तालीम

Submitted by जीवनगंधा on 8 July, 2014 - 03:22

शनिवारी सकाळी सकाळी नाटकाच्या तालिमीसाठी जमलो. आदल्या रात्री बरंच जागरण झालं होतं… आठवडा संपला ह्या आनंदात शुक्रवारी रात्री कुणाला तरी भेटून चकाट्या पिटल्या होत्या… शिवाय आठवडाभर बरंच कामही केलं होतं. नाटकं बिटकं करायची हौस असली तरी आठवडाभर कामासाठी राबणं चुकत नाहीच… पार दमवून टाकणाऱ्या आठवड्यानंतर, शनिवारी सकाळी लवकर उठून नाटकाच्या तालीमीसाठी अर्धा तास गाडी चालवत जाण्याचा आजिबातच मूड नव्हता. शिवाय तालिमीचं ठिकाणही जरासं अंधारं आणि उदासीन.… सकाळी सकाळी अगदी उत्साहानं जावं, असं नाहीच. बुडवावी का तालीम सरळ? असा एक चुकार विचार मनात आल्यावाचून राहिला नाहीच. पण पहिला प्रयोग फक्त एका आठवड्यावर येऊन ठेपला होता. शिवाय रंगमचावर बरेच कलाकार एकाच वेळी असणार होते. त्यामुळे सगळ्यांची आवळ्याची मोट बांधून, प्रत्येकाच्या चुका सांभाळत, काम करणं भाग होतं. दिग्दर्शकाची अवस्थाही popcorn बनवण्यासाठी टाकलेल्या मक्याच्या दाण्यासारखी झाली होती. केव्हा फुटेल ह्याचा नेम नाही.… किंवा वात पेटवल्येल्या, लवंगी फटाक्याच्या माळेसारखी… सतत फुरफुर चालू. कोणत्याही क्षणी फुटणार! कुणी वाक्य चुकलं, फाड… कुणी अनावश्यक प्रश्न विचारला, तडाड…. सतत चीडचीड, कटकट चालू असली की सगळ्यांनाच वैताग येतो. सगळे जणच काहीसे दडपणाखालीच होते…

तालिमीला सुरुवात करण्याआधी सगळे जण गोलामध्ये बसलो. दोन्ही बाजूच्या शेजाऱ्याचा हात धरून, डोळे मिटून सगळ्यांनी एकत्र ओंकार लावला. बारा, पंधरा जणांचा तो खर्ज्यातला ओम… एका सुरात लावलेला… वेगळीच उर्जा देणारा… मन एकदम शांत झालं. एकाग्र झालं.

नकळत डोळ्यासमोर ओंकारेश्वराचा गाभारा उभा राहिला.… मी लहान असताना माझी आजी तिच्याबरोबर मला ओंकारेश्वराच्या मंदिरात घेऊन जात असे… पुलाजवळच्या पायऱ्या उतरून खाली गेलं की नदीकाठाला लागून असलेलं ते दगडी देऊळ दिसायचं. देवळासमोर मोठं अंगण होतं. चपला लांबच काढून ठेवायला लागायच्या. त्यामुळे अंगणातून देवळापर्यंत पोचेपर्यंत पाय भाजायचे. देवळात पाऊल टाकलं की मात्र आतल्या थंडगार फरशीचा स्पर्श तळपायांना सुखावून जायचा… समोर गाभाऱ्यात अंधार.… काळ्या पिंडीभोवती मांडलेली पिवळ्या शेवंतीची आरास… त्यावर तांब्याच्या तांब्यातून होणारा अभिषेक.… जानवं घातलेले, चंदनाचं गंध लावलेले पुजारी… गाभाऱ्याबाहेर बसलेल्या लांब दाढीवाल्या साधूबाबानं लावलेला धीरगंभीर ओंकार…. कुणी तरी देवळात आल्या आल्या वाजवलेली एकच घंटा… हळूहळू विरत जाणाऱ्या त्या घंटानादाच्या ध्वनीलहरी….

काही क्षणांमध्ये ते सगळं चित्र डोळ्यासमोर आलं… तिथले आवाज कानांमध्ये उमटून गेले…. अंधाऱ्या, उदासीन वाटणाऱ्या त्या तालीमीच्या खोलीनं, काही क्षणांमध्ये मला ओंकारेश्वराच्या प्रसन्न गाभाऱ्यात नेऊन आणलं… वाटलं, बरं झालं नाही चुकवली आजची तालीम… नाहीतर घरी राहून नुसतं पलंगावर लोळण्यात शनिवार सकाळ गेली असती…

ठरल्याप्रमाणे, सगळ्यांनी मिळून तीन वेळा ओंकार लावला… टप्प्याटप्प्यानं वाढत जाणाऱ्या पट्टीत…. मग अलगद डोळे उघडले. दोन्ही हात अजूनही दोन बाजूच्या शेजाऱ्यांच्या हातात होते. काही क्षण कुणीही काहीही बोललं नाही. काही जणांनी अजून डोळेही उघडले नव्ह्ते. दिग्दर्शकानं शांतपणे त्या दिवशीच्या तालीमीचे तपशील सांगितले. कुणाच्या काय चुका होत आहेत, त्याची आठवण करून दिली. आणि नंतर कुणाला काय चांगलं जमत आहे, ते ही सांगितलं! कधी फारसं कौतुक न करणाऱ्या आमच्या दिग्दर्शकाच्या तोंडातून दोन चार बरे शब्द अगदी अनपेक्षितपणे ऐकल्यामुळे, उन्हाळ्यातल्या कावलेल्या दुपारी अचानक गार वाऱ्याची हलकी झुळूक आल्यासारखं वाटलं… सगळेच जरा खुश! मग उठलो. All the best! Cheers! वगैरे म्हणून विंगेतल्या आपापल्या जागी जाऊन उभे राहिलो. एवढे दिवस तालीम करणाऱ्या आमच्या सगळ्या संघाची एकत्रित उर्जा एकदम बळ देऊन गेली. इतक्या जणांच्या कष्टातून सफल होऊ घातलेल्या ह्या कलाकृतीचा मी एक भाग होऊ शकत आहे, ह्याचं कुठेतरी समाधान वाटलं… ओंकारानं सगळं वातावरणच पार बदलून टाकलं… तालीमीसाठी मी आता तयार होते…

काही क्षणातच, नेहमीसारख्या गंभीर, पण किंचित हळव्या आणि उत्सुक आवाजात दिग्दर्शकानं पडदा उघडण्यापूर्वीचे अंक मोजायला सुरूवात केली……

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान