अस्पष्ट होत जातो माझ्या समोर रस्ता

Submitted by जयदीप. on 21 July, 2014 - 22:09

निष्पर्ण व्हायचा प्रण घेशील तू मनावर
जयदीप ...शेवटाची चाहूल लागल्यावर

अस्पष्ट होत जातो माझ्या समोर रस्ता
डोळ्यात आसवांचा पाऊस साठल्यावर

आदर्शवाद आहे किल्ला तुझा तरीही
तुटतो बरेच वेळा वाळूत बांधल्यावर

आक्रोश करत येतो उद्रेक शांततेचा
एकांत आठवांच्या गर्दीत पोचल्यावर

वाटे निबंध किंवा कादंबरी जगाला
आयुष्य शब्द होते सारांश काढल्यावर

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैली बदलल्याचे जाणवले. शैली अधिक चांगली झाल्याचे जाणवले.

मात्र गूढतेच्या आवरणात विधानात्मकता समोर आल्यासारखेही वाटले.

छान आहे गझल, काही गोष्टी इनपुट म्हणून लिहितो.

निष्पर्ण व्हायचे पण घेशील तू मनावर
जयदीप ...शेवटाची चाहूल लागल्यावर

अस्पष्ट होत जातो रस्ता सरावलेला
डोळ्यात आसवांचा पाऊस साठल्यावर

आक्रोश करत येतो उद्रेक शांततेचा
एकांत आठवांच्या गर्दीत पोचल्यावर

ठळक केलेल्या भागाबद्दल मला काय म्हणायचे हे आपण समजू शकाल.

डोळ्यात, एकांत, जयदीप ह्या ओळी अतिशय सहज आलेल्या आहेत.

शुभेच्छा!