हितगुज दिवाळी अंक २०१४ - नियमावली

Submitted by संपादक on 18 July, 2014 - 20:41

लेखन पाठवण्यासाठी सूचना आणि नियम

 • आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा.
 • दिवाळी अंकासाठी साहित्य रविवार ३१ ऑगस्ट, २०१४ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत] संपादक मंडळाकडे पोहोचले पाहिजे.
 • दिवाळी अंकासाठी स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित साहित्य पाठवावे. साहित्य सॉफ्ट-कॉपीस्वरूपात आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. देवनागरीत नसलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
 • विशेष विभागासाठी साहित्य सुपूर्त करताना विशेष विभाग शीर्षकात अंतर्भूत करावा. जसे, <विशेष विभाग> : <मुख्य शीर्षक>. लेखन प्रकार निवडताना योग्य तो लेखनप्रकार निवडावा.
 • साहित्य पाठवताना ते शक्यतो व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांत बसेल असे पाहावे. 'मराठी साहित्य महामंडळ'-प्रणीत व शासनमान्य मराठी लेखन-नियमावली येथे वाचावयास मिळेल.
 • साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.
 • अंकासाठी किती साहित्य पाठवायचे यावर अर्थातच बंधन नाही. परंतु पाठवलेले सर्व साहित्य स्वीकारले जाईलच असे नाही. प्रत्येक साहित्यप्रकार संपूर्ण रूपात स्वतंत्र प्रवेशिकेत पाठवावा.
 • संपादक मंडळास पाठवलेल्या साहित्यात काही बदल करायचा असल्यास आधी संपादक मंडळाशी sampadak@maayboli.com येथे संपर्क साधावा. एकच साहित्य पुनः:पुन्हा पाठवू नये.
 • आपण जे साहित्य पाठवू इच्छिता त्याचा आकार जर मोठा असेल आणि ते मायबोलीवरून पाठवणे शक्य होत नसेल तर कृपया संपादक मंडळाशी sampadak@maayboli.com येथे संपर्क साधावा.
 • साहित्य अंकात समाविष्ट करायचे झाल्यास लेखक / लेखिका म्हणून आपले मायबोली सदस्यनाम प्रसिद्ध व्हावे की आपले खरे नाव, हे साहित्य पाठवताना कृपया नमूद करावे. जे नाव प्रकाशित करणे अपेक्षित आहे ते लेखाच्या शेवटी द्यावे.
 • साहित्य मिळाल्याची पोच पाठवली जाईल. साहित्य सुपूर्त केल्यानंतर २४ तासांत पोच न मिळाल्यास संपादक मंडळाशी sampadak@maayboli.com येथे संपर्क साधावा.

’विचारमंथन’ या विभागांतर्गत पाठवायच्या लेखांसाठी विशेष नियमावली

 • या विभागात फक्त ललितलेख अपेक्षित आहेत. या संकल्पनांवर आधारित आपण पाठवलेल्या इतर साहित्याची निवड झाल्यास ते योग्य त्या विभागात समाविष्ट केले जाईल. उदा., पॅराडाइम शिफ्ट या संकल्पनेवर एखादी कथा आल्यास ती अंकातील कथा विभागात दिसेल.
 • सर्व लेखांसाठी शब्दमर्यादा २५००
 • संकल्पनांखेरीज इतर विषयांवरील ललितलेखांचेसुद्धा स्वागत आहे.
 • 'विचारमंथन' विभागात लेख पाठवताना योग्य संकल्पना शीर्षकात लिहावी आणि मग मुख्य शीर्षक लिहावे. उदा., पॅराडाइम शिफ्ट : पृथ्वी गोल झाली तेव्हा. इथे लेखनप्रकार 'विशेष वैचारिक लेख' निवडावा.
 • संकल्पनांखेरीज इतर विषयांवरील ललितलेखांसाठी लेखनप्रकार 'ललित' निवडावा.

किशोरांसाठी असलेल्या साहित्यासाठी नियमावली

 • या विभागात दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील किशोरांसाठी साहित्य अपेक्षित आहे.
 • साहित्यप्रकारावर बंधन नाही. कथा, कविता, ललित, माहितीपूर्ण लेख अशाप्रकारचे साहित्य पाठवावे.
 • शब्दमर्यादा नाही, परंतु आजच्या पिढीची 'इंस्टंट' मानसिकता लक्षात घेता साहित्याच्या लांबीचे भान ठेवावे.
 • 'किशोरविश्व'साठी साहित्य पाठवताना शीर्षकात किशोरविश्व : <मुख्य शीर्षक> असे लिहावे. उदा., किशोरविश्व : एक होता आयफोन. 'एक होता आयफोन' ही कथा असल्यास लेखनप्रकार 'कथा' निवडावा. ललितलेख असल्यास लेखनप्रकार 'ललित' निवडावा.

'हलकेफुलके' विभागासंदर्भातील नियमावली

 • 'सल्ला मेंडकेचा' या सदरात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे पाठवताना कृपया एका प्रश्नाचे एकच उत्तर द्यावे. आपली उत्तरे आम्हाला या दुव्यावर पाठवा.
 • 'सल्ला मेंडकेचा' या सदरासाठी एकापेक्षा अधिक प्रश्नांना उत्तरे द्यायची असल्यास सर्व प्रश्नोत्तरे एकाच प्रवेशिकेमध्ये समाविष्ट करावीत.
 • 'हास्यटपरी' विभागासाठी पाठवलेल्या जाहिराती फक्त शाब्दिक असाव्यात.
 • 'हास्यावली' विभागासाठी पाठवलेला विनोद एक ते चार चौकटीत रेखाटण्यायोग्य असावा.
 • विषयाचे बंधन नाही. चालू घडामोडी, नातेसंबंध, रोजचे जीवन, ऑफिसमधील गमतीजमती इ. विषयांवर विनोद पाठवू शकता. मात्र प्रवेशिका पाठवताना कुठल्याही जाती-धर्म-वर्ण-लिंग-प्रांतावर टिप्पणी कटाक्षाने टाळावी.
 • 'हास्यटपरी' व 'हास्यावली' विभागासाठी प्रवेशिका पाठवताना वर सांगितल्याप्रमाणे शीर्षक देऊन लेखनप्रकार 'इतर' निवडावा.
 • या विभागासाठी शब्दमर्यादा ५० फक्त.

