मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता !!!

Submitted by निमिष_सोनार on 18 July, 2014 - 05:01

"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं. हे कमी पडले की काय म्हणून बहुतांश मराठी सिरीयल सुद्धा रोज रोज हेच दळण दळत असतात.

मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांना पक्के माहिती आहे की, मराठी चित्रपट (बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मल्टीप्लेक्स सह) चालण्याचे एकमेव हक्काचे ठीकाण आहे पुणे आणि पुणे येथे पेन्शनर वृद्ध वयस्कर मंडळी जास्त राहातात. मग त्यांच्या मनाला कॅश करुया. मग असे चित्रपट काढतात. पैसे कमावतात.

तरूण मंडळी इमाने इतबारे आपल्या आई वडीलांची सेवा करतात. यात वाद नाही. आदर्शपणाने नव्हे तर प्रॅक्टीकली! शक्य होईल तसे ते आई-वडीलांची हौस मौज करतच असतात, गरजा पुरवतच असतात.

कोणतेच आई वडील सुद्धा आपल्या मुलांना आदर्शपणे वाढवत नाहीत. तेही प्रॅक्टीकली विचार करूनच शक्य तेवढे शिक्षणच मुलांना देतात. शक्य तेवढे ते मुलांसाठी करतात. स्वतःसाठी काही राखून! बरोबर?

त्याचबरोबर मग इच्छा मारून मुलेही न आवडणारे शिक्षण आई- वडिलांच्या दबावाखाली किंवा इच्छेखातर पूर्ण करतातच की!

मुले आयुष्यभर आई-वडीलांखातर, त्यांचे पांग फेडण्याखातर स्वत:च्या अनेक स्वप्नांवर आणि छंदांवर पाणी सोडतातच !!

मग हेच आई वडील एकदा का वृध्द झाले की अचानक मुलांकडून आदर्शवादी अपेक्षा करतात.का तर ते फक्त "वृद्ध" आहेत म्हणून?

मुलाला लहानपणी अभ्यासासाठी स्वतंत्र खोली सुद्धा न देऊ शकणारे आईवडील मुलगा नौकरीला लागताच शहरामध्ये त्याचेकडून २/3 BHK flat ची अपेक्षा करायला लागतात. हेच नाही तर लहान बहिणीचे/भावाचे ही सगळे मोठ्या मुलाने करावे असा आग्रह धरला जातो. हा मुद्दा मराठी चित्रपट का मांडत नाहीत ???

आजकाल गळेकापू स्पर्धेमुळे पुर्वीच्या पिढी पेक्षा तरुण मंडळींना दुप्पट तिप्पट संघर्ष करावा लागतोय हे लक्षात न घेता फक्त विविध प्रकारचा अपेक्षा ते करताच असतात. आणि या विरोधात मुलगा काही जरी बोलला तरी त्याचे खापर सुनेवर फोडले जाते. याच ठिकाणी त्याच आई- वडिलांचा जावई जर मुलीचे ऐकत असेल तर याच आई वडिलाना आपला जावई आपल्या मुलीच्या मुठीत आहे हे ऐकून कोण आनंद होतो आणि चित्रपटात हा मुद्दा कधीच विचारात घेतला जात नाही. त्या वेळेस मात्र जावयाचे आई वडील खडूस आहेत, आमच्या मुलीचा काही दोष नाही असा प्रचार केला जातो. लक्षात आला का विरोधाभास? हा मुद्दा चित्रपटात ठळकपणे दाखवला पाहिजे.

त्यात मग अशा सिनेमांमुळे तरुणांची गळचेपी, मुस्कटदाबी होते. काही घरांमध्ये असे आदर्शवादी आणि मुलगा-सून द्वेष्टे मराठी चित्रपट बघण्यासाठी "मुला-सूनेवर" दबाव टाकला जातो आणि टोमणे मारले जातात हे सत्य आहे. सगळीकडेच नसेल पण हे आहे. "पहा पहा कशा एकेक सुना असता बाई!!" "पहा तीने सासूचे पाय दाबायला नकार दिला?!

एकदा सुलोचना दिदी म्हणाल्या होत्या की, प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. पण, निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांचेकडे असल्या "आगलाव्या" चित्रपटांशिवाय दुसरे काही दाखवायला नसेल तर माझ्यासारखे असंख्य त्रस्त प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतीलच. हे विषय सोडले तर मराठी चित्रपटांचा दर्जा उत्तम असतो यात वादच नाही.

चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे कोणताच मुलगा-सून टोकाचे वाईट नसतातच. बहुतेक सासवा सुद्धा तश्या नसतात. मात्र हुंड्यासाठी सुनेला जाळून मारणाऱ्या सासवा आजही आहेत. त्यांना कायदेशीर पणे अटकही होते असे दाखवणारे चित्रपट का बनवत नाहीत?

