आठवांवर लोटता आली न माती!

Submitted by profspd on 13 July, 2014 - 09:30

आठवांवर लोटता आली न माती!
तोडता आली न मज कुठलीच नाती!!

मी असे देऊळ काळोखातले की,
लावल्या कोणी न येथे सांजवाती!

बैसला फटका उधारीचा असा की,
ठेवली नंतर न मी कुठलीच खाती!

निंदणारे, वंदणारे पाहिले मी....
मानतो या मंडळींना मी चहाती!

मी यशांनी ना कधी हुरळून गेलो....
काढल्या त्यांच्या न मी केव्हा वराती!

कैक गझलांच्या 'जमीनी' पाहिल्या मी.....
वाटल्या निव्वळ मला सा-या पराती!

फक्त मी उच्चारले, केले न काही....
केवढी घेतात ते त्याचीच धास्ती!

घेतले त्यांनीच रक्ताळून त्यांना.....
माझिया गझला न गवताच्याच पाती!

या महागाईमुळे हैराण झालो.....
परवडेना खायला सुद्धा चपाती!

आजही स्मरतात मज कादंब-या त्या....
याद 'मृत्युंजय', कधी येते 'ययाती'!

पौर्णिमेचे चांदणे दररोज पडते....
अंतरी जपल्यात पुनवेच्याच राती!

हा भिडस्ताचाच माझा पिंड आहे....
काढली नाही पुढे केव्हाच छाती!

कायदे नुसतेच केले कागदावर.....
पण मनामधुनी कधी जातील जाती?

हात कोणाला न दाखवला कधी मी......
नशिब माझे घडविणे माझ्याच हाती!

मी नि माझी सावली, दोघेच होतो....
घेतली नाही कुणाची मीच साती!

संपले आयुष्य गातानाच माझे.....
आज सारे लोक बघ, मजलाच गाती!

माणसे असतात उत्साही अशी की,
टाकती दररोज नेमानेच काती!

ऊब या हृदयामधे आहेच ऐशी....
सर्व दु:खे येउनी येथे रहाती!

------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users