पट्टीचे पोहोणारे पणजोबा ..........प्रो.डॉ. रामकृष्ण आराणके (फोटोसहित)

Submitted by मानुषी on 15 July, 2014 - 09:53

पट्टीचे पोहोणारे पणजोबा ..........प्रो.डॉ. रामकृष्ण आराणके

असाच एक दिवस मैत्रिणीचा फ़ोन आला. गप्पागप्पात मी तिच्या आई वडिलांची चौकशी केली.
तेव्हा म्हणाली, "अप्पा कॅनडाला चाललेत. जेष्ठांच्या पोहोण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी. या स्पर्धा मॉन्ट्रियल इथे होताहेत. ते भारताचं प्रतिनिधित्व करताहेत. "
मी चाटच! कारण अप्पांचं वय ८३!……. हो…… तशी आम्ही कृष्णाकाठची सांगलीची माणसं पोहोणारीच! पण तरी सुद्धा हे अगदीच अनपेक्षित.
मग मैत्रिणीकडून अप्पांचा नंबर घेतला. आणि फोनवर बोलले.
मला अनायासे सांगलीला जायचंच होतं. भाचीच्या लग्नासाठी. मग ठरवलंच की अप्पांची मुलाखत घ्यायचीच.
सांगलीला पोचल्यावर मी अप्पांच्या घरी जायचं असं ठरवलं. पण काही कारणाने माझं त्यांच्या घरी जाणं लांबेल असं लक्षात आल्यावर लगेच संध्याकाळी अप्पांचाच फोन आला.
ते म्हणाले, " मीच येतो". मग मी त्यांना म्हटलं, "आईलाही घेऊन या."
मग संध्याकाळी ठरवलेल्या वेळी हा उत्साही ८३ वर्षाचा युवक स्वता: गाडी चालवत सपत्निक हजर झाला. येताना बरोबर अगदी आठवणीने वर्तमानपत्रातली कात्रणं आणि एक सीडी घेऊन आले होते. या कात्रणात त्यांच्या पोहोण्यातल्या यशाबद्दलच्या बातम्या छापून आलेल्या होत्या. आणि सीडीमध्ये पोहोण्याच्या स्पर्धेतले फ़ोटो.
मग ज्या गप्पा झाल्या तीच ही मुलाखत.
प्रो.डॉ. रामकृष्ण आराणके व सौ. विद्यावति आराणके.

मी: अप्पा तुमच्या बालपणाविषयी सांगा. आणि पोहोणं कसं, कधी सुरू झालं ते सांगा. तुम्हाला पोहायला कुणी शिकवलं?

अप्पा: नाही गं …… शिकवतंय कोण? बालपण कराडला कृष्णाकाठी, अगदी गरिबीत गेलं. वडील पौरोहित्य करीत. घरी अंघोळीची व्यवस्थाच नव्हती. ही गोष्ट साठ सत्तर वर्षापूर्वीची. अंघोळीला पाणीच नसायचे. मग नदीवर जायचं, जाताना बरोबर धुण्याचे कपडे, आंघोळीचा तांब्या आणि दोन घागरी न्यायच्या.
नदीच्या पाण्यात कपडे धुवायचे ते तिथेच घाटाच्या पायऱ्यांवर पसरून वाळवायचे. आमच्या अंघोळी, डुबक्या, पोहोणं जे काही असेल ते होईपर्यंत कपडे चांगले वाळून निघायचे. अंघोळ करायची, परतताना दोन घागरी पाणी घरी घेऊन जायचं. असं करता करता ६/७ वर्षाचा असतानाच कृष्णा नदीत पोहायला शिकलो. नदी घरापासून जवळ होती. नदीवर तास दोन तास रोज जायचेच.

मी : हं ! म्हणजे गरिबी आणि सुखसोयींची वानवा या गोष्टी....आपण म्हणतो तसं तुमच्यासाठी अगदी ..."blessing in disguise" ठरल्या !

अप्पा : हो हो .....अगदी बरोबर !

मी : मग तुम्ही शाळेच्या पोहोण्याच्या स्पर्धेत भाग घेतच असाल.