अशा सासवा म्हणजे खुनीच की.
पुरुष एक खून केला की तुरुंगात खितपत पडतो.
मात्र घराघरातींल अशा "जाळकुट्या" आणि अखंडपणे शब्दांनी सुनेला छळत रहाणार्या "दहशतवादी" बायकांचे काय करायचे?? त्याना कोण अटक करणार??
त्यांच्यावर चित्रपट कधी निघणार?? चित्रपटात त्याना अटक होते आहे फाशी होते आहे असे कधी दाखवणार? जेणेकरून अशा प्रवृत्तीला आळा बसेल!!

याच सासवा स्वत:च्या मुलीच्या आणि जावयांच्या चुकांवर मात्र जाडजूड चादर पांघरतात आणि सुनेची छोट्यात छोटी चूक मोठ्ठी करुन सगळीकडे सांगितली जाते, याला काय म्हणावे?

सासू-सून वाद हे पिढीततले अंतर असल्याने आहे, हे एकवेळ समजू शकते, पण एकाच वयाचे, एकाच काळातले असूनही सून-नणंद-भावजय एकमेकांना समजावून का घेऊ शकत नाही??

अशा या अति भयानक घरगुती दहशतवादाला खतपाणी घालणारे हे चित्रपट बंद झाले पहिजेत असं मी म्हणत नाही, पण कमीत कमी त्याची कथा ही दोन्ही बाजू मांडणारी हवी.खतपाणी मी यासाठी म्हणालो की घराघरात मुलगा-सून हे आई-वडिलांना त्यांची चूक लक्षात आणून देवू शकत नाही कारण ते "मोठे" असतात आणि एक प्रभावी माध्यम म्हणून चित्रपटाकडे गेले तर ते चित्रपट सुद्धा "मुलगा-सून" हे नेहेमी चुकतातच असेच दाखवतात त्यामुळे सासू-नणंद याना फावते म्हणजेच त्यांच्या वागणुकीला खतपाणी घातले जाते. बरोबर की नाही?

महेश मांजरेकर नेहेमी हट के चित्रपट बनवतात. त्यांचे कडून एक तरी "मुलगा-सून" यांची बाजू मांडणारा चित्रपट पुढे येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा पूर्वी असे चित्रपट काढून वीट आणायचे (अवतार-राजेश खन्ना, उमीद, बागबान वगैरे)

जर असे मानले की "समाजातलेच प्रतिबिंब चित्रपटात उमटते" तर माझ्या आजूबाजूला आणि समाजात आणि मित्र मंडळी मध्ये मला इतके टोकाचे दुष्ट मुलगा-सून आणि आदर्श मुलगी-जावई कधी कुठे पाहाण्यात नाहीत.

याउलट वर्तमानपत्रांमधील ९० टक्के बातम्या पाहाता सासू-सासर्याच्या-नणंदेच्या छळवादी वृत्तीला आणि अत्याचाराला कंटाळून स्वत:ला संपवणार्या सुनांच्या बातम्याच वाचायला मिळतात....

काय वाटते आपल्याला?

असल्या अतिशयोक्तीपूर्ण चित्रपटांची/सिरीयल्सची आवश्यकता आहे का??

मुलगा आणि सून द्वेष्ट्या ढीगभर चित्रपटांची/सिरीयल्सची गरज आहे का?

दहा चित्रपट/मालिका "सून-मुलगा द्वेष्ट्ये" आणि "आई-वडील-मुलागीई-जावई धार्जिणे" असले तर एक तरी चित्रपट नाण्याची दुसरी बाजू दाखवणारा का नसावा???

मला एक हिंदीतला "वक्त" नावाचा अक्षय कुमार आणि अमिताभचा एक चित्रपट आठवतो तो मुलगा- सून यांची चांगली बाजू दाखवतो!!!

कुणाला माहिती आहे का असा एखादा मराठी चित्रपट ज्यात सून-मुलगा यांची चांगली बाजू मांडली आहे??

माहिती असेल तर येथे सांगावे. म्हणजे तो चित्रपट समाजातील "सून-मुलगा द्वेष्ट्या" सासू-सासार्याना दाखवायाला बरे!!! काय म्हणता? खरे की नाही?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश मांजरेकर नेहेमी हट के चित्रपट बनवतात. त्यांचे कडून एक तरी "मुलगा-सून" यांची बाजू मांडणारा चित्रपट पुढे येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.>>>> मातीच्या चुली होता की . अगदी नॉर्मल मुलगा सून होते त्याच्यात .

