झाड - गूढ

Submitted by अमेय२८०८०७ on 20 July, 2014 - 23:07

Zaad - Gudh.jpg

कोल्हापूर-जोतिबा रस्त्यावर हे झाड पाहिले. रस्तारुंदीकरणात किंवा असेच एखाद्या वादळात मुळापासून उखडले गेले असावे. जे दिसले त्यावर मेंदूत प्रक्रिया होऊन समोरचे दृष्य उमजायला काही सेकंद जावे लागले, नीट निरखून बघावे लागले.

साधारणत: मुळे अशी अचानक तुटली की जीवनरसाच्या अभावाने झाडाचा मृत्यू अटळच. त्यातून झाड जितके मोठे तितके त्याचा दगावण्याचा धोका जास्त. वाढत्या वयासोबत मुळांवरचे अवलंबित्व वाढत असावे. नवीन रोपाची माती बदलता येते, अलवार उचलून त्याला दुसरीकडे नेता येते. जुनी माती काही काळ मुळांभोवती ठेवून सर्व काही ठीक असल्याचा आभास निर्माण करता येतो आणि त्यालाही ते खरे वाटते. मोठ्या झाडाला वयपरत्वे आलेले शहाणपण दुसरीकडे रुजू देत नाही. आयुष्यभर एकाच जागी घट्ट उभे राहण्यात जगण्याची सगळी उर्जा खर्च झाली असते. जीजिविषा सरत आली असते बहुधा, म्हणूनच मुळे दुरावल्यावर 'सुकून जाणे' हे नशीब अशी झाडे वार्धक्याच्या अपरिहार्यतेने मान्य करताना दिसतात.

या झाडाचेही प्राक्तन तसेच असायचे पण इथे एक चमत्कार घडला. उन्मळल्यावर हे दुसऱ्या झाडावर पडले. कदाचित पहिल्यापासूनच त्यांची मुळे जमिनीखाली गुंतलेली असतील, किंवा सततच्या संवादाने एकमेकांविषयी जिव्हाळा निर्माण झाला असेल. काय असेल ते असेल पण बाह्यशक्तीने उखडून काढल्यावर शेजारी इतर कोणतेही झाड नसताना बरोबर दुसऱ्या झाडावरच पडावे यातील निसर्गयोजना पाहून थक्क झालो खरा ! आणि त्या दुसऱ्या झाडाने काय छान सावरले आहे या दुर्दैवाला. बुंध्याकडचा जमिनीलगतचा काही भाग पडणाऱ्या झाडाने गमावला पण उरलेला भाग संपूर्णरित्या रसरशीत आहे, जिवंत आहे. झाडाच्या पारंब्या आधारदात्याच्या खोडाशी एकरूप झाल्या आहेत आणि त्यातून हक्काचे जीवनतत्त्व झाडापर्यंत व्यवस्थित पोचते आहे. झाडाच्या टोकाशी साल खरवडली तर आत हिरवे चैतन्य अजून जागे असल्याच्या खुणा दिसत आहेत. एक फांदी तर पुढच्या झाडापर्यंत पोचून स्वत:ची हिरवाई त्याच अभिमानाने जपताना दिसत आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या नवीन नात्यात कोणताही ताण दिसत नाही. झाडे एकमेकांशी पक्की जोडली गेली आहेत, अगदी मुद्दामून जोडावीत अशी. नकोशी जबाबदारी अंगावर आल्यावर दिसणारा राग किंवा अवचित आलेल्या ओझ्यामुळे येणाऱ्या थकव्याचे आधारदात्या झाडाच्या चर्येवर कोणतेही चिन्ह दिसत नाही. एका आपल्याच फांदीला वाढवावे इतक्या सहजतेने झाडाने झाड पेलून घेतले आहे. दोघांचीही निरोगी वाढ सुरू आहे.

