विषय क्रमांक २: मी अन कुलूप

Submitted by Priyanka Pathak on 14 July, 2014 - 10:57

काल कंपनीतून घरी आले.. नेहेमीप्रमाणे दारावरचं भलं मोठं कुलूप माझ्या स्वागतासाठी हजर होतं.... 'एकाकीपणा' हा कुलूपाचा प्राणप्रिय सखा असल्याने सध्या 'कुलूप ' हाच माझा आदर्श आहे.. ज्याचं 'अस्तित्व' हा इतरांच्या 'अस्तित्व नसण्याचा' पुरावा असतो, ते कुलूप हा माझ्या पुण्यातील वास्तव्याचा प्रेरणा स्त्रोत आहे असं मी म्हणेन...ते जसं आयुष्यभर एकटेपणाला कवटाळूनही आपलं आयुष्य सार्थकी लावतं , तसंच माझ्या सध्याच्या एकटेपणातूनही मला काहीतरी अर्थपूर्ण साध्य करायचं आहे , ही भावना माझ्या मनी बळावतेय..
असो, एकटेपणातून मी आत्मविश्वास, धाडस, माझी मलाच नव्याने झालेली ओळख अशा काही अनन्यसाधारण गोष्टी भरभरून मिळवल्या असल्या, तरी कायमच त्याला कवटाळून बसणं संवेदनशील मानवी मनाला जमणं खरोखर कठीण असल्याचा शोध काल मला लागला. .....
एकटेपणाचे अनेक फायदे आहेत पण याच एकटेपणातून तुमच्या अगदी जवळच्या काही गोष्टी दुरावतात देखील.... घरी असताना आई च्या इच्छेसाठी अनेकदा मी गायला बसायचे.. पण अशात 'फर्माईश ' नावाची गोष्ट जगात अस्तित्वात असते, याचाही विसर पडायला लागलाय...
काल कंपनीतून आले... सकाळी जशी सोडून गेले होते, अगदी त्याच अवस्थेत माझी रूम माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती.. .. दार उघडल्या उघडल्या तिने अगदी शांत भावाने मला दर्शन दिलं... लहान मुलं कशी, सकाळी झोपेतून उठली, कि 'आई आपलं आवरुइन देईल', या विचाराने अर्धवट मिटल्या डोळ्यांनी काहीही न बोलता तिच्या मागेपुढे घुटमळत असतात, तसा काहीसा माझ्या रूम चा नूर होता ....सकाळी घाईघाईत पलंगावरच टाकलेला कंगवा, चादरीची घडी अजूनही तिथेच होती...... थकल्या डोळ्यांनी मी देखील तिच्यावर एक नजर फिरवली, अन तितक्याच शांतपणे पलंगावर डोळे बंद करून बसले.. त्या क्षणी डोक्यात अगदी कसलाही विचार नव्हता.. काही क्षण असेच शांततेत विरले, अन अचानक माझी सर्वात आवडती गझल मनात डोकावली.... माझ्याही नकळत मी अगदी मनापासून ती गायला लागले.. 'आज जाने कि जिद ना करो... यूँही पहलू मी बैठे राहो...' या गाण्यावर अन माझ्यावरही फरीदा खानुम यांच्या धीरगंभीर आवाजाची छाप असल्याने , स्वरही तसेच गंभीरतेला घट्ट बिलगून येत होते.... 'गाताना अर्थ समजूनच गायचं' असं बाबांनी अगदी लहानपणापासूनच मनावर बिंबवल्यामूळे अनाहूतपणे अर्थही मनावर कोरल्या जात होता..अर्थात गझल ही शब्दप्रधान गायकी असल्याने अर्थाला सोडून चालणारही नव्हतं.. अगदी समरसतेने, अर्थपूर्णरित्या पहिल्या दोन ओळी गायले, अन जाणीव झाली, मी 'सध्या' ती गझल गाणं किती विजोड गोष्ट होती.. 'मी' सोडून आजूबाजूला शांतातेशिवाय कोणीही नाही.. अन मी कोणालातरी माझ्या जवळ थांबण्याची अगदी आर्ततेने विनवणी करतेय... थांबवण्यासाठी आधी कोणीतरी जवळ असावं लागतं.. गझल ऐकून थांबण्यासाठी काय , पण किमान गझलेला दाद देण्यासाठी सुद्धा समोर कोणीही नव्हतं.. माझा एकटेपणा मला अगदी ठळकपणे जाणवला.. 'आपल्या जवळ कोणीही नाही' ही भावना खरोखर थरकाप उडवणारी होती... थरथरत बारीक होत गेलेल्या आवाजात नि पाणावल्याने धूसर होत गेलेल्या नजरेत जणू गझल विरत होती.. इतक्यात दारावर लटकत माझ्याकडे थंडपणे बघणाऱ्या त्या कुलूपावर नजर स्थिरावली... खूप वेळ फोन न उचललेल्या एखाद्याचं 'हॅलो' ऐकून जसा जीव भांड्यात पडतो, तसा दिलासा मला त्याच्याकडे बघून मिळाला... अन मी माझी गझल पूर्ण केली... अगदी अंतःकरणापासून गायले....माझ्या इच्छेविरुद्ध हलणंही वर्ज्य असलेल्या त्याच्यासमोर, मी त्याला मला सोडून न जाण्याची विनवणी करत होते...हे ऐकायला काहीसं हास्यास्पद वाटत असलं, तरीही त्या क्षणी खूप महत्वपूर्ण होतं... कारण कदाचित रोज सकाळी त्याला लावून जाताना तो देखील हीच गझल माझ्यासाठी गात असेल.......''आज जाने कि जिद ना करो... यूँही पहलू मी बैठे राहो...!!!!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सद्ध्या अगदी अशाच अनुभवातून जात असल्याने तुम्ही लिहिलेले चटकन रिलेट होऊ शकले. Happy
तुम्ही स्वतःचे व्यक्तिचित्रण लिहिण्याचा प्रयत्न केला आहे का ?

कारण कदाचित रोज सकाळी त्याला लावून जाताना तो देखील हीच गझल माझ्यासाठी गात असेल.......''आज जाने कि जिद ना करो... यूँही पहलू मी बैठे राहो...!!!!"

<< आवडल!!

आज जाने कि जिद ना करो... यूँही पहलू मी बैठे राहो...' या गाण्यावर अन माझ्यावरही फरीदा खानुम >>>> ७०'s or ८०'s ?

Good one.

छान