अप्पा : अं…. तेव्हा शाळांमधून अ‍ॅथलॅटिक्स, मल्लखांब वगैरे स्पर्धा व्हायच्या. पण पोहोण्याच्या होत नव्हत्या.

मी : बालपणीच्या या शिदोरीचा तुमच्या या आत्ताच्या यशात नक्कीच खूप मोठा वाटा असणार.
तर तुम्हाला बालपणी मिळालेल्या या "आहार, विहार , संस्कार" शिदोरीविषयी ऐकायला आवडेल.

अप्पा : आहाराविषयी म्हणशील तर फार काही सांगण्यासारखं नाही. कारण घरची गरिबी. पण मला वाटतं, त्या काळच्या शुद्ध हवेला आणि पौष्टीक, सकस, निर्भेळ आणि निर्मळ अन्नाला श्रेय जातं. तालमीत त्या काळी बहुसंख्य मुलं जायची. तिथे भरपूर असा सर्वांगिण व्यायाम व्हायचा. सूर्य नमस्कार, जोर बैठका असा. मी स्वत: मल्लखांब करायचो. शाळेतले एक शिक्षक मल्लखांब शिकवाय . मला मल्लखांबात काही बक्षिसं मिळाली होती.
कराडला प्रीतिसंगम आहे. तिथे कृष्णा कोयना संगम आहे. नदीला पूर आला की आम्ही मित्र मित्र कोयनेच्या पुलापासून कृषणेच्या पुलापर्यंत पोहत जात असू. हे अंतर सहा सात कि. मी. असेल.
असा हा विहार. माणसावर यंत्रांची हुकूमत सुरू होण्याआधीचा हा काळ! त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यातच बराचसा विहार असायचा.

मी: अगदी पटलं अप्पा.

अप्पा: आता संस्काराविषयी …आमचं घराणं वैदिक ब्राम्हणांचं.
मी सात वर्षाचा असताना माझी आई वारली. त्यामुळे सगळ्या घरकामाची सवय झाली आणि जुजुबी स्वयंपाकही शिकलो.
आठव्या वर्षी वडिलांनी माझी मुंज केली. मग मुंजीनंतर वडिलांनी मला पौरोहित्य शिकवायला सुरुवात केली. खूप पाठांतर करून घेतलं. वडिलांनी गर्भाधानापासून अंत्यसंस्कारापर्यंत सगळे सोळा संस्कार शिकवले. ऋग्वेद संहिता पाठ करून घेतली. तसं लहानपणापासूनच घरात पाठांतरावर भर असल्याने माझं तसंही पाठांतर होतंच. या संस्कृत पाठांतराचा उपयोग नुसताच वाणी स्वच्छ, शुद्ध होण्यापुरताच नक्कीच नाही. पण मला नितांत विश्वास आहे की या संस्कृत पाठांतरामुळे बुद्धीलाही चालना मिळते. धार होते. स्मरणशक्ती वाढते.
मग मुंजीनंतर वडिलांबरोबर मीही पौरोहीत्य करू लागलो. बऱ्याच वेळी जेवण निघायचं, वर पैसेही मिळायचे.

मी: खरंच…. आजच्या तरुण पिढीला तर सोडाच पण आमच्या पिढीलाही कल्पनाच येणार नाही असा हा काळ होता नाही का अप्पा? बरं…आता तुमच्या शिक्षणाबद्दल सांगा.

अप्पा:: माझी शाळा "टिळक हायस्कुल कराड". मला १९४९ साली अकरावीला बोर्डाचं संस्कृतचं ""अकबरनवीस" एवार्ड मिळालं.
मग मी पुढील शिक्षणासाठी सांगलीला आलो. कारण तेव्हा फक्त सांगली, कोल्हापूर आणि सातारा इथेच कॉलेज होतं. तिथे फक्त आर्ट्स, सायन्स व कॉमर्स याच faculties असायच्या.
सांगली कराडच्या जवळ .....म्हणून सांगलीला आलो. मध्यंतरीच्या काळात माझं लग्न झालं १९५३ साली.
सांगलीत हिच्या(शेजारी बसलेल्या पत्नीकडे अंगुली निर्देश) मावशी … त्यांचं नाव बाळुमावशी…बुद्धिबळपटु श्री. भाऊराव पड्सलगीकर यांच्या वाड्यात रहायच्या. त्यांच्यामुळे पड्सलगीकरांनी मला आश्रय दिला. आणि सांगलीतल्या त्यांच्या ओळखीतल्या लोकांकडे बाळूमावशींनी मला जेवणासाठी वार लावून दिले.
मग मी त्या सगळ्यांकडे वार लावून जेवायला जाऊ लागलो. आणि माझं विलिंग्ड्न कॉलेजातलं बी एस सी चं शिक्षण सुरू झालं.

मी: अप्पा, हे वार लावून जेवणं काय असेल याची नव्या पिढीला कल्पनाच येणार नाही.
पण मला आमच्या जुन्या घरात वार लावून जेवायला येणारे काही विद्यार्थी अंधुकसे आठवतात. आणि खांद्याला झोळी अड्कवून खणखणीत आवाजात "ओम भवति भिक्षां देही" म्हणत माधुकरी मागायला येणारीही मुलं आठवताहेत.

अप्पा: अगं हो…. पण त्या काळची ती सामाजिक व्यवस्थाच होती. त्यात तसा काही कमीपणा वाट्ण्याचं काही कारण नाही. उलट शिक्षणाची आस असलेल्यासाठी ही केवढी मोठी सोय होती. अर्थातच फक्त ब्राम्हण मुलंच आणि ब्राम्हणांकडेच वार लावून जेवायला जात. असो…
करता करता मी बी एस सी झालो. इथे मला पुणे युनिव्हर्सिटीचं केमिस्ट्री विषयातलं सुवर्ण पदक मिळालं.
नंतर मला विलिंग्ड्न कॉलेजची 2 वर्षांची फेलोशिप मिळाली. १९५५ ते ५७ मी तिथे केमिस्ट्रीचा डेमोन्स्ट्रेटर म्हणून काम केलं. तेव्हाच मी एम एस सी मॅथेमेटिक्सचा अभ्यासही चालू केला होता.…. एक्स्टर्नली. १९६१ साली मला पुणे युनिव्हरसिटीची गणितातली एम एस सी आणि गणितातलंही पहिलं प्राइझ मिळालं.
दरम्यान मला कराड पोलिटेक्निकल कॉलेजात लेक्चररची नोकरी मिळाली. इथे दोन वर्ष काढल्यानंतर रत्नागिरी गव्हर्नमेण्ट पोलिटेक्निकल कॉलेजात लेक्चररची नोकरी मिळाली. तिथे मी दोन वर्षं नोकरी केल्यानंतर मी १९६३ साली सांगलीला आलो.
मला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून बोलावणं आलं. इथे मी १९६३ ते १९९२ पर्यंत प्रोफेसर म्हणून कार्यरत होतो.
मध्यंतरीच्या काळात 19७४ साली टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेण्टल रिसर्च आणी मुंबई आय आय टी इथे काम करणाऱ्या काही गणिताच्या प्रोफ़ेसरांच्या मार्गदर्शनाखाली "फ़्लुइड मेकेनिकस" या विषयात मी पी एच डी केली. इथे मला भारतातल्या पहिल्या वहिल्या कॉम्प्युटरवर काम करण्याची संधी मिळाली

मी : या पी एच डीचा तुमच्या करिअरवर नक्कीच सकारात्मक प्रभाव पडला असणार.

अप्पा: हो तर! मी कॉलेजात मॅथ्सचा हेड ऑफ द डिपार्ट्मेण्ट झालो.

मी: या सगळ्या जीवनसंघर्षात व्यायाम करायला किंवा छंद जोपासायला वेळ, पोहायला ......वेळ मिळ्त होता?

अप्पा: छंद? आतापर्यंत माझं "पोहोणं" हे छंद या केटेगरीत न मोडता, " पोहोणं" जीवनाचा एका अविभाज्य घटक बनून गेल होतं. अगदी न चुकता मी विहिरीत पोहायला जात होतो.

मी : व्वा! छान. पण हे स्पर्धात्मक पोहोणं कसं सुरू झालं ? आणि केव्हा?

अप्पा : असं पहा…. इथे सांगलीत आधी मी विहिरीत पोहत होतो. ते आपलं असंच. त्यात काही विशिष्ठ स्ट्रोक्स किंवा स्टाइल असं काही नव्हतं.
पण १० एक वर्षापूर्व इथे सांगलीत एक सरकारी क्रीडा संकुल सुरू झालं. तिथे एक इंटरनेशनल स्टॅन्डर्ड चा जलतरण तलाव बांधला गेला. मग तिथे पोहोण्याच्या स्पर्धेत भाग घेणारे ग्रुप सरावासाठी येऊ लागले. त्यांचं बघून मीही तिथेच जाऊ लागलो. आणि तिथून माझा जरा रीतसर सराव सुरू झाला.
तिथे येणाऱ्या श्री. खाडिलकर, श्री. लांडगे अश्या नेहेमी पोहायला येणार्या मंडळींकडून विहिरीत आणि टॅन्कमधल्या स्पर्धात्मक पोहोण्याच्या तंत्रातला फ़रक जाणून घेतला. आणि स्वत:त हळूहळू सुधारणा केली.

मी: पण अश्या जेष्ठ वयोगटासाठी काही स्पर्धा असतात हे कसं कळलं?

अप्पा: या तलावावरच. कारण इथे वेगवेगळ्या स्पर्धा आणि त्यासाठीचा सराव नेहेमीच चालू असतं. मग मीही ठरवलं की आपणही अश्या स्पर्धात भाग घ्यायचा. साधारण दहा वर्षांपूर्वी हे सुरू झालं.

मी: मग भारतात आत्तापर्यंत तुम्ही कुठे कुठे या स्पर्धांसाठी जाऊन आलात?

अप्पा: मी स्टेट आणि नॅशनल स्पर्धांसाठी साठी नागपूर, राजकोट, भोपाळ, नांदेड इ. ठिकाणी जाऊन आलो. माझ्याकडे १६ सुवर्णपदके आहेत वेगवेगळ्या स्पर्धातली.

मी: ग्रेट! मग तुम्ही स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीने आहारात काही बदल केला का? म्हणजे काही विशिष्ट डाएट घेता का? आणि स्पर्धेतील पोहोण्याव्यतिरिक्त काही वेगळे अ‍ॅडिशनल पूरक व्यायाम करता का?

अप्पा: आहाराचं म्हणशील तर बदल काहीच नाही. अगदी रोजचं घरचं शाकाहारी जेवण. आणि रोज पोहोणं सुरू करण्यापूर्वी पळत राउंड मारणे आणि थोडे वॉर्मिंग अपचे व्यायाम …. इतकं करतो.

मी: स्पर्धांमध्ये तुम्ही कोणत्या वयोगटात पोहोता? आणि तुमचे इव्हेण्ट कोणते? आणि रोज किती वेळ सराव करता?

अप्पा: मी सध्या ८० ते ८५ वयोगटात पोहोतो. आणि ५० मि. ब्रेस्ट स्ट्रोक आणि १०० मी. फ़्री स्टाइल हे माझे इव्हेण्ट. मी रोज १ तास सराव करतो.

मी: आता तुम्ही या महिना अखेरीस इंटरनॅशनल स्पर्धांसाठी कॅनडाला चाललात. यासाठी तुम्हाला सरकारचं किंवा इतर कुणाचं सहाय्य? आणि तुमच्या बरोबर कुणी आहे का?

अप्पा: नाही. फक्त या स्पर्धेतल्या सहभागासाठी स्विमिंग फ़ेडरेशन ऑफ इंडिया चं रेकमेण्डेशन लागतं. तेवढं त्यांनी दिलं. बाकी मदत कुणाची काही नाही. विमानाची तिकिटे आमची आम्हीच काढणार. आणि तिथला रहाण्याचा जेवण्याचा सगळा खर्च आम्हीच करणार.
माझ्याबरोबर नागपूरचे श्री. साठे म्हणून ७० ते ७५ वयोगटातले एक डायव्हर आहेत. त्यांनी फक्त डायव्हिंग च्या स्पर्धेत भाग घेतला आहे. कारण तिथेच त्यांची मास्टरी आहे. म्हणून डायव्हिंग हाच त्यांचा इव्हेण्ट आहे. त्यांनी ४०सुवर्णपदकं कमावली आहेत.

मी: इतक्या या सगळ्या जीवन प्रवासात काही आठवणी किंवा काही अविस्मरणीय अनुभव?

अप्पा: अं ……. असं काही नाही सांगता येणार. पण पण एक खंत मनात राहिली आहे.
बी एस सी नंतर परदेशात उच्च शिक्षण घ्यावं असं खूप मनात होतं. त्यानुसार मी हालचाली केल्यानंतर मला लंडनच्या लीड्स युनिव्हर्सिटीत माझ्या बी एस सी तल्या मेरीटवर आणि माझ्या केमिस्ट्रीतल्या सुवर्णपदकावर पुढील शिक्षणासाठी .......मेटेलर्जी च्या डिग्री कोर्ससाठी .......१९५६ साली एडमिशन मिळाली. मी तिकीटही काढलं .....तेव्हा अर्थातच बोटीचं.

मी: अप्पा … किती तिकिट होतं तेव्हा?

अप्पा : अगं, बोटीने पोचायला दोन महिने आणि तिकिट २०० रु! तशी मला बऱ्याच संस्थांनी मदत म्हणून स्कॉलरशिप देऊ केली होती. धनी वेलणकर सुवर्ण निधी, बॅन्क ऑफ इंडिया, इचलकरंजी एज्युकेशन फंड…अश्या संस्थांनी ही मदत मला देऊ केली होती. पण ती पुरेशी नसल्याने मी शेवटी काढलेलं तिकीट रद्द केलं.

मी: ओह… खरंच खंत वाटण्यासारखीच गोष्ट आहे ही. पण अर्थातच इथे भारतातच तुमच्या हातून हे सगळं घडवण्याची नियतीची खेळी होती! इन्जिनिअरिन्गच्या विद्यार्थ्यांची एक पिढी घडवली ना तुम्ही.

अप्पा : हं...आणखीही एक गोष्ट राहून गेली आहे. ती म्हणजे डायव्हिंग. म्हणजे तशी खंत वगैरे नाही. कारण एक तर इतक्या पूर्वी सिस्टिमेटिक डायव्हिंग शिकण्याची काही सोय नव्हती. .........डायव्हिंग बोर्ड आणि तसा तलाव वगैरे. कारण आम्ही पोहोणार नदीत किंवा विहिरीत. आणि आता सोयी आहेत पण या वयात नव्याने डायव्हिंगसारखी कला शिकणं मला जरा कठिण वाट्तंय.

मी: हो पण तुम्ही नदीत आणि विहिरीत खूप उड्या मारल्या असतील...
अप्पा: हो हो ....पण डायव्हिंगचं तंत्र अगदीच वेगळं !

मी: अप्पा तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा.

अप्पा: मला दोन मुली, एक मुलगा, सून, जावई, चार नातवंडे आणि तीन पंतवंडे आहेत. सगळे आपापल्या जागी देवाच्या कृपेने सुस्थापित आहेत. सर्व मुलांच्या शिक्षणाची मी उत्तम सोय करू शकलो.
आणि तू डाएट्बद्दल मगाशी विचारलं होतंस ना? तर यांनी ( शेजारी बसलेल्या पत्नीकडे अंगुलीनिर्देश)माझ्या डाएट्ची वर्षानुवर्षे संपूर्णपणे काळजी घेतल्यानेच मी हे सर्व करू शकलो.

मी: हो अप्पा, अगदी सहमत! आईच्या हातचं काय काय चांगलं चुंगलं खाल्लंय शाळा कॉलेजात असताना. पण सगळ्यात आठवताहेत ते रव्याचे नारळ घालून केलेले लाडू. त्यात त्या रोझ इसेन्स घालायच्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मीही अजूनही रवा नारळ लाडू रोझ इसेन्स घालूनच करते

अप्पा: प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्री असते असं म्हणतात. तश्या "या" माझ्या मागे न रहाता मी म्हणेन, कायम माझ्या बरोबरच होत्या आणि आहेत. तिने माझ्या सगळ्या चढत्या पडत्या काळात मला जी साथ दिली त्याला तोड नाही.

मी: खरंय ! ........आता खरं म्हणजे सध्या या इन्टरनॅशनल स्पर्धेतला तुमचा सहभाग हा एक मोठाच प्रोजेक्ट आहे तुमच्यासाठी. पण तरीही विचारते…. याव्यतिरिक्त तुमचे काही छंद?

अप्पा: मला बागेची खूप आवड आहे.

मी: हो, मला आठवतेय तुमची बाग, वालचंद कॉलेजच्या क्वार्टर्स मध्ये तुम्ही रहात होतात तेव्हाची. जरबेरा, गुलाब,शंकासूर......किती विविध फ़ुलझाडं तेव्हा असायची बागेत. .

अप्पा: हो हो ….पण आता नवीन घरातली बाग बघायला ये एकदा. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ……२०१० साली मी विलिंग्डन कॉलेजच्या अ‍ॅग्रिकल्चरल फॅकल्टीतून १ वर्षाचा बागकामाचा संपूर्ण कोर्स केला.
त्याचा मला घरातल्या बागेसाठी खूपच फायदा झाला.

मी: अप्पा खूप छान वाट्लं तुमच्याशी बोलून. ही तुमची मुलाखत सगळ्यांनाच खूप प्रेरणादायी ठरेल!
आता कॅनडाहून खूप सुवर्णपदकं जिंकून या. तुम्हाला आम्हा सर्व मायबोलीकरांकडून हार्दिक शुभेच्छा!
जाता ़ जाता तरुण पिढीला काही संदेश?

अप्पा: अं....खरं म्हणजे संदेश देण्याइतका मी स्वता:ला थोर समजत नाही. पण आजुबाजूला पहातो तेव्हा घाण्याच्या बैलासारखी एकाच चक्रात फिरत रहाणारी तरुण पिढी दिसते.
आणि पाळणाघरात वाढणारी त्यांची मुलं! मग वाट्तं की पैशाने सगळं विकत घेता येतं पण आईचं प्रेम आणि घरात होणारे संस्कार नाही कुठेच विकत मिळत. सगळ्याचा कुठे तरी सुवर्ण मध्य निघाला पाहिजे.
असो..... सर्वात महत्वाचं...."हेल्थ इज वेल्थ". वेळेचं उत्तम नियोजन करून रोजच्या दिवसात व्यायामासाठी थोडा तरी वेळ दिला पाहिजे. असं दिसतं की चैनीसाठी वेळ आणि पैसा दोन्ही वापरला जातो पण तेवढं महत्व व्यायामाला दिलं जात नाही.
पण "प्रिवेनशन इज बेटर दॅन क्युअर" .....
नाही का?

मी: हो अगदी बरोबर! अप्पा तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा!

असं म्हणून मी त्या दोघांचा निरोप घेतला. आणि त्यांची कात्रणांची फाइल द्यायला त्यांच्या घरी गेले आणि बाग बघून मन प्रसन्न झालं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त च आणि प्रेरणादायी.

कॅनडातल्या स्पर्धे साठी शुभेच्छा.

वा, ग्रेट आहेत हां पणजोबा ..... कॅनडातल्या स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

मुलाखत सुंदरच जमलीये ....

वा ! खूप छान आहे मुलाखत ! कसले तंदुरुस्त आहेत पणजोबा ! आप्पांना स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! Happy

.

आराणके काकांना माझा साष्टांग नमस्कार. ‘पोहणे’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने लगेचच भिडला. त्यांचा हा जलप्रवास आमच्याबद्दल पोचवल्याबद्दल मानुषी ह्यांचेही आभार!

Pages