पाऊस कधीचा पडतो

Submitted by संतोष वाटपाडे on 14 July, 2014 - 04:38

थकलेल्या डोळ्यांमधला पाऊस कधीचा पडतो
जोमात बहरली दुःखे उपवास तरी का घडतो

मेल्यावरसुद्धा उरतो का श्वास उराशी बाकी
कौलावर घास गिळाया कावळा पुन्हा ओरडतो

दगडांनी काबिज केली वावरात काळी माती
दारात बैसला बाबा लाचार अजुनही रडतो

झाडावर अंध गिधाडे हुंगतात वार्‍यालाही
कुरणातील बैल बिचारा आखरी लढाई लढतो

हंबरते खुंट्याभवती झोपडी प्राण जाताना
हुंदका चुलीचा तेव्हा राखेत पिलागत दडतो

सावली पेटते जेव्हा अडखळल्या पायाखांली
बांधावर कुणबी वेडा नशिबास शिव्या हासडतो..

--- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भीषण दुष्काळी परिस्थितीचे प्रभावी वर्णन करणारी कविता.

"झाडावर अंध गिधाडे हुंगतात वार्‍यालाही
कुरणातील बैल बिचारा आखरी लढाई लढतो" >>> या द्वीपदीतला खयाल चांगला आहे.
परंतु, गिधाडांना अंध का म्हटले आहेत ते समजले नाही.