कुणाला माहिती आहे का असा एखादा मराठी चित्रपट ज्यात सून-मुलगा यांची चांगली बाजू मांडली आहे??>>>>

घरचा भेदी - यात सून मुलगा दृष्टिकोन कितपत म्हणतायेइल माहित नाहि पण जावई जेव्हा करुनये ती चूक करतो तेव्हा ललिता पवारच(सासुच) त्याला शिक्षा करते...

एक कठोर पण हीत चिंतणारि सासुच काम तिने केले आहे.तसेच्,मुलगा आणी सून हे पात्र हि त्यात नॉर्मलच दाखवले आहे,कदाचित आदर्शच म्हणता येइल

माहेरची साडी पाहिला नाही...!!! पण सोशिक सुन दाखवली म्हणजे छळवादी सासावांना आयते कोलीत...
"बघ ती सून किती सहन करते !"

माहेरची साडीच्या एक पिढी मागे
चित्रपटाचं नाव नक्की आठवत नाही, पण बहुतेक सासुरवाशीण
सासू : ललिता पवार. सुना : आशा काळे आणि रंजना. जावई : निळू फुले.
याचा हिंदीत रिमेक आला होता. : सौ दिन सास के : सुना आशा पारेख आणि रीना रॉय. सासू आणि जावई तेच होते.

सासूने सुनेच्या पायाला चुलीतले जळते लाकूड घेऊन डागण्याचा अविस्मरणीय प्रसंग या चित्रपटात आहे.

मोदी आले. अच्छे दिन आयेन्गे>>
लगो, उद्या पोट साफ नाही झालं तरी विचाराल 'अच्छे दिन किधर गये'.

मिनिमम १००० चं पोटेन्शियल आहे.
पॉपकॉर्न घेऊन येतो.>>>>>> आमचे बीयेस्येनेल सारखे बन्द पडतेय नाहीतर मीच पाच-पन्नास पोस्टी टाकल्या असत्या.:फिदी:

त्या सासु सुनेच्या षेनेमात वरुन डोक्यात फिश ट्यान्क पडतो. पाल खिरीत पडते . शेवटी सासुला साप चावतो हेही आहे ना?

बिचार्‍या सासु सुनेपायी किती प्राण्यांना विनाकारणच त्रास झाला.

Proud

फिश टँक नाही. कुंडी. हिंदीत फिशटँक आला असल्यास कल्पना नाही.
सासूला साप चावल्यावर सून तिच्या जखमेतले (सापाचे) विष चोखून काढून सासूला शुद्धीवर आणते व स्वतः बेशुद्ध पडते.

हिंदीत फिशट्यान्क आहे.

आपकी बहु आपको मछली की तरह तडपाकर मारनेवाली थी.

अशा अर्थाचा डायल्वागही आहे बहुतेक

छोट्या पडद्यावर छोट्या कॅनव्हासवर जिथे लार्जर दॅन लाईफ सिनेमॅटोग्राफी (शब्द चुकला'च' असेल पण भावना समजून घ्या) दाखवून नाट्य उभारता येत नाही तिथे असे कौटुंबिक जिव्हाळ्याचे विषय निवडून त्यात एखाद दुसरे कॅरेक्टर वा कंपू अश्याच स्वभावाचा दाखवून नाट्य घडवावे लागते. मग तो मुलगा-मुलगी-सून-सासू-नणंद-भावजय-दीर कुठल्याही नात्यागोत्यातला असो.

अवांतर - हाफिस कँटीन मधील बायकांच्या गॉसिपिंगचा जेवढा अनुभव आहे त्यावरून एवढे नक्की की जग (इथे भारतीय किंवा महाराष्ट्रीय असेही सोयीने घेऊ शकता) बावीसाव्या, तेवीसाव्या शतकात जरी गेले तरी लग्नसंस्था (भले मग एकत्र कुटुंबपद्धती असो वा विभक्त) शाबूत आहे तोपर्यंत या विषयांना टीआरपी हा मिळतच राहणार. तर मग चार चौघांना बोरमारी होते म्हणून हे बंद पडणार नाही.

कोणतेच आई वडील सुद्धा आपल्या मुलांना आदर्शपणे वाढवत नाहीत. तेही प्रॅक्टीकली विचार करूनच शक्य तेवढे शिक्षणच मुलांना देतात. शक्य तेवढे ते मुलांसाठी करतात. स्वतःसाठी काही राखून! बरोबर? >>> तुमची मुलं उद्या तुम्हाला असचं म्हणाली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ?

@ श्री:
मी त्यांचेकडून अवाजवी अपेक्षा आणि आदर्श वागणुकीची अपेक्षाच करणार नाही.
त्यामुळे मुले मला असे म्हणणारच नाहीत.
आपण अपेक्षा केली की मगच "एकमेकांच्या अपेक्षांची उपेक्षा केली गेली" असे उणे दुणे काढायला सुरुवात होते.

"आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीत तुला वाढवले, लहानाचे मोठे केले" या डायालॉग चा आई वडिलांकडून भडीमार केला गेला की मगच मुले असे म्हणतात.

या लेखाला अनुमोदन. इथे आजुबाजुला तरी अति नालायक आणि वाईट सून-मुलगा पाहिले नाहित पण मुलाला आणि सुनेला गृहित धरणारे भरपुस आई वडिल बघितलेत.

आजकाल गळेकापू स्पर्धेमुळे पुर्वीच्या पिढी पेक्षा तरुण मंडळींना दुप्पट तिप्पट संघर्ष करावा लागतोय हे लक्षात न घेता फक्त विविध प्रकारचा अपेक्षा ते करताच असतात. आणि या विरोधात मुलगा काही जरी बोलला तरी त्याचे खापर सुनेवर फोडले जाते. याच ठिकाणी त्याच आई- वडिलांचा जावई जर मुलीचे ऐकत असेल तर याच आई वडिलाना आपला जावई आपल्या मुलीच्या मुठीत आहे हे ऐकून कोण आनंद होतो आणि चित्रपटात हा मुद्दा कधीच विचारात घेतला जात नाही. त्या वेळेस मात्र जावयाचे आई वडील खडूस आहेत, आमच्या मुलीचा काही दोष नाही असा प्रचार केला जातो. लक्षात आला का विरोधाभास? हा मुद्दा चित्रपटात ठळकपणे दाखवला पाहिजे.>> हे अगदीच पटले.

आणि यात भर म्हणून सावधान इंडिया/क्राईम पेट्रोल सारख्या मालिका सुद्धा गुन्हेगारी दाखवतांना मी वर सांगितलेल्या नाण्याच्या एकाच बाजूचा विचार करणाऱ्या कथा निवडून निवडून दाखवतात असा अनुभव आहे. मी बघत नाही पण अंदाजाने,जाहीरातीने कळतेच.

निमिष तुम्हाला काय म्हणायचे ते कळले. आशा काळे सारख्या सोशिक सुना तुम्हाला नको आहेत पण
मुलांनी आई वडिलांच्या अवास्तव अपेक्षा पुर्ण न करणे यात काहीच गैर नाही असे दाखवावे असे तुम्हाला म्हणायचे आहे पण कधी नव्हे ते शाहरुख खानचे एक वाक्य याबाबत खरे असावे...
making movies on certain subjects cannot change the society. The films will reflect what is happening in the society only.

पण जाउ द्या आता लालु ने म्हटलेच आहे "ससुरा भी कभी जमाई था"

•थरारक सासू - दी अल्टीमेट टॉर्चर
•बावरलेला नवरा - नवरा अंडर फायर
•माहेरचं मांजर- कॅटवूमन गेम
•मांजरीचं माहेर
•आहेर फेकला बाहेर
•बाहेरचा आहेर- एका अयशस्वी आहेराची कथा
•माहेरचा तवा- द "फ्राय" स्टोरी
•लेक चालली सासरला (वर्षातून एकदा)
•जाऊबाईच्या नणंदेची सासू- द अल्टीमेट रिलेशन्शीप
•खवळलेली सासू- चवताळलेली सून - एक जगजाहिर जुगलबंदी
•चतुर कावळा - भोळी मैना- एका पक्षीप्रेमीची कथा
•एका मामे-सासूची गोष्ट
•नणंद बनवी भडंग- चविष्ट कथा
•सासूचा थयथयाट - एका नृत्यप्रिय खाष्ट सासूची कर्मकहाणी
•डोंबिवलीच्या सासूबाई खाष्ट - (डोंबिवली फास्ट चे सासू व्हर्जन)
•माझी लेक- तुझी सून
•माझ्या सूनेचा सासरा
•थांब सुने केस ओढते! (द्वंद्व कथा)
•सासऱ्याच्या सासूचं माहेर
•सासूच्या सासऱ्याच्या माहेरचा कचरा- गंभीर होत चाललेल्या कचराप्रश्नावर जळजळीत भाष्य
•माहेरची गाडी
•माहेरची फ्लॉपी - करूया कॉपी
•माहेरची हार्ड डिस्क-एक रिस्क
•९ गिगा बाईट चा आहेर
•डीजीटल आहेर
•काका-नाना-मामा-दादा....
•स्टीलचा गॅस
•हळद झाली पिवळी
•हळद पुसली- कुंकू धुतलं
•सासू ऍट द रेट आदळापट डॉट संताप-फिमेल्सची इमेल कथा
•धाकटा बोका
•शाब्बास सूनबाईची सासू!
•सासरा पळाला सासरी
•भावजयीचा भाचा- नणंदेचा नाना
•भावाची भाभी
•भुताचा भाचा
•सासवेची आसवं...