विषय क्रमांक २ - 'हरी ॐ'

Submitted by विशाल चंदाले on 10 July, 2014 - 07:48

'हरी ॐ' काकांची आणि माझी भेट पुण्यातल्या एका वृद्धाश्रमात झाली. आमच्या कंपनीतील काहीजण मिळून आम्ही दर एक, दोन महिन्याला एखाद्या गरजू संस्थेला, अनाथआश्रमाला वगैरे गरजेनुसार वस्तूंची थोडीफार मदत करतो. असंच एकदा आम्ही सर्व त्या वृद्धाश्रमात गेलो होतो . सकाळची वेळ होती आश्रमातली पुरुष मंडळी, स्त्रिया सकाळच्या कोवळ्या उन्हात फेरफटका मारत होते. कोणी आमच्या सारखेच काही कामानिम्मित आलेले होते. तर काही जण खुर्च्या टाकून बसले होते.

आम्हाला ज्या व्यक्तीशी काम होतं त्या तिथे उपलब्ध नसल्याकारणाने मग आम्ही बाहेर ताटकळत उभे होतो तेंव्हा 'ते' आश्रमाच्या आतल्या भागातून येताना दिसले. मध्यम उंची, गौर वर्ण,तरतरीत लांब नाक, आयुष्याचे साठच्या वर पावसाळे पाहिलेले, माथ्यावर जेमतेम केस राहिलेत, छातीपर्यंत वाढलेली काळी-पांढरी दाढी, नेहरू छाप खादी कुर्ता आणि पायजमा अश्या पोषाखात, ते ओळखीच्या प्रत्येक माणसाला उद्देशून 'हरी ॐ' म्हणत आमच्यापर्यंत येउन पोचले.

त्यांना पाहताच हि व्यक्ती समाजकार्यात असावी अशी शंका आलीच होती, पण त्यांच्या भेटलेल्या प्रत्येकाला उद्देशून 'हरी ॐ' म्हणण्याच्या लकबीमुळे उत्सुकता जास्तच जागृत झाली होती. पुढे आम्हीच त्यांच्याशी परिचय करून घेतला आणि त्यांची खरी ओळख झाली.

आज कालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीत सात्तत्य राखणे किती अवघड झालं आहे. मग ते 'जिम' ला जाणं असो कि नियमित वाचन असो , बऱ्याच सेल्फ हेल्प पुस्तकामधून वाचायला मिळतं कि कोणत्याही गोष्टीत सातत्य हवं असेल तर ती गोष्ट कमीत कमी सलग २१ दिवस केली पाहिजे म्हणजे त्या क्रियेत आपलं सातत्य पुढेही राहत, तिथे हरी ॐ काकांनी गेली २५- ३० वर्ष झालं समाजसेवेच्या कामात कुठलंही वेतन न घेता स्वतःला अक्षरशः वाहून घेतलंय . निवृत्ती नंतर तर ते अधिकच जोमाने काम करतायत, अन तेहि कोणत्याही सेल्फ हेल्प पुस्तकांच्या कुबड्या न वापरता.

गेली २५-३० वर्ष झालं काका ग्रामीण भागातील गरजू मुलांसाठी मदत गोळा करत आहेत, ते जवळपास तेवढ्याच संस्थाशी जुडलेले आहेत. मदत, ती मग कश्याच्याही स्वरूपात असुद्या पैसे, वह्या, पुस्तके, गोष्टींची पुस्तके, कादंबऱ्या, जुने कपडे, जुनी खेळणी, जुन्या वापरण्याच्या वस्तू, असं काहीही जे वापरण्यायोग्य आहे. तसच ते मुलांना दत्तक देणे/घेणे यासारखी मदत गरजूंना करतात.

मला काका भेटेपर्यंत अशी एकही व्यक्ती आढळली नव्हती कि जिने आपल्या पहिल्या पगारापासून ते कालच्या पेन्शन पर्यंतचा थोडा का होईना हिस्सा समाजकार्यात लावला असेल. काका आज ५१ वर्ष झालं हे न चुकता दर महिन्याला करतात. ते 'लिड विथ एक्झाम्पल' चे मूर्तिमंत उदाहरणच म्हणता येतील.

ते म्हणतात "मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणी वृत्ती हेच सांगते कि स्वतः तर करायचच पण दुसऱ्यालाही ते करण्याला प्रवृत्त करायचं."

काकांच्या आणि देणाऱ्यांच्या मदतीने आजपर्यंत अनेक मुलांनि आपलं शिक्षण पूर्ण केलंय.
काका सांगत होते " अश्यातच एक मुलगा C.A.झाला, सध्या दोन गरजू मुलं सध्या इंजिनीयरिंग करतायत. त्यांचा दर महिन्याला ५ हजार खर्च येतो, तो असंच देणाऱ्या लोकाकडून कडून मिळवून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे."
आणि विशेष म्हणजे तो C.A. झालेला विद्यार्थी काकांना बाकीच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करत आहे.
"एक झाड जे माझ्या मामांनी लावलं, मी तोच वसा पुढे चालू ठेवलाय." असं काका म्हणतात आणि त्याहीपुढे जाऊन त्यांच्या मदतीने शिकलेली मुले त्यांच्या कामात आज हातभार लावतायत.

बहुत करून काका ग्रामीण भागातील संस्था यांच्याशी जोडले गेले आहेत. ते म्हणतात तिकडेच खरी गरज आहे आज शहरामध्ये शासकीय मदतीशिवाय उभ्या असलेल्या संस्थांना मुबलक पैसा मिळतो पण ग्रामीण भागात एवढा पैसा कुठून येणार? पण असहि नाही कि ते कोणीही आला कि त्याला मदत करतात . गरजूंची पूर्ण चौकशी करूनच, खरी गरज जाणूनच ते मदत करतात.

ते महानगरपालिकेतून सेवा निवृत्त झाले, पण आजही आपल्या पेन्शन मधून काही वाटा गरजू संस्थेला/ विध्यार्थ्यांना देतात.
आपल्यात असे बरेच आढळतील ज्याना समाजासाठी खूप काही करायचं असतं पण त्यांना हि भिती असते कि आपली मदत योग्य लोकापर्यंत पोहचेल कि नाही? त्यांना काका गरजूंची माहिती देतात किंवा त्यांचा परिचय त्या संस्था,विद्यार्थी यांच्याशी करून देतात.

आम्ही भेटलो त्या दिवशी त्यांच्या खिश्यात दीड लाखांचा बेअरर चेक होता. ते सांगत होते आता लोकांचा विश्वास बसलाय ते निसंदेह्पणे माझ्याकडे मदत सोपवतात, त्यामुळे माझीही जबाबदारी दिवसेंदिवस वाढत चाललीये आणि यातूनच आपल्याला उर्जा मिळते.

आजपर्यंत काकांनी अंदाजे ५० लाख रुपयापर्यंत मदत केलेली आहे. अर्थातच त्यातलि बहुतेक रक्कम देणाऱ्या गटाकडून आलेली असेल.
आज काका 'देणारा' गट आणि 'घेणारा' गट यांच्यामधला सेतू बनले आहेत.

ते सांगतात, "एक वेळ आम्ही एक वेगळाच उपक्रम राबवला होता, आम्ही असे १९ शिक्षक निवडले जे कि तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. त्यांना ते करीत असलेल्या योगदानाची जान ठेऊन, दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाला पाच हजार रुपये दिले. त्यात त्या गुरुजनांचा आदर सत्कार करण्याचीच इच्छा होती.
त्यात एका शिक्षकाने तर एक रकमी पाच हजार रुपये आजपर्यंत पाहिलेहि नव्हते. तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातील अश्रू , चेहऱ्यावरचा आनंद , तिच माझी प्रेरणा आहे. या सर्वातूनच आत्मिक आनंद मिळतो."

त्यांना नावाबद्दल विचारलं असतां ते सांगतात, "स्वामी चिन्मयानंद यांच्या चिन्मय मिशनचे काम करत होतो, त्यांची एक गोष्ट फार आवडली. ते भेटले कि 'हरी ॐ' असं म्हणायचे आणि प्रतिउत्तर हि तेच यायचं, पुढे जसा सामाजिक क्षेत्रात काम करू लागलो तसं ती सवय काही गेली नाही आणि मग पुढे तर नावच पडलं 'हरी ॐ' म्हणून, तुम्ही माझं खरं नाव घेऊन 'सदाशिव मालशे' म्हणून विचारलत इथे तर खूप थोडे ओळखतील पण 'हरी ॐ' म्हटल तर लगेच लक्ष्यात येईल."

काका सांगत होते, "मला बरेचजण विचारतात आता रिटायर झाल्यावर तुम्हाला देव देव करायला भरपूर वेळ मिळत असेल, त्यावर ते सांगतात, जे पोथी पुराणांमध्ये सांगितलंय तेच मी आचरणात आणतो, त्यामुळे मला काय गरज आहे देव देव करण्याची?"
किती खरं आहे ते. नाहीतर आज कालचे टीव्ही च्यानेल्स वर पोथी, पुराणे सांगणारे बरेच बाबा त्यांच्या आचरणाने जेल मध्ये आहेत.

काकांनी धोपट मार्ग सोडला खरा पण त्यांनी त्यातही सुवर्णमध्य साधला आणि संसारहि तेवढ्याच जिद्दीने केला. आज त्यांच्या दोन्ही मुली लग्न होऊन आपआपल्या घरी सुखाने नांदताहेत, पण दुर्देवाने त्यांच्या पत्नीचं कॅन्सरने निधन झालं.
काही माणसे खरच विचित्र असतात त्यांना कुठे? काय? कोणाला? बोलावे काही कळत नसतं, अश्याच एकाने जेंव्हा त्यांच्या पत्नी वारल्या त्यावर काकांना "तुमच्यासोबत असं का व्हावं? असं विचारलं होतं. तर न रागावता न चिडता काका बोलले. "बहुतेक परमेश्वरालाच असं वाटतंय कि ह्याला आता प्रपंचातून मुक्त केलं पाहिजे म्हणजे हा त्याच्या सामाजिक कामात जास्त लक्ष्य देऊ शकेल."
काकांचा परमेश्वरावरील विश्वास अजूनही दृढ आहे आणि ते किती सकारात्मक आहेत हे त्याचं उदाहरणच आहे.

काकांच्या बोलण्यात दोन वाक्य नेहमी येतात.
"थोडा हात तिरका करायला शिका" आपण अर्ध्य देतोना तसं. या अर्थाने, कोणाला तरी द्यायला काय हरकत आहे?
आणि "तुम्हाला नको असलेली वस्तू माझी गरज आहे." फक्त ती वस्तू वापरण्यायोग्य पाहिजे.

काका सांगत होते "आम्ही बऱ्याच अनाथ आश्रमासाठी दिवाळीचा फराळ वगैरे गोळा करतो. त्यांच्याही दारी दिवाळी पहिल्याच दिवशी सुरु व्हावी, असा आमचा प्रयत्न असतो. पण काही लोकं घरी कोण खात नाही म्हणून राहिलेला फराळ आणून देतात, चिवड्यात चकली, लाडू निघतो. असं नकोय आम्हाला, भलेही तुम्ही फक्त एक लाडू द्या पण तो मनापासून द्या, मी तोच त्यांच्यापर्यंत नेउन देईन मला शंभर लाडू जे राहिलेले आहेत ते नकोत."

"तुम्हीच एखादी संस्था का नाही सुरु करत? " काकांना असं विचारलं असता, त्यावर ते फार मार्मिक बोलतात "मी नवीन संस्था सुरु करणार पुन्हा त्यासाठी मदत मागत फिरणार, त्यापेक्ष्या ज्या संस्था सध्या डबघाईला आलेल्या आहेत त्यांनाच का संजीवनी देऊ नये?"

असा उद्दात्त विचार करणाऱ्या काकांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते पुरस्काराची रक्कम सुद्धा अर्थातच सामाजिक कामासाठी वापरतात.
सामाजिक कामात सातत्य आवश्यक असतं आणि याचसाठी जणू ते गेली १७ वर्ष झालं रोज सकाळी ८ ते १ विना वेतन पुण्यातल्या निवारा वृद्धाश्रमात उपलब्ध असतात.

काकांचं गाव कोकणातलं चिपळूण जवळचं एक खेडेगाव 'गांग्रई'. काका लहान असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांचे मामा श्री गजानन जयराम बापट हे काकांना त्यांच्या आई व बहिणी सोबत पुण्याला घेऊन आले.

काका सांगत होते,
"त्या काळात मामांना पगारही फारसा नव्हता पण तरीही त्यांनी आपल्या विधवा बहिण व भाच्यांना तिकडे गावाकडे न ठेवता पुण्याला आणलं. त्यांचा मी खूप ऋणी आहे. आज मी जो काही आहे तो माझ्या मामांशिवाय झालो नसतो. एक मजेची गोष्ट आठवली , ज्या वेळेस पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो तेंव्हा विजेचा दिवा आयुष्यात पहिल्यांदा पाहिला आणि मोठं आश्चर्य वाटायचं कि कळ दाबली कि कसं काय दिवा पेटतो,"

जुन्याकाळी एक 'नादारी' म्हणून संकल्पना होती. ६०% पेक्ष्या जास्त मार्क्स असणाऱ्या विध्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जाई. त्याद्वारे काकांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तरीपण त्यांना टर्मफी असायचीच, ती माफ होत नसे. ती माफ होण्यासाठी काका शाळेचे पटांगण साफ करणे,त्यावर पाणी मारणे अशी कामे करत.
काकांनी हलाखीची परिस्थिती असून सुद्धा न डगमगता शिक्षणासाठी भरपूर कष्ट केले, वेळेवर ते घरगडी झाले, त्यांनी वृत्तपत्रे टाकली अशी कामे करून ते कॉमर्स ग्र्याजूएट झाले.

पुढे काका सांगत होते, " मला कोणी 'रम्य ते बालपण' वगैरे असं म्हटलं कि एक प्रकारचा उद्वेग येतो मनामध्ये, कोण म्हणतं बालपण रम्य असतं?, आम्हाला ते नाही जाणवलं, आमचं नाही गेलं तसं म्हणून असेल कदाचित."

असा मनामध्ये बालपणाबद्दल किंतु ठेऊन एखादा आयुष्यभर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसला असता किंवा बऱ्यापैक्की कमवायला लागल्यावर सुखी आयुष्य उपभोगत बसला असता, पण काका त्यातले नक्कीच नाहीत, ते आपल्याला जे भोगावं लागलं ते दुसऱ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून सतत झटत आहेत.

काकांना मी जेंव्हा विचारलं कि, "तुमच्यावर लिहूका?" तर त्यांचं पहिल वाक्य होतं " प्रसिद्धी साठी लिहित असाल तर नको, पण जर याद्वारे मी समाजातील देणाऱ्या वर्गापर्यंत पोचणार असेल तर जरूर लिहा. "

असे कित्येक लोक असतील कि जे प्रसिद्धी साठी काय काय करतात पण इथेही त्यांना प्रसिद्धी नको तर वंचितांचीच जास्त काळजी वाटते. त्यांच्यासारखे असे खूप थोडे लोक समाजामध्ये असतील जे स्वतःला दिव्याच्या वातीसारखे जाळून बाहेरच्या अंधकारात प्रकाश देत आहेत.

' हरी ॐ' तथा सदाशिव मालशे
९१ दत्तवाडी, कुंडले जोशी यांचे घर
दत्तवाडी मशिदीसमोर, पुणे ४११०३०
मोबाईल- ९६०४४४१३०२
फोन २४३२१६३२

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलाय लेख.
नि:स्वार्थीपणे अशी सेवा करणारी 'देवतुल्य' माणसे फारच दुर्मिळ झाली आहेत.

अतिशय सुंदर लेख लिहिला आहे .

त्यांच्यासारखे असे खूप थोडे लोक समाजामध्ये असतील जे स्वतःला दिव्याच्या वातीसारखे जाळून बाहेरच्या अंधकारात प्रकाश देत आहेत.>>> ++१

मस्त लिहिलंय.....

सध्याच्या काळातही अशी निरलसपणे नि:स्वार्थी भावनेने कामे करणारी माणसे आपल्या आसपास आहेत हे आपले भाग्यच....

छान लिहिलंय मीही भेटलेय याना.>>>>जर याद्वारे मी समाजातील देणाऱ्या वर्गापर्यंत पोचणार असेल तर जरूर लिहा.>>> आवडलच.श्वासाइतकी सहज असते अशा लोकांची समाजसेवा.

सध्याच्या काळातही अशी निरलसपणे नि:स्वार्थी भावनेने कामे करणारी माणसे आपल्या आसपास आहेत हे आपले भाग्यच.... >>>>> +१००००

छानंच लिहिलंय .....

आवडलं Happy