काय पाहून काय आठवेल सांगता येत नाही. एकदम दिलीप आठवला. आईवेगळा मुलगा, सहावी- सातवीपर्यंत आमच्या वर्गात होता. गरिबीसोबत संवेदनेचाही शाप लाभला होता त्याला. बरेचदा शाळा सुटल्यावर आमच्या घरी यायचा. खेळायचा, अभ्यास करायचा. माझी आई मराठी कविता, धडे समजावून सांगत असताना - अनेकांना मिळूनही कदर नसलेल्या आणि त्याला जीव जाळूनही कधीही न मिळू शकणाऱ्या - 'वात्सल्य' नावाच्या निसर्गातील सर्वात सहज आणि सर्वात मौल्यवान भावनेचे तुषार काठावरून का होईना साठवून घ्यायचा. वर्गात जीवशास्त्राच्या शिक्षकांनी, " झाडे व माणसांत फरक सांगा ", असे विचारल्यावर दिलीपने, " माणसांचे अवयव गळले-तुटले तर परत उगवत नाहीत " असे सांगितले होते. एरवी कडक भासणाऱ्या त्या शिक्षकांनी उत्तर ऐकल्यावर चष्मा काढून डोळे पुसल्यासारखे का केले, ते तेव्हा कळले नव्हते. या झाडांना पाहताना मला त्या वरकरणी थेट संबंध नसलेल्या घटनेमागचे रहस्य उकलल्यासारखे वाटले.

माणसांच्या मुळांचे काय ? कुठे असतात त्यांची मुळे ? कुठेतरी जन्मतात, कुठेतरी वाढतात आणि कुठेतरी संपून जातात. घरपरतीची कवाडे बंद झालेल्यांना, बंद केली आहेत त्यांना तर याची तयारी ठेवायलाच हवी. आपल्या मातीतच आधार मिळण्याचे सुदैव अनेकांना लाभलेले नसते तिथे परप्रदेशात जाऊन उखडले जाणाऱ्यांचे काय होत असेल? कुठल्या आशेवर जगत असतील ही माणसे? ज्यांनी डोळसपणे भटकेपण स्वीकारले आहे त्यांचे ठीक पण ज्यांना केवळ तगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी फरफट करावी लागते त्यांचे नशीब कोणत्या सटवाईने लिहिले असते? 'बनगरवाडी'त "माणसे जगायसाठी गावाबाहेर पडली", अशा अर्थाचे वाक्य आहे. किती दारुण आहे असे विस्कटलेले, उसवलेले कपाळ घेऊन जन्माला येणे! पुढे दिलीपचीही मुळे उखडली. पोटासाठी नकली हिऱ्यांची कारागिरी शिकण्यासाठी वडिलांनी त्याला नातलगाकडे मुंबईला पाठवले. दोनेक वर्षांनी गावी सुट्टीला म्हणून आल्यावर आसुसून शाळेत आलेला दिलीप हा तोच आमचा मित्र, हे पटणे अशक्य होते. गावच्या मोकळ्या वातावरणाची सवय असलेला, चित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा स्वच्छंद जीव, चाळीच्या खुराड्यात राहून काजळला होता. स्वप्ने विझवून अकाली मोठा झाला होता. 'भूक' नावाच्या राक्षसिणीने आणखी एक बळी घेतला होता.

निसर्गाचे नियम अगाध असतात. एकाच रागाला भिन्न गायकांनी आपापल्या विचारधारेनुसार उलगडून दाखवावे तसे 'उत्पत्ति, स्थिति व लय' या ढोबळ चाकोरीतून किती तऱ्हेचे व्यवहार निसर्ग दाखवत असतो ! फुलपाखराचे रंगही त्याचेच आणि फुलपाखराच्या आयुष्याचे क्षणभंगुरत्वही त्यानेच दिलेले. सदाहरित जंगले त्याचीच आणि अमर्याद-वैराण वाळवंटेही. सूक्ष्मतर कीटकांचे जीवन फुलावे म्हणून योजना आखणाराही तोच आणि क्रोधाच्या वादळांत, निर्मिलेले सर्व एका झटक्यात नाशाप्रत नेणाराही तोच. कशाचे म्हणून अप्रूप करायचे; बरसणाऱ्या पाण्याचे, चमकणाऱ्या ताऱ्यांचे की भणाणणाऱ्या वाऱ्यांचे! मति गुंग होऊन जाते.

या झाडाच्या रुपात जे काही अनुभवले त्याची जातकुळी मात्र वेगळीच. स्थिर-अचल जीवन कंठणारे झाड दुसऱ्याच्या मदतीला जणू धावून गेले आहे. झाड उखडताना शेजारच्या झाडावर पडणे हा योगायोग मानला तरी ते अशा तऱ्हेने स्वीकारले जाणे, वाढवले जाणे याला कोरडा योगायोग मानायला मन तयार होत नाही. स्टाइनबेक म्हणतो की प्राणी केवळ आपल्या भाषेत बोलत नाहीत म्हणून त्यांचे मनोव्यापार साधे, बिनगुंतागुंतीचे आहेत असे माणूस का समजतो, कळत नाही. झाडांनाही हे लागू पडतेच ना. मरणे तुम्हाला-आम्हाला किंवा या दोन झाडांनाही चुकलेले नाही पण आहे तोवर जीवनाला लढवत ठेवण्याची ही विजिगिषा पाहणे भारावून टाकणारे आहे.

माणसाचे तरी काय वेगळे आहे? मालवू पाहणाऱ्या आशेच्या दिव्याला अकल्पित सुरक्षेची ओंजळ मिळते आणि आयुष्य तेवायला पुन्हा सुरूवात होते. नितांत गरज असताना आधार मिळणे यासारखे भाग्य कुठले? सुदैवाने अजून उखडेन अशी संकटे आली नाहीत माझ्यावर पण मुळे हलवणारे प्रसंग आलेच आले. त्यावेळी ज्यांनी ज्यांनी आपल्यापरीने आधार दिले, त्यांचेही स्मरण यावेळी झाले. कितीतरी थोरांच्या चरित्रांत त्यांना मिळालेल्या संधीचे, वेळेवर मिळालेल्या मदतीचे कृतज्ञतापूर्ण उल्लेख आहेत. त्यांचे मनोबल अभंग राहिले, आयुष्य उजळले आणि एखादा व्हॅन गॉग मात्र अंगात शंभर नंबरी कला असूनही हव्या तशा - कलेला ओळखणाऱ्या - नजरेची दाद न मिळाल्याने भरकटून विझून गेला. शेवटी माणूस अब्जाधीश असो किंवा सर्वसामान्य, टेकवण्यासाठी एखादा खांदा हवाच हवा असतो. भूक असते ती चार गोड शब्दांची, सुखदु:ख वाटून घेण्याची. ज्याला मिळत नाही तो व्यसनांत आणि इतर विकतच्या, कृत्रिम सुखांत ती भूक भागवू पाहतो, मृगजळामागे धावत राहतो. आपण असण्याचा - नसण्याचा कुणालाही कवडीमोलाचा फरक पडत नाही यासारखी भयाण भावना नसेल दुसरी. "कोणीतरी मागे काळजी करणारे आहे" यातील आपलेपणाची ओल सैनिकाला सीमेवर लढते ठेवते, खलाश्याला वादळाशी झुंजवत घरी आणते आणि वैमानिकाला त्याच्या विमानात यंत्रांसोबत समोर आपल्या मुलाबाळांचे छायाचित्र लावावे, असे वाटण्यामागचे कारण असते.

तुम्ही कुठेही असाल, आपल्या मातीत अथवा परमुलुखात आणि तिथे तुम्हाला आधार देणारी, प्रसंगी सावरून-तोलून धरणारी देवमाणसे तुमच्या आजूबाजूला असतील, तर तुमचे नशीब या पडता पडता सावरलेल्या, मरता मरता जगलेल्या भाग्यवान झाडासारखे सुवर्णाच्या शुद्धतेत न्हालेले आहे असे समजा आणि संध्याकाळच्या प्रार्थनेत अशांची नावे असू द्या … जिवापाड शांतता लाभेल याची मला खात्री आहे.

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय मस्त लिहलय. सकाळ मस्त झाली वाचुन. मामा / निपो उगाच नाही तुमच कौतुक करत. Happy

एक गरज नसलेली कमेंट (दिल्याशिवाय राहावल नाही)
ज्या झाडाने आधार दिला आहे ती मुळ झाडाचीच पारंबी आहे (जास्त करुन असेच वाटते) किंवा पारंबीने मुळ झाडाला आधार दिला आहे. कृतज्ञता आणि परोपकार कदाचित झाडे आणि माणसातला अजुन एक मोठा फरक.

