विठ्ठल..

Submitted by poojas on 10 July, 2014 - 09:27

विठ्ठल हा काळा
तरी लडिवाळा
सर्वांना उमाळा
त्याचा सदा..

सावळा असोनी
जगताचा धनी ?
ऐसा माझ्या मनी
प्रश्न उभा..

वरलीया रंगा
कारे त्याच्या भाव?
मजला न ठाव
लागे याचा..

अंतरीचा रंग
असेल कोठला
भेदाभेद मला
जाणवेना..

त्याच्या दरबारी
पंढरीची वारी
जोडे वारकरी
हात जेथे..

माझ्या घरी दारी
चिंतेची उधारी
चितेवर सारी
हौसमौज..

विठ्ठलाच्या पायी
टेकूनिया माथा
सरे दुःख व्यथा
आपोआप..

रंगारंग भेद
नाही ठावे त्याला
भक्तीचा जिव्हाळा
कळे फक्त..

तू का म्हणे तुझा
रंग आहे काळा
विठ्ठलाच्या बाळा
विठ्ठल तू..

एकाएकी झाला
उलगडा सारा
रंग माझा न्यारा
विठ्ठल मी !!!

poojaS..

Group content visibility: 
Public - accessible to all site users