दु:खाचे स्वरूप

Submitted by नरेंद्र गोळे on 7 July, 2014 - 06:40

घर छोड के चले थे, खुशी की तलाश में, खुशी की तलाश में,
गम राह में खडे थे, वहीं साथ हो लिये,
यूँ हसरतों के दाग मोहोब्बत में धो लिये
खुद दिल से दिल की बात कहीं, और रो लिये

अशाप्रकारे सुखाच्या शोधार्थ घराबाहेर पडलेल्यांच्या वाटेवरच उभी असणारी दुःखे, त्यांची सोबत करू लागतात. मग स्वतःलाच त्या दुःखाचा सल सांगून रडून घ्यायची पाळी येते. त्यामुळे दुःख म्हणजे काय हे कुणालाही सांगावे लागत नाही. जन्म घेणारी बालके तर दुःख सहन न होऊन रडत रडतच ह्या जगात अवतीर्ण होत असतात.

विख्यात फ्रेंच कादंबरीकार व्हिक्टर ह्युगो ह्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे 'ला मिझरेबल्स'. मराठीत भा.रा.भागवतांनी तिचा सुरेख अनुवादही केलेला आहे 'दुःख पर्वताएवढे'. त्या कादंबरीतील व्यक्तीरेखा एकापेक्षा एक अधिक दुःख सोसणार्‍या असतात. त्यांच्या दुःखांपुढे आपल्याला आपली दुःखे कःपदार्थ वाटू लागतात. मात्र त्यांच्या दुःखातील अनुभूती आपलीच आहे की काय, असे क्षणभर वाटून वाचक आपली नाळ त्या कादंबरीशी जोडून घेतो. ती कादंबरी अशा प्रकारेच विश्वविख्यात झालेली आहे.

दुःखे केवळ शारीरिकच असतात असे नव्हे तर दुःखे मानसिकही असतात. एम.जी.रामचंद्रन निवर्तले ही बातमी ऐकूनच काही लोकांना इतके अपार दुःख झाले की त्यांनी साक्षात मृत्यूलाही जवळ केले. पराभवाच्या भीतीने आत्महत्या करणारा विख्यात हुकूमशहा हिटलर तर सर्वश्रुतच आहे. मात्र अशा दुःखांची जातकुळी मानसिकच असते.

शारीरिक दुःखेही पराकोटीची असू शकतात. एवढी की त्यापेक्षा ते दुःखित, मृत्यूही आनंदाने पत्करतात. ८०-९० टक्के भाजल्याने होरपळलेले लोक, जेव्हा त्यातच जातात, तेव्हा नातेवाईकही सुटकेचा निश्वास टाकतात. कारण त्या होरपळलेल्यांचे दुःख केवळ त्यांनाच जाळत नसते, तर नातेवाईकांनाही ते असह्य होऊन जात असते.

आपलीच अनेक दुःखे, अनेकदा तुल्यबल राहत नाहीत. जेव्हा दात दुखत असतो, तेव्हा असे वाटते की ह्या जगात दातदुखीसारखी दुखीच नाही. पोट दुखणारेही ह्याच मताचे असतात. अर्धशिशीने डोके दुखणारेही असेच मत व्यक्त करतात. अस्थिभंगाच्या प्रकरणांत तर ठणका सहन न झाल्याने विव्हळणारे आपल्या दुःखाचे वर्णनही करण्यास असमर्थ ठरतात. म्हणून एक असे कुतुहल निर्माण होते की दुःखाचे खरे स्वरूप असते तरी कसे?

मला नागीण झाली, तेव्हा ही सारीच दुःखे मला क्षुल्लक भासू लागली. नागीण ह्या आजारात चेतातंतूदाह होऊन दुःखाची निर्मिती होते. चेतातंतूच्या मार्गावर, कोरडेपणा, तडतड, जळजळ, आग अशा संमिश्र भावना जाणवू लागतात. जळीताच्या प्रकरणासारख्याच, लालसर, पुळ्या उमटू लागतात. त्या वाढत वाढत परस्परांस भेटतात. फुटतात. खूप आग होते. यथावकाश (सुमारे एक ते दोन सप्ताहांतच) खपल्या पडून पुळ्या बर्याा होऊ लागतात. मात्र त्रास कमी होतच नाही. पुळ्या ही केवळ मूळ त्रासाची अभिव्यक्ती असते. ह्या आजारात, बाह्य लक्षणे ही, मूळ त्रासाची केवळ अभिव्यक्ती असतात. दुःखानुनयी असतात. लक्षणे ही दुःखपर्यवसायी असण्याची आपली सवय मात्र, लक्षणे बरी होताच दुःख कमी होण्याची अपेक्षा करू लागते. अशा प्रकारच्या विपरित करणीचे, अनेक महिने टिकून राहणारे, अपार दुःख, नागीण अनुभवास आणते.

गौतम बुद्धाला जेव्हा दुःखाचे स्वरूप लक्षात आले, तेव्हा तो सर्वसंगपरित्याग करून दुःखाचे मूळ शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मग बोधी वृक्षाखाली त्याला जो बोध झाला तोच बुद्ध धर्म!

त्या धर्माचे सार सांगायचे तर:
सुख हैं इक छाव ढलती, आती हैं जाती हैं, दुःख तो अपना साथी हैं
मग एकदा का दुःखाला आपले मानले की, उरते काय तर सुखच सुख!

’जगाच्या पाठीवर’ सिनेमात तर, जगात दुःख आणि सुखाचे प्रमाण शंभरास एक असल्याचे गजानन दिगंबर माडगुळकरांनी लिहूनच ठेवलेले आहे. ते म्हणतातः

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे

आपल्या कार्यकर्तृत्वाने जगातील दुःख नाहीसे करण्याचा शर्थीने आटापिटा करणारी माणसे, किमान आपल्या व आपल्या आप्तेष्ठांच्या जीवनातील दुःख नाहीसे करण्यात यश मिळवतात. मग जग सोडून जातांना त्यांना दुःख होत नाही. समाधानाने कृतकृत्य होऊन ते परलोकाच्या वाटेवर मार्ग चालू लागतात. योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर ह्यांच्या मृत्यूसमयी, ’धन्योऽहं’ (मी धन्य झालो!) म्हणतच त्यांनी वयोवृद्ध अवस्थेत देह ठेवला.

तर मग दुःखाचे खरे स्वरूप काय आहे? जन्मतः निर्माण होते ते दुःख. कर्तृत्वाने नाहीसे करता येते ते दुःख. जे मानवी जीवनाला स्वनिरसनाचे उद्दिष्टच पुरवते ते दुःख. की धर्मनिर्मितीचे मूळ म्हणजे दुःख!

http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users