अमेय....चित्रामुळे तर भारावून गेलो आहेच मी, पण त्याहीपेक्षा ज्या पद्धतीने तुम्ही त्यावर हे जे अप्रतिम असे लिखाण केले आहेस त्यामुळे जास्त प्रभावित झालो आहे मी. जोतिबा रस्त्यावर जाऊन हा निसर्गाचा चमत्कार पाहावा असे वाटतेच कारण असे दृष्य केवळ सुंदर नव्हे तर त्याभोवती निसर्गाची किमयाही गुंतलेली आहे. माणसाला सांभाळायला माणूस लागतो तोही विविध रुपात, पण उन्मळून पडलेले, मेलेले झाड केवळ आपल्या बंधूभगिनीच्या अंगावर रेलले म्हणून तगले पुन्हा नव्या जोमाने हा प्रकार वैज्ञानिकदृष्ट्या कसा घडला हे सांगण्यासाठी वनस्पतीशास्त्रज्ञ जी काही कारणमीमांसा पुढे करतील ते करोत पण तुमच्यामाझ्यासारखा माणूस विनयाने निसर्गाच्या करामतीपुढे झुकून जाईल हे सत्यच. निसर्गाचा नियम/निर्णय कित्येकवेळी करुण, भयावह आणि विस्मयजनक (उदा.त्सुनामी) असतो हे आपण पाहतोच पण वेळ येताच निसर्गाचा सृष्टीला सांभाळण्याचाही नियम किती आनंददायी असू शकते यासाठी हे चित्र उदाहरणादाखल जपून ठेवावे असेच आहे. नेटाने जीवनाची पावले रुतवून ठेवून अंगावर पुन्हा नव्याने हिरवी पालवी फुलविणारे हे उखाडलेले झाड निश्चयाची परमावधी दाखवित आहे. पतंगासारखे काही कीटक जीवन पणाला लावून प्रणयाचा खेळ खेळतात....मीलनानंतर नर मरतो हे पाकोळ्याच्या जगात दिसते....ही देखाल निसर्गाची नियमावली; पण वात्सल्याचा प्राकृतिक आविष्कार जेव्हा पाहायला मिळतो त्यावेळी काय हे अद्भुत जीवन असेच म्हणावे लागेल. जगणेमरणे अटळ आहेच, पण अटीतटीने का होईना पण जीवनाची ओढ केवळ जीवितालाच असते असे नव्हे तर मरणपंथावर असलेल्याही ती कशी असते आणि त्यात तो कसा यशस्वी ठरू शकतो हे दिसले....हे फार मोहक आहे.

माणूस अब्जाधिश होवो वा भिक्षाधिश, तरीही त्याला आधार हा हवा असतोच...तो कशा रूपात त्याला आणि कुठे भेटेल याचे ठोस असे तत्त्वज्ञान नाही. ते अवलंबून आहे स्वतःच्या व्यवहारातील वर्तणूकीवर...तुम्हाला भेटत असलेल्या मित्रांवर...त्यांच्या सोबतीवर....ती असेल पक्की तर मग माझासारखी व्यक्तीही अशा उन्मळून पडत असलेल्या झाडासारखी पुन्हा नेटाने उभी राहू शकते.

माझे वरील मत तर मी तुम्हाला अगोदरच कळविले आहे....पण आज हा लेख पुन्हा वाचताना आणखीन काही विचार मनी रुंजी घालू लागले....ते थोडक्यातच देतो, अन्यथा भीती वाटते की लेखापेक्षा प्रतिसाद दीर्घ होईल. अर्थात हा विषयच इतका वैचारिक आहे की त्यावर जितके लिहिले जाईल ते अपुरेच होईल....ही देखील एकप्रकारची तहानच होय...जी त्या झाडाला गरजेची वाटली....भागली...आणि ते तरारून येत आहे...जगत आहे जिद्दीने.