दक्‌श्राव्य विभागासंबंधी नियमावली
या वर्षीच्या मायबोलीच्या दिवाळी अंकातदेखील दृक्‌श्राव्य कार्यक्रम अंतर्भूत आहेत. दृक्‌श्राव्य विभागात आपण विविध कलाकौशल्यांचे दृक्‌श्राव्य सादरीकरण करू शकता. मायबोलीकरांनी आतापर्यंत तुमच्या कलेचे अंतिम रूपच पाहिले आहे किंवा त्याबद्दल फक्त ऐकले आहे. या निमित्ताने तुमच्या कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण / कलाकृतीची निर्मितिप्रक्रिया बघण्याचा आनंद सर्व मायबोलीकरांना लुटता येईल.
यासंबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे :

 • दृक्‌श्राव्य विभागासाठीच्या कलाकृती आम्हांला sampadak@maayboli.com येथे पाठवा.
 • आपली कलाकृती कुठेही पूर्वप्रकशित नसावी. तसेच, सादरीकरणात अथवा चित्रीकरणात एका अथवा अधिक मायबोलीकरांचा सहभाग असावा.
 • दृक्‌श्राव्य सादरीकरण १० मिनिटांपेक्षा जास्त नसावे.
 • चित्रफितीचा आकार 2GBपेक्षा जास्त नसावा.
 • चित्रीकरण, संकलन, ध्वनिमुद्रण इ. सादरकर्त्यानेच करायचे आहे. चित्रफिती संपादकांकडे पाठवताना प्रकाशनास योग्य असावीत. संपादक या चित्रफितींत दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ व मायबोलीचा लोगो घालणे, असे किरकोळ संस्कार करतील.
 • चित्रफितींत वापरलेलं संगीत हे प्रताधिकारमुक्त असावं, अथवा, ते वापरण्यास अधिकृत परवानगी घेतलेली असावी. चित्रफितींत तसा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.
 • चित्रफीत .avi, .mpeg, .wmv, .wma, .camrec, .mpg यांपैकी एका प्रकारची असावी.
 • चित्रफिती आपण http://www.hightail.com, http://free.mailbigfile.com/ या संकेतस्थळांवर अपलोड करू शकता.
 • चित्रफीत पाठवताना आपण फितीचा आकार कमी करण्यासाठी WinZip® अथवा WinRAR® या संगणक प्रणाली वापरू शकता. तसेच कमी आकाराच्या फॉर्मॅटचाही वापर करू शकता. चित्रीकरण केल्यानंतर Camtasia Studio, Adobe® Premier® यांसारख्या संगणकप्रणाल्यांचा वापर करून आपण आधी संकलन करू शकता व नंतर फितींमध्ये आवाज घालू शकता. यामुळे चित्रफिती अधिक देखण्या होतील. ही सॉफ्टवेअरं आंतरजालावर उपलब्ध आहेत.
 • अंकात समाविष्ट करण्याआधी या चित्रफिती आपण www.youtube.comवर अपलोड करणार आहोत याची कृपया नोंद घ्यावी. याविषयीची अधिक माहिती इथे मिळू शकेल.
 • चित्रफितींचा दिवाळी अंकात समावेश करायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.

प्रताधिकारांसंबंधी नियमावली

 • पाठवलेल्या साहित्यात गरजेनुसार अंतर्भूत केलेले अवांतर साहित्य (छायाचित्रे, मजकूर, रेखाटने/आकृत्या इत्यादी सर्व) हे शक्यतो प्रताधिकारमुक्त असावे व तसे लेखाच्या शेवटी नमूद करावे.
 • प्रताधिकार लागू असलेले साहित्य वापरले गेले असल्यास संबंधित व्यक्तीची अथवा संस्थेची लेखी/ईमेलद्वारे परवानगी घेतलेली असावी व लेखाच्या शेवटी तसा स्पष्ट निर्देश असावा.
 • या परवानग्या मिळवण्यास काही अडचण आल्यास, किंवा काही मदत लागल्यास कृपया संपादक मंडळाशी व मायबोली प्रशासनाशी संपर्क साधावा.
 • 'कॉपीलेफ्ट' असाही एक प्रकार आजकाल प्रचलित आहे. जेव्हा 'कॉपीलेफ्ट' प्रकारातले साहित्य तुम्ही वापरता, तेव्हा ते वापरून तयार केलेले तुमचे साहित्यही तुम्ही 'कॉपीलेफ्ट' प्रकारान्वये प्रताधिकारमुक्त करत असता.
 • आपण वापरत असलेले साहित्य प्रताधिकारमुक्त आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी खालील दुवे संदर्भ म्हणून वापरता येतील.
  1. भारतीय प्रताधिकार कायदा
  2. प्रताधिकार: नेहमी विचारले जाणारे प्रश्न

काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आमच्याशी इथेच अथवा sampadak@maayboli.com या पत्त्यावर जरूर संपर्क साधा. संपादक मंडळ तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

आपले साहित्याभिलाषी,
- संपादक मंडळ

विषय: