स्विट्झर्लंडचे अनुभव.. ५

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

स्वीसमधे तीन भाषा बोलल्या जातात. ६०% जनता जर्मन बोलते. स्वीस जर्मन डायलेक्ट जर्मन बोलणार्‍या प्रांतात बोलली जाते. जशी आपली मराठी किंवा कोकणी प्रांताप्रांतातून बदलते तशीच वालिस(एक स्वीस कॅन्टन)ची भाषा सेंट गालनच्या लोकांना समजायला कठीण जाते. जरी स्वीसमध्ये भाषावार प्रांतरचना आहे तरी त्यावरुन राजकारण होत नाही. काही कॅन्टोन्स ऑफिशिअली द्विभाषिक आहेत, तिथे लोक जर्मन किंवा फ्रेंच दोन्ही भाषेत प्रवीण असतात. उदाहरणार्थ, Fribourg or Biel ही शहरे दोन्ही भाषा वापरतात. आणखी एक भाषा इथे आहे... रोमान्श, पण ती ३५,००० लोकंच बोलतात.... त्यामुळे मी इथे त्याबद्दल फारसं लिहित नाहीये.

स्वीसमध्ये जेव्हा आम्ही आलो म्हणजे - २५ वर्षांपुर्वी - तेव्हा इथली भाषा येणे जरुरीचे होते. (आता इंग्रजीचा प्रसार झाला आहे... आयटीमुळे इंग्रजी शिकणे अपरिहार्य झाले त्यामुळे स्वीस बर्‍यापैकी इंग्रजी बोलतात.) आम्ही आलो ते जर्मन प्रांतात. स्वीस जर्मन लिहिले जात नाही त्यामुले लेखी व्यवहार जर्मनमध्ये होतो. वर्तमानपत्रे जर्मन भाषेत असतात, दूरदर्शनवर बातम्या जर्मनमध्ये असतात्; फक्त वेधशाळा दूरदर्शनवर हवामानाचा अंदाज स्वीस जर्मनमधे वर्तवते. तुमच्या आजुबाजुला, रस्त्यावर, दुकानातुन स्वीस जर्मनच बोलली जाते, इतकंच काय पण ऑफिसमध्ये मिटींगला स्वीस जर्मनच वापरतात. तुम्ही सांगू शकता की लेखी जर्मनमध्ये मिटिंग घेतल्यास मला समजायला बरे पडेल.... तुमच्यासाठी सुरू करतात जर्मनमधे मिटिंग पण पाच मिनिटांतच स्वीस जर्मनमध्ये संभाषण सुरु होते. त्यामुळे भाषा शिकल्यावाचून पर्याय नाही. जिथे राहतो तिथली भाषा शिकलीच पाहिजे.

ज्यांची स्वीस जर्मन मातृभाषा असते ते शाळेत जर्मनमध्ये लिहिताना चुका करतात किंवा त्यांना जर्मन कठिण जाते. याचं एक कारण म्हणजे शाळेत शिक्षक विषय स्वीस जर्मनमध्ये समजावून सांगतात पण वाचतात जर्मनमध्ये.... या गुंतागुंतीमुळे आता शिक्षकांना वर्गांत लेखी जर्मन बोलण्यास सांगण्यात आले आहे.

स्वीस समाज सुमारे चाळीस वर्षांपुर्वी कुटुंबप्रिय होता. रुढीप्रिय स्वीस अजुनही कुटुंबपध्दती टिकवून आहेत. नवी पिढी वेगळा विचार करते. त्यामुळे विभक्त होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. शून्याच्या खाली बर्थरेट गेला आहे. रहाणीमान उच्च असल्याने मुलं परवडत नाहीत. चिंतेची बाब आहे.

प्रत्येक स्वीस मिलिटरीत असतो. त्यामुळे ८०% घरांत बंदुका अगर रायफली असतात. पण गुन्हेगारी अजिबात नाही म्हटलं तरी चालेल. फार झालं तर स्वीस माणूस मिलिटरीच्या शस्त्रांनी आत्महत्या करील पण शस्त्र दुसर्‍यावर चालवणार नाही, अर्थात अपवाद असतीलच. काही प्रमाणात जनता अंतर्मुख आहे. 'जगा व जगू द्या' अशा विचारांची आहे. त्यामुळे आपण दुसर्‍या देशातील असुनही आपला धर्म, राहाणी जतन करु शकतो. त्यांचे कायदे कानून संभाळून आपण आपलं वेगळेपण जपलेलं त्यांना खूप आवडतं.

विषय: 
प्रकार: