अगदी सहज समजेल असा आहे. पण तेव्हा त्या वयात त्यावर फारसा विचार केला नव्हता. ५० मार्कापैकी सुभाषितं आणि त्यांची भाषांतरं फारतर ४-५ मार्कांपुरती असतील. तेवढाच उपयोग. पण हे सुभाषित कायम आठवायचं. अगदी कधीही. पुढे पुढे मोठं होत असताना मला नेहमी आजूबाजूला काय चाललंय, कोण कसं वागतंय, कसं बोलतंय अशा गोष्टी निरीक्षण करायची सवयच लागली. त्यावरून एक गोष्ट पटली... वरच्या सुभाषितात ते स्त्रीचे चरित्र, पुरुषाचं भाग्य वगैरे जाऊ दे, पण माणूस हा प्राणी मात्र 'देवो न जानाति, कुतो मनुष्यः' असा आहे हे नक्की.

माझ्या मते, माणूस हा जगातला सगळ्यात अनाकलनिय, गूढ असा प्रकार आहे. आपल्याला अगदी रोजच्या आयुष्यातसुध्दा असे अनुभव येतातच. एखाद्या व्यक्तीला आपण वर्षानुवर्षे ओळखत असतो. आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव पूर्णपणे माहित असतो (असं आपल्याला छातीठोकपणे वाटत असतं), पण एखाद्या क्षणी ती व्यक्ती असं काही वागून बोलून जाते की आपला अंदाज साफ चुकतो. अजून अशीही उदाहरणं दिसतात की माणूस एका विशिष्ट प्रकारे घडलेला असतो, पण एखादी घटना त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घडते आणि खोलवर परिणाम करते की तो माणूस अगदी बदलूनच जातो. त्याचे एकंदरीत व्यक्तिमत्व १८० डिग्रीमधे फिरते आणि तो अगदी पूर्णपणे बदलतो. हेच कशाला, आपण स्वतःलाही ओळखत नाही नीट. कधी कधी आपण स्वतःच स्वतःला चकित करतो. म्हणूनच ते... 'देवो न जानाति, कुतो मनुष्यः'.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, नुकताच पाहिलेला चित्रपट 'लाइव्ह्ज ऑफ अदर्स'.

काही दिवसांपूर्वी गुडबाय लेनिन या चित्रपटावर लिहिले होते. बर्‍याच लोकांनी तो चित्रपट पाहिलाही होता. बहुतेक सगळ्यांनाच आवडला होता तो. त्याच वेळी बर्‍याच समानव्यसनी लोकांनी अजूनही काही चित्रपटांची नावे सुचवली होती. त्यापैकी हा 'लाइव्ह्ज ऑफ अदर्स' एक. हा चित्रपट सुचवल्याबद्दल मुक्तसुनितचे आभार नक्कीच मानावे लागतील.

हा चित्रपटही पूर्व जर्मनीशी संबंधित आहे. पुढची गोष्ट सुरू व्हायच्या आधी पूर्व जर्मनीतल्या काही गोष्टींबद्दल थोडेसे... पूर्व जर्मनी हा देश दुसर्‍या महायुध्दानंतर सोविएत सैन्याच्या अधिपत्याखालील भूभागावर जन्माला आला. साहजिकच, कम्युनिस्ट पक्षाची अगदी पूर्ण, पोलादी पकड असलेली राज्यव्यवस्था. फारसे वैचारिक स्वातंत्र्य नाही. कोणत्याही एकाधिकारशाही असलेल्या देशात ज्या प्रकारे दडपशाही असते तसेच वातावरण. कोणत्याही प्रकारच्या विरोधाला किंवा बंडखोरीला आळा घालण्यासाठी सरकारने एक प्रचंड मोठे गुप्तहेरखाते उभारले होते आणि अतिशय प्रेमाने पोसले होते. त्या संघटनेचे नाव 'श्टाझी' (झबल्यातला झ). अतिशय कडव्या आणि ध्येयप्रेरित लोकांनाच या संघटनेमधे प्रवेश मिळत असे. या संघटनेचे खास बलस्थान म्हणजे त्यांनी तयार केलेले खबर्‍यांचे जाळे. हा प्रकार इतका भयानक होता की अगदी नवर-बायको वगैरे तर राहूच द्या पण लहान मुलांनाही आपल्या आईवडिलांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल श्टाझी कडे चुगल्या करण्यासाठी पद्धतशीरपणे शिकवले जात असे. (पूर्व जर्मनी कोलमडल्यानंतर श्टाझीची कागदपत्रं खुली करण्यात आली. त्यात कोणालाही आपल्याबद्दल श्टाझीकडे काय माहिती होती हे बघता यायला लागले. त्यात आपल्यावर कोण कोण पाळत ठेवत होते हे पण कळणे क्रमप्राप्तच. ही कागदपत्रं खुली झाल्यावर कितीतरी नातेसंबंध पार मोडून पडले.)

तर अशा वातावरणात घडणारी, एका अतिशय भावनाशुन्य, कोरड्या, कडक शिस्तीच्या अधिकार्‍याची आणि एका संवेदनशील अशा लेखकाची ही कहाणी.

श्टाझी कॅप्टन गेर्ड विस्लर हा खात्यातला एक अतिशय हुशार, अनुभवी, बुध्दिमान आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पूर्णपणे निष्ठावान असा कर्तबगार अधिकारी. त्याचा वरिष्ठ, ले. कर्नल ग्रुबित्झ याचा पण त्याच्यावर पूर्ण विश्वास. चित्रपटाच्या सुरूवातीलाच संशयितांकडून कबुलीजबाब घेण्याचे विविध मार्ग (अर्थात मानवी आणि अमानवी दोन्ही) हा कॅप्टन विस्लर हाताळताना आणि ते नवीन भरती झालेल्या विद्यार्थी सहकार्‍यांना शिकवताना दाखवले आहे. तर असा हा विस्लर आणि त्याचा बॉस ग्रुबित्झ. ग्रुबित्झ हा एका वरिष्ठ मंत्र्याच्या, हेम्फच्या, अगदी जवळचा असतो. गेओर्ग ड्रेयमान हा पूर्व जर्मनीतला अतिशय प्रतिभावान असा लेखक, नाटककार. तो विचाराने कम्युनिस्ट असतो. त्याचे तत्कालिन पूर्व जर्मन राज्यकर्त्यांच्या एका गटाशी खूप जवळून संबंध असतात. मंत्र्याला या ड्रेयमानविषयी संशय असतो की त्याला पश्चिम जर्मनी बद्दल सहानुभूती आहे आणि त्यासाठी तो ग्रुबित्झला ड्रेयमानवर नजर ठेवायला सांगतो. ग्रुबित्झ हे काम त्याचा सगळ्यात विश्वासू सहकारी कॅप्टन विस्लरवर ही अतिशय नाजूक जबाबदारी टाकतो.


गेर्ड विस्लर


ख्रिस्टा-मारिया आणि गेओर्ग ड्रेयमान

एक दिवस विस्लर ड्रेयमानच्या घरी कोणीही नसताना काही टेक्निशियन्सना घेऊन घुसतो आणि त्याच्या पूर्ण घरभर गुप्त माइक्स आणि कॅमेरे लावतो. त्या इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर एक अडगळीची खोली असते त्या खोलीत कंट्रोल रूम थाटतो. अशी व्यवस्था होते की ड्रेयमानच्या घरात जे जे काही घडते ते सगळे व्यवस्थित ऐकू येते. त्या घरात ड्रेयमान आणि त्याची मैत्रिण ख्रिस्टा-मारिया राहत असतात. ही ख्रिस्टा मारिया अतिशय गुणवान आणि गाजलेली अभिनेत्री असते. इथून सुरू होतो विस्लर आणि त्याच्या एका साथीदाराकडून २४ तास पहारा. प्रत्येक घटनेची लेखी नोंद ठेवली जाते. ड्रेयमान जरी निष्ठावान असला तरी त्याला बर्‍याच गोष्टी पसंत नसतात. त्याचा एक प्रसिध्द दिग्दर्शक मित्र येर्स्का हा केवळ राज्यकर्त्यांच्या नाराजीमुळे अक्षरशः आयुष्यातून उठलेला असतो. अशा अनेक घटना तो मूकपणे बघत असतो. त्याचे काही कलाकार मित्र आवाज उठवतात पण याचे धोरण मात्र जमेल तेवढे जुळवून घेण्याचे असते. हा म्हणजे आपल्या विचारांबरोबर केलेला एक प्रकारचा व्याभिचारच असतो. इकडे ख्रिस्टा-मारियाचे पण एक प्रकरण असते. मिनिस्टर हेम्फ आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तिचा यथेच्छ भोग घेत असतो. या सगळ्या भानगडी हळूहळू विस्लरला कळत जातात आणि त्याच्या सारखा खरोखर कम्युनिझमवर निष्ठा असलेला कर्तव्यदक्ष अधिकारी स्वतःला कम्युनिस्ट म्हणवणार्‍या राज्यकर्त्यांचे हे उघडे नागडे रूप पाहून हादरून जातो. तो डळमळू लागतो. एक दिवस ख्रिस्टा-मारिया हेम्फला भेटून येत असते तेव्हा विस्लर असे काही जुळवून आणतो की ड्रेयमानला ही भानगड कळते. पुढच्या वेळी ती जेव्हा परत हेम्फला भेटायला जायला निघते तेव्हा तो तिला जाब विचारतो. तेव्हा ती त्याला रोखठोक जबाब देते... मी शरीराच्या बदल्यात तर तू विचारांचा बळी देऊन, पण आपण दोघेही केवळ आपल्या कलेकरिता का होईना व्याभिचारच करत आहोत. पण त्याचवेळी विस्लर तिला रस्त्यात गाठून तिचा एक चाहता म्हणून भेटतो. आणि तिला योग्य-अयोग्यची जाणिव करून देऊन हेम्फला भेटण्यापासून परावृत्त करतो. ती परत घरी ड्रेयमानकडे जाते.

या सगळ्यात विस्लरला हळूहळू ड्रेयमान समजत जातो आणि विस्लर पूर्णपणे बदलत जातो. तो रोज सगळ्या खोट्या नोंदी करत जातो की काहीही संशयास्पद नाही वगैरे. आणि हळूहळू ग्रुबित्झला पटवून त्याच्या कनिष्ठ सहकार्‍याला या केसवरून हटवतो आणि पूर्णपणे स्वत:कडे सूत्रं घेतो.

काही दिवसांनी येर्स्का एका भकास आयुष्याला कंटाळून आत्महत्या करतो आणि ड्रेयमान अंतर्बाह्य हादरून जातो. तो पूर्व जर्मनी मधे वैफल्यग्रस्त मनःस्थितीमुळे होणार्‍या आत्महत्यांवर एक लेख लिहितो आणि तो काही मित्रांच्या सहाय्याने पश्चिम जर्मनीमधे प्रसिद्ध करतो. सगळीकडे खळबळ माजते. हेम्फ ग्रुबित्झला जाब विचारतो. ग्रुबित्झ विस्लरला फैलावर घेतो. त्या लेखाची मूळ प्रत श्टाझीचे पश्चिम जर्मनीमधील हेर मिळवतात. पूर्व जर्मनीमधला प्रत्येक टाईपरायटर हा रजिस्टर्ड असतो. पण हा लेख एका अशा टाइपरायटर वर टाइप केलेला असतो जो गुप्तपणे पूर्व जर्मनी मधे आणलेला असतो. ग्रुबित्झ पिसाळतो. त्याला कोणत्याही प्रकारे या घटनेचा उलगडा करायचाच असतो. त्याला पूर्ण खात्री असते की हा लेख ड्रेयमाननेच लिहिलेला आहे पण त्याच्याकडे काहीच पुरावा नसल्याने तो काहीच करू शकत नाही. ड्रेयमानच्या घाराची पूर्ण झडती घेतली तरी काहीच मिळत नाही. तो टाइपरायटर फरशीच्या खाली लपवलेला असतो. तो काही सापडत नाही.

त्याच वेळी ख्रिस्टा-मारियाने झिडकारल्यामुळे सूडाने पेटलेला हेम्फ ग्रुबित्झला पुरावा देतो की ख्रिस्टा-मारिया ही काही प्रतिबंधित गोळ्यांचं सेवन करते. ग्रुबित्झ तिला अटक करतो. तो विस्लरला सांगतो की तुला जर का स्वतःची प्रतिमा स्वच्छ करायची असेल तर ख्रिस्टा-मारिया कडून तुला माहिती काढावीच लागेल. दडपणाखाली विस्लर तयार होतो आणि ग्रुबित्झच्या देखरेखीखाली ख्रिस्टा-मारियाची चौकशी करतो. त्यात ती टाइपरायटर बद्दल सांगते. चौकशी संपते. ग्रुबित्झ ख्रिस्टा-मारियाला खबरी व्हायला भाग पाडतो. हे सगळे चालू असताना, विस्लर हळूच सटकतो आणि ड्रेयमानच्या घरी जाऊन तो टाइपरायटर गायब करतो. ग्रुबित्झच्या लक्षात येईपर्यंत विस्लरने आपला कार्यभाग साधलेला असतो. ग्रुबित्झ श्टाझीची माणसं घेऊन ड्रेयमानच्या घरी येतो पण तो पर्यंत काहीच नसतं तिथे. ड्रेयमान बाहेर गेलेला असतो तो पण परत येतो. इकडे ख्रिस्टा-मारिया हे सगळे सहन न होऊन बाहेर रस्त्यावर जाऊन एका गाडीखाली जीव देते. ड्रेयमानला वाटते की टाइपरायटर तिनेच लपवला. ख्रिस्टा-मारिया मेल्यामुळे हेम्फचा इन्टरेस्ट संपतो आणि हे प्रकरण गुंडाळले जाते. पण ग्रुबित्झला विस्लरने केलेल्या विश्वासघाताची पूर्ण कल्पना आलेली असते. केवळ पुरावा नाही म्हणून त्याला शिक्षा होत नाही, केवळ पदावनती आणि एका अती फडतूस कामावर त्याला पाठवले जाते. इथे चित्रपटाचा एक मुख्य भाग संपतो.

पुढे साधारण साडेचार वर्षांनी पूर्व जर्मनीत उलथापालथ होते, कम्युनिस्ट राजवट कोसळते आणि श्टाझी नष्ट होते. ड्रेयमान हेम्फला त्याच्याच एका नाटकाच्या प्रयोगात भेटतो. त्यावेळी त्याला कळते खरे काय काय घडले आहे. तो पूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी श्टाझीच्या कार्यालयात जाऊन स्वतःच्या बाबतीत असलेली सगळी कागदपत्रं बघतो. त्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्या ऑफिसरचा कोड HGW XX/7 असा आहे तो आपल्यावर पाळत ठेवत होता पण त्याने जाणूनबुजून आपल्याबद्दल चुकीची माहिती देऊन आपल्याला वाचवले असते. तो HGW XX/7 हा कोड कोणाचा आहे असे विचारतो आणि त्याला गेर्ड विस्लरचे नाव कळते.

तो विस्लरचा शोध घेतो. त्याला कळते की आता विस्लर हँडबिलं वाटपाचे / कुरिअरचे काम करत असतो. तो विस्लरला भेटायचे टाळतो. काही दिवसांनी विस्लर रस्त्यावरून जात असताना त्याला एका पुस्तकाच्या दुकानात ड्रेयमानच्या नवीन पुस्तकाची जाहिरात दिसते.

तो दुकानात शिरतो. एक प्रत उचलतो, उघडतो. ड्रेयमानने ते नवीन पुस्तक HGW XX/7 ला अर्पण केलेले असते. विस्लरला मनोमन कळते की ड्रेयमानला सगळे कळले आहे.

तो पुस्तकाचे पैसे देत असताना काउटरवरचा माणूस विचारतो,

'पुस्तकाला गिफ्टरॅप करू?'

विस्लर त्याच्याकडे मोठ्या अभिमानाने बघतो, त्याच्या डोळ्यात एक चमक असते, तो अगदी शांतपणे उत्तरतो.

'नाही, हे पुस्तक माझ्यासाठी आहे.'

चित्रपट संपतो.


'नो, धिस इज फॉर मी.'

एक अतिशय सुंदर चित्रपट बघितल्याचे समाधान देऊन जातो. विस्लरसारखा कडवा माणूस कसा हळूहळू बदलतो आणि अगदी विरुध्द बाजूपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो हे अतिशय हळूवारपणे चित्रण केले आहे. त्याचा हा प्रवास चालू असताना आपण त्याच्याबरोबर असतोच. पण आपण एवढे समरस झालेलो असतो की तो बदलतो आहे हे आपल्याला दिसत असते पण जाणवत नाही. शेवटी आपण एकदम भानावर येतो आणि विचार करतो, 'अरे!!! केवढा बदलला हा. कुठून कुठपर्यंत पोचला.' अप्रतिम. सगळेच कलाकार अप्रतिम काम करून गेले आहेत.

चित्रपटाची मला जाणवलेली दोन वैशिष्ट्ये म्हणजे कोणताही भडकपणा नाही. विस्लरचा प्रवास अगदी सहज आणि हळूवारपणे दाखवला आहे. एक प्रसंग असा आहे. तो घरी येतो, लिफ्टमधे शिरतो. एक अगदी लहान मुलगा पण त्याच्या मागोमाग शिरतो. विस्लरचा गणवेष पाहून तो लहान मुलगा विचारतो 'तू श्टाझी आहेस का?' विस्लर त्याला उलट विचारतो 'तुला रे काय माहित श्टाझी काय आहे ते?' तो मुलगा म्हणतो, 'मला माहित आहे. माझे बाबा म्हणतात की श्टाझी दुष्ट असतात.' इतक्या वर्षांच्या सवयीने, अगदी प्रतिक्षिप्तक्रिया असल्याप्रमाणे विस्लर त्या मुलाला त्याच्या वडिलांचे नाव विचारायला जातो पण प्रश्न पूर्ण न करता अर्धवट सोडून देऊन गप्प बसतो आणि विषय बदलतो. हा प्रसंग विस्लरमधला फरक खूपच यथार्थपणे जाणवून देतो. भाषणबाजी नाही, ड्रामा नाही. फक्त एक लहान मुलगा, लिफ्टमधली शांतता आणि विस्लरच्या चेहर्‍यावरचे मूक भाव. लाजवाब.


'श्टाझी दुष्ट असतात!!!'

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचा शेवट. ख्रिस्टा-मारिया मरते तिथे हा चित्रपट संपतच नाही, पण जेव्हा ड्रेयमान नंतर विस्लरला शोधून काढतो तिथेही संपवला नाहीये. त्यावेळी ड्रेयमान विस्लरशी काही बोलतच नाही. बहुधा, तो असले हलके काम करताना त्याच्यासमोर जाणे त्याला प्रशस्त वाटत नाही. तो पुस्तक प्रसिध्द करतो आणि HGW XX/7 ला अर्पण करतो. नंतर विस्लरला ते पुस्तक दिसते आणि अर्पणपत्रिकाही दिसते आणि तो जे काही समजायचे ते समजतो. क्लास. कुठेही शब्दबंबाळ संवाद नाहीत. किंबहुना संवादच नाहीत. तसेही, जेव्हा जेव्हा भावना खरोखर व्यक्त होतात तेव्हा क्वचितच शब्द उपयोगी पडतात. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ते पुरेपूर माहित आहे हे जाणवते.

असा हा... 'लाइव्ह्ज ऑफ अदर्स'. २००७ च्या ऑस्कर मानांकनात 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' पुरस्कार मिळालेला चित्रपट. अजूनही य पुरस्कार मिळालेले आहेत. पण सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे, मला आवडलाय. तुम्ही बघाल तर तुम्हालाही आवडेल, नक्की बघा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एकदम आवडता सिनेमा. बिपीन कार्यकर्ते, तुम्ही इन्ट्रोच्या परिच्छेदानंतर व चित्रपटाची संपूर्ण कथा सांगण्याच्या आधीआधी 'स्पॉइलर' वॉर्निंग असे लिहा म्हणजे ज्यांना सिनेमातील उत्सुकता टिकवून ठेवायची आहे ते संपूर्ण लेख वाचणार नाहीत. फक्त चित्रपट ओळखच वाचतील.

तसेही, जेव्हा जेव्हा भावना खरोखर व्यक्त होतात तेव्हा क्वचितच शब्द उपयोगी पडतात.

अगदी खरंय.
नेमकं आपल्याकडच्या दिग्दर्शकांना हेच कळत नाही त्यामुळे अभिनयातून भावना व्यक्त न करता येणारे लंबे चौडे संवाद बोलत रहातात.

मस्तच परिक्षण.

छान उलगडलाय चित्रपट. नक्की पाहेन.
जाईशी काही अंशी सहमत. विशेषतः लास्ट समुराईच्या लेखात कथेसोबत लेखकाचे भाष्य किंवा प्रतिबिंब जास्त प्रभावीपणे दिसून आले होते.

सुंदर चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही इन्ट्रोच्या परिच्छेदानंतर व चित्रपटाची संपूर्ण कथा सांगण्याच्या आधीआधी 'स्पॉइलर' वॉर्निंग असे लिहा >>> अनुमोदन.

पहायला हवा सिनेमा .
हे सिनेमे पाहताना ही भाषा येत असती तर फार बर झाल असत अस वाटत राहत.
कितीतरी पदर 'लॉस्ट इन ट्रान्स्लेशन" न उमगताच सुटत असतील.
तुम्हाला अजून काही चित्रपटांच्या नावांची लिस्ट पाठवावीशी वाटतेय. Wink

तुम्हाला अजून काही चित्रपटांच्या नावांची लिस्ट पाठवावीशी वाटतेय. >>>> लग्गेच पाठवा Happy आणि बिपिनरावांना संपर्कातूनही कळवा - (आजकाल इथे मा बोवर वावर कमी झालाय त्यांचा ... )

छान ओळख. सिनेमाच्या निमित्ताने लिहिलेले इतरही खूप आवडले. पूर्व जर्मनीतल्या लोकांबद्दल काहीही वाचायची, बघायची उत्सुकता असतेच. हा सिनेमा शोधते आता.