नव्याने तुम्ही लिहिले आहे की...."नितांत गरज असताना आधार मिळणे यासारखे भाग्य कुठले?...मला वाटते "आधाराची गरज" ही देखील एकप्रकारे निसर्गदत्त संवेदना असणार आपल्या रक्तातच. तो देणे वा मिळविणे शिकवणीचा, संस्कारांचा, अनुभवांचा पोत यावर अवलंबून असतो, पण झाड पाहायला गेले तर आपसूक वाढणारी जगणारी निसर्गाची करामत. पण याच्याही शरीराला आधाराची गरज वाटते आणि वेल जशी स्वतंत्ररित्या न जगता आधारावरच जगते त्याच नियमानुसार मरायला आलेले झाडसुद्धा चिकाटीने की काय आपल्याच बांधवाचा आधार शोधते आणि तो मिळवूनही दाखविते हे वरील चित्राने दाखवून दिले आहे.

हे चित्रच एकप्रकारे शुद्ध कविता बनून समोर आले आहे. बघणारे अनेक असतात...पाहतात...पुढे जातात. तुमची मूळ प्रवृत्ती एका कवीची असल्याने तो कवी निसर्गाचा हा खेळ पाहून थबकला....आणि ते दृष्य पाहून त्याला जे सुचले ते मनी साठविले गेले आणि आपल्याला लाभलेला आनंद अन्य सुहृदात वाटावा असे वाटल्याने ते देखणेपणाने शब्दबद्ध झाले. तुमच्या मनातील विचारांमुळे वाचकालाही एकप्रकारचा आधार वाटतो....जीवन कोरडे न राहता अशा भावनेमुळे ते सदैव ताजे राहू शकते.

अमेय _____/\_____ तुझ्या प्रतिभेला.

अशोकमामा सुंदर आणि ओघवता प्रतिसाद.

अमेय, अंतरातून उमटलेले विचार अतिशय आवडले. फार सुरेख मांडले आहेस. आयुष्य जगताना जगाकडे पहाण्याचा नजरिया देखणा आणि लाखमोलाचा आहे तुझा.

मामा, तुमचा प्रतिसादही उत्तम आहे.

सर्व प्रतिसादकांचे आभार. मामा, तुमचे विचार नेहेमीच अगदी स्वतःच्या लिखाणाकडेही बघण्याची नवीन दृष्टी देतात. आताही तसेच झाले आहे.

प्रणाम __/\__
लेखाला, त्यात मांडलेल्या विचाराला आणि ऑफकोर्स सर्वश्रेष्ठ अश्या या निसर्गाला !

अमेयदा, हे फेसबूकवर शेअर करा जमल्यास. हा फोटो आणि झाडाबद्दल सुरुवातीचे छानसे लिहिलेले एका पॅराग्राफमध्ये बसवून. (अख्खा लेख नको, कारण फेबू जनरेशन मोठाले उतारे पुर्ण वाचत नाही.) यात एक छानसा सुविचार दडलेला आहे, पुढे पुढे शेअर होईल तसे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. Happy

खुपचं सुंदर आणि तरल.
असंख्य वेळेला विविध झाडं पाहिली आहेत, पण कवी मनाने त्याचा ठाव घेणं जमुन गेलंय.
कुठेतरी आडवळणावर एका तगुन राहिलेल्या.. त्याला तगवण्यासाठी ठाम उभे राहिलेल्या दोन्हीही झाडांसाठी कदाचित रोमांचितच क्षण असेल.

-
कमळी.

अमेय , निसर्गातल्या एका अद्भुताकडे कविप्रतिभेचे पाहणे कसे असते ते दाखवून दिलेत या लेखनातून.
सुंदर विचार-विस्तार आणि शेवटही.
आणि हो, शीर्षकही, काही जणांना तरी ठाऊक नसेल की ही बोरकरांची कविता आहे.. तिची दोन कडवी आठवताहेत -
झाड गूढ झाड गूढ
ओल्या प्रकाशाची चूड
गार गार पारा गाळी
संध्यारंगाचे गारूड

झाड आकाश वेढते
झाड पाताळ फोडते
ताळमूळ संसाराचे
गाठीगाठीत जोडते ..

Pages